पराग कुलकर्णी

सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छता का राखू शकत नाही? वाहतुकीची शिस्त आणि नियम आपण का पाळत नाही? आपल्या आरोग्यास हानीकारक असणारे अनेक पदार्थ आणि पेये सेवन करणे आपण कमी का करू शकत नाही? कोणताही चांगला बदल घडवून आणणे अवघड असते. वैयक्तिक पातळीवर आपल्या सवयी, विचार बदलणे किती कठीण जाते याची आपल्याला कल्पना आहेच. तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल करू शकतो. पण असाच जर एखादा सकारात्मक बदल समाजातील अनेक लोकांच्या विचारात, सवयीत घडवून आणायचा असेल तर? आजच्या स्वच्छता, वाहतूक, आरोग्य या आणि अशा अनेक सामाजिक प्रश्नांमागचं मूळ कारणही आपली मानसिकता, सवयी आणि वर्तणूक हेच आहे. कडक कायदे करून, जबर दंड आकारून किंवा नुसतेच प्रबोधन करून हे प्रश्न सुटत नाहीत- सुटले नाहीत. पण अशाच सकारात्मक सामाजिक बदलांसाठी मानसशास्त्राचा आधार घेऊन लोकांच्या वागणुकीत बदल घडवून आणू शकणारी अर्थशास्त्रातली (Behavioral  Economics) एक संकल्पना गेल्या दहा वर्षांत प्रभावी ठरत आहे- नज थेअरी  (Nudge Theory)!

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How Suryanamaskar and pranayama can help you fight spring allergies
तुम्हालाही वारंवार शिंका येतात का? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा अ‍ॅलर्जी फ्री
Why HbA1c test important for diabetes diagnosis Who should do it and how consistently
विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?

डॅनियल काहनमन यांनी केलेल्या संशोधनानुसार, आपल्या मेंदूच्या विचार करण्याच्या दोन पद्धती आहेत-जलद, स्वयंचलित, सदैव सक्रिय असलेली, शॉर्ट कट्स वापरणारी, खूपदा तर्कसंगत नसलेली, पण कार्यक्षम अशी सिस्टिम १ आणि संथ, गरज लागेल तशी सिस्टिम १ कडून सक्रिय होणारी, जास्त ऊर्जा लागणारी, पण तर्कसंगत अशी सिस्टिम २. मेंदूच्या या दोन विचार करण्याच्या पद्धती- त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, मेंदूच्या क्षमता आणि मर्यादा या सगळ्याचा मेंदूच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतो, ज्याला आपण ‘कॉग्निटिव्ह बायसेस’ असे म्हणतो. (या सदरात आधी आलेल्या ‘विचारांचा विचार’ या लेखात आपण या संकल्पना बघितल्या आहेत). डॅनियल काहनमन यांनी दाखवून दिले की, आपला मेंदू नेहमीच तर्कसंगत विचार करत नाही आणि आजूबाजूच्या परिस्थितीने प्रभावित होऊन चुका करू शकतो. काहनमन यांच्या याच संशोधनाचा व्यावहारिक उपयोग समाजात चांगले बदल घडवण्यासाठी कसा करता येईल, या विचारातून रिचर्ड थालर यांनी ‘नज थेअरी’ मांडली. त्यासाठी त्यांना २०१७ सालचा नोबेल पुरस्कार मिळाला. नज (Nudge) म्हणजे एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोपराने ढोसणे, एक हलकासा धक्का! माणसाच्या तर्कसंगत नसलेल्या विचारांना योग्य वेळी, योग्य पद्धतीने, आजूबाजूच्या परिस्थितीत छोटे, पण महत्त्वपूर्ण बदल करून प्रभावित केले-हलके धक्के दिले-तर त्यातून तो त्याच्या आणि सामाजिक भल्यासाठी अपेक्षित असा वागू शकतो, हेच नज थेअरी सांगते. थोडक्यात, मानसशास्त्राचा आधार घेऊन माणसाची वागणूक बदलण्यास नज थेअरी मदत करते. उदाहरणार्थ, जर कॅन्टीनमध्ये आरोग्यासाठी चांगले असलेले पदार्थ (फळ, भाज्या) सहज समोर दिसतील आणि घेता येतील अशी ठेवली आणि इतर जंक फूड (चॉकलेट, बर्गर, पिझ्झा) सहज दिसणार नाही अशा थोडय़ा उंचीवर किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवलं- तर डोळ्यांसमोर असल्याने लोकांचे चांगले पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढेल असे प्रयोगांती लक्षात आले आहे. असे छोटे बदल- ज्यात पशाचा वापर होत नाही, जे माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीचा फायदा घेऊन त्याला चांगले निर्णय घेण्यास प्रभावित करतात त्याला ‘नज’ म्हणतात. यात माणसाचा निर्णय घेण्याचा अधिकार अबाधित ठेवला जाणे अपेक्षित आहे- म्हणजे कॅन्टीनमध्ये जर जंक फूड बंदच केले तर निर्णयाचा प्रश्न येत नाही आणि तो आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने आणतो (आम्ही काय खावे आणि खाऊ नये, हे ठरवणारे तुम्ही कोण?) आणि तसंही चॉकलेट, बर्गर, पिझ्झा खाणे काही कायद्याने गुन्हा नाही.

