प्रिय पेरूमल मुरूगन,
स्वत:मधील लेखकाचं मरण घोषित करणाऱ्या मित्रा, आपला नियमित पत्रव्यवहार होता.. आपण कुठल्यातरी लिटररी फेस्टिव्हलला एकदा भेटलो होतो.. माझ्या कवितांचे तू तामिळमध्ये अनुवाद केले होतेस.. तुझं लेखन lok01वाचून मी तुझा फॅन झालेला होतो.. तू माझ्यासाठी खादीचे झब्बे पाठविले होतेस.. मी तुला आमच्याकडची हिमरू शाल भेट दिलेली होती.. असं काही काही घडलेलं नव्हतं. तरीही मी तुझ्याशी सलगी करतोय. एकेरी संबोधून नसलेला दोस्ताना प्रस्थापित करू पाहतोय. त्याचं कारण तू लेखक आहेस. स्वत:चं मरण घोषित करणारा लेखक. रस्त्याने जाताना अचानक एखादी प्रेतयात्रा समोर येते. आपले सहजपणे हात जोडले जातात. तेव्हा मृत व्यक्ती आपल्या ओळखीची असतेच असं नाही. मानवी प्रजातीतील एक सदस्य गेला म्हणून त्याच्या निर्वाणाप्रती आपण आदरभाव व्यक्त करतो. इथं तर लिहिणारा एक सर्जनशील लेखक मेलाय. गाय मरणं वाईटच; पण त्यातही दुभती गाय अवेळी मरणं अधिक त्रासदायक असतं.
चकाचक रस्त्याच्या कडेला मरून पडलेलं कुत्रं एकदम नजरेत येतं, तशी परवा अनेक बातम्यांच्या गराडय़ातील तुझ्या मरणाची बातमी ठळक नजरेत भरली. तुझा फोटो प्रथमच पाहिला. ज्याच्या चेहऱ्यानिशी फोटो छापून आलाय तो जिवंत आहे. पण ज्याचा फोटोच काढता येत नाही त्या लेखकाचा मृत्यू झालाय. लेखक अनेक मरतात. लोकांना गोळा करून मृत लेखकाला श्रद्धांजली वाहिली जाते. असल्या-नसल्या संदर्भासहित भाषणं ठोकली जातात. काहीजण लेखक मेल्यानंतरच त्याचं मोठेपण मान्य करतात. बऱ्यापैकी प्रसिद्ध लेखक असेल तर एखाद्या रस्त्याचं नामकरणही केलं जातं. पण इथं रूढ अर्थानं लेखकाचा मृत्यू झालेला नाहीए, तर एका पेरूमल मुरूगन नावाच्या प्राध्यापकाने स्वत:मधील लेखकाचा मृत्यू घोषित केला आहे. किती अनोखी घटना आहे! अपेक्षेप्रमाणे या घटनेची बेसुमार नोंद घेतली गेली. कारण त्यात बातमीमूल्य जबरदस्त होतं. तू ज्याच्या देहात निवासाला होतास त्यांचा फोटो बातमीसह झळकला. अग्रलेखांचे रकाने भरभरून वाहिले. इलेक्ट्रॉनिक माध्यमाला तर खपावू स्टोरी मिळाली. टीव्हीवर तज्ज्ञ लोक मनसोक्त ‘चर्चा-चर्चा’ खेळले. म्हणजे चांगलाच चघळला गेलेला विषय! त्याबद्दल मी काय नवीन लिहिणार? पण मनातून वाटलं, तुला लिहावं आणि व्हावं मोकळं. ज्याच्यासाठी लिहितोय तो तर मृत झालाय! मग हे वाचणार कोण? समजा, हा मजकूर मी तुझ्या जुन्या पत्त्यावर पाठवला तर प्रा. पेरूमल मुरूगन नावाचे गृहस्थ हे पत्र तीव्र तिटकाऱ्याने नाकारतीलच. हे पत्र घेऊन त्यांच्या दारी गेलेल्या कुरिअरवाल्याला ‘इथं कुणी लेखकबिखक राहत नाही..’ असं तुसडं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. ठीकय. बऱ्याचदा आपण ज्याच्यासाठी लिहितो, तिथपर्यंत लिहिलेलं पोहोचत नाही. तरीही आपण लिहितो, कारण आपल्याला लिहून हलकं वाटतं. म्हणून मीसुद्धा लिहितोय.
