अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com

सध्या मॉस्कोत जे चाललंय त्याचा या लेखाशी दुरूनदेखील काहीही संबंध नाही, हे सुरुवातीलाच सांगावं लागावं यासारखं दुर्दैव नाही. काळ वाईट आहेच; पण कधीकाळी याच मॉस्कोत सांस्कृतिक परंपरेनं भारावून टाकणारं वातावरण होतं. राज्यकर्ते आजचेच असले तरी अगदी सहा वर्षांपूर्वीसुद्धा कला आणि कलाकारांना समाजात आज आहे त्यापेक्षा बरीच किंमत होती. म्हणून हा लेख केवळ एक अभिजात कलापरंपरेच्या संदर्भात बघावा.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

मॉस्कोत असताना बोलशोई थिएटरचा सीझन चालू असेल तर ती पर्वणी समजून तिथे एखादा बॅले किंवा ऑपेरा बघण्याचा अक्षरश: भव्य, राजसी अनुभव आवर्जून घेण्यासारखा! याची सर जगाच्या पाठीवर इतर कशालाही येणं अशक्यप्राय. कारण सादरीकरणाच्या भव्यतेचं हे परिमाण, नेपथ्य, नृत्यकलेवरलं कसदार प्रभुत्व, ठरावीक वेशभूषा असूनही त्यातून प्रगटणारा राजस डौल, ध्वनी आणि प्रकाशयोजनेची तंत्रशुद्धता शब्दांत न मावणारी. इथे सुप्रसिद्ध ‘स्वान लेक’ बॅले पाहण्याची संधी मिळालेला प्रत्येक जण भाग्यवानच!

बोलशोई थिएटर १८२५ मध्ये सुरू झालेलं. मॉस्कोमधली ‘बोलशोई बॅले’ ही जगातली सर्वात जुनी बॅले कंपनी.. परंपरा जतन करणारी. साहित्यातली मुलांची आणि मोठय़ांचीही अनेक क्लासिक्स इथे बॅले किंवा ऑपेरारूपात पाहणं हा नयनरम्य प्रकार असतो. भव्य परिमाण अमेरिकेत ब्रॉडवेचासुद्धा; पण त्या भव्यतेत कृत्रिमता आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वरचष्मा जाणवतो. बोलशोईच्या राजवर्खी भव्यतेला लांबलचक इतिहासाची, परंपरेची गहिरी डूब आहे आणि प्रत्येक तपशिलात असणारी परिपूर्णता! सगळ्या परंपरा सुरुवातीच्या काळात राजाश्रयामुळे- थाटामाटाच्या! आतल्या सजावटीत लाल मखमल आणि सोनेरी रंगाला प्राधान्य.. डोळे दिपवणारा प्रकार. उंच छतावर कोरीव, सुंदर नक्षीदार हंडय़ा-झुंबरं. सगळंच गतकालच्या वैभवाची साक्ष देणारं; पण डोळ्यांना खुपणारं नाही. पडदा वर जाण्याअगोदरच इतकं काही पाहायला मिळतं की बघतच राहावं. प्रेक्षागृहात अनेक लेव्हल्स. वर बाल्कनीत रॉयल बॉक्ससारखीही सोय असावी असं वाटलं. दोन हजारपेक्षा जास्तच प्रेक्षकांची आसनव्यवस्था असूनही सभागृह भरलेलं होतं. प्रेक्षकांना बॅले दुर्बिणीतून पाहण्याचीही सोय केलेली. या थिएटरचे सीझन्स असतात. समोर ६०-७० नर्तकांना पुरेल असं ३० x ३१ मीटर्सचं स्टेज. त्याला सोनेरी महिरप.    

