सतीश लळीत कोकणातील राजापूरच्या पठारावरची ही कातळशिल्पे किमान २५ हजार वष्रे जुनी, याबद्दल एकमत आहे. मात्र ती कशासाठी खोदली गेली असावीत? बारसू येथील प्रकल्पामुळे हे कुतूहल नव्याने जागे झाले.. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथे होणारी प्रस्तावित रिफायनरी सध्या चर्चेत आहे. यानिमित्ताने आणखी एक खूप महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय चर्चेला आला आहे तो कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचा. जेथे ही रिफायनरी प्रस्तावित आहे, त्या बारसू परिसरात दीडशेहून अधिक कातळशिल्पे आहेत आणि रिफायनरीमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत कोकणातील ज्या कातळशिल्पांचा समावेश केला आहे, त्यात बारसूही आहे. केवळ कोकणातीलच नव्हे तर मानवी संस्कृतीच्या दृष्टीने अमोल असा हा जागतिक वारसा आहे. काय आहेत ही कातळशिल्पे? कोणी खोदली? कशी आणि का खोदली? त्यांचा नेमका कालावधी कोणता? त्यांचा अर्थ काय आणि खोदण्याचा उद्देश काय?.. असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभे राहतात. याचे कारण हा विषय तुलनेत नवीन आहे. मी गेली बावीसहून अधिक वर्षे या विषयाचा अभ्यास करीत आहे. ६ मे २००१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हिवाळे (ता. मालवण) येथील कातळशिल्पांचा शोध मी, माझे बंधू डॉ. बाळकृष्ण लळीत यांच्यासोबतीने सर्वप्रथम लावला आणि कोकणातील प्रागैतिहासिक काळातील एक दरवाजा किलकिला झाला. तोपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी आणि अन्य एक-दोन ठिकाणची कातळशिल्पे ज्ञात होती. अन्यथा ती केवळ स्थानिक लोकांपुरती ‘पांडवांची चित्रे’ म्हणून सीमित होती. मी ज्या ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’चा आजीव सदस्य आहे, त्या संस्थेच्या २०१२ साली बदामी (कर्नाटक) येथे झालेल्या १७ व्या वार्षिक काँग्रेसमध्ये कातळशिल्पे या विषयावरचा शोधनिबंध मी सादर केला आणि तेव्हापासून हा विषय एका व्यापक पटलावर आला. गेल्या २२ वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे २० ठिकाणी तीनशेहून अधिक, तर रत्नागिरी जिल्ह्यात दीडशेहून अधिक ठिकाणी पंधराशेपेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या विषयावर मी ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हा संशोधनात्मक ग्रंथ गेल्या वर्षी प्रसिद्ध केला आहे. राज्य सरकारच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाने या विषयात लक्ष घातल्याने या विषयाला गती मिळाली असून, त्यांचे संशोधन, संरक्षण या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत कोकणातील ज्या कातळशिल्पांचा समावेश केला आहे, त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, रुंधेतळी, देवाचे गोठणे, बारसू, देवीहसोळ, जांभरुण, उक्षी या सात ठिकाणांचा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी आणि गोव्यातील पणसाईमळ या एकूण नऊ ठिकाणांचा समावेश आहे. कोकणाची भौगोलिक रचना दख्खनचे पठार आणि देशावरील अन्य प्रदेशापेक्षा