वंदना बोकील-कुलकर्णी माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्याने ती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका.vandanabk63 @gmail.com