रघुनंदन गोखले
बुद्धिबळाचं वेड असणाऱ्या सर उमर हयात खान या प्रचंड श्रीमंत जमीनदाराने गावातल्या झाडाखाली बुद्धिबळ खेळणाऱ्यांतून सुलतान खान या हिऱ्याचा शोध लावला. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमध्ये तीन वेळा मीर सुलतान खान अजिंक्यवीर ठरला. असामान्य भारतीय खेळाडू ही त्याची जगभरात ओळख बनली होती. पण पुढे फाळणीनंतर त्याचे खेडे पाकिस्तानात गेल्यामुळे ‘भारतीय’ न राहिलेल्या या असामान्य बुद्धिबळपटूच्या आयुष्याची शोकांतिका झाली.
ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदच्या कर्तृत्वामुळे भारतीय बुद्धिबळाला संजीवनी मिळाली आणि त्यानंतर भारतात ३३ वर्षांत ७९ ग्रॅण्डमास्टर्स तयार झाले. महिला ग्रॅण्डमास्टर्स आणि आंतरराष्ट्रीय मास्टर्स तर अनेक आहेत. या पार्श्वभूमीवर आनंदच्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळात एक महानायक होऊन गेला हे फार कमी लोकांना माहीत असतं. त्याचं नाव होतं मीर सुलतान खान!
मागे मी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही अशा ब्रिटिश महासत्तेचा एकदा नव्हे, तर तीन वेळा मीर सुलतान खान अजिंक्यवीर होता. या स्पर्धेशी निगडीत आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, ब्रिटिश अजिंक्यपद स्पर्धा खेळणारे सांगलीचे विनायकराव खाडिलकर हे पहिले भारतीय होते. मीर सुलतान खानच्या आधी ६ वष्रे (१९२३ साली) विनायकराव ब्रिटिश अजिंक्यपद सामने खेळून आले होते. त्यांचे नातू लक्ष्मण ऊर्फएल. पी. खाडिलकर आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू असून अजूनही (वयवर्षे फक्त ८४) पुण्यातील स्पर्धामध्ये भाग घेतात.
सांगायची गंमत म्हणजे सगळय़ा देशांना स्वातंत्र्य मिळालं तरी ब्रिटिश अजिंक्यपद सामन्यांत भाग घेण्याची परवानगी राष्ट्रकुल देशांच्या नागरिकांना देण्यात आली होती. ही उदारता अचानक २००४ साली खंडित करण्यात आली. कारण लागोपाठ दोन वर्ष चेन्नईचा ग्रॅण्डमास्टर रमेश (२००२) आणि पुण्याचा ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे (२००३) यांनी ब्रिटिश ग्रॅण्डमास्टर्सना धूळ चारून मिळवलेलं अजिंक्यपद!
हे (डोकेबाज) भारतीय येतात आणि आमच्या हक्काचे पैसे (पहिले बक्षीस १० लाख रुपये) लुटून जातात अशी पोटदुखी स्वातंत्र्यापूर्वी वर्षांनुवर्षे आपल्या देशाला लुटणाऱ्यांना नाही झाली तरच नवल. पुढील वर्षीपासून भारतीयांना ब्रिटिश अजिंक्यपद सामने खेळण्यास बंदी घातली गेली.
सुलतान खानविषयी अनेक दंतकथा आहेत. पुष्कळशी जुनी वर्तमानपत्रं आणि पुस्तकं यांमधून आपल्याला खूप माहिती मिळते. एक मात्र खरं की, सुलतान खान हा एक अनमोल हिरा होता- ज्याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. दुर्दैवानं फाळणीनंतर सुलतान खानचं खेडं पाकिस्तानमध्ये गेलं आणि त्याची तिथे कदर केली गेली नाही. या महान खेळाडूला जरी कधीही ग्रॅण्डमास्टरचा किताब दिला गेला नाही, तरीही सगळे त्याला ग्रॅण्डमास्टर समजत असत.
