जनार्दन मथुरे माझ्याकडे आले ते पोटाच्या विविध तक्रारी घेऊन. जगभरच्या तपासण्या झाल्या, पण कुठलाच आजार काही सापडेना. त्रास तर होतोय. चौकशीत लक्षात आलं की जनार्दनरावांच्या कित्येक पिढय़ा गावी राहून शेती करणाऱ्या. खुद्द जनार्दनरावही वयाच्या ६५ वर्षांपर्यंत शेती करत होते. शेतकऱ्याचं जीवन म्हणजे काबाडकष्ट आणि दोन वेळचं डाळ-भात-भाकरी-भाजी इतकंच जेवण. जनार्दनरावांनी हौसेनं मुलाला शिकवलं आणि आता मुलगा त्यांना मुंबईत घेऊन आला. मुलगा संगणक क्षेत्रातला, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त श्रीमंत. इकडे छोटय़ा घरात बैठा व्यवहार आणि खायला मात्र काजू, बदाम, पिस्ते, दूध, मिठाया, गव्हाच्या पोळ्या असा वेगळाच आहार. त्यांच्या पिढय़ांना हे पदार्थ नियमित खायची सवय नाही. या अर्थी हे पदार्थ त्यांना सवयीचे/ सात्म्य नाहीत. ते पचणार कसे? असे सवयीचे नसलेले पदार्थ खाणं याला ‘सात्म्यविरुद्ध’ म्हणतात. एका नवीन संशोधनात असं आढळलंय की, आपल्याला कुठले पदार्थ पचू शकतात हे आपली गुणसूत्रे ठरवतात. म्हणजे पिढय़ान्पिढय़ा आपले पूर्वज जो आहार घेतात, तो आपल्याला सात्म्य असतो आणि सहज पचतो. आपल्या देशात काही लोक पिढय़ान्पिढय़ा शाकाहारी होते. पाश्चात्त्य शिक्षणाच्या नादी लागून, ‘आपण पुढारलेले आहोत’ हे दाखवण्यासाठी त्यातल्या काही जणांनी मांसाहार घ्यायला सुरुवात केली. या लोकांचं मांसाहाराचं प्रमाण (म्हणजे एका वेळचं प्रमाण आणि वारंवारता) वाढलं. असा हा सात्म्यविरुद्ध आहार त्याचे भयंकर दुष्परिणाम दाखवल्याशिवाय कसा राहील? लक्षात असं आलं की नव्यानं मांसाहारी बनलेल्या या लोकांना ‘गुदविकार’ होताना दिसतात. स्र््र’ी२, ऋ्र२३४’ं, ऋ्र२२४१ी अशा दु:खदायक आजारांनी हे लोक पीडित असतात आणि निरीक्षण असं आहे की, पूर्ण कुटुंब सात्म्यविरुद्ध आहार घेत असेल तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कुठला तरी गुदविकार होतोच.
शरीरात जो दोष वाढला असेल त्याच्या समान आहार घेणं हा ‘दोषविरुद्ध’ आहार झाला. म्हणजे कफ वाढला असताना दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणं, पित्त वाढलेलं असताना मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाणं, वात वाढलेला असताना कडधान्य खाणं हे दोषविरुद्ध आहे. आधीच वाढलेला दोष, त्याला अनुकूल आहारामुळे प्रकुपित होऊन आजार निर्माण करण्याइतका सामथ्र्यवान होऊ  शकतो किंवा असलेला आजार वाढवू शकतो.
संपतरावांना प्रमेह आहे. पण गोड पदार्थ अतीव प्रिय. पत्नीचं त्यांच्यावर निरतिशय प्रेम. त्यांना संपतरावांची आणि गोडाची ताटातूट बघवेना. त्यांनी एक आयडिया शोधून काढली. साखर किंवा गूळ या ऐवजी प्रत्येक पदार्थात शिजवताना त्या त्यात मध घालू लागल्या. ‘अहो मध असा शिजवू नये’ मी त्यांना सांगितलं. ‘पण टीव्हीवर तर किती तरी शेफ असा मध शिजवतात’. आता काय बोलणार? मनोरंजनाच्या माध्यमाला ज्ञानाचं माध्यम आणि कलाकारांना गुरू असं आपण समजू लागलो तर अशीच पंचाईत होणार. आहारीय पदार्थावर संस्कार करून खाणं हा भारतीय आहारपद्धतीतील फार मोठा वैज्ञानिक भाग आहे. पदार्थ स्वच्छ करणं, निवडणं, शिजवणं, विरजण लावणं, घुसळणं, फोडणी देणं असे अनेक संस्कार आपण पदार्थावर करतो. अर्थात त्याचेही काही नियम आहेत. मध, दही हे पदार्थ शिजवू नयेत. (कढीसाठी आपण दही घुसळून केलेलं ताक शिजवतो, ते चालतं.) ते शिजवले तर ‘संस्कारविरुद्ध’ पदार्थ तयार होतो. कल्हई नसलेल्या तांब्या-पितळ्याच्या किंवा अ‍ॅल्युमिनिअमच्या भांडय़ात आंबट पदार्थ साठवू नयेत अथवा शिजवू नयेत. कढी, टोमॅटो सूप, सांबार, रस्सम हे पदार्थ अ‍ॅल्युमिनिअमच्या भांडय़ात शिजवू नयेत. ते ‘संस्कारविरुद्ध’ आहे. आंबे किंवा अन्य फळं पिकावी म्हणून, लोणचं मुरावं म्हणून आपण काही काळ ते ठेवून देतो. याला कालसंस्कार म्हणतात. आजच्या वेगवान जमान्यात हा संस्कार टाळला जातो. लोणची आपल्यापर्यंत स्र्१ी२ी१५ं३्र५ी२ घालून लगेच येतात. फळांवर विविध रासायनिक पदार्थाचा मारा करून, त्यांचे फक्त रंग बदलून, ती पिकली आहेत असं भासवलं जातं. असा आहार आपण टाळायला हवा.
