scorecardresearch

धर्मवादी राजकारण आणि आत्मघातकी वाटचालीची मीमांसा

भारतात सेक्युलॅरिझमला कायदेशीर मान्यता आहे. मात्र काही जण विरोध करून बळजबरीने भारतीयांना हिंदूत्वाच्या कोषात ओढण्याची उठाठेव करीत आहेत.

books about Indian democracy terrorism religious nationalism violence and minority communities
फोटो-लोकसत्ता

डॉ. शमसुद्दीन तांबोळी

‘जमातवादाचे राजकारण आणि भारतीय लोकतंत्र’, ‘जमातवादी हिंसा आणि धार्मिक राष्ट्रवाद’, ‘धर्म, आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज’ ही राम पुनियानी यांची तीन अनुवादित पुस्तके अलीकडेच प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांत मांडण्यात आलेले सर्व विषय भारतातील धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी समाजासमोरील आव्हानांच्या तीव्रतेची जाणीव करून देणारी आहेत. जमातवादी राजकारण मध्यवर्ती विषय ठेवून त्या अनुषंगाने भारतीय लोकशाही, दहशतवाद, धार्मिक राष्ट्रवाद, हिंसा आणि अल्पसंख्याक समाज या विषयांवर उद्भवलेल्या  समस्यांचा वेध या पुस्तकांमध्ये घेतला आहे.

‘जमातवादाचे राजकारण आणि भारतीय लोकतंत्र’ या पहिल्या भागात भक्ती आणि सुफी परंपरेने मानवतेला एकत्र आणण्यात केलेल्या योगदानाची माहिती आहे. हिंदूत्व या शब्दाभोवतीची संदिग्धता आणि यासंदर्भातील न्यायालयीन निर्णयाची चर्चा, भारतीय मूल्यांची सुरू असलेली थट्टा देशाची प्रतिमा मलिन करते. महात्मा गांधी, नेहरू, पटेल, जीना, टिपू सुलतान यांच्या विषयी प्रतिवादात्मक मांडणी आजच्या घडीला महत्त्वाची आहे. तसेच हिंदूराष्ट्र, हिंदूत्ववाद्यांची नवी प्रयोगशाळा, मुस्लिम ब्रदरहूड- हिंदू ब्रदरहूड, आरएसएसचा अजेंडा आणि दहशतवादी कारवायांचा तपास असे बहुचर्चित विषय लेखकांनी हाताळले आहेत.

‘जमातवादी हिंसा आणि धार्मिक राष्ट्रवाद’ भाग २ मध्ये देशातील धार्मिक दंगलींचा समावेश आहे. यात बुलंदशहर, शीखविरोधी दंगल, बाबरी मशीद, गुजरात दंगल, भारतातील मुस्लिम लोकसंख्या, मुस्लिम समाज इथपासून ते जातीव्यवस्थेचा अंत, मुस्लिम महिला आणि राजकारण, मंदिर – मशीद प्रवेश, नक्षलवाद ते कलम ३७० पर्यंतचा उहापोह आजच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची विदारकता दाखवणारी आहे.

‘धर्म, आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज’भाग तीन या पुस्तकात देशात झालेल्या विचारवंतांच्या हत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाचे भगवीकरण, शहरे आणि वास्तूंचे नामांतर, इस्लामवादी दहशतवाद, दहशतवाद आणि धर्म, धर्मातराचा प्रश्न, लव्ह जिहाद, सांप्रदायिक अजेंडा, संघाची विचारधारा हे कळीचे विषय हाताळताना अल्पसंख्याक समाजाची होणारी मुस्कटदाबी भारतीय राज्यघटनेचा संदर्भ घेऊन केली आहे.

या तीन पुस्तकांमध्ये केलेल्या मांडणीतील काही विश्लेषण असे आहे की, भारतीय समाज धार्मिक तणाव आणि सांप्रदायिक राजकारणाचे चटके तसे फाळणी काळापासून सहन करीत आहे. या काळात ज्या सांप्रदायिक अस्मिता पेटवल्या गेल्या त्या आज अधिक भडकताना दिसत आहेत. वास्तविक ही विषारी बीजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी पेरली. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ याकरिता सांप्रदायिक अस्मिता वापरल्या गेल्या. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना जेव्हा विचारण्यात आले की, पंतप्रधान म्हणून त्यांना सर्वात मोठं आव्हान कोणते वाटते? तेव्हा ते म्हणाले, ‘‘अनेक धर्म असलेल्या या देशाला सेक्युलर बनवणं.’’ तसंच ११ ऑगस्ट १९४७ रोजी बॅरिस्टर जिनांनीही म्हटलं होतं की, ‘‘पाकिस्तान हा सेक्युलर असेल.’’ परंतु एका वर्षांनंतर म्हणजे ११ सप्टेंबर १९४८ रोजी जिनांचे निधन झाले आणि झिया उल हक यांच्या काळात इस्लामीकरणाची प्रक्रिया तीव्र होऊन त्याची जागा धार्मिक कट्टरवाद्याांनी घेतली. भारतात ‘‘मी स्वत:ला इतका चांगला हिंदू समजतो, जितका की एखादा मुसलमान. तसेच मी स्वत:ला तितकाच चांगला ख्रिश्चन किंवा पारसीदेखील मानतो,’’ असे सांगणाऱ्या महात्मा गांधींची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली. तरीही भारताने देशाला आधुनिक, वैज्ञानिक, धर्मनिरपेक्ष असा सर्वसमावेशकतेचा चेहरा दिला. पाकिस्तानात जे एका वर्षांत झाले ते भारतात आजमितीस होताना दिसत आहे. सेक्युलर मूल्यांना धाब्यावर बसवून आपण कट्टरतावादाच्या दिशेने प्रवास करत आहोत. भारतात सेक्युलॅरिझमला कायदेशीर मान्यता आहे. मात्र काही जण विरोध करून बळजबरीने भारतीयांना हिंदूत्वाच्या कोषात ओढण्याची उठाठेव करीत आहेत.

