गणेश मतकरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचे भीषण वृत्त गेल्या आठवडय़ात माध्यमांतून पहिल्यांदा धडकले, ते तिच्या प्रियकर मारेकऱ्याने ‘डेक्स्टर’  ही ‘सीरियल किलर’वरील  मालिका पाहून गुन्हा दडविण्याची प्रेरणा घेतल्याच्या कबुलीने. त्यानंतर चित्रपट- मालिकांचा जनमानसावर होणारा तथाकथित दुष्परिणाम यांवर  अद्याप तावातावाने चर्चा सुरू आहेत. सिनेमा, ‘ओटीटी’ फलाटांवरील  मनोरंजन यांमध्ये ‘बिंजा’ळलेल्या पिढीसाठी हे सारे हानीकारक आहे, की त्यांच्या सामाजिक आकलनाच्या दृष्टीने आवश्यक, याची चर्चा करणारे  लेख.. सिनेमा अभ्यासक आणि मानसरोगतज्ज्ञाच्या नजरेतून. 

अलीकडेच दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातला आरोपी आफताब  याने आपण ‘डेक्स्टर’ ही मालिका पाहून प्रभावित झाल्याचं पोलिसांना सांगितलं आणि पुन्हा एकदा चित्रपट/ मालिकांचा जनमानसावर होणारा तथाकथित दुष्परिणाम आणि कडक सेन्सॉरशिपची धोरणं स्वीकारावीत का, या विषयावर चर्चा सुरू झाली. समाजमाध्यमांवर ती अद्याप तावातावाने सुरू आहे. आपल्याकडे तसाही ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा असायला हवी आणि सेन्सॉरशिप अधिक कडक असायला हवी,’ असा एक मतप्रवाह पूर्वीपासूनच आहे. त्या मतप्रवाहाला पुष्टी स्वघोषित आणि स्व-कार्यान्वित संस्कृतीरक्षकांनी आपली मतं अधिक जोरात मांडायला सुरुवात केली आहेच. आपल्या सरकारचाही अशा धोरणांना पािठबा आहे. िहसेचं दर्शन, सेक्स, मुक्त विचारमांडणी, या गोष्टींवर अंकुश असेल तर त्यांना तो हवाच आहे. ‘सेक्रेड गेम्स’, ‘तांडव’ अशा मालिका दूरदर्शन वा आपले सरकारी नियंत्रणाखाली असणारे चॅनल यावर कधीही येऊ शकल्या नसत्या. जे सेन्सॉर ‘सेक्स’, ‘बिच’ किंवा इतर काही त्यांना आक्षेपार्ह वाटणारे शब्द, गल्लोगल्ली कानावर येणाऱ्या शिव्या यांसारख्या घटकांनाही कात्री लावण्यासाठी आग्रही आहे. त्यांना त्यापलीकडचं काही सहन होणार नाही हे तर झालंच. त्यामुळे ‘ओटीटी’लाही सेन्सॉरखाली कसं आणता येईल यावरचा विचार उच्च पातळीवर सुरू असल्याच्या बातम्या मध्यंतरी कानावर आल्या होत्या. आफताबने दिलेल्या ‘डेक्स्टर’सारख्या दाखल्याचा त्यांना आपली बाजू पक्की करण्यासाठी फायदा होईल यात शंका नाही.

सेन्सॉर करायचं, तर आपल्याला बहुधा राजश्री प्रॉडक्शन्सच्या मोजक्या फिल्म सोडून सगळंच सेन्सॉर करावं लागेल अशी परिस्थिती आहे आणि ती काही आज उद्भवलेली नाही. ‘देवदास’ चित्रपटाला दारू पिण्याचं ‘ग्लोरिफिकेशन’ म्हणता येईल, ‘दीवार’ला गॅंगस्टरला ग्लॅमराईज करणारा ठरवता येईल किंवा ‘डेक्स्टर’पासून शव नाहीसं करण्याची प्रेरणा घेतल्याची चिंता असेल, तर ‘दृश्यम’मधल्या विजय साळगावकरचं काय? इंग्रजीत तर गुन्हेगारी, भय, हिंसा याची रेलचेलच आहे. ‘सुपरनॅचरल’सारख्या भुतांच्या गोष्टीला करमणुकीचा एक प्रकार न म्हणता अंधश्रद्धा पसरवणारं म्हणालो तर लगेचच तिला सामाजिक ऱ्हासाशी नेऊन चिकटवता येतं. ‘सीरिअल किलर्स’च्या मनोविकारांबद्दल बोलणाऱ्या ‘माईण्ड हण्टर’ला ‘डेक्स्टर’प्रमाणेच चुकीच्या प्रेरणा  देणारी ठरवता येईल. ‘सेक्स एज्युकेशन’सारख्या वयात येणाऱ्या मुलांच्या प्रश्नांकडे हसतखेळत, पण गांभीर्य पूर्ण न सोडता पाहाणाऱ्या मालिकेला अश्लील ठरवता येईल. अशी उदाहरणं अनेक आहेत, मात्र बंदी वा काटछाट हा त्यावरचा उपाय नाही.त्यामुळे समाज बिघडतो, असा सूर लावणंही योग्य नाही. या काल्पनिक कथानकांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन काय आहे याचा विचार आपल्याला करता आला, तर या मालिका नक्की काय सांगतायत हे आपल्या लक्षात येईल.

