अरुंधती देवस्थळे

एकंदर अभिजात कला पाहावी तर कालौघात अनेक कलाकृती हरवून गेल्या, त्यांचा ठावठिकाणा आज कोणाला माहीत नाही. याची उदाहरणं म्हणजे चार्ल्र्स ऑफ लिंडोस यांनी बनवलेला ‘ऱ्होडस ऑफ कलोसस’चा १० मजली संगमरवरातला (२८० ख्रिस्तपूर्व) भव्य पुतळा किंवा ‘अपॉक्सिओमेनॉस’चा लीसिपॉस ऑफ सिक्योन (३३० ख्रिस्तपूर्व) यांनी केलेला ब्रॉन्झमधला पुतळा, ‘परफेक्ट सर्कल’वाल्या ज्योटोची चित्रं (१४ वे शतक), टिशिअनची शिल्पं ते रूबेन्स, वान गॉग ते अगदी गुस्ताव क्लिम्टच्या काही चित्रांचाही बेपत्ता कलेत समावेश होतो. यांपैकी काहींच्या प्रतिकृती कुठे कुठे सापडल्याने रस असणाऱ्यांना त्या पाहता येतात. जसं की, लिसीपोच्या अपॉक्सिमेनोसची संगमरवरी प्रतिकृती १८४९ मध्ये केलेल्या रोममधील खोदकामात अचानक बाहेर आली होती.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

पण लिओनार्दो सांता मारिया डेल ग्रॅझीच्या रिफ्रॅक्टरीसाठी तीन वर्ष खपून केलेल्या विख्यात म्यूरल ‘दी लास्ट सपर’च्या (४६० x ८८० से. मी., १४९५-९८) बाबतीत असं झालं की, खूप आधीपासूनच भित्तिचित्रावर ते पुसट झाल्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या. त्यात भेगा पडायला लागल्या होत्या. जेसो (प्रायमर), पिच अँड मास्टिक (झाडांपासून मिळणारी राळ) यांच्या मिश्रणाने केलेले रंग उडायला लागले होते. आज आपण पाहतो ती काळजीपूर्वक सावरून, टिकवण्याचा प्रयत्न केलेली, जरा वेगळीच प्रतिमा आहे. म्हणून या मास्टरपीसच्या लिओनार्दोच्या हयातीत किंवा मागाहून केलेल्या प्रतिकृती पाहणं हाही एक मार्ग असतो. लिओनार्दो चित्रं पूर्ण झाल्यावर चाळीसेक वर्षांनी टोंजेर्लोने काळातल्या रिवाजानुसार त्याची प्रतिकृती रंगवून ठेवली होती. तिच्यावरून पाहता, त्यातल्या काही १६ व्या शतकातल्या प्रतिकृती, मूळच्या आसपास येतात, पण लिओनार्दो तो लिओनार्दोच! काही अवाजवी गडद होतं, काही झाकोळलं जातं, त्याची बहुस्तरीय समृद्ध कलादृष्टी इतर कोणाच्या आवाक्यात कशी येणार? काहींमध्ये बरंच काही हाती लागतं, पण ते टिकवून धरण्याच्या प्रयत्नांत मूळ रंगांची योजलेली सौम्यता हरवलीय किंवा रंगसंगतीचा तोल ढळलाय हेही तज्ज्ञ मंडळी ओळखतात. काहींना हे भव्य चित्रं म्हणजे जीजसने सर्वाना एकत्र बोलावून तुमच्यापैकी एक माझा विश्वासघात करणार आहे हे सांगण्याचा हा प्रसंग आहे, तर काहींना यात मृत्यू आणि पुनरागमनाच्या पारलौकिक कल्पनेची सुरुवात दिसते.

