आज ५ सप्टेंबर.. शिक्षक दिन! गेले सव्वा ते दीड वर्ष करोनासाथीने सबंध जगाचीच दुर्दशा केली आहे. तशीच ती शिक्षण आणि विद्यार्थ्यांचीही केली आहे. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न अनेक जण आपापल्या परीने करीत आहेत. ऑनलाइन शिक्षणापासून ते शिक्षकांनी स्वत:च विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून केलेले नाना प्रयत्न यात येतात. या सव्यापसव्यात अनंत अडचणीही आल्या. परंतु त्यातूनही मार्ग काढत मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा व शिक्षकांनी प्रचंड कष्ट घेतले. या प्रयत्नांच्या प्रातिनिधिक कहाण्या..
किशोर मोतीराम भागवत
लॉकडाऊन जाहीर झालं आणि काळजाचा थरकाप उडाला. करोनाचा प्रादुर्भाव जास्त लोकसंख्येच्या शहरी भागांमध्येच होईल असे भाकीत होते; तो ग्रामीण भागांत येणार नाही म्हणून आम्ही बिनधास्त होतो. पण या विषाणूने ग्रामीण भागावरही आपली काळी छाया पसरवलीच. गाव आणि शाळा बंद झाल्या. गावातील बहुतांश पालक हे मेंढीपालन, शेती व मोलमजुरी करणारे. त्यात अशिक्षितांची संख्या जास्त. प्रत्यक्ष शाळा भरणार नाही म्हटल्यावर मोबाइल नसलेली मुले मेंढीपालनानिमित्त बाहेर गेलेल्या आपल्या आई-वडिलांकडे गेली. पण तिथे जंगलात व रानावनात ना मोबाइल नेटवर्क, ना चार्जिगची व्यवस्था. त्यांच्याशी संपर्क तरी कसा होणार? नंतर तर जिल्हाबंदीच झाली आणि मुले तिथेच अडकून पडली. त्यांना जिल्हाबंदी उठेस्तोवर गावात परतता येत नव्हते.
गावात राहणारे अनेक जण शेतीवाडी करणारे. बहुतांशांची आर्थिक परिस्थिती बेताची. करोना संपत नाही तोवर अशा परिस्थितीत या मुलांपर्यंत शिक्षण कसं पोहोचवायचं? निरुत्तरीत प्रश्नांनी डोक्यात गर्दी केली. सगळंच अशक्यप्राय वाटत होतं. मार्ग दिसेना.
कोविडकाळात दोन गोष्टींनी मला प्रेरित केलं. दिनकर पाटील रोज सकाळी न चुकता टाकत असलेली अभ्यासमाला आणि विवेक गोसावी यांनी मुलांपर्यंत पोहोचवलेली पाठय़पुस्तकं! त्याचबरोबर ऑनलाइन क्लासमध्ये शिकणारी माझी लेक पाहून मनात येई : आपल्या शाळेतील लेकरं खेडय़ातली आहेत म्हणून शिकूच शकणार नाहीत का? तेव्हा ठरवलं, अडचणी कितीही असोत; आपण जमेल तितके प्रयत्न करू. ऑनलाइन क्लासचा विचार मनात आला आणि टप्प्याटप्प्यांत आम्ही ते करत गेलो. अडचणी अनंत होत्या. स्मार्ट मोबाइल्सची कमतरता, नेटवर्कचा अडथळा, पालकांची बेताची आर्थिक स्थिती, स्थलांतर, इत्यादी.
लॉकडाऊननंतर सुट्टी जाहीर करताना सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मिरगे सर आणि शाळेतील अकरा शिक्षकांचे संपर्क क्रमांक दिले आणि विद्यार्थ्यांचेही संपर्क क्रमांक घेतले. पण तेव्हा खूपच कमी मुलांकडे फोन होते. मग मोबाइल घेतलात की आपापल्या शिक्षकांना कॉल करून कळवा असे त्यांना सांगितले.
