काळोखाच्या काळातल्या कविता

या कवितांमध्ये आई आणि बहीण सतत येत राहते. संवेदनशील कवीला निदान कवितेत तरी त्यांना न्याय देता येतो.

जुई कुलकर्णी

अंधाराच्या काळात कुठली गाणी असतात? ‘अंधाराच्या काळात अंधाराची गाणी असतात..’ असं बटरेल्ट ब्रेख्तचं एक वाक्य आहे. या कवितासंग्रहाचं शीर्षक वाचून मला ते वाक्य आठवलं आणि योगायोगानं कवितासंग्रह उघडल्यावर अर्पणपत्रिकेनंतर हेच वाक्य लिहिलेलं दिसलं.

नामदेव कोळी यांच्या ‘काळोखाच्या कविता’ त्यांच्या जगण्यातून आलेल्या कविता आहेत. हे जगणं आहे एका शेतमजुराचं, गरीब शेतकऱ्याचं मातीपासून तुटण्याचं, गावाकडून शहराकडे होणाऱ्या स्थलांतराचं. अतिशय थेट आणि तरीही समजूतदार भाषेतल्या या कविता आहेत.

या कवितांमधून बायका जागोजागी दिसतात. त्यांचं कष्टप्रद जीवन, गरिबी, त्या सोसत असणारी हिंसा आणि अन्यायाचं थकवून टाकणारं दर्शन या कवितासंग्रहात होतं. या कवितांमध्ये आई आणि बहीण सतत येत राहते. संवेदनशील कवीला निदान कवितेत तरी त्यांना न्याय देता येतो.

‘माय

बापाला आंधणासोबत मिळालेली

जिवंत वस्तू

माय

सदा खुंटय़ावर बांधलेलं

गरीब जित्राब

माय

दारूडय़ा नवऱ्यानं हासडलेली

झणझणीत शिवी’

अशी ‘माय’ कविता कशी लिहील, यावरही एक कविता आहे.

‘देव कुठं लपून बसलाय’ ही तक्रार

जुनीच आहे तिची

नियतीवर लिहायची असेल कदाचित

तिला कविता

सटवीच्या नावाने ती बोटं मोडायची खूपदा’

गमावलेल्या मोठय़ा बहिणीविषयी लिहिलेली कविता..

‘तुझ्यापासून सुरू झालेला

वंशाच्या दिव्याचा शोध

माझ्यापर्यंत येऊन थांबतो.

म्हणजे तू नाहीयेस

केवळ घरातलं पहिलं अपत्य

तू आहेस माझ्या अस्तित्वाचं कारण’

बहुतेक पुरुषांना ही जाणीवही नसते. आपल्या आधीची अपत्य स्त्री नसती तर आपण अस्तित्वात आलोच नसतो.

आई, बहीण, मजूर बायका यांच्याविषयी कवी संवेदनशील असला तरी बापालादेखील कवितेत स्पर्श झालेला आहे. स्वत: अशिक्षित असूनदेखील पोराला शिकवण्यासाठी कष्ट करणारा बाप इथे दिसतो. विषमता भोगत, सोसत समतेच्या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल असतं.

‘पाटलांच्या पोरीनं वापरलेली पुस्तकं

मला मिळावीत म्हणून

खंडीभर ढोरं गव्हाऱ्यात फुकट वागवलीत बापानं

त्याच पुस्तकांतून शिकलो

इतिहास भूगोल नागरिकशास्त्र’

बाप आयुष्यभर कष्ट करत राहतो. एखाद्या खंबीर, मजबूत संस्थेसारखा बाप असतो. बाप असंख्य हरणाऱ्या लढाया लढत राहतो.

‘शेती हा जुगार आहे

हे कितीदा अनुभवूनही

बाप घालत असतो उखळात डोकं..’

काही काळानंतर मात्र बदल होत जातात आणि बाप नावाची ही संस्था उतरणीला लागते.

‘आज बाप

जत्रेत हरवलेल्या पोरासारखा

भटकतो वणवण, शोधतो घर

गुरांनी भरलेले मोठमोठे वाडे, गोठे

जीव गुदमरतो त्याचा

सुने खुंटे पाहून’

मजुराचा मुलगा शिक्षणाची कास धरतो आणि या कष्टप्रद आयुष्यापासून स्वत:ची सुटका करून घेण्यात यशस्वी ठरतो खरा; पण गावी राहणाऱ्या वयस्क आईबापाचे कष्ट संपत नाहीत. त्यातून ही वेदनेची, उपरोधिक कविता येते..