मुळात आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे चित्रपट, नाटकं, मालिका यात जेव्हा जेव्हा दुष्कर्माचं दर्शन घडतं, घडवलं जातं, तेव्हा अनेकदा ते करणारी व्यक्ती म्हणजे एका प्रवृत्तीचं दर्शन असतं. कोणतंही कथानक चांगला आणि वाईट, यांच्यामधला संघर्ष आपल्यापुढे मांडतं. जर आपल्याला पांढरा उठून दिसायला हवा असेल, तर काळा जितका अधिक गडद वाटेल, तितका त्याचा फायदा अधिक आहे. आता हा गडदपणा सर्व विषयांमध्ये, सर्व काळात तसाच राहील असं अर्थातच नाही. विशिष्ट विषयाचा प्रेक्षक कोण आहे, कथानकातून नक्की कोणती गोष्ट मांडायची आहे, प्रेक्षक काय वयाचा असणं अपेक्षित आहे, त्याची समज किती असावी, अशा अनेक गोष्टींवर तो अवलंबून आहे. केवळ वाईटाचा प्रसार करणं हा अशा कथांचा हेतू कधीही असत नाही.

यावर कोणी असंही म्हणू शकेल, की दरवेळी या वाईट गोष्टी खलनायकाने केल्या आणि त्याला शिक्षा झाली असं पडद्यावर दाखवलं जात नाही. मग जेव्हा नायक वाईट मार्ग निवडतो, तेव्हाचं काय? आस्वादकाने नायकाकडून प्रेरणा घ्यायची नाही, तर कोणाकडून घ्यायची? संशयाने आपल्या पत्नीचा गळा घोटणारा शेक्सपिअरचा ‘ऑथेल्लो’, रसायनशास्त्राचा शिक्षक असून ड्रग डीलर झालेला ‘ब्रेकिंग बॅड’मधला वॉल्टर व्हाईट, अर्थव्यवहाराचा कणा असलेल्या व्यवस्थांना अक्षरश: सुरुंग लावणारा ‘फाईट क्लब’मधला टायलर डर्डन, खून, बलात्कारासह प्रत्येक गुन्हा करून मोकाट सुटणारा ‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’मधला अ‍ॅलेक्स अशा नायकांचं काय करायचं? यांच्यावरून एखादा प्रभावित झाला तर तो या कलाकृतींचा दोष मानता येणार नाही? तर नाही येणार. अशा प्रसंगी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कथानक गुंतागुंतीचं आहे, अनेक पातळय़ांवर फिरणारं आहे, त्याला वास्तवाचा, सामाजिक विचारांचा, नीतिमूल्यांचा आधार आहे. ते केवळ पांढऱ्या-काळय़ा अशा दोन रंगांत फिरत नाही, तर मधल्या अनेक ग्रे शेड्सनी ते तयार झालं आहे. अशा कथांमध्ये समाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. पण हा परिणाम काय प्रकारचा असू शकेल, आणि चित्रपटाचा उद्देश काय, हे प्रश्न अशा वेळी महत्त्वाचे ठरतात.

