मेघना भुस्कुटे meghana.bhuskute@gmail.com

मराठी भावविश्वात शारीरिक जाणिवांबद्दल बोलण्याची प्रथा नाही. त्याबद्दल बोलायचं असलंच, तर ते ‘कामजीवन’, ‘ऋतुस्राव’, ‘पौगंडावस्था’, ‘वीर्यनाश’ इत्यादी संस्कृतोद्भव जीवशास्त्रीय संज्ञांमधून तरी बोललं जातं, वा ‘हुरहुर’, ‘चाहूल’, ‘अस्फुट’, ‘उत्कट’ या धाटणीच्या झिरझिरीत वस्त्रांसारख्या साजूक  पडद्याआडून तरी. या नियमांना असलेले अपवाद नियम सिद्ध करणारेच आहेत. पंकज भोसले यांच्या ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ या कथासंग्रहातल्या कथा या आणि इतरही अनेक नियमांना भलताच नवीन आणि मजेशीर वळसा घालून जातात.

dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
issue is Indians who went to work for a lot of salary and got caught up in Israel and Hamas war
युद्ध कुणाचं, लढणार कोण आणि मरणार कोण…

मुंबईचं उपशहर म्हणावं अशा ठाण्यात विसाव्या शतकाच्या अखेरच्या आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या वीसेक वर्षांमध्ये चाळ ते टॉवर या स्थित्यंतरातून जाणाऱ्या कनिष्ठ मध्यमवर्गीय मराठी वस्तीत या कथा घडतात. त्यांच्या घडणीचा काळ आणि भूगोल त्यांच्यातून वजा करण्याचा विचारही करता येत नाही, अशा प्रकारे त्या त्यांच्या इतिहासभूगोलातून जणू उगवूनच आल्यासारख्या आहेत. स्वतंत्रपणे वाचल्या, तर आकलनाला अजिबात अडचण येऊ नये; पण एकसंधपणे वाचल्या तर एक संपूर्ण विश्व उलगडून दाखवण्याइतके आणि त्यातून वाचकाचं आकलन अधिक समृद्ध करण्याइतके  त्यांचे हातपाय परस्परांमध्ये गुंतून गेले आहेत.

मराठीच काय, पण कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाला मोठय़ाने उच्चारायला निषिद्ध असलेला पॉर्न हा शब्द या सगळय़ा कथांमध्ये बेमालूम विणलेला आहे, असं पहिल्या वाचनात वाटून किंचित हबकायला होतं. पण त्यांमध्ये एक विलक्षण ताजा असा विनोद आहे. ‘कमीत कमी वेळात तिरडी बांधायची स्पर्धा असती, तर त्यात पहिले येऊ शकणाऱ्या’ पाचपांडे नामक गृहस्थांचं पात्र काय, गरोदरावस्थेतल्या सुरक्षितरीत्या गर्भपात करता न येईल अशा टप्प्याचं वर्णन ‘कंट्रोल झेड अवस्था उलटून गेल्यानंतर’ या शब्दांत करणं काय, आजोबांच्या पेटीत साठीच्या दशकातल्या ‘प्ले बॉय’ मासिकाचे अंक मिळाल्यामुळे आजोबांबद्दल आदर निर्माण झालेला विक्रम शांताराम सकट काय; किंवा ‘अर्धाळ पिढी’, ‘प्रपोजव्हर्जिन अवस्था’, ‘मुंगीनिरीक्षण’, ‘गुढीपाडवा’ या तरतरीत शब्दयोजना काय.. सगळे शारीर व्यवहार झाकून वरकरणी सात्त्विक चेहऱ्यानं फिरणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या  काळोखातल्या व्यवहारांकडे पाहण्याची एक तिरकी, भेदक आणि तीक्ष्ण नजर या लेखकाला आहे, हे या सगळय़ामधून पुन्हापुन्हा जाणवत राहतं. ती नजर वापरताना लेखक करुणेच्या वाटेनं जात नाही. त्याउलट त्याच्या सुराला, नाक्यावर रंगेल आणि निरागस गप्पा मारणाऱ्या सेमीतरुण पोरांच्या स्वभावासारखं ऊर्जेनं सळसळणारं, विसंगतीतला विनोद टिपणारं, शारीर तपशिलांच्या टारगट उल्लेखांना अजिबात न बिचकणारं, निस्संकोच पोरपण आहे. त्यामुळे अश्लीलतेच्या सीमेवरची, एकेकदा बीभत्स  म्हणावीत अशी वर्णनं वाचतानाही खुदखुदून हसायला येत राहतं. या कथांमधल्या माणसांच्या  कुचंबणेची किंचित कल्पना येण्यापाशी आपण पोचतो न पोचतो, तोच लेखक नव्या किश्शाकडे वळलेला असतो. करुणेच्या रंगापाशी येता येता थबकून विनोदाकडे वळलेला सूर ही या कथांची मर्यादा आहे की बलस्थान आहे, ते आपापल्या मूडनुसार आणि मगदुरानुसार ठरवायचं. 