लॉकडाऊनचे सुरुवातीचे काही दिवस आणि उन्हाळी सुट्टी सरली. त्यानंतर मात्र गावातील काही पालक शिक्षकांना फोन करून ‘मुलांना काहीतरी अभ्यास द्या, घरी पुरता वैताग आणलाय लेकरांनी..’ म्हणत शिक्षकांशी संपर्क साधायला लागले. हळूहळू शिक्षक सर्व नाही, पण शक्य तितक्या विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचू लागले. आमचं सुरुवातीचं ऑनलाइन शिक्षण ‘सेंड-रिसीव्ह’पासून सुरू झालं. माझ्याकडे मागच्या वर्षी पाचवीचा वर्ग होता. शाळा बंद असली म्हणून काय झाले? पण वर्गातील काही होतकरू मुलं शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेला बसवली पाहिजेत अशी इच्छा होती. आपण पूर्णत: न्याय देऊ शकू असे नाही, पण किमान यानिमित्ताने ते मागील व या इयत्तांच्या पायाभूत क्षमता विसरू नयेत, हा त्यामागील हेतू.
शालेय पोषण आहार व पाठय़पुस्तक वाटप, घरोघरी सव्र्हे यामुळे ग्रामीण विद्यार्थी व शिक्षकांना या काळात जोडून ठेवले. त्यांची भेट व्हायची ती शेतात किंवा मेंढीपालनामुळे रानावनात. फोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे मामा, काका, शेजारी असा कुणाचाही नंबर असो, आम्ही तो मिळवत गेलो, त्याद्वारे त्यांना अभ्यास देत राहिलो.
आम्ही साधे, स्मार्ट आणि कोणताच फोन नसणारे विद्यार्थी असे फोननिहाय विद्यार्थी गट तयार केले. त्यावर कुणाचे व्हॉट्स अॅप क्रमांक आहेत ते शोधू लागलो. सर्व वर्गाचा एक कॉमन ग्रुप तयार केला. त्याद्वारे दैनिक अभ्यासमाला मुलांपर्यंत पोहोचवू लागलो. नंतर जसजसे वर्गवार व्हॉट्स अॅप क्रमांक मिळत गेले तसतसे वर्गवार ग्रुप करायला सुरुवात केली. व्हॉट्स अॅपची फार माहिती नसल्याने काही पालक व मुलं नको ते मेसेजेसही फॉरवर्ड करायला लागली. मराठी वा इंग्रजी टाईप करता येत नसल्याने माईक वापरून ती बोलत. मग आम्हाला ग्रुपला ‘अॅडमिन ओन्ली’ करावं लागायचं. नंतर आम्ही ग्रुप लॉक का करतो हे त्यांना कळलं. त्यांची सुटलेली अभ्यासाची सवय पुन्हा सुरू करायची होती. सुरुवातीला आम्ही आईला घरकामात केलेली मदत, अंगणात लावलेले झाड यासोबतचे फोटो पाठवा वगैरे उपक्रम त्यांना दिले. हळूहळू अभ्यासापासून दूर गेलेली मुलं मोबाइलच्या गोडीने ऑनलाइन वर्गाद्वारे अभ्यास करू लागली. अभ्यास लिहिलेल्या पानांचे फोटो पाठवू लागली. बहुतांश मुलांकडील फोनमध्ये व्हॉट्स अॅप असे, पण जास्त मेमरीच्या फाइल्स डाउनलोड होत नसत. मोबाइल हँग होत असे. व्हिडीओ कॉलिंगचाही दर्जा चांगला नसे. मात्र, टेक्स्ट मेसेज व फोटो पाठवता येत. आम्ही testmoz.com वर सरावासाठी काही टेस्ट तयार करून टाकल्या. खासकरून इंग्रजी व गणितातील पायाभूत माहितीवर आधारित या टेस्ट होत्या. मुले त्यास छान प्रतिसाद देत. मग आम्ही अभ्यासक्रमातील विविध घटकांवर आधारित काही व्हिडीओ स्वत: तयार केले. काही यू-टय़ूबवरील व्हिडीओ लिंक्स विद्यार्थ्यांना आम्ही टाकत असू.