बुद्धिबळाचं वेड असणाऱ्या सर उमर हयात खान या प्रचंड श्रीमंत जमीनदाराकडे सुलतान खान या हिऱ्याचा शोध घेण्याचं श्रेय जातं. हे खान साहेब ब्रिटिश सैन्यात एक अधिकारी होते आणि ते खूप श्रीमंत होते. ते स्वत:ला महाराजा म्हणवून घेत. रूबेन फाईन या अमेरिकन ग्रॅण्डमास्टरनं त्यांच्याविषयी जे लिहिलं आहे त्यावरून खान साहेबांचा अहंगंड दिसून येतो. फाईन लिहितो, ‘‘ब्रिटिश विजेत्यानं बोलावलं म्हणून आमच्या अमेरिकन संघानं उमर हयात खान यांचं चहाचं आमंत्रण स्वीकारलं. परंतु तेथे गेल्यावर खान साहेब म्हणाले की, आज तुमचा भाग्याचा दिवस आहे, कारण खान साहेबांचा हा वेळ त्यांच्या जर्मन कुत्र्यांशी खेळण्याचा आहे. त्या दिवशी खान साहेबांनी अमेरिकी संघासाठी (उपकार म्हणून) तो वेळ दिला आहे. पुढे त्यांनी स्वत:च्या व्यक्ती वर्णनाची (आत्मस्तुतीनं भरलेली) चार पानं प्रत्येकाला वाचायला दिली. फाईन लिहितो की, त्या चार पानांवरून आम्हाला एवढंच कळलं की खान साहेबांचं सर्वात मोठं कर्तृत्व म्हणजे त्यांचा श्रीमंत घराण्यात झालेला जन्म! यथावकाश चहा आला, काही खाद्य पदार्थही आले, पण मीर सुलतान खानचा पत्ता नाही. अखेर फाईननं विचारलं की, ‘सुलतान खान कुठे आहे?’ तेव्हा उमर हयात खान म्हणाले, ‘हा बघा इथेच आहे.’ फाईन खुर्चीवरून पडायचा बाकी होता. कारण त्यांना चहा देणाऱ्या गणवेशधारी वेटर्समधला एक मीर सुलतान खान होता! ‘ग्रॅण्डमास्टरनं वेटर म्हणून आम्हाला सेवा देण्याचा हा एकमेव प्रसंग!’ फाईन खेदानं लिहितो.
या खेळाडूचा शोध कसा लागला तीही सुरस कथा आहे. असं म्हणतात की, उमर हयात खान एकदा घोडय़ावरून रपेट करताना त्यांना एका झाडाखाली काही तरुण बुद्धिबळ खेळताना दिसले. त्यामधील एका तरुणाच्या कौशल्यानं ते थक्क झाले. हा तरुण म्हणजे मीर सुलतान खान! रत्नपारखी उमर हयात खान यांनी त्याला आपल्या पंखाखाली घेतलं आणि १९२८ साली झालेल्या भारतीय अजिंक्यपद स्पर्धेत ९ पैकी ८.५ गुण कमावून त्यानं सर उमर हयात खान यांचा विश्वास सार्थ ठरवला. पुढील वर्षी सर उमर हे इंग्लंडला जाणार होतेच आणि त्यांनी सुलतान खानला आपल्या बरोबर घेतलं.
अनेक लेखकांनी सुलतान खान या गूढ व्यक्तिमत्त्वाविषयी लिहून ठेवलं आहे. ब्रिटिश ग्रॅण्डमास्टर डॅनियल किंगनं तर त्यावर एक पुस्तक लिहिलं आहे. त्यासाठी किंगला खूप मेहनत घ्यावी लागली आणि तासन् तास ब्रिटिश वाचनालयात घालवावं लागलं. अशा या मीर सुलतान खानला आंतरराष्ट्रीय खेळाच्या नियमांची बिलकुल माहिती नव्हती. भारतीय पद्धतीनं खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळाचे नियम फार किचकट असतात. अशा परिस्थितीत खान साहेबांनी सुलतान खानला आंतरराष्ट्रीय नियम शिकवण्यासाठी काही ब्रिटिश खेळाडूंना बोलावलं.
ग्रॅण्डमास्टर सुलतान खाननं १९२९ साली इंग्लंडमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या काय घडलं याचं सुंदर वर्णन केलं आहे. त्यानं शुक्रवारी बोटीवरून उतरून थोडी विश्रांती घेतली तर त्याला उमर हयात खान म्हणाले की, एका सामन्यासाठी तयार राहा. दोन दिवसांनी रविवारी लंडनमध्ये जगज्जेता कॅपाब्लांका एका वेळी ३५ जणांशी खेळणार होता. त्या ३४ गोऱ्या खेळाडूंमध्ये पंजाबी फेटा घातलेला सुलतान खान उठून दिसत होता. प्रदर्शनीय सामन्यांना सुरुवात झाली आणि सुलतान खाननं कॅपाब्लांकाला आपल्या अनवट चालींनी पार गोंधळवून टाकलं. अवघ्या २४ खेळींत कॅपाब्लांकानं एक घोडचूक केली आणि आपला पराभव मान्य केला. ही तर एका गूढ प्रवासाची फक्त सुरुवात होती. सर उमर हयात खान यांनी सुलतान खानसाठी एक सराव स्पर्धा आयोजित केली होती. नुकत्याच आंतरराष्ट्रीय नियम शिकलेल्या आणि इंग्लंडमधल्या थंड हवेनं गारठलेल्या सुलतान खानचा या सराव स्पर्धेत चक्क शेवटचा क्रमांक लागला आणि त्या खेळाडूंमध्ये िवटर आणि येट्स वगळता एकही आघाडीचा