अमृता रागिणी शेखर चंद्रात्रे

दत्तक अनुभवांवर ‘अ‍ॅडॉप्शन : एक गुड न्यूज’ हे वर्षां पवार-तावडे यांनी संकलित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आज (२१ नोव्हेंबर) होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील एक प्रकरण.. 

mahendra thorve dada bhuse news
विधानभवनात शिंदे गटाचे आमदार थेट मंत्र्यांनाच भिडले; कारण विचारताच म्हणाले, “…म्हणून माझी दादा भुसेंशी बाचाबाची झाली!”
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
sudha murty net worth rs 775 crore but hasnt bought new saree in 30 years read behind story
…म्हणून सुधा मूर्तींनी ३० वर्षांत एकही साडी घेतली नाही विकत; कारण एकदा वाचाच
kamal nath
भाजपात जाण्याच्या चर्चांवर कमलनाथांची रोखठोक भूमिका, प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले…

‘दत्तक’ हा शब्द आजही सगळे जण हळू उच्चारतात. मी तर म्हणेन, मी हा शब्द किंवा यासंदर्भातला विषय कित्येक वर्षांत ऐकलाही नसेन. दत्तक असणं म्हणजे काय? हे जर कुणी मला विचारलं, तर याची व्याख्या मला नाही सांगता येणार. कारण त्याची कशी आणि काय व्याख्या करायची? पोटचं पोरं असणं याची तरी काय व्याख्या आहे? माझ्यासाठी या दोन्ही गोष्टी इतक्या सारख्या आहेत, किंवा यामधलं अंतर इतकं धूसर आहे, की दत्तक असणं आणि नसणं काय, हे अनुत्तरितच राहिलेलं बरं.

मी खूप लहान होते. साधारण सहा महिन्यांची असेन- त्या वयात मी माझ्या घरी आले. माझ्या दादाने आई-बाबांकडे लहान बहिणीचा हट्ट धरला आणि आई-बाबांनी पूर्ण विचारान्वये हा निर्णय घेतला. मग त्रिकोणी कुटुंबाचं चौकोनी कुटुंब झालं.

मी साधारण दोन-तीन वर्षांची असताना आईनं मला एक गोष्ट सांगितली. ‘‘एक परीताई होती. तिच्याकडे खूप मुलं  होती. आणि त्यातून तिनं शोधून मला दादाच्या मांडीवर आणून हळूच ठेवलं आणि तशी मी या घरात आले.’’ २ ते ६ वय वर्षे हे फक्त गोष्टी ऐकायचं आणि बागडायचं असतं, म्हणून मीही ते अगदी तसंच घेतलं.

हळूहळू मी मोठी होत गेले आणि वयाच्या १३ व्या वर्षी वगैरे आई आणि बाबांनी मला मी दत्तक असल्याचं सांगितलं तेव्हा माझ्या मनातल्या भावना नक्की काय होत्या हे आता आठवणं  कठीण आहे. कारण मला माझं दत्तक असणं हा कुठल्या चर्चेचा विषय आहे हे कधी जाणवू दिलं गेलं नाही किंवा जाणवलंही नाही. माझी आजी वरणभाताचे घास भरवताना मला देवकी आणि यशोदेची गोष्ट सांगायची. अल्लड वय असल्यानं तेव्हा ‘अरे वा! आपलं उदाहरण कृष्णासोबत दिलं जातंय..’ या विचारानंच माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचं. पण जसजसं वय वाढत गेलं, तसतसं या विषयाचं गांभीर्य जाणवायला सुरुवात झाली. आपल्या घरी कुणीही पाहुणा आला की दादाला ‘‘तू किती तुझ्या आईसारखा दिसतोस!’’ असा  शेरा ऐकू आला की जाणवायचं, की काहीतरी वेगळं आहे. मात्र, त्याचा फार फरक पडायचा नाही. कारण घरातल्या  सगळ्यांची मी इतकी लाडकी होते की आपलं अस्तित्व हे जणू वेगळं नाहीच, हा ठाम विश्वास होता. यात सगळ्यात मोठा वाटा जसा माझ्या आई-वडिलांचा आणि दादाचा आहे, तितकाच मोठा वाटा माझ्या सगळ्या नातेवाईकांचाही आहे. कोणाकडूनही आपल्याला त्या टिपिकल सीरियलमधल्या नातेवाईकांसारखी वागणूक मिळतेय असं कधीही झालं  नाही. या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करूनच माझ्या आई-वडिलांनी बहुधा हा निर्णय घेतला असावा.