फार वेगळी आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री यांनी बंदिस्त केलेला, सरासरी साठ किलोमीटर रुंद आणि (गोव्यापासून पालघपर्यंत) साडेआठशे किलोमीटर लांब असलेला, चिंचोळा, निसर्गसमृद्ध भूभाग म्हणजे कोकण. या भूभागाचे पूर्वपश्चिम असे खलाटी, वलाटी आणि सह्यपट्टी असे तीन भाग पडतात. खलाटी म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून २० किलोमीटरचा थोडा वालुकामय आणि जांभ्या दगडाच्या सडेपठारांचा (लॅटेराइट) भाग. वलाटी म्हणजे त्यापुढच्या वीस किलोमीटरचा सुपीक जमिनीचा बागायतींचा पट्टा आणि सह्याद्रीपर्यंतच्या वीस किलोमीरचा डोंगराळ आणि जंगलांचा भाग म्हणजे सह्यपट्टी. खलाटीच्या जांभ्या दगडाच्या सडेपठारांवरच प्रामुख्याने ही कातळशिल्पे आढळून येतात. लाखो वर्षांपासून पृथ्वीतलावर असणाऱ्या आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीतही सतत प्रगती करणाऱ्या मानवाला स्थैर्य लाभले ते जेमतेम दहा-बारा हजार वर्षांपूर्वी. तोपर्यंत त्याला अन्न, निवारा आणि संरक्षण यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागले. जगाच्या अनेक भागांत आजही रानटी, आदिम जमाती वास्तव्य करून आहेत. यावरून मानवाच्या या कष्टमय प्रगतीची कल्पना यावी. मानव नवाश्मयुगाच्या सुमारास एका ठिकाणी वस्ती करून राहू लागण्याच्या पूर्वीच्या काळातील पुरावे फारसे मिळत नाहीत, याचे कारण तो नैसर्गिक गुहांमध्ये (Rock Shelter) किंवा उघडय़ावरच राहत असे. हे पुरावे म्हणजे मुख्यत: त्याने दगडापासून तयार केलेली वेगवेगळय़ा प्रकारची हत्यारे होत. शिकार हेच उपजिविकेचे साधन असल्याने ही हत्यारे त्याच्या दृष्टीने जीवनाचा आधारच होती. त्यामुळे त्याने दगडी हत्यारे तयार केली. नंतरच्या काळात तर हाडे, शिगे यांच्यापासून ही हत्यारे तयार करण्याचे कसब त्याने आत्मसात केले. आदिमानव जेव्हा एका ठिकाणी स्थायिक होऊ लागला, तेव्हा टोळय़ांचे रूपांतर हळूहळू अगदी प्राथमिक अवस्थेमधल्या का होईना, पण समाजामध्ये होऊ लागले. एकत्रित समाजामुळे हळूहळू काही नियम तयार झाले असावेत. पूर्णपणे निसर्गाच्या सहवासात राहणाऱ्या आणि निसर्गावरच आपले अस्तित्व अवलंबून असणाऱ्या मानवाला निसर्गाच्या अफाट ताकदीचा प्रत्यय सारखा येत असणार. जसजसा मानव उत्क्रांत होत गेला, तसतसा त्याच्या बुद्धीचाही विकास होत गेला. त्याच्या ठिकाणी आहार, निद्रा, भय, मैथुन या सजीव प्राण्याच्या मूलभूत भावनांपेक्षा अन्य भावनांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. याचदरम्यान मानवाच्या ठिकाणी कलावृत्ती निर्माण होण्यास सुरुवात झाली. तसेच, भटक्या जीवनाला थोडेफार स्थैर्य आल्याने त्याला कदाचित विरंगुळय़ासाठी काही काळ मिळू लागला असण्याची शक्यता आहे. हाच काळ त्याने कलासाधनेसाठी घालवला असण्याची आणि यातूनच कातळशिल्पांसारख्या कलाकृतींची निर्मिती झाल्याची शक्यता आहे. कातळशिल्पे म्हणजे अश्मयुगातील मानवाने जांभ्या दगडाच्या पठारावर दगडाच्या साहाय्याने खोदून किंवा कोरून ठेवलेल्या कलाकृती होत. प्राणी, पक्षी, मासे, मानवाकृती यांचा यात