राज्यातील बहुतांश कृषी बाजारांतील व्यापार्यांना गेल्या दोन आठवड्यांपासून कढीपत्त्याच्या दरवाढीने कोड्यात टाकले. कायमच मुबलक असल्याने विक्रीत किरकोळ मानला जाणारा कढीपत्ता आंध्र प्रदेशमधून पहिल्यांदाच आयात करावा लागला. वजन वाढावे म्हणून पाणी मारून त्याला विकण्याचे प्रकार घाऊक बाजारात घडले. एरवी भाजीबरोबर मोफत मिळणार्या कढीपत्त्याच्या जुडीसाठी ग्राहकांनी २० ते २५ रुपये मोजले. कढीपत्त्याच्या दरवाढीकडे तात्कालिक टंचाई हे कारण म्हणून न पाहता, आता बदलत्या अन्नसंस्कृतीचा संकेत म्हणून का पाहायला हवे, याची चर्चा. त्याचबरोबर डाळींच्या अर्थकारणाचा नागरिकांच्या आरोग्याशी सांगड घालणारा लेख…
फुकट मिळते त्याची किंमत कुणी करत नाही, मग ती वस्तू किंवा सेवा कितीही उपयुक्त का असेना. कढीपत्ता हे याचे उत्तम उदाहरण. अनेक पाककृतींमध्ये अनिवार्य असूनही त्याला नेहमीच ‘क्षुद्र’ मानले गेले. भाजीवाल्याकडून इतर भाज्या घेतल्या की दोन-चार कढीपत्त्याच्या काड्या पिशवीत मोफत मिळणे हा आपला हक्कच होता. त्यामुळे त्याचे खरे मोल कधी जाणवलेच नाही. मराठी भाषेतही ‘फुकटचा कढीपत्ता’ किंवा गरज संपली की ‘कढीपत्त्यासारखे फेकून देणे’ असे वाक्प्रचार रूढ झाले. मात्र, आता तोच कढीपत्ता विकत घेण्याची वेळ आल्यावर लोकांना त्याची खरी किंमत समजू लागली आहे.
कढीपत्त्याचे दर अचानक का वाढले, हे सर्वांसाठी एक कोडेच आहे. वर्षानुवर्षे याचा पुरवठा सुरळीत आणि विनामूल्य होत असल्याने ग्राहक, व्यापारी, शेतकरी आणि सरकार यांपैकी कोणीही याकडे गांभीर्याने पाहिले नाही. आज दर वाढल्यानंतरही उत्पादन आणि मागणीबाबत कोणतीही ठोस किंवा विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. वास्तविक, भारत हा जगातील कढीपत्त्याचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे. आपण संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान यांसारख्या आखाती भागांत विमानाने कढीपत्ता निर्यात करतो. रमजानच्या काळात तिथे या मालाला मोठी मागणी असते. परदेशातील ग्राहक पैसे मोजायला तयार आहेत, पण देशांतर्गत बाजारपेठेत मात्र या पिकाची आकडेवारी गोळा करण्याबाबत अनास्था आहे. सरकारी ‘स्पायसेस बोर्ड’कडेही (मसाला मंडळ) याची अद्ययावत माहिती नाही.
व्यावसायिकतेचा अभाव…
दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांतील काही भागांत कढीपत्त्याची शेती केली जाते. महाराष्ट्रात मात्र मुख्यत: घर-गोठ्याच्या मागे किंवा शेताच्या बांधाला कढीपत्ता लावला जातो. त्याची व्यावसायिक शेती केली जात नाही. त्याकडे कधीही व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले गेले नाही. म्हणूनच आजही शेजारच्याने कढीपत्ता तोडून नेला तरी मालकाला त्याचे फारसे काही वाटत नाही.
पोहे असो वा पोळ्याची आमटी अथवा इडलीची चटणी… सर्वांना कढीपत्त्यामुळेच चव येते, यात दुमत नाही. अलीकडच्या काळात अनेक आहारतज्ज्ञ आणि वैद्यकीय सल्लागार कढीपत्त्याचे गुणधर्म सांगू लागले आहेत. वजन कमी करण्यापासून ते रक्तातील साखर कमी करण्यापर्यंत अनेक बाबींमध्ये कढीपत्ता उपयुक्त असल्याचे मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमातून प्रभावक (इन्फ्लुएंसर) सांगत आहेत. यामध्ये किती तथ्य हे तेच सांगू शकतील. मात्र मागणी वाढत आहे हे वास्तव आहे. कढीपत्त्याचे लोणचे, चटण्या आणि इतर पदार्थांचे उत्पादनही वाढू लागले आहे. तरीही मागणी नेमकी किती वाढली आणि उत्पादनाचा आलेख कसा आहे, हे सांगणे कठीण आहे. पण हे फक्त कढीपत्त्याबाबतच घडत नाही.