या चित्रावर दांडग्या शोधकार्यानंतर रशियन- अमेरिकन कला इतिहासतज्ज्ञ लेओ स्टेनबर्ग यांनी एक सुंदर पुस्तक लिओनार्दोला पत्र स्वरूपात लिहिलं आहे. त्यात बारा शिष्यांचे चेहरे, त्यांच्यापैकी काहींची देहबोली, टेबलावर जीजस आणि जूडास यांची नियोजित स्थानं, जीजसच्या पायांची ठेवण, टेबलावर ठेवलेले त्याचे आणि इतरांचे हात, त्यांचे पडलेले गट, सगळय़ांच्या कपडय़ांची रंगसंगती यावर सविस्तर भाष्य आणि मूळ चित्राच्या वेगवेगळय़ा संदर्भात मिळवलेल्या १५० प्रतिमा आहेत. तेरा माणसं जेवायला टेबलाभोवती बसलेली हा प्रसंग चित्राचा विषय म्हणून ठोकळेबाज. या आधीही या प्रसंगाची चित्रं अनेक चित्रकारांनी काढली होती. त्यात उल्लेखनीय होतं आंद्रेआ देल कास्टेनोचं रंगीबेरंगी आकाराने लिओनार्दोच्या चित्राहून जरा मोठंच. पण लिओनार्दोला जीजसच्या दगाबाजीच्या घोषणेची नाटकीयता पकडून मानवी चेहरे आणि देहबोलीतून चित्रं जिवंत करायचं होतं. त्यासाठी आधीचे चित्रकार ज्यूडासला परंपरागत चित्रात समोर बसलेला दाखवत, तसा न बसवता त्याने त्याला सर्वासारखंच बसवलं. फक्त जीजस इतरांपेक्षा उंचीने जरा मोठा. सर्वाना धक्काच बसल्याचं त्यांच्या देहबोलीतून जाणवतंय. चित्राचा विषय केवळ हा एक क्षण नसून, त्याला आणखी तीन मिती आहेत, त्यातील धूसरताही हेतुपूर्वक आहे असा विचार त्यांनी या पुस्तकांत मांडला आहे. त्यांना लिओनार्दोची ही भव्य कलाकृती एक अशी विहीर वाटते की विविध अर्थ शोधणाऱ्यांसाठी जिचा तळ गाठणं अशक्य आहे. लिओनार्दो स्वत:ला मुक्तचिंतक म्हणत असले तरी हे चित्रं त्यांच्या सश्रद्धतेमुळेच गहिरं झालं आहे असा निष्कर्ष स्टेनबर्ग काढतात.

चित्रकलेच्या संपूर्ण इतिहासात गेली अनेक वर्ष बहुचर्चित ठरलेला चेहरा म्हणजे मोनालिसा!! मोनालिसा (१५०३-१९) हा लिओनार्दोचा मास्टरपीस. फ्लोरेन्सचे सधन, कलाप्रेमी व्यापारी फ्रांचेस्को जिओकोंडा यांनी करून घेतलेलं त्यांच्या पत्नीचं म्हणजे लिसा घेरार्दिनीचं पोट्र्रेट,( ७७ ५३ से.मी. ऑइल ऑन पॉप्लर पॅनल ) जे लिओनार्दोने अंघीआरी म्यूरलच्या आधीच सुरू केलं होतं. लिसा थेट समोर बघणारी. त्या काळात उच्च घराण्यातल्या बायका नटूनथटून पोट्रेटला बसत, मोनालिसा अनलंकृत आहे. तिच्या मागे दिलेली पार्श्वभूमीही अशी की लक्ष फक्त तिच्या चेहऱ्यावर खिळून राहावं, मेरी किंवा इतर संत बायकांचा असावा तसा चेहरा. एका शांत