शाळेला सुट्टी लागली की पुण्याहून ताई घरी कधी येते याची अनिश आणि राणी वाट पाहत असत. ताई त्यांना रात्री एक तरी गोष्ट सांगायचीच. त्यांच्याबरोबर पत्ते किंवा कॅरम खेळायची. कधी कधी स्क्रॅबलचा पट मांडून बसायची. आणि ताई घरी आली. अनिश आणि राणी आपापल्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळून घरी आले. रात्रीची जेवणं झाली आणि मंडळींची त्यांच्या ताईच्या मागे ‘गोष्ट सांग’ म्हणून भुणभुण सुरू झाली. तिघेही गादीत लोळत पडले आणि ताईने गोष्ट सांगायला सुरुवात केली.
‘‘एकदा काय झालं, एक…’’ म्हणेपर्यंत अनिश आणि राणी ‘‘तसली गोष्ट नकोऽऽऽ’’ म्हणून ओरडू लागले. ताई विचारात पडली. ‘‘आयडिया! मी ज्या सिरॅमिकच्या स्टुडिओत काम करते तिथली गंमत सांगते. चालेल?’’
‘‘गंमत असेल तर आवडेलच. तू तिथे गरगरणाऱ्या चाकावर छान छान भांडी, प्लेट्स, निरनिराळ्या आकारांच्या फुलदाण्या बनवतेस तिथली नं?’’ दोघेही म्हणाले.
‘‘हो. मी ज्या स्टुडिओत काम करते ना तो एक छोटासा बंगला आहे. त्या बंगल्या पुढे लहानशी बाग होऊ शकते एवढी बंगल्याच्या मागेपुढे जागाही आहे. पण त्या बंगल्यात काही वर्षं कोणीच राहत नव्हतं. बंगला त्यामुळे पडीक दिसत होता.’’
‘‘ताई, भुताची गोष्ट आहे का? मला आवडेल.’’ अनिश खूश होऊन म्हणाला. हे ऐकून राणीच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. ‘‘तिथे भूत असेल तर ताई कशी तिथे काम करेल?’’ राणी म्हणाली.
‘‘तुम्ही मधे मधे बोलू नका हां, माझी लिंक तुटते.’’ ताई वैतागून म्हणाली.
‘‘चुकलो चुकलो, ओके कन्टीन्यू.’’ दोघेही एकदम म्हणाले.
‘‘माझी सिरॅमिकची भांडी बनवणारी मैत्रीण- मेघल मला म्हणाली, ‘‘अगं, बंगला पडीक आहे त्यामुळे भाडं स्वस्त आहे. नाही तरी आपला सिरॅमिकचा पसारा केवढा असतो- माती, कुंभाराचं चाक, हत्यारं, भट्टी…’ इत्यादी. तर आपण घेऊ या हा बंगला भाड्याने.’’ मग आम्ही एक दिवस त्या बंगल्यात गेलो. बाग तर खूपच दुर्लक्षित होती. दाराचं कुलूप करकर आवाज करत कसंबसं धडपडून काढलं. आत सर्वत्र धूळच धूळ होती. कोळिष्टकांचे तर आम्ही दोघींनी मस्त फोटो काढले आणि इन्स्टावरपण टाकले. तशाच घाणीतून घरात शिरलो आणि खिडक्या उघडल्या तर समोरच्या इमारतीतून दोन बायका डोकावत होत्या. म्हणाल्या, ‘‘बरं झालं तुम्ही येताय इथे ते. नाही तर…’’ म्हणत घरात गेल्या.
‘‘ताई तिथे नक्कीच भूत असणार! नाही तर असं बोलून त्या आत का जातील?’’ अनिश जरा घाबरूनच बोलला.
‘‘आम्ही बंगल्यात गेलो तर गरगर पंखे सुरू झाले. मेघलने चमकून माझ्याकडे पाहिलं. कोणी केले असतील पंखे सुरू? आमच्या मनात आलं. स्वयंपाकघरात आम्ही डोकावलो तर फ्रिज उघडा. आत मात्र काहीच नव्हतं. आम्ही चक्रावलोच. हे असं असलं ना की भूत असतंच म्हणतात.’’ इतकं ऐकूनच राणीची चुळबुळ सुरू झाली. अनिश मात्र मुडात आला.
दुसऱ्या खोलीत जायला दार उघडलं तर असंख्य वटवाघळं आमच्या डोक्यावरून उडाली. आम्ही किंचाळलोच. तो आवाज ऐकून पुन्हा शेजारच्या इमारतीच्या खिडक्या उघडल्या. बायका खिडकीतून डोकावून विचारू लागल्या, ‘‘काही दिसलं का?’’
हे ऐकून राणी उठलीच. म्हणाली, ‘‘आपण झोपू या का आता?’’