मित्रा, आपल्याला परदेशातील फुटकळ लेखकही माहीत असतात. बोलताना आंतरराष्ट्रीय लेखकांचे संदर्भ पेरणं हा आताशा स्टेटस सिंबॉल आहे. पण आपल्या भारतीय भाषेतील लेखनाबद्दल मात्र उदासीनताच दिसते. साहजिकच त्यामुळे तुझं साहित्य वाचण्याची आम्ही तसदी घेतलेली नाहीए. तुला मरणदारी घेऊन जाणारी चर्चा झाली ती तुझं लेखन इंग्रजीमध्ये अनुवादित झाल्यावरच. ‘मधोरूबागन’ नावाची तुझी साहित्यकृती तामिळ भाषेत प्रथम प्रकाशित झाली. तामिळ वाचकांनी, समीक्षकांनी तिचं बऱ्यापैकी स्वागतही केलं. सगळं काही गुण्यागोविंदानं सुरू होतं. ही कादंबरी अनुवादित होऊन इंग्रजीत गेली आणि संस्कृती दुखावली गेली. या लेखनाला विरोध सुरू झाला. बाकी सर्वजण ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवून चूप होते. लेखकाच्या जयंत्या-पुण्यातिथ्या साजऱ्या करणाऱ्या कुठल्याही साहित्य संस्थेनं साधी नोंदही घेतली नाही. कुणी निषेध नोंदवला नाही. शेवटी तुलाच लेखी माफी मागावी लागली. पुस्तकाच्या न खपलेल्या प्रतींवर बंदी आली. विक्री थांबली. या मन:स्तापातूनच ‘वाचकांनी त्यांच्याजवळच्या प्रती जाळून टाकाव्यात,’ अशी विमनस्क घोषणा तू केलीस. शिल्लक प्रतींच्या नुकसानीपोटी प्रकाशकालाही भरपाई देण्याचं तू जाहीर केलंस. या वादंगाला कारणीभूत ठरला- तुझ्या कादंबरीचा ‘वन पार्ट वुमन’ हा इंग्रजी अनुवाद. तामिळ भाषेत शांत राहिलेला विषय इंग्रजीत मात्र पेटला. यावरून काही निष्कर्ष काढता येतील. १) तामिळ भाषेतील वाचक इंग्रजी भाषेतील वाचकापेक्षा अधिक उदार आहेत. २) तामिळ भाषेतील वाचकांना भारतीय संस्कृतीबद्दल चिंता नाही. ३) तामिळ भाषेतील वाचक-समीक्षकांना साहित्यातील काहीच कळत नाही. ४) तामिळ वाचक गांभीर्यानं वाचत नाहीत. यापैकी कुठल्याही निष्कर्षांला आपण सहमती दर्शविली तरी तू घोषित केलेलं मरण स्वीकारावंच लागतं. भोवतालच्या परिस्थितीनं घडवून आणलेली ही लाजिरवाणी घटना आहे.
अशा घटना आपल्याला नवीन नाहीत. या उन्मादामुळेच तुकारामाला स्वत:च्या अभंगाचे चोपडे नदीत बुडवावे लागले होते. तेंडुलकरांच्या ‘सखाराम बाईंडर’ नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आलेली होती. ‘पाथेर पांचाली’सारख्या कलाकृतीवर भारतातल्या दारिद्रय़ाचं भांडवल केल्याचा आरोप झाला होता. ‘बॅण्डिट क्वीन’ चित्रपटातील एका स्त्रीवर समूहाने केलेल्या अत्याचाराच्या दृश्याला संस्कृतिरक्षकांनी विरोध केला होता. म्हणजे देशातलं वळवळणारं दारिद्रय़ चालेल, पण ते पडद्यावर दिसता कामा नये. दिवसाउजेडी आजही बाई ओरबाडली जाते, पण पडद्यावरच्या, पुस्तकातल्या दृश्यातून मात्र संस्कृती धोक्यात येते. अर्थात तुला हे सर्व माहीत आहेच. पण या यादीत आपण जाऊ, असा विचार तूही केला नसशील. खरं सांगतो, एखाद्याला आपल्या आतल्या लेखकाला असं मनावर दगड ठेवून मारून टाकावं लागेल असं मलाही वाटलं नव्हतं.
लेखक मित्रा, खरं तर मेलेल्या लेखकाला उद्देशून लिहायचं ही कल्पना मेलेल्या पितरांना पिंडदान करण्यासारखीच श्रद्धाळू आहे. लिहायला बसलो. भाबडेपणा वाटला. बेत रद्द केला. पण तुझा मरणगंध काही डोक्यातून जाईना. म्हणून पुन्हा लिहायला बसलो. तशी तुझी एकही ओळ मी वाचलेली नाहीए. एक तर मला तामिळ भाषा येत नाही. या तामिळ भाषेवरून सहज आठवलं. वीस वर्षांपूर्वी राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी म्हणून मदुराईला आलो होतो. विद्यापीठाच्या कलावंतांचा संघच होता. त्यावेळी चेन्नईला सदिच्छा भेट दिली होती. चेन्नईच्या बीचवर फिरताना एक खारीमुरीवाला दिसला. आम्हाला चेन्नईचे खारीमुरे खाण्याची इच्छा झाली. पण त्या खारीमुरीवाल्याला इंग्रजी किंवा हिंदी भाषा येत नव्हती. मराठीचा तर प्रश्नच नाही. आम्हाला तामिळ येत नव्हतं. संवादच खुंटला. शेवटी आम्ही शब्दांची भाषा बाजूला ठेवली आणि खाणाखुणांची भाषा वापरात आणली. आम्ही खारीमुरीवाल्याला दोन रुपये दाखविले, तर त्याने एक माप दाखवलं. आम्ही पाच रुपये दाखविले, तर त्याने एक मोठं माप दाखवलं. असा आमचा संवाद झाला होता. तुझ्या मातीतल्या भाषेतली गंमत आहे म्हणून सांगितली. आता तुला कुठल्याही भाषेशी काय देणंघेणं असणार म्हणा! मेल्यावर भाषेचा काय संबंध? जगण्यासाठी भाषा लागते.
