अंजली कुलकर्णी

अरुणा सबाने हे आजमितीला महाराष्ट्रातील सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील एक मोठे नाव. राजकीय- सामाजिक निडर भूमिका घेऊन सार्वजनिक हितासाठी निरंतर संघर्ष करणारी कार्यकर्ती म्हणून त्या सर्वपरिचित आहेत. त्याबरोबरच त्या प्रकाशक आणि लेखक म्हणूनही कार्यरत आहेत.  त्यांनी लिहिलेली ‘विमुक्ता’, ‘मुन्नी’, ‘ते आठ दिवस’, ‘आईचा बॉयफ्रें ड’ ही पुस्तके त्यांतील वैशिष्टय़पूर्ण आशयमांडणीमुळे गाजली. गेले वर्षभर त्यांचे ‘सूर्य गिळणारी मी’ हे आत्मचरित्र चर्चेत आहे.

arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Dealing with anti-recipe trolls on social media
एका पाककृतीविरोधातील ट्रोलधाडीला सामोरे जाताना…

सूर्याप्रमाणे सतत धगधगणारे आयुष्य त्या जगल्या आहेत. एखाद्या स्त्रीने आपला संपूर्ण जीवनपट काहीही न लपवता जसाच्या तसा पुस्तकात मांडणे यासाठी जे प्रचंड नैतिक धैर्य लागते ते असीम धैर्य अर्थातच अरुणा यांच्याकडे आहे.

हे आत्मचरित्र म्हणजे केवळ अरुणा सबाने या एका स्त्रीची जीवनगाथा आहे असे नाही, तर त्या माध्यमातून आपल्या वर्चस्ववादी पुरुषसत्ताक घृणास्पद व्यवस्थेचे अत्यंत वास्तववादी प्रातिनिधिक दर्शन त्यांनी घडवले आहे. या व्यवस्थेच्या मुजोर चक्रातून जाण्यावाचून कोणतीही स्त्री वाचलेली नाही. फरक एवढाच आहे की, हे चक्र भेदून स्वत:च्या अस्तित्वाचा शोध स्वत:च्या बळावर घेण्याची जिगर फारच थोडय़ा स्त्रियांमध्ये असते, ती जिगर अरुणा यांनी दाखवलेली आहे. या अपरिमित संघर्षांची गाथाच या आत्मचरित्रात त्यांनी मांडली आहे. नवऱ्याचा क्रूर छळ सहन करण्यात संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या स्त्रियांची संख्या आपल्या देशात कमी नाही. अरुणा यांनीही सोसणे शक्य आहे तेवढा नवऱ्याचा कमाल छळ सोसला, तो कदाचित याच परंपरेच्या एका नेणिवेतील अदृश्य दबावामुळे. माहेरच्या लोकांचा विरोध पत्करून शिक्षण अर्धवट सोडून सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केले, ते लग्न टिकावे, कधी न कधी परिस्थितीत बदल होईल, ही सनातन आस बाळगून अरुणा यांच्यासारख्या लढवय्या स्त्रीनेही पुरोगामी विचारांच्या, कार्यकर्ता असलेल्या, स्त्री-पुरुष समानतेवर प्रभावी भाषणे देणाऱ्या नवऱ्याचा अशक्य जाच, उपेक्षा, अपमान. हेटाळणी सहन केली. तब्बल चौदा वर्षे एकतर्फी तडजोडीचा आटापिटा केला. नवऱ्याच्या विकृत आणि विपरीत वर्तनाचे असंख्य प्रसंग पुस्तकात येतात, ते वाचून अक्षरश: अंगावर काटा येतो. एखादा सुविद्य प्राध्यापक, कार्यकर्ता म्हणून समाजात प्रतिष्ठेने मिरवणारा पुरुष घरात पत्नीशी इतक्या क्रूर पद्धतीने वागू शकतो, हे पाहून दु:खाने मन गदगदून उठते.