खेळाडू नव्हता. अशा परिस्थितीत जवळ आली होती ती रॅम्सगेट येथील ब्रिटिश अजिंक्यपद स्पर्धा! आणि काय आश्चर्य! सराव स्पर्धेत शेवटचा क्रमांक लागलेल्या आणि धड इंग्रजी लिहिता-बोलता न येणाऱ्या या युवकानं धडाधड विजय मिळवले आणि ज्याच्यावर सूर्यही मावळत नाही अशा ब्रिटिश साम्राज्याचं अजिंक्यपद मिळवलं. रातोरात सुलतान खान एक स्टार बनला. आता हा काय आणखी पराक्रम करतो याकडे सगळय़ांचं लक्ष लागलेलं असताना उमर हयात खान यांनी परत भारतात येण्याचं ठरवलं आणि बिचाऱ्या सुलतान खानला परत भारतात येण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
भारतात येऊन त्याला आंतरराष्ट्रीय नियमानुसार खेळणारे खेळाडू नसल्यानं आणि इंग्रजी लिहिण्या-वाचण्याची वानवा असल्यामुळे सुलतान खाननं स्वत: कसा सराव केला असेल हे अल्लाच जाणे! पण एका वर्षांनं परत इंग्लंडला आलेला सुलतान खान वेगळाच होता.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळताना त्यानं एकाहून एक रोमहर्षक विजय मिळवले. जगज्जेते मॅक्स येवे, कॅपाब्लांका यांच्याविरुद्ध हेिस्टग्ज या स्पर्धेत मिळवलेले विजय म्हणजे भारतीयांच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट होती. त्यानं १९३२ आणि १९३३ चे ब्रिटिश अजिंक्यपदही सहज खिशात घातलं. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्यानं ब्रिटिश संघाचं अव्वल पटावर प्रतिनिधित्व केलं आणि मुख्य म्हणजे सामान्य बुद्धिबळपटूंना आजही परिचित असणाऱ्या आघाडीच्या खेळाडूंचा त्यानं केलेला पराभव. यामध्ये खेळाच्या अंतिम प्रकारातील तज्ज्ञ सालो फ्लोहर आणि अकिबा रुबीनस्टाईन यांची नावं तर नवख्या खेळाडूंना आजही माहिती असतात. जगज्जेत्या अलेक्झांडर अलेखाइन याच्याशी बरोबरीचा मानही सुलतान खाननं मिळवला.
ब्रिटिश बुद्धिबळ साम्राज्यावर सुलतान खान जसा धूमकेतूप्रमाणे अचानक आला तसाच लुप्तही झाला. डिसेंबर १९३३ ला उमर हयात खान यांनी अचानक लंडनमधून गाशा गुंडाळला. इंग्लंडमधील थंड हवेमुळे सतत आजारी पडणाऱ्या सुलतान खानला वाईट वाटण्याचं काही कारण नव्हतंच. फातिमा नावाची उमर हयात खानांची एक नोकराणी (ही पण ब्रिटिश महिलांची १९३३ सालची बुद्धिबळ विजेती होती!) म्हणाली की, सुलतान खाननं भारतात आल्यावर तुरुंगातून मुक्तता झाल्यासारखा आनंद व्यक्त केला.
सुलतान खाननं त्याची जमीन फाळणीनंतर पाकिस्तानात असल्यामुळे तेथेच राहण्याचं ठरवलं आणि येथेच त्याच्या बुद्धिबळाचा अंत झाला. त्यानं आपल्या मुलांना बुद्धिबळ शिकवलं नाही. परंतु त्याचा मुलगा अथर खान आणि नात डॉ. अथिया सुलतान यांनी परदेशात शिक्षण घेतलं. अथियानं डॅनियल किंगच्या पुस्तकावर आक्षेप घेऊन सुलतान खान हा उमर हयात खान यांचा मित्र होता आणि त्याला इंग्रजी चांगलं येत होतं असं सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु किंग याची बाजू भक्कम होती आणि तिच्या दाव्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. भारतद्वेषी अथियानं आपल्या आजोबांना भारतीय म्हणण्यासही विरोध केला आणि त्याला पाकिस्तानी म्हटलं पाहिजं असं सांगितलं. पण फाळणीनंतर एकही डाव न खेळणारा सुलतान खान ज्या वेळी खेळत होता तेव्हा अखंड भारताचा निवासी होता यावर सगळेच ठाम राहिले. पाकिस्तानी सरकारनं त्याचा कोणताही गौरव केला नाही आणि हा महान खेळाडू अज्ञातवासात असताना १९६६ साली क्षयरोगानं मरण पावला.
आज भारतीय बुद्धिबळाचं सुवर्णयुग आहे आणि मीर सुलतान खान याला मरणोत्तर ग्रॅण्डमास्टर किताब देण्याची जागतिक संघटनेकडे साधी विनंतीही पाकिस्तान संघटना करत नाही. याचं कारण म्हणजे सुलतान खान याचा उल्लेख नेहमीच भारतीय म्हणून होतो. असो! स्वत: सुलतान खानला याची जराही खंत नव्हती पुढे त्यानं बुद्धिबळाला रामराम ठोकला तो कायमचा- एखाद्या शापित गंधर्वासारखा!
gokhale.chess@gmail.com