परिपक्व पुरंध्रीचा! शांतिरसात न्हायलेला, पण गूढतेच्या आवरणामागून किंचितसं स्मित करणारा. क्लिओपात्राच्या बाबतींत ‘अ फेस दॅट लाँचड् थाऊसंड शिप्स’ असं म्हटलं जातं तसं हिच्या बाबतीत ‘अ पर्सोना दॅट इन्स्पायर्ड मिलिअन्स अँड गॉट दी क्रिएटिव्ह ज्यूसेस गोईंग’ असं म्हणायला हवं. तिने अनेक कलाकारांना शिल्पं, चित्रं काढायला प्रेरणा दिली आणि लिखाडी मंडळींना स्फूर्ती! बिचारीला फटकळ टीकेचाही सामना करावा लागला, पण तिच्याबद्दलच्या आकर्षणाला अजूनही खळ नाही. लूव्रच्या डेनॉन विंगमधल्या ७११ क्रमांकाच्या कक्षात आजही हिच्या दर्शनेच्छुकांची गर्दी असते. लिओनाडरे जेव्हा फ्रान्सच्या राजाच्या (फ्रान्सिस) दरबारात सलाई आणि मेल्झीबरोबर पेंटर म्हणून पॅरिसला आला; तेव्हा त्याच्या सामानात फक्त हे चित्रं आणि त्याची नोटबुकं होती. त्याला हे अपुरं चित्रं इतकं प्रिय होतं की आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यावर काम करत ते स्वत:जवळच ठेवलं होतं, ‘पदे पदे यन्नवतामुपैति, तदेव रूपं रमणीयताया:’ त्याच्या मृत्यूनंतर ते राजाच्या खजिन्याचा आणि शेवटी लूव्रचा भाग झालं. जाणकारांसाठी हे चित्रं कोणा एका व्यक्तीचं न राहता (तशीही ती तेवीस वर्षांची तरुणी वाटत नाही), स्फुमातो तंत्राने घडवून आणलेला छाया आणि प्रकाशाचा धूसर खेळ ठरलं. पॉप्लर लाकडावर सफेद लेडचा एक थर देऊन ग्लेझेस, पिगमेंट्स आणि तेल यांच्या मिश्रणाने हे चित्रं साकार झालं. हा थर ग्लेझेसमधून प्रकाश परीवर्तित करतो म्हणून मोनालिसाच्या मुखावर दैवी तेज आल्याचा भास होतो. ब्रशचे फटकारे अतिशय लहान- लहान, तलम. हे काम म्हणूनच वर्षांनुवर्ष चालत राहिलेलं. पण हातावर फटकारे आधीच्या पोट्र्रेट्ससारखेच भराभर मारलेले, मोकळे म्हणून त्वचा खऱ्यासारखी वाटते. स्फुमॅटोबरोबरच किरिओस्कुरोच्या वापरामुळे चित्राला त्रिमितीय चित्राचा फील येतो. मुख्य म्हणजे मोनालिसाचं गूढ हसणं. यासाठी शरीर रचनेचा अभ्यासक लिओनार्दोने प्रेतांची चिरफाड करून स्मितामागे असणाऱ्या शिरा आणि स्नायू यांचा बारकाईने अभ्यास केला होता. या चित्राची पार्श्वभूमी त्याने मध्यभागी अधुरीच सोडली आहे असं डॉ. कार्मन बाम्बखसारख्या तज्ज्ञांचं मत, त्यांनी Leonardo da Vinci Rediscovered हे त्याचे पुनर्मूल्यांकन करणारे ४ खंड लिहिलेले असून ते येल युनिव्हर्सिटीने प्रकाशित केले आहेत.

