नाटकवाला : धमाल बालनाटय़ं

रंगभूमीवर आपण वर्षांतून एखादं तरी बालनाटय़ करायला हवं; आणि म्हणून मी एक टीम बनवली. त्या टीमनं आत्तापर्यंत चार बालनाटय़ं केली आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मकरंद देशपांडे

१४ नोव्हेंबरला ‘बालदिन’ साजरा केला जातो तेव्हा मला वाटलं, रंगभूमीवर आपण वर्षांतून एखादं तरी बालनाटय़ करायला हवं; आणि म्हणून मी एक टीम बनवली. त्या टीमनं आत्तापर्यंत चार बालनाटय़ं केली आहेत.

एक निवेदिता पोहनकरनेच लिहिलेलं- ‘टाईमबॉय’ नावाचं. मुरली नावाचा छोटा मुलगा वैतागलेला असतो, कारण त्याने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं त्याला तो मोठा झाल्यावर मिळतील, असं सांगण्यात येतं. एक दिवस तो स्वप्नात आपल्या वॉशिंग मशीनचं टाइम मशीन बनवून भविष्यात जातो आणि पाहतो तर काय, तो अंतराळवीर झालेला असतो. तो पृथ्वीपासून खूप दूर जाणार असतो. त्याला निरोप द्यायला त्याचे वृद्ध माता पिता आलेले असतात. त्यांना वृद्ध झालेलं पाहून मुरलीच्या डोळ्यांत पाणी येतं. आपल्या या आई-वडिलांना आपण खूप त्रास देतो, सकाळी वेळेवर उठत नाही, शाळेत जायचा कंटाळा करतो. शाळेतही लक्ष फक्त आकाशाकडे.. नको नको त्या प्रश्नांनी शिक्षकांना हैराण करतो. भविष्यात जरी आपण मोठ्ठे होणार असलो तरी आत्ता कुणालाही त्रास देऊ नये, या विचारांनी तो जागा होतो. आईला घट्ट मिठी मारतो.

हे नाटक जेव्हा निवेदिताने मला वाचून दाखवलं तेव्हा मला खूप आवडलं. कारण खरंच हे नाटक लहान मुलांसाठी, त्यांच्या आई-वडिलांसाठी आणि शिक्षकांसाठीही होतं. तिनं आईला बंगाली, वडिलांना दाक्षिणात्य, शाळेतल्या मुरलीच्या मत्रिणीला- समीराला पंजाबी केलं. समीराची आई- डॉली आंटी.

मला असं वाटलं, मुलांना (प्रेक्षकांना) गंमत येण्यासाठी जर आपण या सगळ्या पात्रांमध्ये एखादा प्राणी पाहिला तर मज्जा येईल. म्हणून मुरली, त्याचे आई-बाबा हे पेंग्विन, समीरा आणि डॉली आंटी बदक, मित्र रोहन झेब्रा, शिक्षक जिराफ. असा प्रयोग तालमीत सुरू केला आणि आम्हालाच प्राणी बनून आपापल्या ठरावीक मुद्राभिनयातून बाहेर आल्यासारखं वाटलं. मुळातल्या घट्ट समजुतीला तोडून काहीतरी बेफिकिरीनं करतोय असं सगळ्यांना वाटलं. मुक्तपणा सगळ्यांनी अनुभवला. निवेदिताने बंगाली आई बेमालूमपणे केली. डोळे बंद करून ऐकलं तर बंगाली बाई इंग्रजी बोलतीये असं वाटायचं. तिचा मुलगा मुरली सहा फूट उंच अशा हिदायत सामीने इतका गोड केला की पाच फूट तीन इंच आईच्या समोर सहा फूट मुरली जेव्हा हट्ट करायचा, तेव्हा आम्हाला विलक्षण दृश्य पाहिल्याचा आनंद मिळायचा. अमृता संतने डॉली आंटी आणि अदिती पोहनकरने समीरा ऊर्फ सॅमी ही आई-मुलगी जोडी पंजाबी बदक म्हणून अफलातून केली. अमृताने तर आपली पंजाबी भाषा आणि विशिष्ट देहबोलीतून मुलांना खूप खूप हसवलं. अदितीने आपल्या आईला साथ देताना ठार वेडेपणा केला. झेब्रा झालेल्या मित्राच्या भूमिकेत रुमीने झेब्य्राचा आभास देताना खूपच कल्पकता दाखवली. दिव्या जगदाळेचा शिस्तप्रिय जिराफ बघताना असं वाटायचं की हिची मान खरंच लांब झालीये. सगळ्या प्राण्यांचे मुखवटे खूपच देखणे आणि कमी वजनाचे असल्याने ते घालून अभिनय करणं नटांना खूप सोपं झालं! धनेंद्र कावडे या गुणी रंगकर्मीने हे मुखवटे बनवून घेतले का स्वत:च बनवले, आठवत नाही पण त्यांनी ते डिझाइन केले होते.