नक्षी नेमाडे, डॉली गाला, फुलसुंदरी, लतिका बर्वे, शेंगदाणा चिंकी, पिंकी अशा फटाकडय़ा आणि  बिनधास्त नायिका हेही या कथांचं बलस्थान. आपल्या सांस्कृतिक-सामाजिक-आर्थिक मर्यादा पक्क्या ठाऊक असणाऱ्या आणि त्या मर्यादांचा स्मार्ट वापर करणाऱ्या या मुली. त्या पॉर्न बघतात, पोरं झुलवतात, धुंद नाचतात, मन:पूत फॅशन करतात, सेलिब्रिटींच्या वा नाक्यावरच्या उपलब्ध पोरांच्या प्रेमात पडतात, प्रेमभंगातून सावरताना रडरड रडतात, समाजानं केलेल्या बदनामीतून समाजाच्या नाकावर टिच्चून बाहेर येतात, संसाराच्या धारेला लागतात.. आणि विझून जाव्यात तशा अदृश्य होतात. तसेच लेखकानं रंगवलेले सेमीतरुण नायकही. आपल्या शरीरामधल्या हार्मोनल बदलांना प्रतिसाद देताना पालकांचा आणि शिक्षकांचा खच्चून मार खाणाऱ्या, पण त्यांच्या दडपशाहीला न जुमानता आपल्या अभिव्यक्तीशी होता होईतो प्रामाणिक राहणारी ही पोरं बघताना चकित व्हायला  होतं. यांचं चित्रण इतक्या अस्सलपणे करणारा लेखक मध्यमवयीन बायांची पात्रं रंगवताना मात्र साचेबद्धतेला बळी पडतो, नवऱ्याला मारणाऱ्या – लठ्ठ – कर्कश बायांच्या वर्णनातून विनोद साधू बघतो. मध्यमवर्गीय पौगंडवयीन लैंगिकतेची कुचंबणा अचूक टिपणारा लेखक ‘होमो’, ‘छक्का’ इत्यादी  शब्द अपमानास्पदरीत्या वापरताना बिचकत नाही. पात्रांच्या मनोवस्थेनुसार ते योग्यच म्हणायला हवं. पण एका नक्षी नेमाडेचा अपवादवगळता या संज्ञांच्या पलीकडे जाऊन त्यातला अन्याय त्याला टिपावासा वाटत नाही. हे लेखकाच्या पौगंडवयीन सुराचंच एक वाढीव नि अविभाज्य अंग मानावं की त्रुटी म्हणून त्यावर बोट ठेवावं हे कळेनासं होतं. या सेमीतरुण नायिका आणि पिनाक कुरकुरे, विन्या खांडेकर, अनिरुद्ध देशपांडे, विक्रम सकट.. इत्यादी सेमीतरुण नायक लेखक जितक्या तपशिलांतून  जिवंत करतो, तितके तपशील ‘नेमाडेकाका’ हे ‘स्टार’ पात्र वगळता इतर कोणत्याही मध्यमवर्गीय पात्राच्या वाटय़ाला येत नाहीत, हे अतिशय बोलकं आहे. नाही म्हणायला ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ या शेवटच्या कथेतल्या सोमेशचंद्र या गृहस्थांचा अपवाद. तेही पात्र लकेशचंद्र या तरुण मुलाच्या पात्राकडून  झाकोळलं जातं. हस्तमैथुन करण्यापुरताही खासगीपणा न मिळाल्यानं, गर्लफ्रेंडसारख्या चेहऱ्याच्या  पॉर्नस्टारची चित्रफीत बघण्यावर समाधान मानणारा लकेशचंद्र बापानं डिटेक्टिवगिरी करून ती फीत डीलीट केल्यावर अक्षरश: पिसाळतो. त्याची ही भीषण कुचंबणा संग्रहातल्या शेवटच्या कथेत येते आणि  त्या चित्राच्या प्रकाशात आधीच्या कथांमधल्या चित्रांचे रंग अधिकच गहिरे होऊन जातात.