समावेश आहे. हिवाळे, कुडोपी, वानिवडे, आरे, वाघोटण येथे व अन्य काही ठिकाणी आश्चर्यकारक अशा प्रमाणबद्ध भौमितिक अमूर्त रचना सापडल्या आहेत. अशा रचना कोरणारा मानव प्रगल्भ असला पाहिजे. बऱ्याचशा रचनांमध्ये चौकोन किंवा आयतांमध्ये आणखी काही चौकोन आखून त्यात नागमोडी रेषा खोदलेले शिल्पपट्ट आढळतात. गूढ नकाशांप्रमाणे या रचना भासतात. अशा प्रकारचे शिल्पपट्ट रत्नागिरी जिल्ह्यातही आढळले आहेत. काही ठिकाणी वर्तुळे ( circles), चक्री वर्तुळे (( circles) चक्रव्यूह ( labirynths) आढळून येतात. यांचा संबंध आकाशातील ग्रहतारे यांच्याशी किंवा खगोलाशी असावा का,हासुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हिवाळे येथे बारा फूट लांबीची एक मानवाकृती खोदलेली आहे. तिच्याभोवती चौकटही आहे. याशिवाय अन्य दोन मानवाकृती आहेत. कुडोपी येथे दोन अतिशय सुस्पष्ट व अलंकारिक चौकटी असलेल्या दोन मानवाकृती आहेत. या मानवाकृती म्हणजे टोळीतील ज्येष्ठ सदस्य किंवा प्रमुख यांच्या मृत्यूनंतर त्यांची स्मृती म्हणून खोदल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. ही सर्व कातळशिल्पे लांबलचक कातळपठारावर आहेत. या ठिकाणी जो समाज वस्ती करून राहत होता, त्याला जवळपास दफनाची सोय नव्हती. जिथे खोदकाम करून खड्डा करणे शक्य आहे, अशा ठिकाणी म्हणजे दूरवर दफनविधी करावा लागत असणार. मात्र मृत व्यक्तीच्या स्मृतींशी रोजच निकटचा संपर्क राहावा, विधी करणे सोपे जावे, यासाठी कदाचित वसतिस्थानाजवळ त्यांची ही स्मृतिस्थळे केली गेली असावीत, असा एक अंदाज बांधता येतो. काही ठिकाणी मातृदेवतासदृश शिल्पेही आढळली आहेत. केरळपासून ते रत्नागिरीपर्यंत अनेक ठिकाणी कातळशिल्पे आढळली असून, त्यामध्ये काही परस्परसंबंध, साखळी (लिनिएज) असण्याची शक्यता आहे. पक्षी, प्राणी, मासे, अमूर्त रेषा व चित्रांचे शिल्पपट्ट रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यात आढळले आहेत. या सर्वामध्ये काही प्रकारचे साधम्र्य (पॅटर्न) दिसून येते. कदाचित त्या काळात तत्कालीन मानवी समूहांचे स्थलांतर या परिसरात होत असावे, असा निष्कर्षही यावरून काढता येतो.कातळशिल्पांचा विषय निघाला की या कलाकृती कोणत्या कालावधीत कोरण्यात किंवा खोदण्यात आल्या, हा प्रश्न हमखासपणे विचारला जातो. याचे निश्चित उत्तर देता येत नाही. पण याबाबत काही अंदाज लावण्यात आले आहेत. एक नक्की की हे सर्व अश्मयुगात घडले आहे. परंतु अश्मयुगाचा कालावधी हा प्रदीर्घ आहे. जगभरात विविध ठिकाणी सापडलेल्या पाषाणकलेचा (गुहाचित्रे आणि कातळशिल्पे) विचार केला तर साधारणत: २५ ते ३० हजार वर्षांपूर्वी म्हणजे मध्याश्मयुगात याची सुरुवात झाली असावी. मानवाची बुद्धी प्रगत होत गेली, तसतशी त्याने दगडी हत्यारांची निर्मिती, अग्नीचा वापर आणि नियंत्रण, निवारा, मृतांचे दफन, वस्ती, पशुपालन, मातीची भांडी, शेती असे प्रगतीचे एकएक टप्पे पार केले. याचदरम्यान त्याच्या अंगी कलावृत्तीचा जन्म झाला. हा सर्व प्रगतीक्रम लक्षात घेतला तर पाषाणकला ही इसवीसनपूर्व २५ हजार ते पाच हजार वर्षे या काळादरम्यानची