‘बॅले’ ही समूह नृत्यनाटिका. पडद्यामागून सूत्रधार सुरुवातीला कथेचा गोषवारा सांगतो. चार अंकी प्रयोग फक्त रशियात असतो. जगात इतरत्र बॅलेचा तीन अंकी प्रयोग होतो असं ऐकलं खरं; पण त्यामागचं कारण कळलं नाही. पावणेदोन तासाच्या नाटिकेत शब्द/ संवाद नसल्याने नर्तकांना कथा केवळ नृत्याभिनयाने साकार करायची असते. अर्थात बहुतेक बॅलेज् लहानांसाठी ‘सिंड्रेला’ किंवा ‘द नट क्रॅकर बॅले’ हे मोठय़ांसाठीच्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’सारख्या सुप्रसिद्ध कथांवर आधारित असल्याने प्रेक्षकांना परिचित असतात. शिवाय प्रयोगाची माहिती देणाऱ्या, सुंदर डिझाईन केलेल्या पुस्तिका असतातच हाताशी. कुठे अवास्तव नाटकी अभिनय नाही. चेहऱ्यावर संयत भावच्छटा. प्रेमातील अत्यानंद किंवा काळजाला पीळ पाडणारी वेदनासुद्धा शरीरातून नृत्यमयतेने दर्शविलेली. त्यातूनच कथा दर्शकांपर्यंत पोहोचते. बॅलेच्या अभिव्यक्तीत लवलवता नखशिखांत देह हेच माध्यम असल्याने सगळा नर्तक, नर्तकींच्या ताफ्याचा कारभार. त्यात एक प्रमुख नर्तकी आणि नायक नर्तक. त्यांचं वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी सुरू होणारं बॅले प्रशिक्षण दहा वर्ष  चालतं. प्रयोगाआधी भूमिकेसाठी निवड ही कठीण प्रक्रिया असते. प्रशिक्षणात सगळे क्लासिकल गोष्टींचे बॅलेज् शिकवलेले असतातच; पण बोलशोईत निवड म्हणजे शिखरावर पोहोचणं. निवडीनंतर सहा-आठ आठवडे तालमी चालतात. मुख्य नर्तिकेने (प्रिमा डोना) स्वत:ची भूमिका काटेकोरपणे पार पाडायची असतेच, शिवाय इतरांबरोबर तालमेळही राखायचा असतो. कुठेही तसूभर हयगय नाही.

‘स्वान लेक’ बॅले ही पीटर तायकोवस्की यांची विश्वविख्यात रचना. १८७६ मधली. पांढऱ्याशुभ्र हंसांच्या तलावात तालबद्ध विहरण्यातून एक सुंदर स्वप्नलोक डोळ्यांसमोर साकार होतो. स्वान लेकची कहाणी म्हणजे राजकन्या ऑडेट कुठल्याशा शापामुळे सूर्योदय ते मध्यरात्रीपर्यंत सरोवरातल्या हंसांच्या कळपात राहणारी हंसिनी असते. रात्री ती मानवरूप धारण करून पहाटेपर्यंत त्या रूपात राहते. तिला योगायोगाने एक राजपुत्र मानवरूपात पाहतो आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण या प्रेमाला अपूर्णतेचा शाप असतो. कुटिल जादूगाराच्या मुलीचंही मन राजपुत्रावर जडतं. मायावी जाळ्यात राजकुमार ओढला जातो आणि त्याच्या प्रियेऐवजी या दुसरीशी लग्न करतो. सुकुमार ऑडेटच्या प्रेमभंगाची वेदना संगीतात उतरवताना हार्पचा अतिशय मंद, काळजाला हात घालणारा वापर केलेला आहे. पण सत्य उमगताच राजकुमार ‘स्वान लेक’मध्ये परत येतो आणि दोघंही दु:खातिरेकानं त्यात जलसमाधी घेतात आणि त्यांना परलोकात नवजीवन मिळतं. पाण्यात हंसिनी म्हणून विहरणाऱ्या आणि रात्री मनुष्यरूप धारण करणाऱ्या ऑडेटच्या देहबोली वेगळ्या.. त्या मुख्य नर्तकीने असामान्य कौशल्यानं साकार केल्या. तिने एका चौडय़ावर तोल सांभाळत एक पाय जमिनीशी काटकोनात नेऊन एका दमात स्वत:भोवती वेगाने घेतलेल्या ३२ गिरक्या (फॉउएट्स) हा बोलती बंद करणारा अनुभव!

वर्षांनुवर्षे कधी भरती, तर कधी ओहोटीच्या लाटा.. लाटांसारखं उसळत, विसावत प्रेक्षकांवर पसरत जाणारं संगीत. जणू काही सगळे जण स्वरलहरी आणि समोर उलगडणाऱ्या नृत्याबरोबर कुठल्यातरी जादूच्या गालिच्यावर बसून एका वेगळ्याच जगात अलगद तरंगत चाललेले! विशाल रंगमंचावर स्वान लेकची कहाणी सुरू होते तीच मागील पडद्यावर प्रकाशाच्या साहाय्याने चितारलेल्या सूर्योदयाच्या वेळी. चारही वेगवेगळ्या अंकांत बदलणारी वेळ- म्हणजे सरोवरावर उतरलेली संध्याकाळ व रात्र, किंवा होणारी सकाळ अप्रतिम प्रकाशयोजनेतून मंचामागच्या पडद्यावर क्षणाक्षणाने उमटताना दिसते. आनंदाचे क्षण उत्फुल्ल रंगांत द्रुतगतीतल्या संगीतावर, तर दु:खाचे प्रसंग उदास काळोखीतून संथ वाहणारे. भव्य पडद्यावर प्रकाशाचं छायानृत्य आणि मंचावर कलाकारांचं- दोन्हींचं एकमेकांत पूर्णपणे मिसळणं.          

