रावबा गजमल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यंदा अपेक्षित दर्जाची एकांकिकाच न आढळल्याने सर्वोत्तम विजेत्यांस पुरुषोत्तम करंडक न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरून नाटय़क्षेत्रात उलटसुलट चर्चा होत आहे..

मळलेल्या चाकोरीच्या बाहेर  जाऊन एकांकिका सादर करणाऱ्या  एका नाटय़कर्मीचा ‘पुरुषोत्तम’चा  अनुभव..

महाराष्ट्राच्या रंगभूमीचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा सर्वप्रथम ‘एकांकिका’ या नाटय़प्रकाराचा विचार केला जातो. आज रंगभूमी, चित्रपट, मालिका यांतील बरेच अभिनेते, दिग्दर्शक, लेखक किंवा प्रॉडक्शन्समधील मंडळी ही अधिकरून एकांकिकांतूनच पुढे आलेली आहेत.

आजघडीला महाराष्ट्रात अनेक एकांकिका स्पर्धा होत असतात. त्यापैकी पुरुषोत्तम करंडक ही खूप महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. परंतु पुणे, मुंबई तसेच काही मोजकी शहरे सोडली तर ग्रामीण भागामधील विद्यार्थी रंगकर्मीना ती माहीत नाही हेही सत्य आहे.

मी नाटय़शास्त्र विभागात प्रवेश घेतला तेव्हापासून एकांकिका करायला सुरुवात केली. पुढे लेखन, दिग्दर्शन आणि वेळ पडलीच तर अभिनयदेखील त्यात करू लागलो.. आजही करतो.  काही सीरियल्सचे लेखनही केले आहे. सिनेमाचेही लेखन-दिग्दर्शन केले आहे. पण  एकांकिकेमध्ये मला जे समाधान आणि जी एनर्जी मिळते, ती इतर माध्यमांत तेवढीशी मिळत नाही. ‘लोकसत्ता’च्या लोकांकिका स्पर्धेतील यशानेच आम्हाला ओळख मिळवून दिली.

आज महाराष्ट्रात जितक्या म्हणून नावाजलेल्या एकांकिका स्पर्धा आहेत त्या सर्वच स्पर्धातून आम्ही एकांकिका सादर केल्या आहेत. सर्वत्र पारितोषिकेदेखील मिळाली. पण आम्हाला खरी ओळख दिली ती २०१५ सालातील लोकांकिका स्पर्धेने! त्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेली आमची ‘भक्षक’ ही एकांकिका महाराष्ट्रातील अन्य पाच स्पर्धामध्येही प्रथम आली. आणि अचानक पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसंबंधात जळगाववरून फोन आला की, ‘खानदेश आणि औरंगाबादला एकच विभागीय केंद्र आहे, तुम्ही तुमची ‘भक्षक’ घेऊन या.’ आम्ही जळगावला जाऊन ‘भक्षक’चा प्रयोग केला. तिथे ती पहिली आली. पुरुषोत्तम करंडकच्या आयोजन समितीतील एक आघाडीचे अभिनेते तेव्हा आम्हाला म्हणाले की, ‘फायनलला जा, पण पारितोषिकाची अपेक्षा ठेवू नका. पण त्यांना नाटक काय असतं ते दाखवा.’ तेव्हा त्यांचं म्हणणं आम्हाला नीटसं समजलं नव्हतं, पण त्यांचं ते वाक्य लक्षात राहिलं.  विद्यापीठात ‘पुरुषोत्तम’बद्दल आम्ही खूप काही ऐकले होते. ‘पुरुषोत्तम’च्या महाअंतिम फेरीत पुण्यात भरत नाटय़मंदिरात आम्ही प्रयोग सादर करणार हेच आमच्यासाठी खरे पारितोषिक होते. आम्ही भरत नाटय़मंदिरात ‘भक्षक’चा प्रयोग सादर केला.  लोकांकिका स्पर्धेत जे परीक्षक म्हणून होते ते परेश मोकाशीच ‘पुरुषोत्तम’ला प्रमुख पाहुणे होते.

आमचा प्रयोग छान झाला.  प्रेक्षकांना आणि प्रतिस्पर्धी यांनाही प्रयोग आवडल्याचे दिसले. पण जेव्हा अंतिम निकाल लागला तेव्हा उत्तेजनार्थ अभिनयाचे एक पारितोषिक वगळता आम्हाला काहीच मिळाले नाही. अर्थात पारितोषिक मिळाले नाही याचे अजिबात वाईट वाटले नाही. कारण स्पर्धेतला प्रयोग आहे, आमच्यापेक्षा दुसऱ्यांचा विषय किंवा सादरीकरण चांगले झाले असावे, परीक्षकांना ते भावले असावे म्हणून त्यांना पुरुषोत्तम करंडक मिळाला असा विचार आम्ही केला. पण काही परीक्षकांकडून ‘भक्षक’ हे नाटकच नाही असे मत मांडले गेल्याचे संयोजन समितीकडून कळले. ‘भक्षक’ नाटक नाही तर मग काय आहे,  ते तरी सांगा, असं आम्ही म्हटलं. पण तेही सांगायला ते तयार नव्हते. आम्हाला हा खूप मोठा धक्का होता. त्यांचं म्हणणं : ‘पुरुषोत्तम’चा क्रायटेरिया वेगळा आहे. तुमचं नाटक आमच्या क्रायटेरियामध्ये बसत नाही.