१९११ मध्ये मोनालिसाचं पेंटिंग चोरी झाल्याने बेपत्ता होते. लूव्रमध्येच काम करणाऱ्या इटालिअन कर्मचाऱ्याने दोन मित्रांच्या मदतीने पळवून ते इटलीत नेले होते, पैसे कमावण्याचा उद्देश नव्हता हे विशेष. इच्छा एवढीच की मोनालिसा तिच्या मूळ देशात एखाद्या प्रतिष्ठित संग्रहालयात असायला हवी. उच्चस्तरीय शोध सुरू झाला आणि अडीचेक वर्षांनी तिची ‘लूव्र वापसी’ झाली. तीही सिनेमात शोभावी अशी कहाणी आहे, पण त्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या आणखीनच वाढली. किमतीच्या भाषेत सांगायचं तर आता ७०० मिलियन डॉलर्स अशी नोंद आहे. लिओनार्दोने ख्रिस्ताचं केलेलं ‘साल्वातोर मुंडी’ ( सेविअर ऑफ दी वल्र्ड, ६६ ४५ से मी.) हे तैलचित्र दोन वर्षांपूर्वी ४५० मिलियन डॉलर्सना विकलं गेलं होतं.

लिओनार्दोच्या माघारी त्याच्या हस्ताक्षरात इटालियन भाषेत लिहिलेल्या १५००० वेगवेगळय़ा आकारांच्या वह्यंच्या पानांची सामग्री सापडली. (१४७५-१८१८) त्यात त्याच्या मनन -चिंतनाबरोबर कला- विषयांवर भाष्य करताना, अनेक रेखाचित्रं, नकाशे आणि आकृत्या देऊन आपला एकेक मुद्दा विशद केला आहे. कला, गणित, संगीत, स्थापत्य, शिल्पकला आणि काव्य हे या नोंदींमध्ये गुण्यागोविंदाने नांदताना दिसतात आणि त्यावरून त्यांच्या लेखकाच्या गरुडझेपेने थक्क व्हायला होतं. हे सगळं एकत्र करून त्याचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. लिओनार्दोने चित्रकलेला कुठल्याही मानवी मनाच्या व्यवहारात झुकतं माप दिलेलं असूनही तो चित्रांपेक्षा जास्त वेळ लिखाणाला देत असावा असं वाटतं. ही टिपणं तयार करताना ती प्रकाशित होतील असं लिओनार्दोला वाटलं होतं की नव्हतं, हे कळायला मार्ग नाही. पण ती ज्या स्पष्टीकरणाच्या शैलीत लिहिली आहेत त्यावरून ती वाचली जावीत असं त्याला वाटत असावं. जसं की Shadow is the obstruction of light. Shadows appear to me to be of supreme importance in perspective, because, without them opaque and solid bodies will be ill defined; that which is contained within their outlines and their boundaries themselves will be illunderstood unless they are shown against a background of a different tone from themselves. And therefore, in my first proposition concerning shadow I state that every opaque body is surrounded and its whole surface enveloped in shadow and light.किंव्हा of the difference between light and lustre; and that lustre is not included among colours, but is saturation of whiteness, and derived from the surface of wet bodies; light partakes of the colour of the object which reflects it ( to the eye) as gold or silver or the. कधी शाळेतसुद्धा न गेलेल्या या विचक्षण बुद्धीच्या कलाकारात विचाराची घट्ट शास्त्रशुद्ध बैठक असावी हे केवढं मोठं आश्चर्य!! त्याची ही विवेचनपूर्ण टिपणं पुढली ४-५ शतकं युरोपात कलेची समज आणि अभ्यासात महत्त्वाची भूमिका निभावत राहिली. लिओनार्दोच्या नोट्स नीट सांभाळून त्यांचं पुस्तक तयार करण्याचं श्रेय चित्रकार मित्र मेलझीचं! त्यातील ‘वित्रुविअन मॅन’ चं पेन आणि शाईमधलं करडय़ा कागदावरचं रेखाचित्र रेनेसान्सकालीन कला, विज्ञान आणि मानवतेत सर्वोत्कृष्टता शोधणाऱ्या पुरुषाचं प्रतीक बनलं. लिओनार्दोला एक थोर तत्त्ववेत्ता म्हटलं जाई. अखेरच्या काही वर्षांत अर्धागवायूने त्याचा उजवा हात बऱ्यापैकी निकामी होऊनही त्याला चित्रं काढणं जमत होतं. त्याने रोममधून काही चित्रं मागवून घेतली होती, ती आणि मोनालिसा हेच त्याचं धन होतं. या काळातली लिओनार्दोची ‘डेल्युज’ ( १५१७-१८) सारखी चित्रं निसर्गाचं रौद्ररूप दाखवणारी. त्याची २०० चित्रं, पूर्ण /अपूर्ण विंडसर कासलच्या आर्ट गॅलरीत आहेत.

आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे लिओनार्दोचं प्राण्यांवर अपार प्रेम! इतकं की तो त्याला समजू लागल्यापासून शाकाहारी राहिला होता. अनेकदा पक्षीविक्याकडून पिंजऱ्यातले पक्षी विकत घेऊन तो त्यांना हवेत मोकळं सोडून देई. त्याने पक्ष्यांचं निरीक्षण करून त्यांच्यावर चित्रकथाही लिहिल्या होत्या.
लिओनार्दोने २ मे १५१९ ला शेवटचा श्वास घेतला. चित्रकार मित्र मेलझी जवळ होता. त्याचा विख्यात चरित्रकार जॉर्जिओ वसारी याने लिहिलं आहे की, ६७ वर्षीय लिओनार्दोने समाचारास आलेल्या राजा फ्रान्सिसच्या खांद्यावर डोकं टेकवून आपल्या चुकांसाठी देवाची क्षमा मागत, जगाचा निरोप घेतला. त्याच्या इच्छापत्राप्रमाणे शातोच्या चर्चमध्येच त्याला चिरविश्रांती देण्यात आली. मिलानमध्ये शहराच्या मध्यवर्ती चौकात संगमरवरात त्याचा पुतळा आहे आणि त्याच्या कामाचं एक म्युझिअमही आहे, त्यात हजारो जवळपास पुरी होत आलेली किंवा त्याच्या माघारी इतरांनी ताकदीने पूर्ण केलेली चित्रं आहेत. मृत्यूनंतर पाचशे वर्ष जनमानसांत त्याच ताकदीने जिवंत राहणं, ही असामान्य प्रतिभेलाच लाभणारी गोष्ट!
arundhati.deosthale@gmail.com