आईचा वाढदिवस म्हणून आज सुट्टी असूनही जय सकाळी वेळेवर उठला आणि त्याने स्वत: क्विलिंगने तयार केलेले ग्रीटिंग कार्ड तिला दिलं. नमस्कार केला. आईनं जवळ घेऊन आज संध्याकाळी मावशी आणि त्याचा लाडका मल्हारदादाही येणार असल्याची खूशखबर सांगितली. आज संध्याकाळी पावभाजी आणि त्याचा आवडता पायनॅपल केक आई स्वत: करणार होती. त्यामुळे स्वारी जामच खूश होती. बाबाही आज काम शक्यतो लवकर संपवून घरी येणार होता. जयला तर आतापासूनच संध्याकाळचे वेध लागले होते. आज शहाण्यासारखं वागून आईला जमेल तितकी मदत करायची असं त्यानं ठरवलं होतं. बाबा ऑफिसला गेल्यावर त्यानं पटापट कालचा ग्रीटिंग बनवतानाचा पसारा आवरला. आईनं न सांगताच झाडांनाही पाणी घातले. तेवढ्यात ‘‘जय, संध्याकाळसाठीचं काही सामान आणायचंय आपल्याला. मी अंघोळ करून आले की जरा बाहेर जाऊ या… तूही पटापट तयार हो,’’म्हणत आई आटपायला गेली. इकडे जय कपडे बदलत असताना आईचा फोन वाजला. जयनं बघितलं तर बाबाचा कॉल होता म्हणून त्यानं उचलून आई अंघोळीला गेल्याचं सांगितलं. झालं असं होतं की, काल आईबाबांनी एका मोठ्या दुकानातून मायक्रोवेव्ह पसंत केला होता. त्या दुकानदाराने बाबाला फोन करून घराचं लोकेशन पाठवायला सांगितलं होतं. बाबा खूप गडबडीत होता म्हणून हा निरोप आईला आठवणीनं द्यायला सांगून फोन ठेवला. आई अजून अंघोळ करून बाहेर आली नव्हती. जयनं विचार केला, ‘‘हॅट… लोकेशन टाकायला आईसाठी कशाला थांबायचं?’’ खरं तर जयला अजून स्वत:चा मोबाइल मिळाला नव्हता तरी आईबाबांनी नेमून दिलेल्या वेळात त्याच्या हाती मोबाइल येई तेव्हा त्यानं त्यातल्या बर्‍याच ॲप्सची थोडीफार माहिती करून घेतलेली होती. शिवाय एकदा पुण्याला जाताना मल्हारदादानं ते कुठपर्यंत पोहोचले सांगायला मोबाइलवरून मावशीला लोकेशन पाठवलं होतं ते त्यानं बघितलं होतं. लगेच त्यानं त्याच्याकडून ते समजूनही घेतलं होतं. आज आता त्याला स्वत:ला लोकेशन टाकायची आयती संधी मिळाली होती. आईची तयारी होईपर्यंत आपणच हे काम करून तिला मदत करायची असं त्यानं ठरवून टाकलं. पण खरं तर मदतीपेक्षाही मोबाइलवर स्वतंत्रपणे आपण नवीन काही तरी करणार म्हणून तो थोडा एक्साइटही झाला होता. हीपण ‘अंदरकी बात’ होतीच. बाबानं पाठवलेल्या दुकानदाराच्या नंबरवर त्यानं आईच्या फोनवरून झटपट लोकेशन पाठवून दिलं. इकडे आई पिशव्या, पर्स, स्कूटीची चावी घेऊन दार बंद करत असतानाच जयला समोरच्या आर्यननं त्याची नवीन हॉटव्हीलची कार दाखवायला हाक मारली. त्याच्याशी बोलताना जयला वेळेचं भानच उरलं नाही. खालून आईच्या हाका ऐकून तो पळतपळत स्कुटीवर जाऊन बसला. आईनं मंडईच्या टोकाला स्कुटी लावून भाज्या घेतल्या. पुढे मोठ्या बेकरीशी स्कूटर थांबवून लादीपाव घेतले. केकच्या सामानाची खरेदी झाली. त्यांची सगळी खरेदी चालू असताना आईला तिच्या पर्समध्ये वाजत असलेल्या मोबाइलचा आवाज ऐकूच येत नव्हता. स्कुटी चालू करताना मात्र पर्समधल्या फोनवर तिनं अनोळखी नंबरवरून दोन फोन आल्याचे बघितलं. पण ते कुठल्या तरी जाहिरातींसाठी असतील म्हणून तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं. उन्हातून फिरून दमल्यावर जयची पायनॅपल फ्लेवरच्या एनर्जीची मागणी पुरवण्यासाठी त्यांची स्कूटर आणखीन एका गल्लीत शिरली. थोडक्यात साधारणपणे २ तास त्यांची खरेदीसाठी इथेतिथे भटकंती चालू होती. भरपूर खरेदीनं भरलेल्या पिशव्या उचलून घरी पोहोचल्यावर आईनं पंख्याखाली बसत पाणी पिता पिता आपल्या पर्समधून मोबाइल काढून बघितलं तर… मगाच्याच अनोळखी नंबरवरून थोड्या थोड्या वेळाने ५-६ कॉल आले होते. एवढे कॉल म्हणजे नक्की कुणी तरी काही अर्जंट कामासाठी फोन करत असणार याची तिला खात्री झाली. घाईघाईनं तिनं त्या नंबरवर फोन केला. बाजूला बसलेल्या जयला आईच्या बोलण्यातील लोकेशन… ॲड्रेस… डिलिव्हरी वगैरे शब्द ऐकल्याक्षणी बाबाच्या सकाळच्या फोनची आणि त्यानं परस्पर पाठवलेल्या लोकेशनची आठवण आली. आर्यनची कार बघण्याच्या नादात तो आईला त्या फोनबद्दल आणि त्याच्या लोकेशन पाठवायच्या आपल्या हुशारीबद्दल सांगायचं साफ विसरून गेला होता. त्यानं आईला खुणेनं ते सांगायचा प्रयत्न केला, पण तिच्या चेहर्‍यावरून ती जाम चिडल्याचं समजत होतं. बराच वेळ त्या माणसाशी बोलून अखेर वैतागून ठीक है. ठीक है म्हणत फोन बंद केला. आणि जाम म्हणजे जामच वैतागून जयकडे मोर्चा वळवला.