‘फाईट क्लब’ या चक पॉलानिकच्या कादंबरीवर आधारित चित्रपटाचा असा मोठा परिणाम तत्कालीन समाजावर दिसून आला. ‘फाईट क्लब’ हा कन्झ्युमरिझमच्या विरोधातला सिनेमा आहे. नवनव्या वस्तूंचा मोह आपल्याला गुलाम करतो आहे, या दुष्टचक्रात न सापडता माणसाने आपलं स्वत्व शोधायला हवं, या प्रकारचा संदेश या चित्रपटात आहे. आपली आदीम ओळख शोधण्यासाठी चित्रपटाच्या नायकांनी सुरू केलेला ‘फाईट क्लब’ या चित्रपटातला एक मोठा घटक आहे. दर रात्री एका ठरावीक जागी जमून फ्री स्टाइल मारामारी करण्यात मन रमवण्याची ही जागा आहे. चित्रपट आल्यानंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी असे क्लब उघडले, वर बंडखोरीच्या पुढल्या पायऱ्या चढण्यातही काहींनी रस दाखवला. अमेरिकेत अभिव्यक्तिस्वातंत्र्याला विशेष महत्त्व असल्याने, तिथे चित्रपटावर काही बंधनं घालण्यात आली नाहीत, पण अलीकडेच चीनमध्ये स्ट्रीिमगसाठी उपलब्ध असलेल्या ‘फाईट क्लब’च्या आवृत्तीत एक गमतीदार बदल केल्याचं दिसून आलं. चित्रपटाच्या शेवटी टायलर डर्डन क्रेडिट कार्ड रेकॅार्डस ठेवणाऱ्या इमारतींमध्ये बॉम्ब लावून त्या उद्ध्वस्त करतो. हा भाग इथे काढून टाकण्यात आला होता, वर पोलिसांनी हा कट हाणून पाडून सर्व गुन्हेगारांना ताब्यात घेतल्याची लेखी माहितीही नव्याने जोडण्यात आली होती. कोणी सरकारविरोधात असं काही करायला जाऊ नये, यासाठी उचललेलं हे पाऊल होतं. या महत्त्वाच्या चित्रपटाच्या चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात विरोध केल्यावर आता मूळचा शेवट पुन्हा जोडल्याचं कळतं.

बरेचदा जेव्हा सेन्सॉर काही बदल करतं, तेव्हा ते या प्रकारचे बदल असतात. बिग पिक्चर लक्षात न घेता तेवढय़ापुरते केलेले. समोर दिसणाऱ्या गोष्टी काढून टाकताना सूचकता, प्रतीकात्मकता, आशयाची खोली, यातली कोणतीच गोष्ट लक्षात घेतली जात नाही. केवळ सुटे शब्द, सुटे प्रसंग, यांना कात्री लावली जाते, त्यामुळे  आस्वादात अडथळा येण्यापलीकडे फार काही होत नाही. जर सेन्सॉरची उपाययोजना वरवरचीच असेल तर तिला विरोध कशाला, असा प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो. तर विरोध हवा तो पायंडा पडू नये म्हणून. आपण विरोध केला नाही तर आपल्याला या प्रकारच्या दबावाची सवय होते. जशी आता थिएटर प्रिन्टमधल्या हास्यास्पद काटछाटीमुळे अनेक गोष्टींची सवय झालीच आहे. त्यामुळे पटलं नाही तर त्याबद्दल बोलण्याची गरज तयार झाली आहे.

कोणत्याही सेन्सॉर बोर्डाला पावलं उचलण्यासाठी प्रवृत्त करणारं धाडसी आशयाचं उदाहरण, म्हणून स्टॅनली कुब्रिकच्या ‘अ क्लॉकवर्क ऑरेंज’ चित्रपटाकडे पाहता येतं. अ‍ॅन्थनी बर्जेसच्या नजीकच्या भविष्यकाळात घडणाऱ्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचा नायक अ‍ॅलेक्स, हा अ‍ॅन्टीहिरोचं टोकाचं उदाहरण मानता येईल. चित्रपट प्रक्षोभक दृश्यांनी भरलेला आहे, जो पाहून तत्कालीन समीक्षकांनाही धक्का बसला होता. पॉलीन केलसारख्या प्रख्यात समीक्षिकेनेही चित्रपटाला पोर्नोग्राफिक म्हणून हिणवलं होतं. काही देशांमध्ये चित्रपटावर बंदीही आणली गेली, पण पुढल्या काळात चित्रपटाची कीर्ती वाढत गेली. आज हा कुब्रिकच्या गाजलेल्या चित्रपटांमधला एक म्हणून ओळखला जातो. चित्रपट अ‍ॅलेक्सचं क्रौर्य झाकण्याचा वा त्याला रंगसफेदी करण्याचा प्रयत्न करत नाही. सुधारण्यासाठी जेलमध्ये त्याला एका अघोरी उपाययोजनेला सामोरं जावं लागतं. या उपचारामुळे तो सुधारतो, पण हा बदल आतून आलेला नसतो, नैसर्गिक नसतो. त्याला सुधारताना त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याचा मानवतेचा सौदा केला जातो. चित्रपटाचा विरोध आहे तो नेमका याच गोष्टीला. स्वातंत्र्य, मानवता, नीतिमत्ता, या गोष्टींचा अर्थ काय, याबद्दल चर्चा घडवणं हा या चित्रपटाचा हेतू आहे आणि हा हेतू जर आपण लक्षात घेतला नाही आणि केवळ दृश्य भागापुरतच त्याकडे पाहिलं, तर पॉलीन केलप्रमाणेच आपण त्याला पोर्नोग्राफी समजू शकतो.