आहे, असे म्हणता येईल. अर्थात हा केवळ अंदाज आहे. दुसरा प्रश्न या कातळशिल्पांचा अर्थ काय? तसे पाहिले तर कातळशिल्पांचा अर्थ लावणे अतिशय जटिल आहे. ही कातळशिल्पे खोदण्याचा अश्मयुगीन मानवाचा नेमका कोणता उद्देश होता, त्या चित्रांचा अर्थ काय, हे प्रश्न आजही बऱ्याचअंशी अनुत्तरित आहेत. गुहाचित्रांमधील प्राणी व त्यांच्या शिकारीच्या प्रसंगांची चित्रे किंवा कातळशिल्पांमधील प्राणी यांचा अर्थ काही प्रमाणात लागू शकतो. मेमरी ड्रॉइंग या चित्रकला पद्धतीनुसार त्याने हे पूर्वी पाहिलेले, अनुभवलेले चितारले किंवा खोदले. आपल्या पुढील पिढीला याची माहिती मिळावी, असाही त्याचा उद्देश असावा. मेंदूचा सतत होत असलेला विकास, सुचणाऱ्या संकल्पना, फावल्या वेळाचा सदुपयोग हे उद्देशही त्यामागे असण्याची शक्यता आहे.दुसरी एक शक्यता अशी वाटते की, या काळात ज्या भटक्या टोळय़ा होत्या, त्या वेगवेगळय़ा प्रदेशांत शिकारीनिमित्त फिरत असत. अशा अनेक टोळय़ा असल्याने शिकारीवरून त्यांचा संघर्षही होत असणार. याकरिता विशिष्ट भूप्रदेशावरची आपली मालकी किंवा सत्ता सिद्ध करण्याचाही प्रयत्न त्याने केला असावा. वन्य प्राणीही अशा प्रकारे आपल्या क्षेत्राच्या सीमा निश्चित करून घेतात. या सीमांच्या हद्दीत ते दुसऱ्या प्राण्याला येऊ देत नाहीत. एकाच ठिकाणी अशा प्रकारे सहज लक्ष वेधून घेतील अशी चित्रे कोरून त्या टोळय़ांनी आपल्या सीमारेषा किंवा हद्द आखून घेतल्या असाव्यात, अशीही शक्यता आहे. इसवीसनाच्या आधी दोन-तीन शतकांपासून कोकणच्या अनेक बंदरांमधून रोमसोबत व्यापार होत असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुसरोंडी गुहा (पालशेत, गुहागर) आणि कोळोशी गुहा (नांदगाव, कणकवली) येथील उत्खननामध्ये कोकणातील पुराश्मयुगकालीन मानवी वसाहतींचे प्राथमिक पुरावे सापडले आहेत. त्यानंतरच्या कालावधीत कोकण प्रदेशात मानवी संस्कृतीच्या पातळीवर काय घडामोडी घडत होत्या, हे समजण्यास अजिबात वाव नाही. ही एक मोठी पोकळी आहे आणि तो अज्ञाताचा प्रांत (डार्क एज) आहे. परंतु आता रत्नागिरी, सिंधुदुर्गातील कातळशिल्पांच्या शोधामुळे या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे, असे म्हणायला हरकत नाही. कोकणातील हा प्राचीन मानवी वारसा अद्याप दुर्लक्षित आहे. मोठमोठे प्रकल्प, चिरेखाणी, नागरीकरण, रस्तेबांधणी अशा कारणांमुळे तो नष्ट होत आहे. या कातळशिल्पांचा अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास झाला तर कोकणातील मानवी अस्तित्वाच्या प्रवासावर नवा प्रकाश पडू शकेल. पण यासाठी शासनस्तरावर आवश्यक असलेली राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती, स्थानिक जनतेचा सहभाग आणि रेटा निर्माण होऊन हे प्रत्यक्षात घडेल का, हा कळीचा प्रश्न आहे. या सर्वाच्या प्राधान्यक्रमात हा विषय कोणत्या क्रमांकावर असेल, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत आशावादी राहायला हरकत नाही. satishlalit@gmail.com(लेखक हौशी पुरातत्त्व अभ्यासक व निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.)