भारत सासणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरसा अप्रिय असण्याची शक्यता जास्त असते. त्याचं कारण असं की, आरसा तुम्हाला केवळ सत्याचंच दर्शन घडवतो आणि स्वप्नात जगणाऱ्यांना वास्तवाकडे बघणं नको असतं. तुम्ही जसे आहात तसं दाखवण्याचा धर्म आरसा पाळत असतो. सिंड्रेलाच्या कथेतील चेटकीण आरशाला विचारते, ‘सांग दर्पणा, मी कशी दिसते?’ त्यावर आरशानं बोटचेपेपणानं धूर्त उत्तर न देता तिला ‘तू सुंदर नाहीस’ असं सांगितलं आणि कथेतल्या चेटकिणीनं आरसा पसोडलेला आहे. आरशाचं पुसटणं हे त्याचं गौरवचिन्ह. हा त्याचा सन्मान. माझ्या एका अप्रकाशित कादंबरीमध्ये लेखकाच्या घरातला आरसा पुसटतो, तेव्हा लेखक म्हणतो, ‘बरं झालं आरसा पुसटला ते, कारण नाहीतरी आता आरसे जरा जास्तच सत्य बोलायला लागलेले आहेत.’ त्यावर आरसेमंडळी निषेध करतात आणि त्यांचा प्रतिनिधी लेखकाला भेटायला येतो. ‘सत्य सांगणं हा आमचा धर्म आणि म्हणून आम्ही सत्यार्थी आहोत.’ असं तो प्रतिनिधी सांगतो.

राजहंस प्रकाशनातर्फे ‘थिजलेल्या काळाचे अवशेष’ या शीर्षकांतर्गत कवयित्री व कथालेखिका नीरजा यांची पहिली कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. वर जो आरशाचा उल्लेख केलेला आहे, त्या अनुषंगाने या कादंबरीकडे पाहणं शक्य आहे. भोवती व गेल्या काही वर्षांत समाजाच्या विचारात आणि आचरणात जो काही बदल घडलेला आहे, त्या संदर्भात ही कादंबरी सूक्ष्मपणे बोलते. वास्तवाचं दर्शन घडविणारी कादंबरी म्हणून ती ‘अप्रिय आरसा’देखील ठरू शकते आणि तोच तिचा गौरवदेखील असणार आहे.

नीरजा यांच्या मते, काळ आता अवशेषरूपाने उरला आहे, पण हा काळ थिजलेलादेखील आहे. म्हणजेच तो गोठला आहे. काळ प्रत्यक्षात गोठू नये, गोठला जात नसतो. तो प्रवाही, वेगवान असतो. अनेक अप्रामाणिक आरशांसमोर काळाचं असत्य रूप उभं करून असत्यालाच सत्य म्हणून घोषित करण्यामागची समाजाची अगतिकता गोठलेपणाचे संकेत देते. मराठी साहित्यामध्ये कादंबरीलेखनाच्या संदर्भात एक विशिष्ट प्रकारची टीका चर्चिली गेली आहे. ‘मराठी भाषेमध्ये राजकीय कादंबऱ्यांची विशेष अशी परंपरा नाही,’ अशी टीका करून ‘मराठी लेखकांना भोवतालच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे आकलन नसते,’ असा निष्कर्षदेखील काढण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूने मराठी लेखकाने राजकीय स्वरूपाची भेदक अशी कादंबरी लिहिल्यास ‘लेखकाने राजकीय विचार व्यक्त करू नये’ असं सांगून टीका करणारा वर्गदेखील अस्तित्वात आहे. समाजाचा हा दांभिक चेहरा त्यानिमित्ताने दिसून येतो. नीरजा यांनी ‘जे. एन. यू.’ या दिल्लीतल्या विद्यापीठातल्या १९८० च्या तुकडीतून बाहेर पडलेल्या ‘बुद्धिवादी- बुद्धिजीवी’ तरुण-तरुणींच्या जगण्याचा वेध घेतलेला आहे. ‘जे. एन. यू.’ म्हटल्यानंतर वाचक या नात्याने आपण सावरून बसतो. कारण नीरजा यांच्या कादंबरीची नायिका मुसलमान आहे. ही स्त्री आपल्या तत्कालीन मित्रांना भेटायला भारतामध्ये आलेली आहे. एकेकाच्या घरी राहून नजमा सर्वाशी चर्चा करते आणि त्यांच्या १९८० नंतरच्या जीवनपद्धतीचा अंदाज घेते. त्या वेळेला विशिष्ट आदर्श बाळगणारी मंडळी आता कुठे कुठे वाहत जाऊन स्थिरावलेली आहेत, याचा ती अंदाज घेते.  २०१४ च्या निवडणुकांच्या नंतर भारतीय समाजामध्ये जो बदल झाला; त्याचं विश्लेषण डोळसपणे, धीटपणे करण्याची गरज होतीच. ही गरज का भासली, याबाबत लेखिकेने तिच्या मनोगतात पुढीलप्रमाणे स्पष्ट केलं आहे..

