रघुनंदन गोखले

सामान्यपणे बुद्धिबळपटूंचं चित्रं- जे चित्रपटातून आपल्यापुढे येतं ते ‘अति शहाणे’ या प्रकारात मोडणारं किंवा वेडगळ असं असतं. व्यावसायिक बॉण्डपटांपासून नावालाही हा खेळ न दाखवता शीर्षकात ‘शतरंज’ वापरणारे देमार बॉलीवूडपट किंवा देशी-विदेशी कलात्मक चित्रपटांनीही या खेळाला कल्पकतेने पडद्यावर आणले. बुद्धिबळात रस असणाऱ्यांनी पाहायलाच हव्यात अशा चित्रपटांवर या लेखात चर्चा.

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
artificial intelligence use in film
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे सिनेअवतार
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘जेम्स बॉण्ड’ हा चित्रपट माहिती नाही असा माणूस विरळाच आणि त्याचा ‘FROM RUSSIA WITH LOVE’ हा (काहींच्या मते) सर्वोत्कृष्ट बॉण्डपट! या चित्रपटात जेम्स बॉण्डला नामोहरम करण्यासाठी स्पेक्टर नावाची खुनशी संघटना क्रॉनस्टीन नावाच्या झेकोस्लावी ग्रँडमास्टरची मदत घेते, कारण त्याचा लौकिक असा असतो की प्रतिस्पध्र्याच्या सर्व चाली तो आधीच ओळखू शकतो. अर्थात जेम्स बॉण्ड हा नरश्रेष्ठ आपल्या अजोड कर्तृत्वामुळे (आणि नशिबाने) क्रॉनस्टीनच्या सर्व योजना उधळून अंतिम विजयी ठरतोच. क्रॉनस्टीनच्या खेळातील कौशल्य प्रेक्षकांना कळावं म्हणून त्याचा एका आंतरराष्ट्रीय सामन्यातला विजयसुद्धा एक मिनिटं दाखवला गेला आहे. माझ्यासारख्या अनेक भारतीय प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्समधील बुद्धिबळ सामन्याचं वातावरण बघण्याचा पहिला अनुभव या चित्रपटानं दिला.

सत्यजित रे यांनी ‘शतरंज के खिलाडी’ या अप्रतिम चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटामुळे बुद्धिबळ खेळाडू विक्षिप्त आणि विचित्र असतात असा गैरसमज लोकांच्या मनात झाला असला तर त्यात नवल नाही. त्यातही बॉबी फिशर नावाच्या अवलियाच्या पसरलेल्या सुरस कथा- त्यानं आइसलँडमधील रैकजेविकमध्ये बोरिस स्पास्कीविरुद्ध खेळताना न्यूयॉर्कमधून आपल्या घरातील आवडती खुर्ची मागवल्याची गोष्ट तर सर्वश्रुत!
सामान्यपणे बुद्धिबळपटूंचं चित्रं- जे चित्रपटातून आपल्यापुढे येतं ते ‘अति शहाणे’ या प्रकारात मोडणारं किंवा वेडगळ असं असतं. परंतु १९४० सालच्या प्रभात निर्मित ‘शेजारी’मध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी बुद्धिबळाचा खुबीनं वापर केलेला दिसतो. हिंदू कुटुंब आणि त्यांच्या मुस्लीम शेजारी यांची हृदयस्पर्शी कथा सांगणारा ‘शेजारी’ आणि त्याची हिंदूी आवृत्ती ‘पडोसी’ यांनी लोकांच्या मनात घर केलं होतं.

‘शतरंज’ नावाचे अनेक चित्रपट आतापर्यंत येऊन गेलेत, पण या चित्रपटात बुद्धिबळाचा दूरान्वयानेदेखील संबंध आलेला नाही; परंतु बुद्धिबळ या खेळाची मध्यवर्ती कल्पना घेऊन अथवा तिला स्पर्श करून अनेक सुंदर चित्रपट पाश्चात्त्य देशांत आलेले आहेत. त्यापैकी काहींची आपण माहिती घेऊ या.

