प्रा. मं. गो. राजाध्यक्ष

‘‘व्यंगचित्रं काढणारा चित्रकारापुढे एक पायरी पुढे असतो. त्याचे ड्रॉइंग तर उत्तम असावेच लागते, शिवाय त्याचा रेषेचा, शरीरशास्त्राचा, कॉम्पोझिशनचा पाया भक्कम असावा लागतो. राजकीय व्यंगचित्रे काढताना ती केवळ शिक्के मारल्याप्रमाणे एकेक काढून दाखवता येत नाहीत. तर भोवतालचे वातावरणही त्यात घ्यावे लागते. मंत्री दाखवताना पलीकडच्या दालनात त्याचा सचिव दाखवावा लागतो. अलीकडच्या भागात शिपाई फायली घेऊन जात असताना दिसतो. शिवाय छतावरील पंखे, दिवे, भिंतीवरील दिव्याची बटणे हे सर्व अभ्यासपूर्ण तऱ्हेने चित्रित करावे लागते.’’ जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण दूरदर्शनवरील एका मुलाखतीत बोलत होते आणि ते खरेच होते. व्यंगचित्राची ताकद खूप मोठी असते.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

असाच एक मुलगा कोल्हापूरमधील आपल्या शाळेत चित्रे काढण्यात रमत होता. त्याचे चित्रकला शिक्षक शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रॉइंगच्या दोन परीक्षाही त्याने दिल्या. कोल्हापूर हे तसे कलापूर म्हणून ओळखले जात असे. आबालाल रहमान, बाबूराव पेंटर, माधवराव बागल अशा दिग्गज कलाकारांची चित्रे त्या काळात घरोघरी दिसत असत. त्याचाही प्रभाव या बाल कलाकारावर पडला. पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबईला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचं हेही त्याने मनाशी नक्की केले. तो कोल्हापुरातील ज्या वाडय़ात रहात असे. तेथील आणखी एक मुलगादेखील असाच चित्रकलेच्या वेडाने झपाटलेला होता. दोघांची मिळून कला साधना सुरू झाली. शिरगावकरांच्या घरी होणाऱ्या ज्येष्ठ चित्रकारांच्या चर्चेमधून मार्गदर्शनही व्हायचे, पण या मुलाने सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर त्याच्या जिवलग मित्राने स्कूल ऑफ आर्टची वाट धरली. हा स्कूल ऑफ आर्टमध्ये उच्च कला शिक्षणासाठी गेलेला मुलगा होता, आजचे सुप्रसिद्ध कलाकार शि. द. फडणीस व पुढे इंटर सायन्स झाल्यावर इंजिनीअिरग कॉलेजमध्ये दाखल झालेल्या या मुलाचे नाव होते वसंत सरवटे. हास्य आणि साहित्याशी नातं जुळलेले एक व्यंगचित्रकार. त्यामुळे काही काळ का होईना, सरवटेंचा चित्रकलेशी संपर्क तुटला, पण नियतीला ते मंजूर नव्हते. महाराष्ट्राला एक व्यंगचित्रकार घडवायचा होता आणि तो तसा घडलाही!