‘‘ही भित्रीच आहे. अजून तर भूत आलंपण नाहीये गोष्टीत, आणि झोपायला काय जातेस?’’ अनिश चिडून बोलला.
‘‘त्या बायकांना आम्ही ‘आत काही दिसणार आहे का’ म्हणून विचारलं. तर त्या पुन्हा उत्तर न देता घरात गेल्या. वटवाघळांच्या खोलीत खूप घाण वास होता. जिना चढत मेघल आणि मी वरच्या मजल्यावर जायला निघालो तर आमच्या पुढे कोणीतरी झटकन पळालं असं वाटलं. मेघल चांगलीच घाबरली. म्हणाली, ‘‘नको बाई हे घर. काही तरी इथे आहे.’’
‘‘ताई तुला भीती वाटतच नाही, हो ना!’’ राणी गोष्ट उभं राहून ऐकत म्हणाली. ‘‘मी मेघलचा ओलाचिंब हात धरत म्हणाले, चल ना भूत असलंच तर बघायला तरी मिळेल! आपण त्याला सांगू, ‘‘हे, गेट आऊट. इथे आता आम्ही काम करणार आहोत. हे सटरफटर सामान आम्ही काढणार आणि आमची माती, भांडी बनवायचं चाक, हत्यारं, ग्लेझेसच्या बादल्या, मातीत भांडी बनवून सुकवायसाठी लागणारे स्टॅंड इत्यादी सर्व इथे आणणार आणि काम करणार. आम्हाला हे घर खूप आवडलंय.
वरच्या मजल्यावरील खोलीत खूपच अडगळ होती. त्या अडगळीत आम्हाला जराशी हालचाल जाणवली. अर्थातच ते काय आहे हे तिथे जाऊन बघायला भीती वाटली. तिथल्या मोडके टेबल, खुर्च्या सरकवल्या आणि तिथलं दृश्य पाहून पुन: आम्ही दोघी किंचाळलोच. मेघल तर धावत खाली पळून गेली. तिथे घाणीत उंदरांची इवली इवली अनेक पिल्लं वळवळत होती. याक! त्यांची आई पळून जाताना दिसली.
‘‘तू त्यांना एकेकाला शेपटीला पकडून टाकून दिलंस का? अनिशने खूश होऊन विचारले. ते जेरार्ड डरेल लेखक होते ना, त्यांनी लहान असताना घरात काड्याच्या पेटीत विंचवाची पिल्लं ठेवली होती तशी कशात तरी ठेवलीस की नाही?’’
‘‘मी काही केलं नाही. वरच्या खिडक्या उघडल्या तर परत त्याच दोन बायका समोर दिसल्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘बरं झालं बाई तुम्ही इथे येताय ते. सारखे काहीबाई आवाज येत असतात त्या घरातून.’’
मी काही न बोलता खाली जायला निघाले तर धाडकन् दरवाजा वाजला. तेव्हा मात्र मीही घाबरले. खाली आले आणि बाथरूमचं दार उघडलं तर भुर्रकन बरीच कबुतरं माझ्या डोक्यावरून खिडकीवाटे उडून गेली. मेघल आसपास कुठेच नव्हती. मीही घाबरले. दार उघडून बाहेर पळणार होते तर ते उघडेचना. मी दार ठोकत राहिले. अचानक बाहेरून दार उघडलं गेलं. समोरच्या झाडावरून एक घुबड सरळ सरळ नजरेने माझ्याचकडे बघत होतं. मला बघून त्यानं त्याची मान १८० अंशांत फिरवली.’’
‘‘पण तो पंखा कोणी सुरू केला? फ्रिज कोणी उघडा ठेवला?’’ अनिशच्या डोक्यातून ते काही गेलं नव्हतं.
‘‘तेच तर आम्हाला शोधायचं होतं.’’
‘‘पण भूत असतं का?’’ राणीनं घाबरत विचारलं.
मी न घाबरता सबंध घरात फिरले आणि ओरडले, ‘‘ए भुता, तुझं इथे राहून झालंय. आता तू जा.’’ आणि पुन्हा धाडकन् दारं खिडक्या आपटल्या. मी हे सर्व रंगवून सांगण्यात रंगले होते. मला अचानक लक्षात आलं की, अनिश आणि राणी दोघेही गाढ झोपले होते. पुढे भूत दिसलं त्या घरात का नाही वगैरे सांगायचं राहूनच गेलं.’’
सकाळी मला उठवत अनिश विचारत होता, ‘‘तिथे खरंच भूत होत का गं?’’
‘‘होतं तर! आमच्या झोपलेल्या दोन भुतांना भेटायलाही ते आलं होतं. पण त्यांना झोपलेलं पाहून ते पळून गेलं. गोष्टीतलं भूत ते गोष्टीतच राहिलं.’’ मी गालातल्या गालात हसत म्हणाले.
vidyadengle@gmail.com
