scorecardresearch

अभिजात: बरोक शैलीचा अनभिषिक्त सम्राट

‘‘White is poison to a picture : use it only in highlights..’’सारखी विधानं बेधडक करणाऱ्या पीटर पॉल रुबेन्सचं (१५७७-१६४०) अँटवर्पमधलं हवेलीवजा घर आता म्युझियम बनवण्यात आलंय.

अभिजात: बरोक शैलीचा अनभिषिक्त सम्राट

अरुंधती देवस्थळे
‘‘White is poison to a picture : use it only in highlights..’’सारखी विधानं बेधडक करणाऱ्या पीटर पॉल रुबेन्सचं (१५७७-१६४०) अँटवर्पमधलं हवेलीवजा घर आता म्युझियम बनवण्यात आलंय. हे घर उत्कृष्ट सौंदर्यदृष्टीने बांधलं असल्याची ग्वाही त्याच्या दगडी कोरीव भव्य प्रवेशद्वारातच मिळते. बाहेर पारंपरिक वेशात द्वारपाल खडा. स्थापत्यातच साधता येणारा रोमन अँटिक्विटी आणि इटालियन रेनेसान्सचा मिलाफ, कमानी, पायऱ्या, मोकळ्या जागा आणि दगडी शिल्पांतून दिसणारा. पदपथाच्या दुसऱ्या हाताला रुबेन्सच्या चित्रांच्या वेगवेगळ्या आकारांत प्रतिकृती, पोस्टकार्डे, मग्ज वगैरेचं छोटंसं दुकान.. म्हणजे १६११-१६४०च्या दरम्यान कलाकार आणि कलानिर्मितीला साक्ष असलेली उंच पुराणवास्तू आणि आज एकविसाव्या शतकात तिच्या आधारे जगणारी आधुनिकता.. एकमेकांसमोर उभ्या.
इटलीतील बालपणाचा परिणाम रुबेन्सच्या ऑइल ऑन पॅनल शैलीवरच नव्हे, तर एकंदर जीवनमानावरही असावा. पोर्टिकोवर त्यांनी कलाकारांचं आराध्यदैवत मानल्या गेलेल्या मक्र्युरीला डावीकडे आणि ज्ञानदेवता मिनव्‍‌र्हाला उजवीकडे स्थान दिलेलं. परमेश्वरावर अपार श्रद्धा : I am just a simple man standing with my old brushes, asking God for inspiration… असं म्हणणाऱ्या रुबेन्सने अँटवर्पच्या चर्चसाठी दिवसरात्र खपून छतावरली ३९ पेंटिंग्ज करून दिली होती. पण दुर्दैवाने अठराव्या शतकात चर्चला आग लागून ती नष्ट झाली. थोडीबहुत वाचलेली आता ब्रसेल्सच्या संग्रहालयात ठेवली आहेत. त्याच्या वेगवेगळ्या देशांत उपलब्ध चित्रांची संख्या हजारावर जाते. रुबेन्सने आपल्या कामानं नाव कमावलं आणि भरपूर पैसाही. ऐश्वर्य कसं उपभोगावं याचंही ते उदाहरण म्हणायला हवेत.
हे रुबेन्सने स्वत: डिझाइन केलेलं घर.. इटालियन पलॅझोच्या धर्तीचं. त्यात स्टुडिओ आणि एक अर्धचंद्राकृती आर्ट गॅलरी- शिल्पं आणि चित्रं मांडण्यासाठी. पण इथे त्यांची फारशी चित्रं राहिलीच नाहीत, ती जगभरातल्या संग्रहालयांत जाऊन पोहोचली. हे रुबेन्सचं लाडकं घर टिकवून धरण्यासाठी त्यात फेरबदल करावे लागले. पण मूळ इमारतीचं रूप सांभाळूनच ते केले गेले. त्यांनी लावलेल्या बागेवर त्यांचं उत्कट प्रेम होतं. ती तशीच ठेवली गेली आहे. चारही बाजूंनी दुमजली घर आणि मधे मोकळं अंगण ही त्याकाळी लोकप्रिय असणारी रचना. या मोकळ्या जागेत आणि घराच्या उजवी-डावीकडे फुलझाडं, वेली आणि फळांची झाडं आहेत. घर सोडून कधी प्रवासाला बाहेर जावं लागलं तर रुबेन्स लुकास किंवा वान एग्मोन्टना या विश्वासातल्या शिष्यांना बागेतल्या रोपांची, झाडांची कशी काळजी घ्यायची आहे किंवा आलेली डाळिंब, संत्री कधी तोडून कोणाकडे पोहोचवायची आहेत याबद्दल तपशीलवार सूचना सोडून जात. एवढेच नव्हे तर पत्रांतून सविस्तर रिपोर्ट मागवत. शिष्यांपैकी हे दोघेही पुढे यशस्वी कलाकार झाले. अर्थातच रुबेन्सची उंची त्यांना गाठता आली नाही.