वसंत सरवटेंचा जन्म ३ फेब्रुवारी १९२७ रोजी कोल्हापूर येथे झाला. वसंतरावांनी इंजिनीअिरगची प्रथम वर्षांची परीक्षा दिली आणि त्यानंतर आलेल्या दीर्घ आजारामुळे सुमारे दोन वर्षे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. या सक्तीच्या विश्रांतीमध्ये त्यांच्यातील चित्रकला उफाळून आली. मात्र शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची सोय आता नव्हती. त्यामुळे स्वत:च्याच हिमतीवर त्यांनी त्या कलेची तपश्चर्या सुरू केली. आजपर्यंत गोळा केलेला चित्रकलेचा अनुभव जोडीला घेऊन तांत्रिकदृष्टय़ा रेखाटन कसे करावे याकडे सरवटे यांनी विशेष लक्ष पुरवले. तसेच चित्रामध्ये आशय महत्त्वाचा असतो. त्यासाठी सभोवार पाहण्याची चौकस दृष्टी हवी, ती त्यांना लाभली होती. सुरुवातीला त्यांना छापील चित्रांची नक्कल करणे सुलभ वाटत असे; पण पुढे त्यांच्या वाचनात बरीच पाश्चात्त्य नियतकालिके आली अन् सरवटय़ांची दृष्टी बदलली. चित्रकारांच्या विविध शैली त्यांच्या नजरेस पडल्या. विशेषत: व्यंगचित्रे हा प्रकार केवळ रेखाटनांपुरता नसून तो साहित्यनिर्मितीचाच एक प्रकार आहे, हे त्यांना जाणवले आणि आजारातून उठल्यावर त्यांनी पुन्हा इंजिनीअिरगचा अभ्यास सुरू केला.

इंजिनीअिरगची पदवी संपादन केल्यानंतर पुढे सरवटे मुंबईला आले. चित्रे काढणे सुरूच होते. मुंबईला ‘ए.सी.सी.’ या सिमेंट कंपनीत डिझाइन इंजिनीअर म्हणून कामाला लागल्यानंतरही सरवटय़ांचे रेखाटन चालूच होते. अनुभवाच्या शाळेतून त्यांनी कलेचे धडे गिरवायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे व्यंगचित्रामध्ये त्यांनी विशेष गती दाखवली. येथे चित्र तर हवेच, पण त्याही पुढे जाऊन त्यातील आशय, त्यावरील तुमचे भाष्य, नेमके साधलेले मर्म आणि त्याबरोबर व्यक्तीचा स्वभाव विशेष दाखवणारी हुकमी रेषा- जी कोणाकडूनच शिकता येत नाही. त्यातील मानवी आकृतीच्या अभ्यासासाठी मॉडेल्सवरून रेखाटने करणे आवश्यक होते. त्यासाठी सरवटय़ांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या सायंकालीन छंद वर्गात प्रवेश घेतला आणि नोकरी सांभाळून तीन-चार वर्षे जोमाने अभ्यास केला. येथे त्यांना गुरुवर्य शंकरराव पळशीकरांचं मौलिक मार्गदर्शन मिळाले. जोडीला बी. डी. शिरगावकरही असत. कधी अधिष्ठाता गोंधळेकर यांच्याही फेऱ्या होत असत. मात्र येथे कोण शिकवत नसत. सर्व जण आपापले काम करण्यात मग्न असत. जर तुम्हाला काही अडचण असली तरच सल्ला मिळे. मुंबईत आल्यावर काही दिवस भावाकडे काढून पाल्र्याला त्यांनी स्वत:ची जागा घेतली आणि स्वत:च्या कामासाठी टेबल-खुर्ची व चित्रकलेच्या साहित्यासाठी स्वतंत्र जागा केली, ज्यावरून पुढे त्यांनी अनेक व्यंगचित्रांना जन्म दिला.