मरणारा सुटतो, पण मागे उरलेल्यांचा जाळभाज सरत नाही. तू मेलास, पण जाताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आमच्यासाठी तसाच शिल्लक ठेवून गेलास. त्या ‘मधोरुबागन’ कादंबरीत तू रूढ परंपरेबद्दल लिहिलंस. काही लोकांना तो अपमान वाटला. ते ठीक. पण बोलणाऱ्याचं तोंड कायमचं बंद केलं जाणार असेल तर कुठली अश्मयुगीन संस्कृती पुन्हा अवतरणार आहे, माहीत नाही. असा उलटा प्रवास कायम राहिला तर एक दिवस आपल्याला पुन्हा शेपूट फुटेल. वेदना वेदनाच असते. तरीही चप्पल हरवलेल्या दु:खी माणसाला पाय तुटलेल्या माणसाची गोष्ट सांगण्याची आपल्याकडे प्रथा आहे. तुलना म्हणून नाही, पण सहज सांगतोय. आमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची साथ आलेली आहे. परवा तर पस्तीस हजार कर्ज फेडता येईना म्हणून एका तरुण शेतकऱ्यानं गळफास घेतला. आधी शेतकरी म्हटलं की डोळ्यासमोर नांगरधारी शेतकरी यायचा. आता फासासकट शेतकरी दिसतो. या शेतकऱ्यांची पंचाईत आहे. परिस्थितीचा जाच सारखाच असताना त्याला त्याच्यातील शेतकऱ्याचं मरण घोषित करता येईना. त्याला स्वत:च्या देहासह लटकवून घ्यावं लागतंय. जगण्याचा मूलभूत अधिकारच संपतो. कृपया, तुझ्या मरणाची त्याच्या मरणाशी तुलना करतोय असं समजू नकोस. तुझा मन:स्ताप, यातना यांचा आदर ठेवूनच सांगतोय. शेतकरी जिवानिशी मरतो. तू मरणाची घोषणा केलेली आहेस. गेलेला जीव परत येऊच शकत नाही. केलेली घोषणा मात्र परत घेता येऊ शकते. तुझी घुसमट, तुझा त्रागा, तुझी वेदना मी समजू शकतो. त्यामुळे फुकाचा सल्ला द्यायचा अधिकार मला नाहीए. तरीही सांगतो- तू मेला नाहीस आणि मरणारही नाहीस. आई जेव्हा स्वत:च्या लेकराला रागात ‘मेल्या’ असं म्हणते तेव्हा लेकराप्रतीच्या आसक्तीचा तो आविष्कार असतो. कुठल्या आईला आपलं मूल मरावं वाटेल? तसा तुझा हा मरण घोषित करणारा तीव्र निषेध आहे. तो रास्तही आहे. तू मेल्यानंतर इथं कुणाचं अडणार आहे? स्वत:च नद्या बुजवून पुन्हा स्वत:च नद्यांचा शोध लावणारे हे लोक आहेत.
मित्रा, माणसाला मारता येतं, विचाराला नाही मारता येत. विहीर बुजवता येते, पण पाण्याला संपवता येत नाही. झरे वळवता येतात, पण थांबवता येत नाहीत. कंदिलावरच्या वाढत्या काजळीनं ज्योत दिसेनाशी होते, पण विझत नाही. मला खात्री आहे- तू हे सर्व जाणतोसच. मला एक खरं खरं सांग. तू घोषित केलंयस म्हणून तुझ्यातला लेखक खरंच मेलाय? तुझी संवेदना मेलीय? तुला कशाबद्दल काहीच वाटत नाहीए?
मला माहीत आहेत- तुझे शिवशिवणारे ओठ आणि अनावर झालेली लेखणी. पुन्हा तुला लाल-पोपटी पानांची पालवी फुटेल. तुझ्या कथेची, कवितेची आम्ही वाट पाहत आहोत. तूर्त लिहिण्या-वाचण्याची शिसारी आली असेल तर किमान पुढील दोन ओळी वाचच वाच. लेखनासाठी शुभेच्छा. घरी सर्वाना नमस्कार. वाचतोयस नं..
‘वाढलेल्या काजळीने
ज्योत विझते का?
गळा दाबल्याने
गाणे अडते का?’
तुझाच-
शेपूट फुटण्याच्या भीतीने
टरकलेला एक कवी
 
-दासू वैद्य