१९२५ साली बुद्धिबळ खेळानं Chess (रशियन भाषेत Shakhmatnaya Goryachka) या २८ मिनिटांच्या विनोदी मूकपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असे म्हणायला काही हरकत नाही. त्या वर्षी मॉस्को इथं झालेल्या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय स्पर्धेची पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभली आहे. एक तरुण आणि त्याची प्रेयसी यांच्यात बुद्धिबळामुळे निर्माण झालेल्या दुराव्यात साक्षात जगज्जेता कॅपाब्लांका (प्रत्यक्ष कॅपाब्लांका!!) त्या प्रेमिकेला भेटतो आणि तिच्याशी प्रियकरांचं मीलन घडवून आणतो. कॅपाब्लांका त्याच्या एक मिनिटाच्या दर्शनानं नायिकेलाच नव्हे तर आपल्यालाही जिंकून घेतो. रिचर्ड रेटी, ग्रुनफेल्ड, बोगोलजुबोव, मार्शल असे अनेक प्रख्यात खेळाडू आपल्याला या मूकपटात भेटतात. रसिकांना हा चित्रपट पुढील Youtube link ‘ मार्फत बघता येईल. https://www.youtube.com/watch?v=NdXmtc56rsM

नंतर येतो ‘शतरंज के खिलाडी’. जशी Chess Fever मध्ये बुद्धिबळ खेळाची महती प्रेमिकांना पटते आणि बुद्धिबळाच्या मदतीनं प्रेमाचा विजय होतो, याच्याविरुद्ध बुद्धिबळ हा खेळ खलनायक ठरतो ‘शतरंज के खिलाडी’मध्ये. १८५७ सालची पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटात त्या काळचे उच्चवर्गीय लोक कसे आत्मकेंद्रित आणि बेफिकीर होते याचं वर्णन आहे. साक्षात नवाब वाजिद अली खान हा स्वत:च जर सुस्त कलाप्रेमी आणि कवी असताना त्याच्या राज्यातले बाकी उच्चभ्रू लोक कसे असणार? एकीकडे इंग्रज आपले राज्य गिळंकृत करत असताना मिर्झा सज्जाद अली आणि मीर रोशन अली हे बुद्धिबळ खेळाडू आपल्या बायकांची आणि राज्याची कटकट नको म्हणून खेडय़ात जाऊन बुद्धिबळ खेळत असतात. थोडक्यात, ही कथा आपल्या मनाला खिन्न बनवते.

एखाद्या बुद्धिबळ खेळाडूवर खोटा आळ आला तर आपल्या बुद्धिचातुर्याचा उपयोग करून तो स्वत:ची कशी मुक्तता करून घेतो या कथानकावर Knight Moves (१९९१) हा चित्रपट आधारलेला आहे. पीटर सॅन्डर्सन या बुद्धिबळ खेळाडूवर खुनाचा संशय येतो आणि तो त्यातून बाहेर पडण्यासाठी बुद्धिबळातील कौशल्याचा वापर करतो. एकीकडे खून पडत असताना पीटर प्रत्येक परिस्थितीत त्याची सांगड बुद्धिबळातील पटावरील परिस्थितीशी घालतो आणि अखेर गुन्ह्याची उकल करण्यात यशस्वी होतो. यावरून मला एक गोष्ट आठवते ती ब्रिटिश ग्रँडमास्टर रेमंड कीन यांची! एकदा एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्कॉटलंड यार्डनं त्यांची मदत घेतली होती.

Searching for Bobby Fischer (१९९३) हा खऱ्या अर्थानं बुद्धिबळ ही मध्यवर्ती कल्पना ठेवून केलेला चित्रपट! जोश वाईट्झकीन नावाच्या अमेरिकन ज्युनियर विजेत्याच्या जीवनावर त्याच्या वडिलांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आपल्याला रंगवून ठेवतो आणि अंतर्मुखही करतो. अलौकिक बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक तडजोडी यांची सांगड घालणं किती कठीण आहे आणि त्यामुळे केवळ त्या मुलांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांचीही कशी घुसमट होते त्याचं दर्शन हा चित्रपट घडवतो. ‘गांधी’ या चित्रपटामुळे गाजलेल्या बेन किंग्सले या नटानं विक्षिप्त बुद्धिबळ प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.

मी ज्या वेळी गॅरी कास्पारोव्ह विरुद्ध विश्वनाथन आनंद या सामन्यावर वृत्तपत्रात वार्ताकन करण्यासाठी १९९५ साली न्यू यॉर्कला गेलो होतो त्या वेळी जोशनं जवळजवळ निवृत्ती घेतली होती आणि तो कोलंबिया विश्वविद्यालयात तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत होता. तरीही त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटामुळे त्याच्याभोवती वलय कायम होतं. त्याचा फायदा घेऊन त्यानं त्याच वर्षी पहिलं पुस्तक लिहिलं होतं. बुद्धिबळासाठी सर्वस्व त्यागण्याची त्याची तयारी नसल्यामुळे लवकरच त्यानं बुद्धिबळातून संपूर्ण निवृत्ती घेतली आणि २००० सालानंतर त्यानं एकाही स्पर्धेत भाग घेतलेला नाही.