वसंत सरवटे यांची व्यंगचित्रे ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘वसुधा’, ‘वीणा’ यांसारख्या साहित्यिक दर्जाच्या मासिकांतून प्रसिद्ध होऊ लागली. विशेष करून ‘हंस’, ‘मोहिनी’मधील व्यंगचित्रांना जाणकारांकडून चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. व्यंगचित्रामध्ये कॉम्पोझिशन हा तांत्रिक प्राण असतो. प्रत्येक चित्राची मागणी वेगळी असते व ती पूर्ण करण्यासाठी स्वत:च्या प्रयोगक्षमतेवरच अवलंबून राहावे लागते. सरवटेंनी अनेक नामांकित आणि दर्जेदार अशा लेखक-साहित्यिकांच्या साहित्यासाठी चित्रनिर्मिती केली. साहित्य सजावटीच्या निमित्ताने त्यांना थोर लेखकांचा स्नेह लाभला. त्यामध्ये पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, रमेश मंत्री असे नामांकित होते. त्यांच्या सहवासातून सरवटेंना बरेच काही शिकायला मिळाले. जयवंत दळवींचा ‘ठणठणपाळ’ त्यांनी आपल्या चित्रातून मराठी साहित्यात अजरामर केला. पु. ल. देशपांडे यांच्यासाठी तर त्यांनी अगणित काम केले. भाईंच्या विनोदी लिखाणासाठी चित्रे काढणे हा त्यांना नेहमी आनंददायक अनुभव होता. विशेषत: त्यांच्या ‘बटाटय़ाची चाळ’साठी काढलेल्या अर्कचित्रांना. त्यांनी त्यातील अनेक व्यक्तिरेखा जिवंत केल्या. त्यातील आकाराच्या मर्यादेमुळे दाखवलेला चाळीचा फक्त वरचा मजला, मोडकळीस आलेले छप्पर, वाळवीने खाल्लेले खांब, उखडलेल्या लाद्या, कठडय़ावर सुकत घातलेले कपडे, वर टांगलेल्या डालडय़ाच्या डब्यात लावलेली तुळस या सर्वच गोष्टी भाईंच्या मनातील चाळीचे दर्शन घडवणाऱ्या होत्या आणि भाईंनीही त्यांना यासाठी मनसोक्त दाद दिली.

सरवटेंनी केवळ हास्यचित्रेच काढली नाहीत, तर साहित्य क्षेत्रातील कथाचित्रेही तितकीच समरसतेने आविष्कृत केली. किंबहुना तीच त्यांची ओळख राहिली. त्या काळच्या कथा मुख्यत्वे करून घटनाप्रधान असल्यामुळे त्यात केवळ सजावटीचा भाग असे; पण नंतरच्या ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’ आदी नियतकालिके एक विचारवंतांचा नवा वर्ग निर्माण करत होती. त्यांच्यातील नवकथांच्या बाबतीत ही विसंगती लक्षणीय होती आणि त्याबरोबर चित्रकाराची कथेशी असलेली सुसंगती अशा शैलीतील अर्थपूर्ण उणीव दूर करीत होती.

रमेश मंत्री यांनी इंग्रजीतील ‘जेम्स बॉण्ड’ या पात्रापासून मराठीत ‘जनू बांडे’ हे विडंबनात्मक पात्र आणले, त्या वेळी सरवटेंनी शॉन कॉनेरीला डोळय़ासमोर ठेवून ते चित्रित केले. ‘जनू बांडे’ या कथामालिकेतील त्यांची चित्रे खूपच गाजली. कारकीर्दीच्या आरंभी ‘हंस’, ‘मोहिनी’चे अनंत अंतरकर व नंतर ‘मौज’चे श्री. पु. भागवत व राम पटवर्धन, ‘वीणा’चे उमाकांत ठोमरे यांनी दिलेल्या उत्तेजनाचा ते नेहमीच उल्लेख करीत.