राज्यातील अगोदरच यू-टय़ूबर असलेल्या शिक्षकांना एकत्र आणायचे व जे यू-टय़ूबवर नाहीत त्यांना प्रशिक्षित करायचे असे मनात होते. केजी टू पीजी यू-टय़ूबर शिक्षकांना एकत्र आणून प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक व्हिडीओच्या लिंक पोहोचवायच्या. ११ जुलै २०२० रोजी ११ यू-टय़ूबर व तंत्रस्नेही शिक्षकांनी एकत्र येऊन आजवर राज्यातील १५०० शिक्षकांना आम्ही एकत्र केले आहे. यातून एकमेकांच्या साहाय्याने एकमेकांचे व्हिडीओ राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
टीलीमिली : ७ जुलै २०२० रोजी शिक्षणमंत्र्यांसोबत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यतील एक शिक्षक व एक पालक यांची ऑनलाइन सभा झाली. या बैठकीस बुलडाणा जिल्ह्यतर्फे सहभागाची संधी मिळाली. ज्या मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी काय करता येईल यावर फ्री डिश/ दूरदर्शनचा पर्याय मी शिक्षकांच्या वतीने सांगितला. ‘टिलीमिली’मुळे स्मार्ट फोन नसणाऱ्या मुलांना फायदा झाला.
शहरांतील शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गूगल मीट’ ऑनलाइन लाइव्ह वर्ग घ्यायला सुरुवात केली. अगोदर त्यांनी पालकांचा तांत्रिक क्लास घेतला. हा क्लास केल्यावर माझ्या मनात आलं, शहरातल्या मुलांप्रमाणेच आपल्या शाळेतील मुलांचाही क्लास घ्यायला हवा. पण प्रयोग कुणावर करणार? कारण क्लासची लिंक कशी तयार करायची, हे मला शिक्षक म्हणून माहिती करून घ्यायचे होते. मग वेगवेगळ्या जिल्ह्यंतील माझे प्रयोगशील शिक्षक मित्र शेखर फुटके, वैभव तुपे, संतोष सुतार, प्रवीण शिंदे आदींच्या साथीने सराव केला. सगळ्या तांत्रिक बाबी चर्चा करून समजून घेतल्या. शाळेतील अगदी बोटांवर मोजण्याइतक्या मुलांकडेच स्मार्ट फोन होते. एका फोनसमोर तीन, चार, कधी पाच विद्यार्थी ऑनलाइन वर्गाला बसायचे. एक तर महागडा मोबाइल, नाजूक वस्तू आणि घरात एकच त्यामुळे पालक सुरुवातीला ‘संध्याकाळी आम्ही घरी आल्यावर क्लास घ्या,’ म्हणायचे. तसे आम्ही केले. कारण पालकांची गैरसोय होता कामा नये. याबाबतीत अगोदर काही दिवस ‘गूगल मीट’ कसे हाताळावे याबाबत मुलांना प्रशिक्षित केले. ही मुले आता त्याचा सराईतपणे वापर करतात. शिक्षकदेखील प्रशिक्षित आहेत. पण मुलांकडे साधने नाहीत ही मुख्य अडचण ठरते आहे. शाळेतील सर्व वर्गातील स्मार्ट फोन असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून आम्ही ‘गूगल मीट’वर गणित व इंग्रजीच्या पायाभूत ज्ञानावर ऑनलाइन क्लास सुरू केला. विद्यार्थ्यांसह पालकांनाही या पाठांचे खूप कौतुक वाटत होते. तेही पाल्यासोबत तासाला बसायचे. पुढे माझ्या वर्गातील ३९ मुलांपैकी सहा विद्यार्थी आपल्या स्मार्ट फोनवरून गुगल मीटवर आपल्या घराजवळच्या वर्गमित्रांना सोबत घेऊ लागले.
सुरुवातीला गूगल मीटला वेगवेगळ्या वर्गातील एक वा दोन मुले जुळत असल्याने सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल अशा गणित, मराठी व इंग्रजी या विषयांतील अतिशय सोप्या बाबी घ्यायला सुरुवात केली.
