scorecardresearch

Premium

प्रामाणिक डॉक्टरची स्फूर्तिदायी कैफियत

या शोकांतिकेचे एकमेव ‘बळी’ ठरलेले डॉक्टर कफिल खान यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा उत्तम मराठी अनुवाद राजेंद्र साठे यांनी केला आहे.

book review the gorakhpur hospital tragedy by dr kafeel khan translation by rajendra sathe
‘द गोरखपूर ट्रॅजेडी : अनेक मृत्यू, बळी एक’, –  डॉ. कफिल खान, अनुवाद- राजेंद्र साठे,मनोविकास प्रकाशन,  पाने- २४०, किंमत- ३३० रुपये.

प्रमोद मुजुमदार 

डॉक्टर कफिल खान हे नाव आज आपल्या स्मरणातून गेले आहे. गोरखपूर येथील बाबा राघव दास हॉस्पिटल (बीआरडी हॉस्पिटल)मधील एक कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर काम करणारे ते एक बालरोगतज्ज्ञ होते. १० ऑगस्ट २०१७ रोजी या इस्पितळातील द्रवरूप ऑक्सिजन संपला. त्यामुळे पुढील दोन दिवसांत प्राणवायूअभावी गोरगरीब कुटुंबांतील ६३ बालके आणि १८ प्रौढ रुग्ण मृत्युमुखी पडले. या दोन दिवसांत डॉक्टर कफिल खान यांनी अक्षरश: जिवाची बाजी लावून, पदरचे पैसे खर्च करून या बालकांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक बालकांचे आणि रुग्णांचे प्राण वाचले होते. तरीही त्यांनाच या घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले. ही शोकांतिका आणि त्यातील तथ्य ‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’ हे पुस्तक आपल्यासमोर मांडते. या शोकांतिकेचे एकमेव ‘बळी’ ठरलेले डॉक्टर कफिल खान यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा उत्तम मराठी अनुवाद राजेंद्र साठे यांनी केला आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

कफिल खान हे उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सरळमार्गाने जीवन जगणाऱ्या कुटुंबातून येतात. सन्मान आणि प्रतिष्ठा देणारे वैद्यकीय शिक्षण घ्यावे, प्रामाणिकपणे कायदा-नियमांचे पालन करून योग्य पद्धतीने वैद्यकीय सेवा समाजाला द्यावी अशा ‘उच्च’ प्रामाणिक मूल्यांवर ‘भाबडा’ विश्वास असलेला हा एक तरुण डॉक्टर. जगातील ‘दुष्ट’ प्रवृत्तींपासून सर्वशक्तिमान ईश्वर आपले रक्षण करतो, असा ठाम विश्वास तो बाळगतो. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर वैद्यकीय शिक्षण घेऊन, प्रत्यक्ष नोकरीत येईपर्यंत आपल्या भोवतीच्या समाजातील गुंतागुंतीचे, छुप्या हितसंबंधांच्या खेळाचे कोणतेही भान त्यांना नव्हते. असा हा प्रामाणिक तरुण डॉक्टर ‘गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’मध्ये कसा गुंतत गेला आणि भ्रष्ट वैद्यकीय व्यवस्थेमुळे ६३ बालके आणि १८ प्रौढ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणातील एकमेव ‘बळी’ ठरला, याची ही कहाणी. डॉ. कफिल खान यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे अनेक रुग्ण आणि बालकांचे प्राण वाचले; परंतु त्यांच्या या प्रयत्नांमुळे बीआरडी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठा साखळीतील ‘आर्थिक भ्रष्टाचार’ नकळतपणे उघडकीस आला. त्यामुळे हितसंबंधी लोकांना वाचवण्यासाठी या दुर्घटनेला डॉ. कफिल खान यांनाच जबाबदार धरण्यात आले. प्रसारमाध्यमांत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्यात आले. त्यांच्या डॉक्टर पत्नी आणि अन्य कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला गेला. त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले. त्यांच्या भावावर खुनी हल्ला करण्यात आला. त्यांना इतके बदनाम करण्यात आले की समाजात त्यांचे कुटुंब बहिष्कृत होत गेले. डॉ. कफिल खान यांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी अखेरीस पोलिसांना शरण यायला लावले गेले. त्यांना नऊ महिने गोरखपूरच्या तुरुंगात डांबले गेले. हा सर्व भीषण अनुभव वाचणे वेदनादायी असले तरी खूप काही शिकवणारे आहे.