‘सोशल मीडियावर सरकारच्या पॉलिसींवर टीका करणाऱ्यांना ट्रोलिंग सुरू झालं होतंच; पण काय खावं काय ल्यावंकाय बोलावं आणि काय लिहावं हे विशिष्ट लोक ठरवायला लागले होते. असले लोक प्रत्येक काळात होतेच, पण आता त्यांची संख्या करोनापेक्षा वेगाने पसरायला लागली होती. याचा फायदा सत्ताधारी घेत होते आणि सोयीस्कर मौनही पाळत होते. वेगवेगळ्या अस्मिता – ज्या नव्वदनंतर टोकदार होत गेल्या होत्या, त्या आता धारदारही होत गेल्या. लोक  आक्रमक आणि हिंसक व्हायला लागले होते. शाब्दिक हिंसकपणा तर प्रचंड वाढीला लागला होता.’

शिक्षणक्रमामध्ये भूतकाळाच्या अवशेषांचा वापर करून विपर्यास  करण्याच्या आक्षेपार्ह कृतीकडे का दुर्लक्ष केलं जातं – अशा प्रकारची चर्चा या कादंबरीमध्ये येते.  ही वस्तुस्थिती आणि वास्तव नायिकेला अस्वस्थ करते.  लेखकाने कलात्मक लिहिलं पाहिजे, सूचक लिहिलं पाहिजे, सामाजिकतेचा आग्रह धरला पाहिजे, परंतु हे करीत असताना लेखकाने राजकीय स्वरूपाचं लिखाण मात्र करू नये, असं म्हणणाऱ्या प्रवृत्तींची समाजामधून मोठय़ा प्रमाणात वाढ होते आहे, म्हणून या कादंबरीचं स्वागत केलं पाहिजे. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणानंतर मला ‘ट्रोल’ करण्यात आलं. निर्भर्त्सनेनंतर असा सल्ला देण्यात आला की, साहित्यिकाने साहित्याबद्दल बोलावं ‘राजकीय – सामाजिक’ किंवा ‘सामाजिक – राजकीय’ संदर्भात बोलू नये. हा मतलबी सल्ला जगभर दिला गेला आहे. विश्व स्तरावरच्या लेखकांनी हा सल्ला मानलेला नाही, म्हणून लेखकांची जमात अस्तित्वात राहिली आहे – अजून तरी. साहित्याला मर्यादा आखून देण्याचे प्रयत्न पूर्वीप्रमाणे आजही सुरू असतात. मात्र कला विभाजित होत नसते. लेखक जेव्हा सामान्य माणसाच्या जगण्याबद्दल बोलतो, तेव्हा लेखक सामान्य माणसाच्या भोवती असणाऱ्या वास्तवाबाबतदेखील बोलतो. आणि म्हणून ‘सामाजिक – राजकीय’ स्वरूपाचं चिंतन किंवा ‘राजकीय – सामाजिक’ स्वरूपाचं चिंतन मांडणं अपरिहार्य आणि क्रमप्राप्त होऊन जातं. नीरजा यांनी तटस्थपणे हे काम केलेलं आहे. ‘प्रवाही असणारा काळ काही मंडळींनी गोठवला. विद्वेषवृद्धी केली. समाजाला एकमेकांपासून विभाजित केलं आणि आता या थिजलेल्या काळाचे अवशेष मात्र उरलेले आहेत.’ असं नीरजा आपल्या कादंबरीतून स्पष्ट करतात. फैजच्या ‘हम देखेंगे..’ या कवितेचा उल्लेख कादंबरीच्या शेवटी येतो. यातून ‘कुरूप वास्तवा’चं सूचक दर्शन घडतं. नजमा ही कादंबरीची नायिका स्वत:ला प्रश्न विचारते आणि चिंतनातून उत्तरही देते. तिचं चिंतन असं..