१९६४ साली ‘मॅजेस्टिक’चे संस्थापक-संपादक केशवराव कोठावळे यांच्या सहकार्याने ‘ग्रंथप्रेमी मंडळ’ स्थापन झाले. त्या वेळी जयवंत दळवी, रमेश मंत्री व वसंत सरवटे यांच्या सहकार्याने वाचकांचे वैचारिक मंथन करणारे ‘ललित’ हे मासिक सुरू करण्यात आले. साहजिकच त्याचे मुखपृष्ठ व आतील सजावट, बोधचित्रे करण्याचे काम वसंतरावांकडे देण्यात आले. त्यांना येथे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. या वेळी मुखपृष्ठ, व्यंगचित्रे यामध्ये जे जे काही करता येईल, जे काही करून पाहावेसे वाटेल ते सर्व त्यांनी येथे करून पाहिले. जणू चित्रांची प्रयोगशाळाच त्यांना येथे गवसली होती. ‘ललित’ मासिकाच्या अगदी प्रारंभापासून असलेले एकमेव चित्रकार हे सरवटे यांच्या नावावर असलेलं एक मानाचं पान! ‘ललित’ मासिकाच्या १९६४च्या पहिल्या दिवाळी अंकापासून मुखपृष्ठे आणि आतील चित्रे त्यांनी आरंभापासून ती त्यांच्या हयातीपर्यंत सतत केली. चाळीसपेक्षा जास्त वर्ष मोठी अर्थपूर्ण, खुमासदार, गर्भित अशी मुखपृष्ठे काढून त्यांना सरवटय़ांनी योग्य न्याय दिला. १९७७ साली ‘ललित’ने खास ‘वसंत सरवटे गौरव अंक’ काढला, त्याचेही मुखपृष्ठ त्यांचीच बनवले होते. ते चित्र दोन भागांत विभागले होते. सभोवतालचे वास्तव आणि फुलातून जग पाहण्याच्या फॅंटसीत रमलेला कलावंत- अशा दोन भागांत चित्रं मधोमध विभागले आहे आणि मधले व्यक्तिचित्र वास्तव भागात रेषांतून, तर फॅंटसी भागात छायाचित्रांतून दाखवून वास्तव व फॅंटसी यांची एकमेकांतील गुंतागुंत सूचित केली आहे. बालसाहित्याला पोषक अशी बालचित्रे काढून त्यांनी बालवर्गाला आनंदित केले. िवदा करंदीकरांच्या ‘राणीचा बाग’सारख्या बालसाहित्याला बहुरंगी असा निरागस चेहरा दिला. निखळ व्यंगचित्रांची दुनिया किती समृद्ध आहे, किती संपन्न आहे हे वसंत सरवटे यांनी आपल्या चित्रांतून उलगडून दाखवले; आणि हे करत असताना त्यांनी आपल्या व्यंगचित्रांचा दर्जा उच्च ठेवला. त्यांची अभिरुची आणि संपन्नता जपली आणि म्हणूनच ते एका विशिष्ट दर्जाचे व्यंगचित्रकार म्हणून कायम स्मरणात राहिले.

मुंबईतील ‘बाँबे बुक डेपो’मध्ये पुस्तक जत्रा भरत असे. त्या वेळी रोज एका लेखकाच्या स्वाक्षरीचा कार्यक्रम त्याची पुस्तके विकत घेणाऱ्या वाचकांसाठी ठरला होता. ‘ठणठणपाळ’ या लेखकाची पुस्तकेही त्यात होती. सुरुवातीला हा ‘ठणठणपाळ’ कोण आहे हे कुणालाच माहीत नव्हते. मात्र ‘ठणठणपाळ’चा दिवस आला तेव्हा ‘ठणठणपाळ’चा एक मोठा कटआऊट ठेवण्यात आला होता व त्यामागून हात बाहेर काढून सही केली जात होती; पण वाचकांनी ‘ठणठणपाळ’ दिसलाच पाहिजे, असा आग्रह केला. तेव्हा मात्र कटआऊटमागून लेखक पुढे आले अन् ते होते जयवंत दळवी. एक गुपित उघड झाले. मात्र दळवींचा हा ‘ठणठणपाळ’ गाजवण्यात सरवटे यांचाही तितकाच मोठा हात होता. त्यांनी त्याला दृश्य स्वरूप दिले होते. तशीच सरवटेंनी अनेक श्रेष्ठ लेखकांची वेष्टनेही केली आहेत, तीही त्यांच्या साहित्याचा दर्जा ठेवून.