पोर्नोग्राफी या शब्दाचा अर्थ एके काळी केवळ अश्लीलतेपुरता मर्यादित होता, पण आता तो अधिक सर्वसमावेशक झाला आहे. कोणताही घटक (लैंगिकता, हिंसा इत्यादी) हा विशेष अर्थाशिवाय निव्वळ प्रक्षोभक पद्धतीने प्रेक्षकाला उत्तेजित करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा त्याला पोर्नोग्राफी म्हटलं जातं. हा वापर आज समाजात अनियंत्रित स्वरूपात जागोजागी पसरला आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोन्सनी त्याला खतपाणी घातलंय आणि त्याचा प्रसार हा नियंत्रणाबाहेर गेला आहे. पोर्नोग्राफी केवळ उत्तेजित करत असल्याने ती अ‍ॅडिक्टिव असते आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचे मार्ग शोधणं आवश्यक आहे. पण तिच्यावर आक्षेप घेतल्यासारखं दाखवत त्या निमित्तावर काहीही वेगळं करू पाहणाऱ्या प्रयत्नांना टाचेखाली आणण्याचे प्रयत्न जर होत असले, तर ते धोकादायक आहेत आणि अशा वागण्याला विरोध केला पाहिजे.

समाजविघातक काय आहे, काय पडद्यावर चालू शकतं, कशाला विरोध व्हायला हवा आणि काय अभिव्यक्तिस्वातंत्र्याखाली सुरक्षित ठेवायला हवं याचा किचकट तपशील आपण काढू शकतो. पण अशा तपशिलाच्या निव्वळ यादीत अर्थ नाही. आपले डोळे उघडे असले, विचारशक्ती शाबूत असली आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आपल्याला कदर असली, तर कथा रंगवताना तिच्या लेखकाची, ती पडद्यावर आणताना तिच्या दिग्दर्शकाची भूमिका समजून घेण्याची हिंमत आपण ठेवायला हवी. डोळे झाकून नियमाचं पालन करण्यापेक्षा आणि कलावंतावर अधिकाधिक कडक नियम लादण्यापेक्षा तो कलावंत काय सांगतोय याचा विचार आपल्याला करता यायला हवा.

काय योग्य आणि काय वाईट याबद्दलचे संस्कार सिनेमाने करणं अपेक्षित नाही, ते घरच्यांनी करणं अपेक्षित आहे, शिक्षणात होणं अपेक्षित आहे. मुलांच्या मनावर जर योग्य विचार बिंबवले गेले, त्यांना वरवरच्या विरोधापेक्षा एकूण कलाकृतीच्या संदर्भात प्रत्येक गोष्टीचा विचार कसा करायला हवा याबद्दल शिकवलं गेलं, शालेय शिक्षणात घोकंपट्टी कमी करून कलाविचाराचं आयुष्यात काय स्थान आहे याची ओळख करून दिली, चित्र/ साहित्य/ सिनेमा यांचा आस्वाद घेण्याचं प्राथमिक ज्ञान दिलं गेलं, तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही. हा मार्ग कात्री वापरण्यासारखा सोपा नाही, पण योग्य आहे.

ganesh.matkari@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Content in movies serials on ott responsible for violence zws
First published on: 27-11-2022 at 01:15 IST