रुबेन्सच्या बरोक शैलीतल्या चित्रांचे विषय इटालियन मास्टर्ससारखेच- म्हणजे धार्मिक, रूपक आणि पुराणकथांतील पात्रं आणि प्रसंग. पण वैशिष्टय़ हे की, त्यात एक स्वत:च्या दृष्टीने लावलेला अर्थ जाणवण्याइतपत स्पष्ट असे. मोठय़ा कॅनव्हासवर काढलेली गतिशील चित्रं, गहिरे धाडसी रंग आणि कॉन्ट्रास्टचा नाटय़पूर्ण वापर. स्त्रीदेहाच्या चित्रणात आकर्षक मादकता. ती आपण लपवण्याचा खुळचट प्रयत्न करत नाही असं जाहीरपणे सांगणं. रुबेन्सची बरोक शैलीवरची हुकमी पकड बघायची असेल तर भव्य पॅनेल्सवरची ऑइलमधली ‘दि ओरिजिन ऑफ मिल्की वे’, ‘सॅम्सन अॅंचड डिलाईला’ आणि ‘व्हीनस अॅंहड अॅधडोनीस’ ही १६३०-३६ च्या दरम्यानची दोन-तीनच चित्रंच पुरेशी आहेत. ‘दि ओरिजिन ऑफ मिल्की वे’ हे एक अप्रतिम चित्र. १.८ × २.४४ मीटर्सच्या भव्य पटलावर उतरलेलं. चित्रात झ्यूस असून नसल्यासारखा. आणि हेरा हक्र्युलसला दूध पाजणारी. गर्द निळ्या-सावळ्या आकाशात दौडणारा मोरांचा रथ आणि चमकणाऱ्या विजा. हेराच्या स्तनातून फुटलेली दुधाची धार आणि तिचं उल्केसारखं तेजोमय होणं आणि पुसट थेंबांमधून छोटय़ा छोटय़ा तारका होणं हे रुबेन्सने फारच सुंदर रंगवलं आहे. ‘व्हीनस अँड अॅुडोनीस’ हे ओवीडच्या मेटामॉरफॅसिसमधली रूपककथा चित्ररूपात सांगणारं. व्हीनस अॅजडोनीसवर लुब्ध झालेली, पण पायाला विळखा घालणाऱ्या क्युपिडचा त्याच्यावर फारसा परिणाम नसावा. ‘सॅम्सन अँड डिलाईला’ १.८५×२.०४ मीटर्सच्या पॅनेलवर दिसतो गाढ झोपलेला सॅम्सन आणि त्याचे काळेकुरळे केस कापणारी व एका वंशाचं भवितव्य धोक्यात टाकणारी सोनेरी केसांची डिलाईला.
रुबेन्सच्या चित्रांत गडद रंगांचा वापर, स्थूलतेकडे झुकणाऱ्या गौरांगी आणि पीळदार देहयष्टीचे वीरपुरुष असत. देह आणि देहबोली दोन्हीचं उत्कृष्ट चित्रण. काळ्याकरडय़ा रंगछटा. लाल रंगाचा अतिशय सुनियोजित खेळ. पोट्र्रेटमध्ये परंपरागत स्थिरता सोडून हालचाल दाखवल्याने चित्रांना जिवंतपणा येतो आणि ती घडत असल्यासारखं वाटतं. रुबेन्स असे नशीबवान कलाकार ठरले की ज्यांना सुरुवातीपासूनच यश आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. खूप तोलामोलाची कामे (कमिशन्स) परदेशातूनही मिळत गेली. मागण्यांचा वेग सांभाळण्यासाठी रुबेन्स, राफाएल किंवा मायकेलएंजेलोसारखे प्राथमिक रेखाटन करत आणि अँथोनी वान डाईकसारखे शिष्य/ सहाय्यक ते पुढे नेत. अर्थात मास्टर त्यावर शेवटचा हात फिरवतच. राजघराण्यातली किंवा तत्सम कामं असली तर मात्र संपूर्ण चित्र ते स्वत: करत. संग्रही असलेल्या जुन्या मास्टर्सची चित्रंही ते अशीच आपल्या परीने रंगसंगती बदलून अधिक उठावदार करण्याचा प्रयत्न करत. ही त्यांची शिष्यांना शिकवायची पद्धत होती. त्यात त्यांना नैतिकदृष्टय़ा काही चुकीचे वाटत नसे.
रुबेन्सचं त्यांच्या पहिल्या पत्नीवर प्रेम होतं. त्यांनी ती सुखात राहावी म्हणून खूप प्रयत्न केले, हे तिच्या दैनंदिनीमधल्या टिपणांवरून दिसतं. तिची त्यांनी काढलेली दोन चित्रं आणि दैनंदिनीही या घरात आहे. पहिली पत्नी वारल्यावर त्यांनी एका गरीब कुटुंबातल्या षोडशेशी- हेलेनाशी लग्न केलं तेव्हा त्यांचं वय ५३ र्वष होतं. हेलेनाचंही एक अतिशय गहिरं तैलचित्रं इथे आहे, पण ते दुसऱ्याकडून काढून घेतलेलं. अल्पवयात तिला पाच मुलं झाली, तीही अखेपर्यंत याच घरात राहिली.