‘संध्याकाळी

बाप

परततो सांधेदुखी

अन्

माय

पायात कुरूपं घेऊन

मी

परततो दोघांच्या आधी

शहरातल्या पोरांना

थकलेल्या मायबापाची कविता शिकवून’

या संग्रहातील कवितांमध्ये मालक-मजूर, स्त्री-पुरुष आणि नागर-अनागर संस्कृतीचा संघर्ष सतत जाणवत राहतो. शेतकरी कुटुंबातील संघर्षही त्यात येतो. बाईला वस्तूचं स्वरूप देणारी कृषिसंस्कृती आणि कुटुंबव्यवस्था शोषणाचे कारण ठरते. या कवितांमधून दिसणारे भीषण सत्य पांढरपेशा समाजाला फार अनोळखी आहे, अस्वस्थ करणारे आहे. ही गुलामगिरी पिढी दर पिढी चालत राहते. जणू ती अंतहीन आहे..

‘मजुराच्या पोरी मजुराच्या घरात

म्हणून त्या उडत नाहीत हवेत

..बिनबोभाट आपलासा करतात

अनोळखी खुंटा

स्वीकारतात आपल्या वाटेचा भोगवटा

रात्रीचा दिवस करत भोगतात आपली जन्मठेप’

नागर-अनागर संघर्ष हा आदिम काळापासून चालत आलेला असला तरी सध्याच्या काळात तो अधिक टोकदार झालाय..

‘शहरातल्या सरकारी दवाखान्यात

भरती झालंय गाव..’ या प्रतीकातून गावांची हतबल, आजारी अवस्था अधोरेखित होते.

‘गरिबीला, आजाराला, नापिकीला कंटाळून

मरून पडलंय अवघं गाव शवागारात’

जातीव्यवस्था, साध्या आवश्यक सोयीसुविधांचा अभाव, नियमित उत्पन्न मिळेल अशा रोजगाराची वानवा, शिक्षणाचा अभाव या सगळ्यांनी गावं किडत राहतात. नवीन पिढीतील प्रगती करू पाहणारे सगळेच शहरात जाऊ पाहतात, निघून जातात..

‘माती माय माणसं

ओढून नेतात गावात

पैसा प्रगती प्रतिष्ठा

झुलवत ठेवते शहरात’

काही जण मात्र गाव सोडून जाऊ शकत नाहीत. लक्ष्मी कोपेल अशी अंधश्रद्धा घट्ट धरून गावातच राहतात.. शोषण सहन करत राहतात.

‘कित्येक पिढय़ांपासून

गावाला चिकटलीयत ही माणसं

कराडीवर मुळ्या रोवत

उमेदीनं वाढणाऱ्या झाडासारखी’

 कवी म्हणतो..

‘इतिहासात

काळोखाचे संदर्भ आहेत

अर्थात..

काळोखालाही इतिहास आहे.’

काळोख ही सर्जनाआधीची स्थिती. काळोखाचे गूढ उकलणे हा या कवितांचा हेतू आहे. हा काळोख शोषणाचा आहे. हा काळोख अन्यायाचा आणि संघर्षांचा आहे. हा काळोख आत्मशोध करायलाही भाग पाडणारा आहे. जरी कवी कवितेत म्हणतो,

‘साधूचे कूळ

पुसू नये

नदीचे मूळ

पुसू नये

काळोखाचे गूढ

पुसू नये’

तरी काळोखाचा गूढ उकलण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. वर्णमुद्रा प्रकाशनची ही दर्जेदार निर्मिती आहे. सुरुवातीचं बटरेल्ट ब्रेख्तचं वाक्य काळ्या पानावर देण्यात एक औचित्य आहे. राजू बाविस्कर यांचं मुखपृष्ठही उत्तम. सुरुवातीलाच सबीर हाका या इराणी कवीच्या कवितेचं गीत चतुर्वेदींनी अनुवादित केलेलं कडवं अगदी चपखल आहे. 

काळोखाच्या कविता

– नामदेव कोळी, वर्णमुद्रा प्रकाशन, पाने-११६, किंमत : २५० रुपये. 

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Collections of poems kalokhachya kavita book by namdev koli zws

Next Story
दखल : मनोरंजन क्षेत्रातील कहाण्या
फोटो गॅलरी