सामान्य लोकांना आजकाल हमखास माहीत असलेला विरुद्धाहारातील एक पदार्थ म्हणजे फ्रुटसलाड. हा वीर्यविरुद्ध पदार्थ आहे. वीर्य म्हणजे पदार्थाची शक्ती. उष्ण आणि शीत या दोन शक्तींमध्ये पदार्थाचं वर्गीकरण करता येतं. असे दोन वेगळ्या वीर्याचे पदार्थ एकत्र करून खाणं हे वीर्यविरुद्ध आहे. आंबट फळांचं वीर्य उष्ण असतं, तर दुधाचं वीर्य शीत. म्हणून ते एकत्र करून खाऊ  नये. सामान्यत: सगळे आंबट आणि खारट पदार्थ उष्ण वीर्याचे असतात. म्हणून शीत वीर्याच्या दुधाबरोबर ते खाऊ  नयेत. जसे खारी/ खारी बिस्किटं/ चिवडा/ फरसाण/ भजी/  सामोसे / अळूवडी असे पदार्थ खाताना त्यासोबत दूध/ चहा/ कॉफी घेऊ  नये. मासे आणि दूध, मूग-तांदळाची खिचडी आणि दूध, टोमॅटो व मीठ घातलेल्या पदार्थात दुधाची मलई असे एकत्र करू नये. नियमित असे पदार्थ खाण्यात असल्यास कष्टसाध्य त्वचाविकार होऊ  शकतात. सतत ताप आणि अंगदुखी असणारी माझी एक रुग्ण, दही-दुधाची साय-लोणचं-भात असा अत्यंत चवदार पण तितकाच अनारोग्यकार, वीर्यविरुद्ध पदार्थ दोन र्वष रोज खायची. आजारांची अशी कारणं बंद केल्याशिवाय आजार कसा बरा होणार? आणि जोपर्यंत रुग्ण आयुर्वेदाचा अंगीकार करणार नाही तोपर्यंत आजाराची अशी कारणं त्याला कळणार तरी कशी?
आठ वर्षांच्या रोहनची आई त्याला घेऊन माझ्याकडे आली ती त्याच्या पोटाच्या तक्रारींनी हैराण होऊन. वरचेवर होणारी पोटदुखी, जुलाब, पोटफुगी यामुळे रोहन खूप अशक्त झाला होता. चौकशीत कळलं की, रोहनचा कोठा लहानपणापासून हलकाच आहे. तो शाळेत जायला लागल्यापासून शक्ती येण्यासाठी त्याची आई त्याला दिवसातून तीन वेळा मोठा पेला भरून दूध देते. हा ‘कोष्ठविरुद्ध’ आहार झाला. कोठा हलका असताना दूध, मेदूवडे, मांसाहार, मिठाई असे पचायला जड पदार्थ खाणं हे कोष्ठविरुद्ध ठरतं. याउलट कोठा जड असेल (म्हणजे रोज मल कडक होत असेल) तर कडधान्यासारखा रूक्ष आहार घेणं हेही कोष्ठविरुद्धच.
माझ्या एका मैत्रिणीला बाळ झाल्यावर मी पहिल्याच दिवशी तिला रुग्णालयात भेटायला गेले होते. नेमकी त्याच वेळी तिची जेवणाची थाळी (रुग्णालयानं बनवलेली) आली. त्यातले पदार्थ बघून मी बधिर झाले. छोल्यांची उसळ, लोणचं, दही, बेसनाचं पिठलं.. अरे देवा! तितक्यात तिथल्या २४-२५ र्वष वयाच्या तरुण आधुनिक आहारतज्ज्ञ येऊन वार्डमधल्या सगळ्या बायकांना भाषण देऊ  लागल्या, ‘‘प्रसूती म्हणजे आजार नव्हे. ती एक अवस्था आहे. तेव्हा तुम्ही सगळे पदार्थ खाऊ  शकता.’’ वगैरे वगैरे. खरं सांगायचं तर प्रसूतीनंतर काय खावं आणि काय नाही हे आपल्या गावाकडच्या अडाणी बायकांना जास्त चांगलं कळतं. त्या आहारतज्ज्ञ महिलेच्या मताप्रमाणे प्रसूती ही एक अवस्था आहे, हे खरं. पण ती प्रभूत वातप्रकोप झालेली, तीनही दोषांची स्थिती बिघडलेली. अशा वेळी वातप्रकोप करणारी मोठी कडधान्यं, बलऱ्हास करणारा नि:स्नेह आहार, अग्नीवर ताण आणणारे पचायला जड पदार्थ, पित्त वाढवणारे लोणच्यासारखे पदार्थ, कफकर दही हे सगळं ‘अवस्थाविरुद्ध’ ठरतं. सूतिकेचा आयुर्वेदोक्त आहार अत्यंत शास्त्रशुद्ध तर आहेच, शिवाय हजारो र्वष कोटय़वधी महिलांनी आचरणात आणून तो सिद्ध केला आहे. प्रयोगशाळेतील परीक्षानळ्यांमध्ये
१० र्वष केलेलं संशोधन हे त्याला पर्याय ठरूच शकत नाही. करंटेपणानं आपण तसं करू तर आपल्या मातांचं आणि त्यामुळे बाळांचंही आरोग्य आपण धोक्यात आणू.  
(क्रमश:)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Rx=आहार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contrast food part
First published on: 28-09-2014 at 01:02 IST