 जसजसं वय वाढतं, आपल्याला समज येऊ लागते तसतसं आपण एका गोष्टीचा अनेक अंगांनी विचार करायला लागतो. अनेक बाबतीत आपल्याला जे प्रश्न पडतात त्यांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तर आपण अजून त्या विषयांच्या खोलात जायला लागतो. या विचारांच्या कोलाहलातून मीही गेले. सगळेच जातात. कितीही विचार करायचा नाही म्हटलं तरी तुमच्या अस्तित्वाचा उगम कुठाय? हा अत्यंत कुतूहलात्मक प्रश्न भल्याभल्यांना पडतो. त्यात मीही वेगळी नाही. आपलं  नेमकं अस्तित्व काय, आपल्याला जन्म देणाऱ्या त्या व्यक्तीवर नेमका असा काय प्रसंग गुदरला, की तिला हा आणि असा निर्णय घ्यावा लागला? आपल्याला संस्थेपर्यंत कोणी आणलं? अशा अनेक प्रश्नांनी मनात दाटीवाटी केली होती. मात्र, याबद्दल कोणाशी बोलायचं? तर तेव्हा माझे बाबा आणि माझी आई या माझ्या दोन मित्रांनी मला मदत केली. माझ्या मनात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला आई-बाबांनीच दिली.

 आईला मी लहानपणी तिच्या पोटावरून खूप चिडवायचे. म्हणायचे, ‘‘किती गोलमटोल आहे तुझं  पोट!’’ त्यावर ती हसून मला म्हणायची, ‘‘माझी दोन बाळंतपणं झालीयेत. त्यामुळे तेवढं असेलच.’’ भांडणात अनेक घरांमध्ये भावंडं एकमेकांना चिडवतात, ‘‘तुला उचलून आणलंय हं आम्ही!’’ म्हणून आईची मी लाडकी आहे. मात्र, आमच्या घरात अनेकदा मी दादाला चिडवताना हे म्हटलंय आणि आम्ही तितक्याच मारामाऱ्या केल्यात. दादाचं माझ्या पाठीशी भक्कम उभं असणं आणि त्यामुळे माझ्या मनाला ‘आपण दत्तक आहोत’ हा विचार दूपर्यंत नाही शिवला. त्यामुळेच जगात सगळ्यात जास्त कोण आवडतं? तर ‘दादा’ हे माझं हमखास उत्तर आईबाबांना चिडवून जातं.

माझ्यासाठी मी दत्तक असणं हा वेगळा असा मोठा विषयच नाही हे मला पदोपदी भेटणाऱ्या लोकांनी अनुभवून दिलं आणि यात महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे माझ्या नवऱ्याचा. लग्नाचे आणि त्यासोबतचे अनेक किस्से आपण ऐकत मोठे झालेलो असतो. जसजशी मी मोठी होत होते तसतसे माझे विचारही ठाम होत होते. मला पक्कं माहीत होतं की, ज्याच्यात हे सगळं  समजून घ्यायची मानसिक कुवत असेल, ज्याला या विषयाचं गांभीर्य असेल, त्याच मुलासोबत मी लग्न  करेन. मात्र, हे इतकं सोप्प नसतं. माझा सगळ्यात जवळचा मित्रच माझा नवरा झाल्यानं त्याच्याशी या विषयावर बोलणं मला अगदी सहज सोप्पं गेलं आणि त्यानं तितक्याच प्रगल्भतेनं ते समजूनही घेतलं. कोणत्याही प्रकारचे प्रश्न मला त्यानं विचारले नाहीत. मला प्रश्न पडला की, याच्या जागेवर मी असते तर किती प्रश्नांचा भडिमार केला असता मी एव्हाना. मात्र, आपली निवड चुकली नाही याची खात्री पटली!