डान्सर म्हणजे मुख्य पुरुष नर्तक- या कथेतला राजपुत्र म्हणजे अगदी शिडशिडीत, पावलापासून गळ्यापर्यंत शुभ्र पांढऱ्या तंग पोशाखात. नायिका शेलाटी, हंसाच्या मानेची,  लांबसडक पाय, हात. सुरुवातीला चंदेरी जरीच्या पांढऱ्या टुटूत. (टुटू म्हणजे बॅलेरिना घालतात तो तंग आणि कमरेभोवती गोल घेरासारखा तोकडा फ्रॉक, खाली तलम पांढरे किंवा त्वचेच्या रंगाचे पारदर्शक टाईट्स़.. पावलंही झाकणारे.) आणि बाकी नृत्यांगना तिच्यासारख्याच, पण जराशा साध्या. खलनायिका तशाच, पण काळ्या आणि सोनेरी जाळीदार टुटूत. तिचे जादूगार वडील गर्द जांभळ्या दुष्ट माणसाच्या पेहरावात. सगळंच नृत्य चवडय़ावर आणि पावलाच्या पुढल्या दोन बोटांवर डौलदार, सहजपणे तोल सांभाळत, टाचा उंचावून करायचं. कोणत्याही नर्तकाच्या शरीरावर एकही सेंटिमीटर जास्तीचं मांस नाही. पोशाख तंग यासाठीही- की हालचाली जिम्नॅस्टसारख्या. नाजूक दिसणाऱ्या कोवळ्या देहांमध्ये केवढी लवचीकता आणि चिवटपणा भरलेला! माझी मॉस्को युनिव्हर्सिटीतली मैत्रीण इरीना सांगत होती की, तंग कपडय़ांमुळे पायांच्या स्नायूंना मदत मिळते आणि अत्यावश्यक असलेली ऊबही. इंद्रजालासारखं प्रवाही संगीत आणि नृत्य यांचा मेळ या बॅलेला अभिजाततेच्या उच्च पातळीवर घेऊन जाणारा. सरोवरात हंसिनींची चाल दाखवणारी करपल्लवी आणि त्यांचं पंखांसारखं फुलारणं, मानेच्या हंसांसारख्या मोहक हालचाली, डोक्यावरल्या शुभ्र बॅण्डमुळे आलेला एक मोहक नवतारुण्याचा इफेक्ट.. सगळंच लोभस! मुख्य म्हणजे या हालचाली मुख्य नर्तिका सोडून सर्वाच्या अगदी त्याच.. कोनात अंशमात्र फरक नसावा. एवढय़ा मोठय़ा कास्टबरोबर हे घडवून आणणं म्हणजे परफेक्शनची कमालच. प्रयोगानंतर जेव्हा शंभरेक कलाकार प्रेक्षकांचं अभिनंदन स्वीकारायला मंचावर येतात तेव्हा सगळे प्रेक्षक त्यांना उभे राहून अभिवादन करतात आणि टाळ्यांचा कडकडाट फेरी-फेरींनी खूप वेळ चालू राहतो. प्रेक्षागृहातून बाहेर पडताना एका अतिशय सुंदर स्वप्नातून जागं झाल्यासारखी सगळ्यांचीच अवस्था असते. चांगल्या तिकिटाची किंमत महागडी वाटते, हे मान्य.. आपलं मध्यमवर्गीय मन त्यासाठी जरा तयारच करावं लागतं. पण ही चैन म्हणजे आयुष्यात एकदाच घ्यायचा भव्य, नेत्रदीपक अनुभव असतो. पश्चात्ताप होणार नाही, ही हमी. जवळच ‘बोलशोई’ नावाचा कॅफे आहे. त्यातला रशियन ‘हनी केक’.. अहाहा!! चहाची किटली आणि कपबशा लाल-पांढऱ्या डिझाइनच्या.. टिपिकल रशियन परंपरेतल्या. बोलशोई थिएटरचा अनुभव म्हणजे जीवाचं मॉस्को होणं- तंतोतंत!