‘सुगीभरल्या शेतातून’ या कवितासंग्रहात निसर्गकवी इंद्रजित भालेराव यांच्या निवडक कवितांचे संपादन रणधीर शिंदे यांनी केले आहे. ‘माझे संस्कारक्षम वय  खेडय़ात आणि शेतीत राबण्यातच गेल्यामुळे माझ्याही नकळत कवितेचा विषय ठरून गेलेला असतो.  शेती हे माझ्या आयुष्यातले आणि कवितेतलेही नंदनवन आहे.’ असे एका मुलाखतीत इंद्रजित भालेराव यांनी म्हटले आहे. निसर्ग, शेती आणि शेतीशी संबंधित गोष्टींमध्येच त्यांची कविता रुंजी घालत असते. मात्र त्यांची कविता निसर्ग आणि शेतीशी संबंधित अगणित गोष्टींशी गुज साधत असते. निसर्गाचं मनोहारी चित्रण त्यांच्या कवितेतून दिसते. शेतीशी संबंधित असल्याने श्रमसंस्कृतीचा अनोखा आविष्कार या कवितांमधून दिसतो. त्यांची कविता शेतीजीवनाशी बांधलेली आहे. निसर्गाविषयी असलेले प्रेम, श्रद्धाभाव त्यांच्या कवितांमधून प्रकट होतात.

‘माझ्या कवितेला यावा शेना-मातीचा दर्वळ

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

तिने करावी जतन काटय़ाकुटय़ात हिर्वळ’

आपल्या कवितेविषयी हीच त्यांची मनोभूमिका आहे.

‘मेघा मेघा’ ही  कविता मन विषण्ण करून जाते.

‘मेघा मेघा, ये गा ये गा

रानामधी झाल्या भेगा

भेगा भेगा झाल्याभळी

भळीमध्ये गेला बळी

बळी गेला पाताळात

वामनाने केला घात..’

जगरहाटी बदलत चालली आहे याचे यथार्थ दर्शन होते ‘विठूचे मंदिर’ या कवितेत.

‘होते विठूचे मंदिर। होता सोन्याचा पिंपळ।

होते एकीचेही बळ। गावामध्ये।। ’ अशा या गावाची अवस्था ‘माय भाकर देईना। बाप भिकेला आडवी। पायाखालती तुडवी। जनलोक।।’ अशी झाली आहे.

कवी आपल्या कवितेतून तुकारामालाही प्रश्न विचारतात-

‘खरं सांग तुकया। तुझा अनुभव

तुला कधी देव भेटला का’

शेतच कवीचे सर्वस्व आहे.  ‘शेतच इमान’ या कवितेत कवी म्हणतो-

‘शेतच इमान। शेत माझा मळा

शपथेचा गळा। शेत माझे’

पावासाच्या वाट पाहण्यावेळच्या मनोवस्थेचं सहजसुंदर वर्णन कवी करतो- ‘पावसा पावसा, पिसारा फुलू दे

कोवळ्या हातात पागोळ्या झेलू दे

धामोका फुटू दे, चिंचोका उलू दे’

शेतकऱ्यांना कणखर व्हा, परिस्थितीवर मात करायला शिका असं कवीचं सांगणं-

‘शीक बाबा, शीक, लढायला शीक

कुणब्याच्या पोरा, आता लढायला शीक’

इंद्रजित भालेराव यांची कविता निसर्गातील अनेक गुजगोष्टी सांगते, तशीच ती श्रमजीवी शेतकऱ्यांचे सुख-दु:खही मांडते. त्यांच्या व्यथांना वाचा फोडते. त्याच्या कष्टमय आयुष्याची लोकांना ओळख करून देते. या कविता म्हणजे कवीप्रेमींसाठी वेगळी पर्वणीच आहे. रणधीर शिंदे यांनी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून इंद्रजित भालेराव यांची कविता उत्तमपणे उलगडली आहे.

‘सुगीभरल्या शेतातून’-

इंद्रजित भालेराव,

संपादन : रणधीर शिंदे, सुरेश एजन्सी,

पाने-१६०, किंमत-२२० रुपये.