इतरांच्या बाबतीतही तेच…
कढीपत्त्याप्रमाणे शेवगा, गवारी, नारळापासून वेलचीसारख्या पिकांचे दर अचानक वाढले आणि अनेक महिने टिकून आहेत. ही पिके गहू-तांदूळ किंवा कडधान्यांसारखी मोठी नाहीत, ज्यामुळे किरकोळ महागाई निर्देशांकात मोठा फरक पडेल. त्यामुळे या लहान पिकांकडे लक्ष दिले जात नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार शेतकरी पुरवठा नियंत्रित करतील हे गृहीत धरले जाते. जोपर्यंत खूप दरवाढ होऊन ग्राहकांना झळ पोहोचत नाही तोपर्यंत त्याकडे लक्ष दिले जात नाही, हेच सर्वार्थाने धोकादायक आहे.
सलग दोन वर्षे मोसमी पावसाने साथ दिल्यामुळे अन्नधान्याचे दर कमी झाले आहेत. किरकोळ महागाई निर्देशांक गेले अनेक महिने भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या दोन ते सहा टक्क्यांच्या ल्ष्यियत मर्यादेत आहे. महागाई निर्देशांकाच्या वाढीपेक्षा अन्नधान्याच्या वाढीचा वेग कमी आहे. गेल्या काही महिन्यांत तो अनेकदा उणे होता. त्यामुळे गौण भाज्यांमधील अशा किरकोळ दरवाढीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. चांगला पाऊस झालेल्या वर्षातही काही भाज्यांचे दर सातत्याने जास्त का टिकून आहेत, त्यांचा पुरवठा का वाढत नाही याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या लहान पिकांमध्ये मागणी-पुरवठ्याचे गणित नेमके कसे बदलत आहे, हे समजून घेतले तर दुष्काळी वर्षात इतर अनेक वस्तूंचे दर कसे वाढू शकतात, याचाही अंदाज येऊ शकतो. या वर्षी ‘एल निनो’ (ए’ ठ्रल्लः) स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सामान्यत:
ज्या वर्षी एल निनो सक्रिय असतो, त्या वर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो.
नवी पिढी, नव्या गरजा…
जोपर्यंत उदरभरण करणे हेच लोकांसाठी कष्टप्राय होते तोपर्यंत गहू, तांदूळ, ज्वारी आणि बाजरी यांचा भारतीय आहारात मोठा वाटा होता. पिढ्यान्पिढ्या जेवणाच्या ताटातील घटकांत फार फरक पडत नव्हता. आता मात्र वाढत्या संपन्नतेसोबत फळे, भाज्या, अंडी-मांस, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे प्रति व्यक्ती सेवन वाढत आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि तयार अन्नपदार्थ खाण्याच्या वाढत्या सवयींमुळे त्यात वाढ होत जाणार आहे. लोकांनी १९७२च्या दुष्काळात सुखडीवर दिवस काढले. मात्र त्यांची नातवंडे आता केवळ पिझ्झा अथवा बर्गर मागवत नाहीत तर त्यातील विविध घटक निवडून ते आपल्या आवडीनुसार बदलूनही घेत आहेत.
पूर्वी एखाद्या शेतमालाचे दर वाढले की लगेच मागणीत मोठी घट होत असे. आता मात्र दर वाढले तरी मागणी मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत नाही. मर्यादित उत्पन्न असलेला वर्ग साहजिकच दुसर्या वस्तूंकडे वळतो, मात्र काही झाले तरी चवीत बदल करणार नाही. त्यासाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी असलेला एक वर्ग तयार होत आहे. त्यासाठी केवळ कढीपत्ता, गवारी अथवा शेवगा महत्त्वाचा नाही, तर त्याला परदेशी फळे आणि भाजीपालाही हवा असतो. त्यामुळेच अवोकाडो, किवी, ड्रॅगन फ्रूट, ब्लूबेरीसारखी फळे आणि अस्पॅरागस, ब्रोकोली, झुचिनीसारख्या भाज्या आता लहानसहान भाजीपाला विक्रेतेही ठेवू लागले आहेत. सुरुवातीला त्यांची मर्यादित आयात होत होती. आता स्थानिक शेतकरीही मागणीचा अंदाज घेऊन उत्पादन करू लागले आहेत. मात्र या बदलांची योग्य प्रकारे नोंद घेऊन मागणीतील वाढीचा वेग अथवा पुरवठ्यातील अडथळे याबाबत शेतकर्यांना सजग केले जात नाही. त्यामुळे अचानक कढीपत्त्यासाख्या एखाद्या शेतमालाचा दर वाढतो आणि सरकार तो केवळ कमी होण्याची वाट पाहते.