Freshl (१९९४) यामध्ये Knight Moves च्या उलट कथानक आहे. फ्रेश हा नायक बुद्धिबळवेडय़ा बापाचा मुलगा. आपल्या बुद्धिबळ कौशल्याचा वापर करून तो अट्टल गुन्हेगार बनतो, पण ज्या वेळी परिस्थिती उलटू लागते त्या वेळी फ्रेश त्याच कौशल्याचा वापर करून प्रतिस्पध्र्याला अडकवतो आणि अखेर बापाबरोबर बुद्धिबळ खेळण्यास मोकळा होतो असं याचं कथानक! सॅम्युएल जॅक्सन हा प्रख्यात अभिनेता या चित्रपटात फ्रेशच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. तसं पाहिलं तर या चित्रपटात बुद्धिबळ कमी आहे- ते पार्श्वभूमीपुरतंच चित्रपटाला आहे एवढंच म्हणावं लागतं.

The Luzhin Defence (२०००) हा चित्रपट रशियन कादंबरीवर काढण्यात आलेला आहे आणि तीही एक शोकांतिका आहे. लुझीन हा एक उत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू मानसिक दबाव सहन करू शकत नाही. उच्च दर्जाच्या स्पर्धेला लागणारं मनोबल त्याच्याकडे नसतं आणि त्याची प्रेयसी त्याला धीर देऊन त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तरीही त्याच्या प्रतिस्पध्र्याची कारस्थानं अखेर यशस्वी होतात आणि बुद्धिमान लुझीन आत्महत्या करतो अशी या चित्रपटाची करुण कहाणी आहे. बुद्धिबळ खेळाडू पटकन शोधू शकतील अशी एक मोठी चूक या चित्रपटात आहे. लुझीन प्रतिस्पध्र्यावर मात करतो, पण त्याची खेळी बुद्धिबळ नियमाप्रमाणे अवैध असते. सोबतच्या पटाच्या आकृतीवरून तुम्हाला कळतं का ते बघा, नाही तर जवळपासच्या कसलेल्या खेळाडूची मदत घ्या.

जर तुम्हाला बुद्धिबळ एखाद्याच्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडवून आणतं हे बघायचं असेल तर तुम्ही Queen To Play (फ्रेंच भाषेत Joueuse ) हा २००९ सालचा चित्रपट सोडू नका. कथा आहे कोर्सिका बेटावर साधं घरकाम करणाऱ्या हेलन नावाच्या बाईची! तिच्या आयुष्याला दिशा देणारी एक अनपेक्षित गोष्ट घडते- ज्या वेळी क्रूगर नावाचा एक निवृत्त अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू तिच्या गावात राहायला येतो. तो खेळत असलेला विचित्र आकाराच्या सोंगटय़ांचा खेळ तिला आकर्षित करतो आणि हेलन त्या खेळाच्या प्रेमात पडते. क्रूगर तिला सुरुवातीच्या खेळी शिकवतो.
त्यानंतर ती गावातल्या स्पर्धेत भाग घेऊ लागते आणि काही डाव जिंकल्यावर तिच्यात एक नवी उभारी येते. तिच्या रटाळ आयुष्यात एकदम बदल होतो आणि नवचैतन्यानं बहरलेली हेलन आत्मविश्वास कमावते. तिच्या नवऱ्याला तिची असूया वाटू लागते. मुलगी तिच्यावर नाराज होते. तरीही या सगळय़ातून मार्ग काढत ती अखेर कशी यशस्वी होते त्याचं छान चित्रण या फ्रेंच चित्रपटात घडतं. तुम्हाला ‘The Queen’ s Gambit ही नेटफ्लिक्सवरची मालिका आवडली असेल तर हा चित्रपटही आवडेल. फक्त मालिकेत रोमांचक आणि चित्तथरारक प्रसंग आहेत; तर चित्रपट साधा सरळ आहे. केविन क्लाईनसारखा दर्जेदार अभिनेता असल्यामुळे चित्रपटाची रंगत अधिकच वाढते.

आता तुम्हाला असं वाटेल की, या लेखामध्ये अशा गाजलेल्या चित्रपटांचा उल्लेख कसा नाही? शेवटी इतकी सगळी माहिती आपल्याला एका लेखात देणं शक्य नाही. त्यामुळे वरील सर्व चित्रपट आणि काही उत्तम माहितीपट यांची माहितीही आपल्याला पुढे घ्यायची आहे.
gokhale.chess@gmail.com