‘अस्वस्थ होणारे लोकही कमीच असतात प्रत्येक काळात. उरलेले अस्वस्थ नसतातच असं नाही, पण ते ठरवून कानाडोळा करतात परिस्थितीकडे. सामान्य लोक अन्नावाचून तडफडत असतानाही, आंदोलनं, बंड चिरडली जात असतानाही ठरवून करमणुकीच्या कार्यक्रमात रमवतात स्वत:ला. बोलत राहतात वरवरच्या आनंदाबद्दल, कायम पार्टी मूडमध्ये राहू शकतात ते. बंद करून घेतात स्वत:ला आपल्या बिळात आणि जगत राहतात मरणाचा तो क्षण येईपर्यंत निरर्थकपणे.’

एक विशिष्ट विचार घेऊन आणि विशिष्ट कृतीचा अंगीकार करून आपल्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या भारतीय स्त्री-पुरुषांकडे नायिका विश्लेषक नजरेने पाहते आणि त्यांचा कथित ऱ्हाससुद्धा नोंदवते. मात्र त्याचबरोबरीने ती स्वत:कडेदेखील पाहते. भोवतालच्या फसव्या आणि असत्याचा चेहरा घेऊन आलेल्या वास्तवाकडे पाहत असताना ती स्वत:लादेखील प्रश्न विचारत आहे. तिचं स्वत:ला विचारणं असं.. ‘आपलंही असंच होतंय का? थिजलेल्या काळाच्या खोल विवरात अडकून पडलो होतो आपण. आता या क्षणी काय प्रयत्न चालला आहे आपला? सोडवून घेतोय का आपण स्वत:ला या गुंतलेल्या संबंधातून, त्याचा गुंता होण्यापूर्वीच? हळूहळू सोडवून घेतलं, तर आठवणींची ही वलयं अशीच सुटून येतील एकमेकांतून आणि विरघळून जातील हवेत. काळाच्या ओघात आजच्या दिवसाच्या आठवणीही फिकट होत जातील कदाचित, की त्या काळातल्या त्या सुंदर आठवणींवर पसरून राहील राख आजच्या भेटीची या सिगरेटच्या राखेसारखी?’

नायिका नजमा परदेशात राहते. ती धूम्रपान,  मद्यपान करते. ती आधुनिक स्त्री आहे, आणि म्हणून ती निखळपणे या देशातल्या विचारी स्त्री-पुरुषांच्या जगण्याकडे पाहू शकते. लेखिकेने नजमाच्या रूपाने एक कॅमेरा आणला. या कॅमेऱ्यातून सूचक दृश्यं दाखवली. लेखिकेने नंतर कॅमेरा बंद केला आहे, कारण नजमा निघून जाणार आहे. पण इथल्या वास्तवाचं भवितव्य काय राहील – हा प्रश्न मात्र लेखिकेने सूचकपणे आपल्या संवेदनशीलतेमध्ये ‘इंजेक्ट’ केला आहे. उत्तर आपल्याला शोधायचं आहे. चांगल्या कलाकृतीचं हे लक्षण आहे.  मोहक असत्य सांगणाऱ्या आरशांची चलती असण्याच्या कालखंडात सत्य सांगणारे आरसे नकोच असतात. ही कादंबरीसुद्धा चांगल्या अर्थाने अप्रिय होईल. ‘झिरो टॉलरन्स’चा आग्रह सर्वत्र धरला जातो आहे. विरोधी असं तुम्ही काही बोलायचंच नाही, असं सांगितलं जातं आहे. म्हणून याही कादंबरीवर संभवत: टीका होईल. ती होऊ दे. पण त्यामुळे सत्याती आरशांची मान उंचावली जाईल, यात शंका नाही. नीरजा यांच्या या कादंबरीचं मी स्वागत करतो. सद्य:कालामध्ये अशा कादंबऱ्यांची आवश्यकता आहेच. या कादंबरीने आपली जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. विभाजनाला नकार देणारी आणि समग्रतेचा स्वीकार करणारी कादंबरी नीरजा यांनी लिहिली. सद्य:कालामध्ये तशी गरज तर आहेच, पण ही कादंबरी केवळ तत्कालीन ठरत नाही. भविष्याबद्दल चिंता उत्पन्न करते.

‘थिजलेल्या काळाचे अवशेष’

– नीरजा, राजहंस प्रकाशन,

पाने-२५५, किंमत-४०० रुपये.

bjsasne@yahoo.co.in

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review thijalelya kalache avashesh marathi book author neeraja publishing by rajhans prakashan zws
First published on: 19-03-2023 at 01:02 IST