म्हटले तर ही ‘अ‍ॅडम अँड रोश’ या औषध कंपनीच्या भ्रष्टाचाराच्या कहाणीसारखी किंवा जॉन ग्रीशहॅम लिखित एखादी न्याय-वैद्यकीय ‘डिटेक्टिव्ह स्टोरी’ वाटू शकते; परंतु ‘गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’ ही काही डिटेक्टिव्ह स्टोरी नाही. तर आपल्याच देशातील उत्तर प्रदेश या राजकीयदृष्टय़ा वजनदार राज्यातील भीषण अमानुष घटना आहे.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मार्च २०१७ मध्ये स्वीकारली. योगी आदित्यनाथ यांच्या आश्रमाजवळील बीआरडी हॉस्पिटल या सरकारी हॉस्पिटलमध्ये घडलेली ही घटना आहे. ऑक्सिजनचा पुरवठा तीन दिवस ठप्प झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ८१ लोक मृत पावले. या घटनेमुळे नव्याने मुख्यमंत्री झालेले योगी राजकीयदृष्टय़ा अडचणीत आले. आपली प्रतिमा वाचविण्यासाठी त्यांनी अतिशय सुमार राजकीय डावपेच केले. हिंदूत्वाचा ‘गर्व’ बाळगणाऱ्या योगींनी या घटनेचे भांडवल करत कफिल खान या ‘मुस्लीम’ समाजात जन्मलेल्या, प्रामाणिक डॉक्टरला बळीचा बकरा बनविले. नऊ महिने कफिल खान याला तुरुंगात डांबले. छळ केला. भ्रष्ट प्रसारमाध्यमांचा आधार घेत कुभांड रचले. वास्तविक या दुर्घटनेचा प्रामाणिक शोध घेत उत्तर प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था स्वच्छ आणि अधिक लोकाभिमुख करण्याची फार मोठी संधी प्रथमच सत्तेवर आलेल्या योगी आदित्यनाथ यांना होती. मात्र त्यांनी तसे केले नाही. तर एका मोठय़ा अमानुष घटनेचा आधार घेत, एका निरपराध तरुण मुस्लीम डॉक्टरचा बळी घेण्याचा प्रयत्न केला. उत्तम राज्य कारभाराचा आदर्श निर्माण करून ‘जननायक’ बनण्याची संधी तर त्यांनी गमावलीच, पण एका तरुण प्रामाणिक ‘मुस्लीम’ डॉक्टरला त्यांनी ‘हिरो’ केले!

मानवी हक्क संरक्षण करणारी न्यायव्यवस्था, नोकरशाही, मानवी चेहरा असलेली वैद्यकीय व्यवस्था, समाजाभिमुख शिक्षण व्यवस्था या समाजात वर्षांनुवर्षांच्या सामूहिक प्रयत्नांतून उभ्या राहतात. या संस्था कोणत्याही समाजाचा कणा असतात. या संस्थांत अपप्रवृत्ती शिरू शकतात, भ्रष्टाचार माजू शकतो. तो सुधारणे आणि या संस्थांची विश्वासार्हता टिकवणे, हे प्रगल्भ राजकीय व्यवस्थेचे लक्षण असते. परंतु हे भान सर्वसंगपरित्याग केलेल्या साधूने दाखविले नाही- हे अधिक धक्कादायक वाटते! किंबहुना त्यानंतर देशात आलेल्या करोना साथीच्या काळात उत्तर प्रदेशात गंगेच्या प्रवाहातून वाहणाऱ्या मृतदेहांच्या चित्रप्रतिमा त्यामुळे अधिकच स्वाभाविक आणि वास्तव वाटू लागतात.

या पार्श्वभूमीवर डॉक्टर कफिल खान यांचे हे कथन म्हणजे ऱ्हास पावणाऱ्या वैद्यकीय व्यवस्थेशी एकाकी लढत देणाऱ्या प्रामाणिक योद्धय़ाची स्फूर्तिदायी कैफियत वाटते. मात्र कफिल खान ‘गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’ या आपल्या संघर्षमय कथनात कुठेही आपल्या मुस्लीम असण्याचा आधार घेत नाहीत. मुस्लीम म्हणून आपला बळी घेतला गेला असा आक्रोश करत नाहीत. उलट ते म्हणतात, माझ्या जागी कोणताही प्रामाणिक डॉक्टर असता तर त्याच्याही वाटय़ाला हाच छळ आला असता! कारण आपल्या समाजाची सामाजिक आणि राजकीय संवेदना बोथट करण्यात आली आहे. उथळ राजकीय प्रगल्भता असलेले सत्ताधारी आणि नोकरशाही यातून यापेक्षा वेगळे काही घडणार नाही. डॉक्टर कफिल खान यांनी व्यक्त केलेली ही खंत आणि भेदक टीका अधिक अस्वस्थकारक आहे. हे पुस्तक वाचताना राणा आयुब यांच्या गुजरात दंगलींच्या राजकीय-नोकरशाही साटेलोटय़ाची गुंतागुंत उलगडणाऱ्या ‘गुजरात फाइल्स’ची सतत आठवण येत राहते. आपल्या समाजाचे वास्तव चित्रण लिहिणे, छापणे आणि वाचण्याचे धैर्यही आपण गमावत आहोत, असे वाटत राहते. म्हणूनच अंतर्मुख करणाऱ्या या पुस्तकाचे महत्त्व!

‘द गोरखपूर ट्रॅजेडी : अनेक मृत्यू, बळी एक’, –  डॉ. कफिल खान, अनुवाद- राजेंद्र साठे,मनोविकास प्रकाशन,  पाने- २४०, किंमत- ३३० रुपये.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book review the gorakhpur hospital tragedy by dr kafeel khan translation by rajendra sathe zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×