‘वू ऑफ हेत स्टीन अर्ली मॉर्निग’ हे रुबेन्सचं भव्य लँडस्केप त्या काळातील अँटवर्पजवळच्या खेडय़ातील पहाटेचं दृश्य चित्रित करणारं. विस्तीर्ण माळावरल्या निसर्गावर कोवळ्या प्रकाशछटांचा खेळ. त्यांचे समकालीन रेम्ब्रांसारखी रुबेन्सनीही सेल्फ पोट्र्रेट्स केली होती. पण तेवढी जास्त नाहीत. घरीच काढलेल्या सेल्फ पोट्र्रेटमध्येही रुबेन्स खानदानी, आबदार असे दिसतात. त्या काळात शिष्टसंमत मानलेला घोळदार काळा पोशाख, त्याला पांढरीशुभ्र लेस लावलेली कॉलर, छातीवर पदकं टाचलेली आणि जाडजूड बूट, चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज.. आत्मकेंद्री, गर्वाकडेच झुकणारं. त्यांनी स्वत:साठी सिंहासनवजा खुर्ची तयार करून घेतली होती आणि तिच्या पाठीवर स्वत:चं नाव सुवर्णाक्षरात लिहून घेतलं होतं. त्या काळात टिपिकल वाटणाऱ्या उत्तम प्रतीच्या लाकडाचे कोरीव कपाट इथेही आहे. त्यात छोटे कप्पे- कलाकुसरीच्या लहानसहान वस्तू, लेखण्या, नाणी किंवा सुगंधी द्रव्यांच्या कुप्या ठेवण्यासाठी. रुबेन्सने प्रिय शिष्य लुकासला लिहिलेल्या पत्रांचा जुडगाही यात आहे. घरातील फर्निचरपैकी वेगळाच म्हणजे लांबीला कमी असणारा लाल पडदेदार, लाकडी आखूड पलंग. रुबेन्सना असलेल्या अपचन आणि दम्यासारख्या विकारामुळे पाय पसरून झोपता येत नसे. ते रेलून बसल्यासारखे झोपत असत.
त्या काळात उच्चभ्रू लोकांमध्ये दर्जेदार पेन्टिंग्ज आणि शिल्पं घरात गॅलरी बनवून मांडून ठेवण्याची प्रथा होती. रसिकराज रुबेन्सच्या संग्रहात विल्यम वान हेख्त, क्विंटन मासी, याकोब जॉर्डन्ससारख्या फ्लेमिश चित्रकारांचाही समावेश होता. त्यांना प्रिय कलाकारांची आणि कलाकृतींची संगत आवडे. अनेक इटालियन शिल्पं त्यांच्या संग्रही होती. त्यात सेनेकाच्या संगमरवरी बस्ट किंवा टेराकोटामधला हेक्र्युलिस यासारख्या दुर्मीळ कलाकृतीही होत्या. पण ते त्याकडे गुंतवणूक म्हणूनही पाहत असत. आर्ट डीलिंगमध्येही त्यांनी अंगभूत कौशल्याने पैसा कमावला. रुबेन्स हे कलाचिंतकही होते आणि त्यांनी आपली थिअरी शब्द, रेखाटन आणि आकृत्यांमध्ये मांडून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या संहितेच्या काही प्रतीही हस्तलिखितातच केलेल्या होत्या. त्यापैकी एक इथेही त्यांच्या टेबलावर ठेवलेली आहे.
ऑइल व कॅनव्हासमधलं ‘दि ऍन्सीएशन’ (३.०४ सें. मी. × १.८८ मीटर्स ) हे त्यांचं सर्वात भव्य चित्र. स्वत:च्या विशेष आवडीचं. मुक्त, प्रवाही रेनेसान्सचा प्रभाव दर्शवणारं. बायबलमधील प्रसंग.. देवदूत मेरीच्या खोपटात येऊन सांगताहेत की, ख्रिस्त तुझ्या पोटी जन्मणार आहे. मेरीच्या निळ्या झग्यासाठी त्यांनी मौल्यवान लपिस लॅझुलीची वस्त्रगाळ पूड करून ती पिगमेंटमध्ये वापरली होती. रुबेन्सच्या बहुचर्चित चित्रांपैकी ‘लॉट अँड हिज डॉटर्स’ (१.९ × २.२५ मीटर्स) अलीकडेच ख्रिस्तीजच्या लिलावात ४४८८२५००० पौंडांना विकलं गेलं आणि त्याने ओल्ड मास्टर्स कॅटेगरीतील आजवरच्या किमतीचा विक्रम नोंदवला. चित्रातील वडील आणि त्यांच्या दोन्ही लेकींचे चेहरे आणि देहबोलीत विलक्षण व्यामिश्र तणाव. रंगछटांच्या खेळांतून अर्धिझगल्या बापाच्या चेहऱ्यावरील गोंधळ. मुलीच्या त्वचेचं टेक्श्चर, रंध्रे, त्यातून फुटलेली लव पाहून त्यांच्या रंगछटांमधून नाटय़ निर्माण करण्याच्या कौशल्याची कमाल वाटते.
arundhati.deosthale@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या