एक दिवस उशीर झाला. ऑनलाइन क्लास थांबायला नको म्हणून अक्षराला सांगितलं, ‘तू आज सर्वाचं वाचन घे.’ मुले एकामागोमाग वाचन करू लागली. मी मीटिंगमध्ये सहभागी नसतानाही मुलांच्या मदतीने २० मिनिटे वर्ग नियंत्रित करता आला. त्यानंतर कवितावाचन, पाठय़पुस्तकांतील नाटकांचे सादरीकरण, शब्दभेंडय़ा/ अंताक्षरी, पाढे, पाठाचे वाचन, भूमिकाभिनय, इ. मुलांकडून सादर करून घेतले. या वर्गाची उपयुक्तता कळल्यावर फोन नसलेल्या बऱ्याच पालकांनी नवे किंवा कुणी जुने फोन विकत घेतले.
ऑनलाइन क्लासेसमध्ये स्क्रीन शेअरिंगचा पर्याय व बालभारतीने आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली ऑनलाइन पुस्तके ऑनलाइन वर्गासाठी वरदान ठरली. मुले शेतात असोत वा नातेवाईकांच्या गावी- शिकवत असताना ऑनलाइन पुस्तके शेअर करून ही अडचण दूर करता आली. स्पीड टेस्टसाठी चॅटिंगचा खूप चांगला वापर करता येतो. समजा, ‘वन मिनिट अॅक्टिव्हिटी’ घेताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची सोपी उदाहरणे काही मिनिटांत सोडवायला द्यायची. मुलांना हे फार मजेशीर वाटलं. ट्विनक्राफ्टचा वापर करून अनेक संदेश वा पाठ आपल्याला कार्टूनमध्ये बनवता येतात.
ज्यांच्याकडे साधे वा स्मार्ट फोन नाही, जे गुगल मीटवर येऊ शकत नाहीत, ते विद्यार्थी मोठय़ा इयत्तेतील भावंडांकडून वा आपल्या परिसरातील सुशिक्षित युवक वा पालकांकडून मार्गदर्शन घेत होते. असे स्वयंसेवक- म्हणजे ‘करोना कॅप्टन’ आम्ही तयार केले. कधी कधी ढगाळ वातावरण वा इतर तांत्रिक कारणाने गूगल मीटवरील व्हिडीओ वा आवाजाला अडथळे निर्माण होतात. अशा वेळी कॉन्फरन्स कॉल केला गेला. पण त्याअगोदर त्यांना गूगल मीटवर कल्पना द्यायचो. कधी कधी गूगल मीट लॅपटॉपवर आणि दुसऱ्या फोनवरून इतर पाच जणांना कॉन्फरन्स कॉलवर घेत होतो.
नवोदय वा स्कॉलरशिपचा तास घेताना कमी मुले असायची. अशात एखाद्या वेळी व्हॉट्स अॅपच्या ग्रुप व्हिडीओ कॉलिंगचा वापरदेखील करून पाहिला. माध्यम कुठलेही असो; शिकणं महत्त्वाचं!
अशा प्रकारे सर्व मुले लॉकडाऊन काळात शाळेच्या संपर्कात होती. काहींशी दररोज संवाद व्हायचा; मात्र काहींशी जेव्हा जमेल तेव्हा! गावाबाहेर असलेल्या वा भटकंती करणाऱ्या पालकांकडे फोन वा चार्जिगची सुविधा नसल्याने कधी कुणाच्या तरी फोनवर संपर्क व्हायचा, तर कधी नाही. करोनासारखी आपत्ती भविष्यात अनेकदा येईल, पण मुलांची शिकत असलेली इयत्ता त्यांच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. शाळेचे हे उपक्रम ‘बुलडाणा जिल्हा इन फोकस’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात व नवोपक्रम स्पर्धेत मांडता आले आणि राज्यातील अनेक शिक्षकांसाठी ते प्रेरकही ठरले.
kishorbhagwat289@gmail.com
(लेखक जि. प. शाळा, हिवरखेड, ता. खामगाव, जि. बुलडाणा येथे शिक्षक आहेत.)