‘‘जय… आज आता केक वगैरे काही होणार नाहीये. फुकट एवढी धावपळ केली आपण… तुला माहितेय का, तू काय गोंधळ घातलायस? तो दुकानदाराचा माणूस आपल्याकडे दुपारच्या ऐवजी सकाळी मायक्रोवेव्हची डिलिव्हरी द्यायला निघाला होता म्हणून त्यानं त्यांच्या टेंपोसाठी लोकेशन मागवलं. त्यासाठी बाबाचा आलेला फोन तू मला सांगितलाच नाहीस आणि करंट लोकेशन कधी पाठवायचं आणि लाइव्ह लोकेशन कधी पाठवायचं यातला फरक तुला माहितीच नसताना तू परस्पर उद्योग करून ठेवलास. तुझी मोबाइलची माहिती अर्धवट आणि वापरायचा उत्साह मात्र चौपट… त्याच अर्धवट माहितीच्या जोरावर मला न सांगता विचारता तू त्यांना चक्क लाइव्ह लोकेशन पाठवलंस. त्याआधी निदान मला विचारलं असतंस तर किंवा निदान पाठवल्यावर तरी मला सांगितलं असतंस तर? केवढा गोंधळ झाला बघ आता.’’ तरीही जयला नक्की काय झालंय समजेना तेव्हा गोंधळलेला चेहरा बघून नक्की गडबड समजावण्यासाठी तिनं त्याला जवळ बोलावून आपल्या मोबाइलमधलं करंट आणि लाइव्ह लोकेशनचे पर्याय दाखवले.

‘‘अरे, लाइव्ह लोकेशन टाकल्यामुळे आपण जेव्हा बाजारात इथेतिथे फिरत होतो त्याच्या दिशेने बिचारा टेंपोवाला तोच आपला पत्ता समजून आपल्या मागेमागे फिरत राहिला. अखेर गोंधळून त्यांनं मला फोनही केला, पण मी तो उचललाच नाही. नाही तर तेव्हाच उलगडा झाला असता. शेवटी त्या शोधाशोधीला कंटाळून तो टेंपो पुन्हा त्याच्या गोडाऊनमध्ये गेला. आता मायक्रोवेव्ह उद्या सकाळी पाठवतो म्हणालेत.’’ तेव्हा कुठे आपण केलेला गोंधळ त्याला समजला आणि आईच्या गळ्यात पडून सॉरी पुटपुटून ‘‘आता मी आणू का बाहेरून केक?’’ असं त्यानं हळूच विचारलं. त्यावर ‘‘तू आता प्लीज काहीही करू नकोस. आता बाबालाच सांगू येताना केक आणायला. तुझ्या अतिउत्साहामुळे माझा आज केक करायचा उत्साह आता साफ संपलेला आहे.’’ जयला टपली मारत आईनं जाहीर केलं.

alaknanda263@yahoo.com