नव्वदीच्या दशकात भारतात अवतरलेले यच्चयावत बदल या कथांमध्ये अत्यंत परिणामकारकरीत्या जिवंत केलेल्या नेपथ्यासारखे वावरतात. अहोरात्र चालू असणारा एफ टीव्ही आणि त्यावरचे ‘उठावदार’  शोज्, स्मार्टफोनच्या आगमनापूर्वी तासाला वीसेक रुपयांच्या मोबदल्यात इंटरनेटचा नळ खुला करणारे सायबर कॅफे, व्ही चॅनल आणि एम टीव्ही या दोन वाहिन्यांनी एखाद्या स्फोटासारखं घरोघर आणून  ठेवलेलं आंतरराष्ट्रीय संगीत, शकीरा ते सिलिन डिऑन ते शेरिल क्रो व्हाया केट विन्स्लेट अशा  निरनिराळय़ा तारकांशी नव्यानं झालेली ओळख, समांतर सिनेमे दाखवणारी ‘दूरदर्शन’ची तिसरी वाहिनी, ‘टायटॅनिक’ ते ‘चाची चारसोबीस’ ते ‘इस रात की सुबह नही’ अशी रेंज असणारे तेव्हा प्रदर्शित झालेले सिनेमे, हिंदी सिनेसंगीतत नव्यानं जान फुंकणारा ए. आर. रेहमान, सोळा रुपये मिनिटाला अशा  दरासह भारतात अवतरलेला आणि अल्पावधीत लोकांना आपल्या व्यसनात अडकवणारा मोबाइल फोन आणि अपरात्री ‘तसले’ सिनेमे लावून ग्राहकांच्या समाधानाची सोय बघणारा केबलवाला.. हा या कथांचा अविभाज्य भाग आहे. तसंच नाक्यानाक्यावर उगवलेल्या इंडो-चायनीज अन्नाच्या टपऱ्या, तिथल्या शेजवान सॉसची आणि मनचाव सूपची लागलेली चटक, टोमॅटोच्या स्वादाच्या बटाटाच्या  वेफर्सपासून ते कॉंटिनेंटल पदार्थापर्यंत सगळं काही सहजी खायला सवकलेले नि खाऊन न संपणारी पार्सलं वॉचमनला देऊन पुण्य मिळवू बघणारे लोक.. यांसह मध्यमवर्गीय मराठी खाद्यसंस्कृतीचं वेगानं बदलत गेलेलं लॅंडस्केप हाही. केबलवाल्यांच्या वायरींनी नि डिश अँटेनांनी बदलून टाकलेली शहराची क्षितिजरेषा आणि या बदलांनी क्षितिजावरून हद्दपार केलेली पतंगसंस्कृती हाही. अस्सल वातावरणनिर्मिती करत पार्श्वभूमीला नांदणारे हे घटक एकेकदा कथानकामधली कळीची भूमिकाही वठवतात, तेव्हा या घटकांची जबरदस्त भूमिका दिसून किंचित दचकायला होतं.

काही कथांमध्ये अतिशय नेमकी, दाद द्यायला भाग पाडणारी उपशीर्षकं आहेत. ती सगळय़ा कथांमध्ये  असती, तर अजून मजा आली असती, अशा अनियमितपणे आणि लक्ष्यवेधीपणे ती येतात. इंग्रजी आणि मराठी यांचा सहज आणि अभूतपूर्व समास करायला न बिचकणारी आणि त्यातूनही काही सुचवणारी भाषा (‘एक्स्ट्रालार्ज आत्मविश्वास’!) हे या कथांचं वैशिष्टय़ आहे. मात्र त्यात काही ठिकाणी निव्वळ वेगळेपणाची चूष जाणवते, ती थोडी आवरायला हवी होती. तसेच, काळाचे तपशील अजून काटेकोरपणे तपासून घ्यायला हवे होते. पण कथासंग्रह संपताना हे लक्षात राहत नाही. लक्षात राहतं, ते एका पात्राच्या तोंडचं वाक्य : ‘सारं जगच माझ्यासाठी पॉर्न बनलंय.’ हे वाक्य कथेच्या संदर्भचौकटीतून निसटून, अकराळविकराळ होऊन समोर उभं ठाकतं. नव्वदोत्तरी जगाची न संपणारी भूक अधोरेखित करतं. तिरकस विनोदाचा पेहराव करून आलेल्या या कथांचं हे मोठंच यश म्हणायला हवं.

विश्वामित्र सिण्ड्रोम- पंकज भोसले

रोहन प्रकाशन, पाने : २९०, किंमत : ३२५