बाळकृष्णाच्या जीवन-आख्यायिका जवळपास सगळ्यांनाच माहीत आहेत आणि आणखीन कितीही वेळा दाखवल्या तरीही मुलं पाहतील. बाळकृष्ण माती खातो तेव्हा यशोदा आई रागावते. त्याला बळजबरीनं तोंड उघडायला लावते, तर तिला बाळकृष्णाच्या तोंडात ‘विश्वरूप दर्शन’ होतं! बाळकृष्ण आणि सवंगडी नदीवर चेंडू खेळताना चेंडू पाण्यात जातो तेव्हा पाण्यातल्या कालिया नागाला बुक्क्यांचा मार देऊन बाळकृष्ण त्याच्या फण्यावर बसून चेंडू घेऊन बाहेर येतो. कंस पुतना राक्षसिणीला कृष्णाला विषारी दूध पाजून मारायला पाठवतो, पण बाळकृष्ण तिला ठार मारतो. गोकुळात जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा गोकुळवासीयांचं रक्षण करण्यासाठी कृष्ण गोवर्धन पर्वत उचलतो आणि त्याखाली गोकुळवासी सुरक्षित होतात. आजही या गोष्टी नुसत्या वाचल्या तरी आनंद होतो.

मला वाटलं की, याच गोष्टी जर आजच्या संगीतात, तालात आणि भाषेत लहान मुलांना दाखवल्या तर काय होईल? मी अन्वय या नवीन हुशार लेखकाला आणि तेजस या फारंच छान ‘माइम’  (मूक अभिनय) दिग्दर्शकाला हाताशी घेतलं आणि ‘क्रिष्णा किडिंग’ नावाचं धमाल नाटक करायचं ठरवलं. त्यानंतर साधारण महिनाभर सगळेच लहान झाले. सगळे खूप नाचायचे, खूप हसायचे, खूप दंगा करायचे. आशीष हा फारच उत्साही आणि गुणी संगीत दिग्दर्शक (वयानं फारच तरुण) लाईव्ह म्युझिक वाजवायचा. रिदम, की-बोर्ड सगळं वन मॅन ऑर्केस्ट्रा!  काही अप्रतिम गाणी त्याने कम्पोज केली आणि मुलांकडून (नटांकडून) गाऊन घेतली. दृष्ट लागेल अशी ही टीम. भरत, आकांक्षा, मयुरी, अंकित, अजिंक्य, नीलिमा, अण्णा.. कधीही थकायचे नाहीत. जर स्वत: कृष्ण तालीम बघायला आला असेल तर तोही खूप हसला असेल. अण्णा कृष्ण लाजवाब करायचा. त्याचा खोडकरपणा, भोळं देवत्व हे सगळं तो सहज नृत्य आणि संवादांनी साकारायचा. आकांक्षा यशोदा करताना आजच्या काळातल्या मुलाच्या काळजीनं झपाटलेल्या आईची मानसिकता दाखवण्यात समर्थ ठरली. भरतनं आता मोजताही येणार नाहीत इतक्या भूमिका शंभर टक्के वठवल्या. अजिंक्य आणि नीलिमाने आपल्या खेळकर, पण कलात्मक अभिनयाने जणू काही श्रीकृष्णाच्या प्रतिमेच्या मोरपिसात रांगोळी भरली. मयुरी या विलक्षण अभिनेत्रीचा उल्लेख करायला हवा. ती रंगमंचावर असली की कधीच नाटक रेंगाळू शकत नाही. माधुरीनं पुतना करताना बालप्रेक्षकांना एवढं घाबरवलं की तिच्या मृत्यूवर टाळ्या आल्या. अंकितचा कंस तर सगळ्या व्हिलन्समधला सगळ्यांत मनोरंजक व्हिलन ठरला. कारण अंकित गातो, सहज नाचतो आणि त्यातून विनोदी अंग.. असा कंस कुणीच पाहिला नसेल.