वसंत सरवटेंनी कथाचित्रे, मुखपृष्ठे आणि विशेष करून व्यंगचित्रे व अर्कचित्रे मोठय़ा प्रमाणावर काढली. अर्कचित्रे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे कॅरिकेचर. अर्कचित्र हा शब्द सरवटेंनीच दिला आहे. अर्कचित्रांमध्ये सरवटेंनी स्वत:चे असे मानदंड निर्माण केले आहेत. त्यांची प्रभावी व वाहती रेषा, चित्रांच्या हुकमती सामर्थ्यांने व्यक्तीच्या अंतरंगात शिरून तिची स्वभाववैशिष्टय़े दाखवते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी त्यात दाखवलेला भावाविष्कार. संपूर्ण नवरसाची निर्मिती त्यातून दिसून येते. त्यांची चित्रे व्यंगात्मक अंगाने जात असली तरी ती आपली प्रमाणबद्धता व लय सोडत नाहीत; पण त्या व्यक्तीची लकब दाखवताना त्या व्यक्ती आपण केवळ पाहत नसतो तर त्यांच्याशी संवाद साधत असतो. त्यांच्या भावाविष्कारावरूनच आपणाला त्यांचे विचार स्पष्ट जाणवतात. त्यातून कधी आपण अनंत काणेकरांना भेटतो, कधी ग. दि. माडगूळकर आपल्याशी संवाद साधतात. कधी आचार्य अत्रे दिलखुलास हसवत असतात, कधी गंभीर चेहऱ्याचे ग. का. रायकर खुर्चीवर दोन्ही पाय घेऊन बसलेले दिसतात. पु. ल. देशपांडे मिस्कीलपणे संवाद साधतात. शिवाय गंगाधर गाडगीळ, श्री. पु. भागवत, रमेश मंत्री, रामदास भटकळ अशांची व्यक्तिचित्रे ही व्यंगचित्रकलेचा एक सर्वोत्कृष्ट आविष्कार मानावा लागेल.

ए.सी.सी.मधून सरवटे बाहेर पडले. अर्थात ए.सी.सी.तील नोकरी ही त्यांची महत्त्वाकांक्षा कधी नव्हतीच. केवळ एक चरितार्थाचे साधन म्हणूनच त्याकडे त्यांनी पाहिले होते. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी चित्रकला-व्यंगचित्रकलेला वाहून घेतले होते. त्यांनी स्वयंप्रेरणेने जो मार्ग स्वीकारला तो निष्ठेने जोपासला. मराठी साहित्याच्या क्षेत्रातील ते एक चित्रमय मानिबदू ठरले. व्यंगचित्र हे संवेदनशीलता जागृत ठेवण्याचे साधन आहे हे त्यांनी पक्कं मनाशी ठरवलं होतं. जेव्हा त्यांनी आपला ‘खडा मारायचा तर..’ हा व्यंगचित्र संग्रह ‘राज्य पुरस्कार’ स्पर्धेसाठी पाठवला, तेव्हा हा साहित्याच्या कोणत्याच प्रकारात बसत नाही म्हणून तो स्वीकारावयास नकार देण्यात आला होता. पण काही वर्षांनी व्यंगचित्र हा चित्राच्या माध्यमातून मांडलेला साहित्याचाच एक प्रकार आहे, हे त्यांनी पटवून दिले. त्यामुळे सरकारला ते मान्य करावे लागले.

मराठी साहित्यसृष्टीला आपल्या व्यंगात्मक चित्रसंपदेने हसवणारा, नटवणारा आणि तिला सर्वागांनी समृद्ध करणारा महाराष्ट्राचा हा हरहुन्नरी कलावंत २४ डिसेंबर २०१६ रोजी या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. त्या वेळी कदाचित त्यांच्या अर्कचित्रांनी-व्यंगचित्रांनी खळाळून हसणाऱ्या साहित्य- कलावेडय़ा रसिकांचा श्वासही क्षणभर अडकला असेल!
rajapost@gmail.com