आज पुणे आणि मुंबईतील अनेक मोठय़ा रंगकर्मीचं म्हणणं आहे की, ‘पुरुषोत्तम’ने आम्हाला हे दिलं, ‘पुरुषोत्तम’ने आम्हाला ते दिलं. ते खरंही असेल. पण ‘पुरुषोत्तम’ने आम्हाला ‘तुम्ही जे करता ते नाटकच नाही,’ हेच दिले असेल तर त्यावर कोण विश्वास ठेवणार?

आणि आज त्याच ‘भक्षक’ने आम्हाला महाराष्ट्रभरात ओळख मिळवून दिली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने महाराष्ट्रभर एकांकिका महोत्सवांमध्ये आमचे प्रयोग केले. महाराष्ट्राच्या बाहेरदेखील या एकांकिकेचे प्रयोग झाले. श्रेयस तळपदे यांच्या प्रॉडक्शनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर ती लवकरच येत आहे. परंतु पुरुषोत्तम करंडकवाल्यांचे म्हणणं आहे की, हे नाटकच नाही. (आरे कारशेड हा आज एक ज्वलंत विषय झाला आहे. वाढत्या जंगलतोडीमुळे जंगलातील प्राणी आणि परिसरातील पाडे, वस्त्यांतील माणसं आणि जंगलातील प्राण्यांमध्ये संघर्ष वाढीस लागला आहे. यात ‘भक्षक’ कोण? ही कथा आमच्या ग्रामीण स्टाईलने सादर केली आहे.)

त्यानंतर आम्ही पुरुषोत्तम करंडकमध्ये भाग घेणं बंद केलं. जी स्पर्धा आमच्या नाटकालाच मानायला तयार नाही, तिथे नाटकाचा प्रयोग करून काहीच अर्थ नाही.

आज २०२२ साल आहे. नुकत्याच झालेल्या ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेच्या निकालावरून महाराष्ट्रभर सध्या चर्चा सुरू आहे. कारण परीक्षक आणि आयोजकांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके दिली. परंतु मानाचा पुरुषोत्तम करंडक कुणालाच दिला नाही. या ऐतिहासिक निर्णयाने महाराष्ट्रात चर्चेला उधाण आलं आहे. ‘करंडक दिला नाही हे योग्यच आहे!’ असं म्हणणारे काही जण आहेत, तर काहींचं म्हणणं- ‘हे चुकीचं आहे.’ काही रंगकर्मी यावर भाष्य करू इच्छित नाहीत, हेदेखील सत्य आहे.   पुरुषोत्तम करंडकचा हा जो ऐतिहासिक निर्णय म्हणताहेत, त्यात परीक्षकांनी स्पर्धेची अमुक एक गुणवत्ता ठरवली. त्याच्या आग्रहापायी स्पर्धेचा मानाचा करंडक द्यायला ते राजी नाहीत. ही कुठली पद्धत? काळासोबत नाटक बदलत आहे. आजच्या नवीन रंगकर्मीच्या नाटकाचा स्वीकार करा. कदाचित तुमच्या काळातील तुमच्या नाटकाइतके चांगले नाटक यंदा झाले नसावे, किंवा आज होतदेखील नसेल. परंतु ते आजचे विद्यार्थी रंगकर्मी आहेत. त्यांचं आजचं नाटक आहे, तसं स्वीकारा. तुमचे जे काही जुने विचार, जुने नियम असतील ते बदला. कदाचित आपल्याला काळानुसार अपडेट होण्याची गरज असू शकते. याचादेखील एकदा विचार करून बघायला हरकत नाही. कारण ही आजच्या रंगभूमीची गरज आहे. परीक्षक वा संयोजकांनी घेतलेला निर्णय हा नवीन रंगकर्मीच्या मनावर खूप वाईट परिणाम करू शकतो, हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय. कारण आज तुम्ही एकांकिकांना दर्जा नाही म्हणून मानाचा करंडक देत नाही आहात. आज अनेक जण नाटकापेक्षा सिनेमा, सीरियल्स, युटय़ुबकडे वळताना दिसताहेत. याचादेखील विचार व्हायला पाहिजे. कारण नाटकामध्ये पैसा नाही. (पण समाधान आहे.) मुंबई आणि पुण्यासारख्या मोठय़ा शहरांचा अपवाद वगळता ग्रामीण  भागातील जी मुलं आज नाटक करताहेत, त्यांच्या घरच्यांच्या लेखी नाटक करणं म्हणजे स्वत:च्या आयुष्याचं वाटोळं करणं आहे. परीक्षकांना कदाचित हे माहीत नसावं. त्यामुळे अशा विद्यार्थी रंगकर्मीचं खच्चीकरण हे एकांकिका स्पर्धेच्या भवितव्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यांची  मानाचा करंडक पटकावण्याची योग्यता नसेल, तर आपण खूप कच्चे आहोत असा विचार करून ते स्पर्धेत भाग घेणंच बंद करतील. त्यामुळे कदाचित मानाचा करंडकदेखील बंद पडू शकतो. आज रंगभूमी टिकली पाहिजे.कारण तो महाराष्ट्राचा प्राण आहे. म्हणूनच नाटकाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर थोडं उन्नीस-बीस असू शकतं असा विचार करून असा थेट टोकाचा निर्णय घेणं टाळलं पाहिजे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over purushottam karandak results zws
First published on: 25-09-2022 at 01:01 IST