गेल्या जवळपास साडेतीन दशकांपासून भारतातील जमातवादी गट आक्रमक झाले आहेत. जे शहाबानो प्रकरणात अनुभवले त्यातूनच हिंदूत्ववाद्यांना इंधन मिळाले. या संघटनांनी परिस्थितीचा फायदा घेऊन आत्मशक्ती वाढवली आणि शक्तिप्रदर्शनातून बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली. नंतरच्या तीन दशकांत वातावरण अधिकाधिक गढूळ होत गेले, लोकांत असामंजस्य, असहिष्णुता वाढवली. हिंदू जमातवादी राजकारणाने  समाजात दुहीची बीजे पेरून हिंसा आणि ध्रुवीकरणाचे विविध प्रयोग केले. त्यासाठी राम मंदिर, गोमांसाचा प्रश्न उभा केला. धर्माची नैतिक मूल्ये, धर्मविषयक नियम यांना फाटा देत धार्मिक अस्मितेचा वापर करून समता आणि उदारमतवादी मूल्यांना पायदळी तुडवून, हिंसेचा मार्ग अनुसरून सर्जनशील कलाकारांच्या अभिव्यक्तींवर मर्यादा घालण्याचे आणि त्यांना देशद्रोही ठरवण्याचे प्रकार वाढले. अलीकडे तर  अल्पसंख्याक समाजाबद्दलचा आकस, घृणा टोकाला पोहोचवली आहे. सातत्याने अपप्रचार, भीती आणि शत्रुभाव निर्माण करणारे विषय हाताळण्यात आले. ‘भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढवून भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचे कारस्थान रचले जात आहे.’ हा अपप्रचाराचा जुना मुद्दा आजही वापरण्यात येतो. डॉ. एस. वाय. कुरेशी यांनी ‘द पॉप्युलेशन मिथ..’ पुस्तकातून हे अपसमज दूर करण्यासाठी भारतातील जनगणनेचे अहवाल सादर केले. तसेच ‘फॅमिली प्लॅनिंग अँड लीगसी ऑफ इस्लाम’ या पुस्तकात विचारवंत ए. आर. ओमरान यांनी केलेले प्रतिपादन जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात येते. या सर्व गोष्टींचा ऊहापोह या पुस्तकांमध्ये सविस्तरपणे करण्यात आला आहे.

गो-वंश मांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये अल कबीर, अरेबियन एक्सपोर्ट, एमकेआर फ्रोजन फूड आणि अल-नूर यांचा समावेश आहे. नावांवरून असा समज होऊ शकतो की, याचे मालक मुस्लीम असावे. मात्र यांपैकी बऱ्याच कंपन्या जैनांच्या आणि ब्राह्मणांच्या मालकीच्या आहेत. सध्या समाजमाध्यमांचा वापर करून खोटी, बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येते. मध्यंतरी एक ट्वीट फिरवले ‘एनसीआरबीच्या अहवालानुसार भारत हा महिलांसाठी सर्वात धोकादायक आहे, कारण भारतात ९५% बलात्कार प्रकरणात गुन्हेगार मुस्लीम असतात. बलात्काराच्या एकूण ८४,७३४ घटनांपैकी ८१००० बलात्कार करणारे मुस्लीम होते. ९६% बळी हे अन्य धर्मीय आहेत आणि त्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, बलात्काराच्या घटनाही वाढतील.’ वस्तुस्थिती  अशी आहे की, एनसीआरबी (नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो) बलात्काराच्या प्रकरणात धर्माची नोंदच करीत नाही. ही तथ्यशोधनातून पुढे येणारी माहिती समाजापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक निर्माण केलेले संशयाचे वातावरण अधिक गडद होते. भारतीय मुस्लिमांची विदारक स्थिती दाखवणारे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. या आधारे विकासासाठी सहानुभूतीने विचार करून काही उपाययोजना करण्याऐवजी मुस्लिमांबद्दल अपप्रचार करून, त्यांना अतिरेकी ठरवून, अफवा पसरवून त्यांचे अपराधीकरण करून अपमानित करण्यात येत आहे. हा केवळ अन्याय नसून तो भारताचा धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी चेहरा विद्रूप करण्याचा प्रकार आहे. देशात मुस्लिमसमाजाचे नकारात्मक चित्र कसे उभे केले जात आहे हे अशा अनेक उदाहरणांमधून लेखकाने विशद केले आहे.

मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी आणि महिलांविषयक सातत्याने घेण्यात येणारी भूमिका आणि वक्तव्ये, जेएनयू, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी, अलिगढ मुस्लीम विद्याापीठ, डॉ. आंबेडकर – मद्रास आयआयटीतील पेरियार स्टडी सर्कल, इत्यादी ठिकाणी घडवून आणलेले राजकारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्या मूलभूत विचारांशी छेडछाड करून विपर्यास करणे. अशा प्रकारातून देशार्ची हिंदू राष्ट्राकडे आणि एकाधिकारशाहीकडे  वाटचाल सुरू झाली आहे याविषयीचे सखोल विश्लेषण या पुस्तकांमध्ये वाचावयास मिळते.

समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या संविधानिक मूल्यांपासून लोकशाहीचा प्रवास सुरू होतो. मात्र १. सत्तेचे विकेंद्रीकरण, २. नागरिकांच्या मूलभूत हक्काचे संरक्षण, ३. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, ४. दुर्बल घटनांविषयी सकारात्मक भूमिका आणि ५. धार्मिक अल्पसंख्याकांना वाटणारी सुरक्षितता या पाच निकषांच्या आधारे लोकशाहीच्या सद्य:स्थितीचे मूल्यमापन केल्यास  लोकशाहीचा दुबळेपणाच समोर येतो. जमातवादी राजकारणामुळे निर्माण झालेल्या दुरवस्थेची मांडणी करून देशाच्या भल्यासाठी, जनसामान्यांच्या सुखासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी तसेच शांततापूर्ण सहजीवनासाठी आम्ही कोणता मार्ग अवलंबला पाहिजे याचीही चर्चा लेखकाने केली आहे.

लव्ह जिहाद, घरवापसी, मॉबलिंचिंग, दलित हिंसाचार, एनआरसी, शिक्षणाचे भगवीकरण, तसेच शहर, रस्ते, वास्तूंची नावे बदलण्याचा सपाटा, काशी – मथुरा मंदिराचे राजकारण, विविध अंधश्रद्धांना खतपाणी, मुस्लीम महिला आणि संघ व भाजपचा अजेंडा, विविध तपास यंत्रणांचा दुरुपयोग या आणि अशा जमातवादी राजकारणास ऊर्जा पुरवणाऱ्या विषयांवरील वाद-प्रतिवाद या पुस्तकात मांडला आहे. तसेच विविध ऐतिहासिक संदर्भाच्या पार्श्वभूमीवर जमातवादी राजकारणाची, संकोच होत असलेल्या मूल्यांची अभ्यासपूर्ण मीमांसा उपायांसह लेखकाने केली आहे.

मुस्लीम विचारवंत मौलाना वहिदुद्दिन खान तसेच डॉ. असगरअली इंजिनीअर यांच्या उदारमतवादी इस्लामचे संदर्भ पुस्तकात आहेत. मात्र हमीद दलवाई यांनी केलेल्या मुस्लीम जमातवादाची चिकित्सा, आक्रमक हिंदूत्ववादास कारणीभूत ठरलेले घटक, जमातवादी मुस्लिमांनी सुधारणेस सातत्याने केलेला विरोध पुस्तकात अधिक तपशीलासह आले असते तर सयुक्तिक ठरले असते. ही पुस्तके वाचताना पंडित नेहरूंच्या एका विधानाची आठवण होते, ‘‘बहुसंख्यांकाचा धर्मवाद राष्ट्रासाठी घातक असतो आणि अल्पसंख्याकांचा धर्मवाद आत्मघातक असतो.’’

लेखक राम पुनियानींनी वेळोवेळी लिहिलेल्या लेखांपैकी निवडक अशा ६३ लेखांचा मराठी अनुवाद म्हणजे तीन भागांत विभागलेली ही तीन पुस्तके आहेत.

‘जमातवादाचे राजकारण आणि भारतीय लोकतंत्र’, ‘जमातवार्दी हिंसा आणि धार्मिक राष्ट्रवाद’, ‘धर्म, आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज’  – राम पुनियानी, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, पाने- अनुक्रमे ८३, ८८, ९१. किंमत- प्रत्येकी १०० रुपये.

tambolimm@rediffmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-12-2022 at 01:01 IST
ताज्या बातम्या