अरुणा यांचे माहेर हे विदर्भातील मोठे तालेवार घराणे. राजकीय क्षेत्रात नावाजलेले, प्रतिष्ठित, सुसंस्कृत, पुरोगामी विचार मानणारे म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु त्यांच्या मनाविरुद्ध एका प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचारांना भुलून अरुणा यांनी त्यांच्याशी लग्न केले. लग्नापूर्वीचा प्रियकर लग्न झाल्याबरोबर ‘टिपिकल नवरा’ झाला. एवढेच नाही तर त्याने अरुणा यांच्याशी वर्तन करताना माणूसपणाची पातळीही सोडली. अखेर एका निर्णायक क्षणी अरुणा यांनी निर्धाराने घर सोडले आणि लहान मुलांसह स्वत:ची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी विविध छोटेमोठे व्यवसाय केले. मुलींसाठी हॉस्टेल चालवले. अनेक मुलींच्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम सुरू केले. कौटुंबिक िहसाचाराच्या बळी झालेल्या स्त्रियांना कायद्याचे संरक्षण मिळवून देणे, त्यांना आयुष्यात परत आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी मदत केली. दुसरीकडे बालपणापासूनच्या साहित्याच्या आवडीतून पेपर काढणे, प्रकाशन व्यवसाय सुरू करणे, स्वत:चे लेखन करणे अशा अनेक पातळय़ांवर त्यांनी आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवण्याचा ध्यास घेतला.

अर्थात हा सगळा प्रवास म्हणावा तितका सोपा बिलकूल नव्हता. त्यात अनेक अडचणींचे डोंगर ठायी ठायी उभे होते. आर्थिक अडचणी तर होत्याच, परंतु नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेली महिला म्हणून समाजाच्या नजरांचाही सामना त्यांना करावा लागला. आपल्याकडे संसाराच्या अपयशाचे सारे खापर बायकांवर फोडण्याची जुनीच रीत आहे. नराधमापेक्षा किंचितही कमी नसलेल्या नवऱ्याला कुणीच बोल लावत नाही, त्याला दोषी ठरवले जात नाही, सारा दोष स्त्रीलाच दिला जातो. अरुणा यांना समाजाच्या या उफराटय़ा दृष्टिकोनाचा मनस्ताप किती झाला असेल, याची कल्पना करवत नाही.

अरुणा यांचे वैशिष्टय़ हे की, अशा विपरीत परिस्थितीत धीर न सोडता, अत्यंत कष्ट करून आर्थिक हलाखी सोसून त्यांनी स्वातंत्र्याचा ध्यास घेतला आणि एक अत्यंत खंबीर, प्रतिष्ठित, समाजाला अभिमान वाटावे असे स्वत:ला घडवले. एक प्रकारे घरगुती हिंसाचाराने दबलेल्या स्त्रियांसाठी एक प्रेरणादायी असा वस्तुपाठ त्यांनी आपल्या जीवनाच्या माध्यमातून निर्माण केला.

नवऱ्याच्या छळाने त्रस्त झालेली एक स्त्री ठरवले तर निर्धाराने स्वत:चे जीवन तर उजळू शकतेच; परंतु समाजातील अनेक स्त्रियांच्या जीवनातदेखील स्वाभिमानाची ज्योत पेटवू शकते, समाजाला भूषणास्पद ठरेल असे सामाजिक कार्य उभारते. लेखक, प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ती म्हणून स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करते, हेच या आत्मकहाणीतून अधोरेखित होते.

अरुणा यांनी फार प्रांजळपणे आणि धाडसाने हे लेखन केले आहे. स्वत:चे आयुष्य असे समाजासमोर पारदर्शकपणे आणणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी समाजाच्या, नातेवाईक, परिचित यांच्या रोखलेल्या नजरांचा सामना करावा लागतो. घटस्फोटित नवऱ्याचाही धमकीवजा अदृश्य दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीला म्हटले तसे हे जितके अरुणा यांचे वैयक्तिक चरित्र आहे, तितकेच ते समकालीन समाजाचे विपरीत दर्शनदेखील आहे. एक प्रकारे ते आपल्या स्त्री-पुरुष विषम समाजाचे प्रातिनिधिक चित्रच आहे.

‘सूर्य गिळणारी मी’,- अरुणा सबाने, मनोविकास प्रकाशन, पाने-४९४, किंमत-६०० रुपये.

anjalikulkarni1810@gmail.com