मला व्यवस्थित कल्पना आहे की, हा विषय इतकाही सहज नाहीये. अनेकांना अनेक प्रश्न, शेऱ्यांचा सामना करावा लागला असेल. पण माझ्या अनुभवात असणारं दत्तकपण हे नसल्यातच जमा आहे. घरात असणारा मुक्त संवाद, वस्तुस्थिती समोर ठेवण्याची धडपड व एकमेकांवरचा विश्वास या तीन गोष्टींनीच हा विषय हाताळला जाऊ शकतो. प्रत्येकाला स्वत:च्या अस्तित्वाबद्दलची माहिती समजून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो न लपवता समोर ठेवणं हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि ते कसं सांगावं, हे मात्र त्या आई-वडिलांनी ठरवावं. मात्र, हिंदी चित्रपटांसारखं वयाच्या १८ व्या वर्षी वगैरे सांगू नये. जितक्या लवकर आणि जितकं सोप्पं करून सांगता येईल तितकं हे कोडं लवकर सोडवता येईल. कारण जरी हे सत्य इतकं महत्त्वाचं नसलं तरी ते सत्य आहे आणि आई-वडिलांच्या संवादातूनच ते पुढे यावं, कारण त्यामुळे त्या तिघांमधलं नातं वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. मला जर हे आता समजलं असतं तर मी कशी रिअ‍ॅक्ट झाले असते? मी तितक्याच विश्वासानं आई-वडिलांकडे पाहिलं असतं का? ते तितकेच मला आपले वाटले असते का? मी तुटले तर नसते ना? कोणत्या मानसिक अवस्थेतून गेले असते?.. असे अनेक प्रश्न मला आता हे लिहिताना शेवटी पडू लागलेत आणि त्यांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. मात्र, हल्लीच एक किस्सा घडला तो नक्की नमूद करावासा वाटतो. परवा टीव्हीवरची चॅनेल्स बदलताना अचानक ‘कभी खुशी, कभी गम’ हा चित्रपट लागलेला. तसंही  काही करायला नसल्यानं तो पाहायला सुरुवात केली. असे काही ठेवणीतले चित्रपट पाहायला सुरुवात केली की अचानक ‘गोइंग डाऊन द मेमरी लेन’ वगैरे वाटायला लागतं. प्रत्येक चित्रपट जसं आपल्याला काही देऊन जातो, तसंच आपल्याकडून घेऊनही जात असतो. हे विचार मनात येत असतानाच तो शाहरूख खान आणि अमिताभ बच्चनचा सीन आला- ज्यात अमिताभ शाहरूखला वयाच्या तिशीत सांगतो की, ‘तुमने साबित कर ही दिया की अपना खून अपनाहीं होता है..’ आणि शाहरूखच्या अख्ख्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं ठाकतं. आपल्या वडिलांकडून अशा रीतीनं आपल्या दत्तकपणाची भावना उमटू शकते हे ऐकूनच तो स्तब्ध होतो. बरं, यात त्याच्या भावाला- म्हणजे हृतिक रोशनलाही वयाच्या तिशीत कळतं की, आपल्या भावाला ‘गोद’ घेतलंय, आणि तेही चुकून! हे सीन्स  प्रत्येकासाठी वेगळे असतील. बरेच लोक त्याला फारसं महत्त्व देतील का, हाही प्रश्नच आहे. मात्र, मी नेहमी या दोन-तीन सीन्सवर येऊन थांबते. मनात अनेक विचार येतात, अनेक प्रश्न उभे राहतात.