माणसाला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी नज ही खूप प्रभावी पद्धत आहे. आपल्या मेंदूची विचार करण्याची विशिष्ट पद्धत, त्याची कार्यक्षमता, त्याचा आळशीपणा, तर्कसंगत विचारांचा अभाव आणि भावनिकता या सर्वाचा वापर करून असे नज वापरले जाऊ शकतात. उदा. जे आहे ते तसेच चालू राहावे आणि निर्णय घेणे किंवा बदल शक्यतो टाळावे याकडेच आपल्या मेंदूचा कल असतो. याचाच वापर करून नज थेअरीमध्ये ‘डिफॉल्ट ऑप्शन’ हा एक खूप प्रभावी नज म्हणून वापरला जातो. जेव्हा आपण एखादा निर्णय घेत नाही, त्यामुळे जो निर्णय आपोआप निवडला जातो तो म्हणजे ‘डिफॉल्ट ऑप्शन’. आपल्याकडे अवयव दान करायचे असल्यास फॉर्म भरा, नाव नोंदणी करा अशी प्रक्रिया असते (Opt-in), पण स्पेनमध्ये प्रत्येक पेशंट आपोआप अवयव दाता बनतो आणि ज्यांना अवयव दान करायचे नसतील ते फॉर्म भरून आणि इतर प्रक्रिया पार पाडून आपले नाव त्यातून काढून घेऊ शकतात (Opt-out). थोडक्यात, स्पेनमध्ये ‘डिफॉल्ट ऑप्शन’ हा अवयव दाता बनणे आहे आणि त्यातून बाहेर पडायला तुम्हाला प्रयत्न करावे लागतात, तर इतर देशांत याच्या उलट परिस्थिती आहे. खूप लोकांना अवयवदान करायचे असते, पण ते काही कारणांनी नोंदणी करत नाहीत हा यामागचा विचार आहे. आणि नोंदणीचा हा डिफॉल्ट ऑप्शन ठेवून खूप साऱ्या लोकांना या चांगल्या कामात सहजपणे समाविष्ट करून घेता येते. आज या डिफॉल्ट ऑप्शनच्या छोटय़ा बदलाने स्पेन अवयव दानात जगात सर्वात आघाडीचा देश आहे आणि अर्थात हजारो लोकांना त्याचा फायदा होतो आहे.

आज अनेक देशांनी नज थेअरीचा वापर करणे सुरू केले आहे. भारतातही ‘स्वच्छ भारत’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या अभियानात याचा वापर केला गेला- ज्याद्वारे टॉयलेट वापरणे, मुली असणे (दुर्दैवाने आपली सुरुवात इथून आहे) आणि त्यांना शिकवणे याला कशी सामाजिक मान्यता आहे, हे लोकांच्या मनावर बिंबण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ‘सोशल नॉर्म’चा उपयोग करण्यात आला- ज्यात आपण आपले निर्णय, मते आणि सामाजिक वर्तन- दुसरे लोक काय करतात, म्हणतात यावरून ठरवतो. आज सामाजिक भल्यासाठी जसा नज थेअरीचा उपयोग होतो आहे, तसाच आता खासगी क्षेत्राकडून जाहिरातीत आणि नफेखोरीसाठीही तो केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नैतिकता हा नज थेअरीच्या वापरातला कळीचा मुद्दा ठरणार आहे. नज थेअरी म्हणजे मोठय़ा प्रश्नांचे एक छोटे रामबाण उत्तर, असे बिलकुल नाही! पण मोठय़ा प्रश्नांची उत्तरे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी आणि त्यांनी ती सहजपणे स्वीकारावी, अंगिकारावी यासाठी दिलेला हलकासा धक्का म्हणजे नज थेअरी. आणि कोण जाणो, अशा अनेक छोटय़ा छोटय़ा धक्क्यांनी एखादा मोठा प्रश्न सुटेलही कदाचित, नाही का?

parag2211@gmail.com