एका प्रयोगाला माझा प्रकाशयोजनाकार हिदायत सामी येऊ शकला नाही तर तेजसनं सांगितलं की, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतला एक चांगला होतकरू मुलगा आहे. मी म्हटलं, बोलव त्याला. मला नेहमीच नवीन टॅलेंट आकर्षति करतं. मी तो प्रयोग बघायला बसलो. त्याने थोडं बदललेलं डिझाइन आणि त्याचं लाइट ऑपरेशन पाहून मला वाटलं की, याला आपण आपल्या हाताखाली घेऊन मोठय़ा अवकाशात जाऊ या. आज तो मुंबई रंगभूमीतील खूप महत्त्वाचा प्रकाशयोजनाकार आहे, अगदी हिंदी, मराठी, इंग्रजी कुठलंही नाटक असो, अभिवाचन असो; हल्ली मलाही त्याच्या तारखा पाहून प्रयोग लावावे लागतात. पण मला त्याच्या यशाचं, प्रगतीचं अप्रूप आहे. त्याचं नाव अमोघ फडके.

‘इमली पपीता टरबूज़’ हे पुढचं बालनाटय़. सगळी टीम तीच. लेखक अन्वय, दिग्दर्शक तेजस. अन्वयची एक खासियत अशी की, तो अभिनेता असल्यामुळे त्याच्या लिखाणात एक लय आहे आणि वाचन असल्यानं छंद आणि उपमा आहेत. तेजस हा नोकरी करून नाटक करतो. त्यानं खरं तर ही टीम उभी केली. या सगळ्या नटांना त्यानं आत्मविश्वास दिला. मला गंमत वाटायची, जेव्हा हे सगळे नट तालीम नसली की त्याच्याशी अगदी अरे-तुरे करून गप्पा मारायचे. तो त्यांच्यातलाच एक आहे, पण त्याला दिग्दर्शकाचं व्यक्तिमत्त्व आहे. दिग्दर्शक हा टीमला आवडणारा असला की काम आग्रह न धरता होऊन जातं, हे मात्र खरं.

‘इमली पपीता टरबूज़्’ नाटकाची गोष्ट अगदी साधी. मुंबईतलं एक कुटुंब, आई-बाबा आणि त्यांची दोन मुलं. आई, बाबा, मुलगा आणि मुलगी अमेरिकेला फिरायला जायचं ठरवतात. डिस्ने लँडला. पण नेमकी त्याच वेळी गावी काकू आजारी पडल्यानं त्यांची मुलं ‘इमली’, ‘पपीता’ ‘टरबूज़्‍’ ही मुंबईत त्यांच्याकडे राहायला येतात. अमेरिकेची ट्रिप रद्द झाल्याने मुलगा-मुलगी खूप चिडलेले असतात. त्यांना त्यांचे हे चुलत बहीण-भाऊ अजिबात आवडत नाहीत. त्यांना ते खूप त्रास देतात, पण शेवटी आई-बाबा त्यांना पटवून देतात की, याच मुलांच्या वडिलांमुळे आम्ही शहरात आहोत. इमली, पपीता, टरबूज़्‍ाच्या भोळ्या, प्रेमळ स्वभावानं मुला-मुलींच्या मनाचं परिवर्तन होतं. आपल्या गावाला विसरू नका, परदेशी जाण्याच्या स्वप्नासाठी, असा आशय.

मयुरी इमली, भरत पपीता आणि अंकित टरबूज. या तिघांनी खरंच त्यांच्या अभिनयानं गावचा गावंढळपणा नाही तर आपलेपणा प्रेक्षकांना दिला. आकांक्षा आणि अन्वयने फारच छान शहरी आई-बाबा केले, ज्यांना आपल्या मुलांची काळजी वाटते. आपल्या संस्काराबद्दल ते साशंक होतात. पण एका प्रवेशात जेव्हा आकांक्षा अंगाई गाते तेव्हा सगळी मुलं पाचही जण आईकडे येऊन झोपतात तेव्हा अंधार होतो, पण नवीन पहाटेची सुरुवातसुद्धा!

मी एक नवीन नाटक लिहिलं ‘हनुमानजी आ रहे हैं.’ मुंबई शहरातील एक बेकायदेशीर झोपडपट्टी तोडण्यात येते. तिथं राहणारा एक गरीब मुलगा पोलीस आणि महानगरपालिकेविरुद्ध एका हनुमानाच्या मंदिरात तक्रार करतो आणि गरिबांना वाचवायला हनुमानजी येणार आहेत, अशी घोषणा करतो. महानगरपालिकेचा अधिकारी आणि पोलीस इन्स्पेक्टर हे त्याच्या आयुष्यातले व्हिलन. हनुमानजी येणार हे त्यांना खरं वाटत नाही, पण छोटय़ा मुलाच्या बोलावण्यावरून हनुमानजी येतात, पण मदत करण्याबाबत चिंताग्रस्त असतात- कारण त्यांचं मंदिरसुद्धा बेकायदेशीर असतं. अशा वेळी हतबल हनुमान पाहून छोटा मुलगा चिडतो. त्याची समजूत घालण्यासाठी हनुमानजी अधिकारी आणि इन्स्पेक्टरला शिक्षा करतात, पण मुद्दा तर बेकायदेशीरच राहतो.

या नाटकाचं दिग्दर्शन मी अमोघ फडकेला करायला सांगितलं आणि त्याने गद्य नाटकात संगीत आणि नृत्य टाकून छान मनोरंजन केलं. हनुमानाची एन्ट्री दाखवताना त्यांनी आपल्यातल्या प्रकाशयोजनाकाराचं कौशल्य दाखवलं. दिग्दर्शक म्हणून त्यांनी नाटककारांनी लिहिलेलं नाटक बालप्रेक्षकांपर्यंत परिणामकारकतेनं पोहोचवलं.

नीरज या सिक्युरिटी गार्डच्या मुलाला मी गरीब मुलाच्या पात्रासाठी निवडलं. कारण जेव्हा त्याने मला सांगितलं की, त्याला अभिनय करायचाय आणि त्यासाठी तो कधी भुकेला राहतो, पैसे नसतात म्हणून विनातिकीट गाडीनं प्रवासही करतो. त्याचं स्वप्न मी पूर्ण केलं. अजयने अधिकाऱ्याच्या भूमिकेत वेडेपणाचा कळस गाठला. तो ठार वेडाच नट आहे. भरतने (Replacment) इन्स्पेक्टरच्या पात्रात धमाल उडवून दिली. आता नाटकांत खूपच जास्त गंमत येते. असीम हट्टंगडी या प्रगल्भ नटाने लहान मुलांसाठी शेपटी लावून केलेला हनुमान हा अतुलनीय. त्याने त्या गरीब मुलाशी एवढं छान नातं तयार केलं की, बालप्रेक्षकांनी हनुमानाबरोबर नाटकानंतर फोटो काढले. आशीषचं संगीत पुन्हा बालनाटय़ाला खूप ऊर्जा देणारं ठरलं.

जय बालदिन! जय बालप्रेक्षक!

जय रंगमंच! जय नाटक!

mvd248@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Childrens drama natakwala article makrand deshpande abn

Next Story
लेखकाचा कट्टा : नेटके लिहिण्याचे बीज पेरताना…
ताज्या बातम्या