तंत्रज्ञानाची जोड आवश्यक…
लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनला मागे टाकले आहे. वाढती लोकसंख्या आणि संपन्नतेमुळे गहू-तांदळापेक्षा प्रथिने, जीवनसत्त्वे पुरवणार्या शेतमालाची मागणी वाढत जाणार आहे. त्यातही सध्या समाजमाध्यमातून येणार्या विविध लाटा, प्रभावक यांचा रेटा यामुळे अचानकच काही शेतमालाची मागणी वाढण्याचे प्रकार यापुढे सततच दिसणार आहेत. फळे आणि पालेभाज्यांची टिकवण क्षमता कमी असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात आयात करता येत नाही. वाढती मागणी स्थानिक बाजारात पुरवठा वाढवून पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आकडेवारीची गरज आहे. पूर्वी आकडेवारी गोळा करणे हे कष्टप्राय होते. आता उपग्रह चित्रणाच्या माध्यमातून पिकांची किती क्षेत्रावर लागवड होते हे सांगणे शक्य आहे. त्याबरोबर पिकांचे आरोग्य तपासण्यासाठी, त्यांच्या वाढीचा मागोवा घेणे, पिकांवरील कीड, रोग आणि पोषक तत्त्वांची कमतरता यांचे वेळेत निदान करणेही शक्य आहे. त्याआधारे संभाव्य उत्पादनाचा अंदाज घेता येईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आकडेवारीचे विश्लेषण करत वेळेवर उपयुक्त माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचवली तरच बाजारपेठेतील अनिश्चितता कमी होईल. ज्यामुळे अचानकच पिकांचे दर वाढणार नाहीत. त्यासाठी गौण पिकांतील दरवाढीला कढीपत्त्याहून अधिक महत्त्व द्यावे लागेल.
कढीपत्त्याचे वाढलेले दर कदाचित ग्राहकांना त्याची सवय लावून देतील आणि या ‘क्षुद्र’ मानल्या गेलेल्या पिकाला प्रतिष्ठा मिळेल. मात्र, या दरवाढीकडे केवळ एक टंचाई म्हणून न पाहता, बदलत्या अन्नसंस्कृतीचा एक संकेत म्हणून पाहिले पाहिजे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम बीज झाली. जगण्याचे तत्त्वज्ञान रोकड्या भाषेत सांगणारे तुकाराम महाराज कढीपत्त्यावर कदाचित म्हणाले असते.
तुच्छ म्हणुनी जे जगी टाकिले।
काळचि त्यांसी माथां चढविले॥ १॥
फुकटासी जे न कधी मानिले।
दाम देऊनी तेचि मागविले॥ २॥
सुवास अंतरी गुणांचा दडला।
अवघा संसार बाह्यासी फसला॥ ३॥
तुका म्हणे रे जाण अंतर्भाव।
जे तुच्छ आजि तेचि उद्या ठाव॥ ४॥
अनास्थेचे बळी ठरलेले पीक…
देशांतर्गत बाजारपेठेमध्ये या पिकाची आकडेवारी गोळा करण्याबाबत अनास्था कायमच दिसते. सरकारी ‘स्पायसेस बोर्ड’कडेदेखील या पिकाची अद्ययावत माहिती नोंदविली जात नाही. जगातले मोठे उत्पादक असून आपण जागतिक बाजारात या पिकाला फायदेशीर ठरवू शकत नाही, ते त्यामुळेच. कढीपत्त्याची पूड करून ती टिकवून त्याचे नवे आंतरराष्ट्रीय खरेदीदार करण्याइतपत संशोधन आणि विचार करण्याबाबत आपण
मागे राहतो.
पहिल्यांदाच दरवाढ…
कढीपत्त्याचे दर असे अचानक कसे वाढले, याला मागणी-पुरवठ्याचे पारंपरिक कारण दिले जात असले, तरीही अशी परिस्थिती यापूर्वी कधी का झाली नाही? अन् आत्ता होण्याचे तात्कालिक कारण काय, याचा विचारच केला जात नाहीये. परराज्यांतदेखील कढीपत्त्याचे दर पहिल्यांदाच तेजीत गेल्यामुळे व्यापारीदेखील अचंबित झाले. घाऊक बाजारामध्ये कढीपत्ता सुकू नये म्हणून पाणी मारून त्याला ताजे ठेवण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. कारण पाणी मारल्यानंतर कढीपत्त्याचे वजन किलोमागे शंभर-दोनशे ग्रॅम अधिक भरते. किरकोळ म्हणून ओळखला जाणारा कढीपत्ता गेल्या दोन आठवड्यांत राज्यातील मार्केट यार्डांत सर्वाधिक भाव खातोय.
कुठून होतो पुरवठा?
दक्षिणेतील राज्यांप्रमाणे इतरत्र व्यावसायिकरीत्या कढीपत्त्याची शेती केली जात नाही. कुंडीत-परसदारीही तो मुबलक होत असल्यामुळे त्याचा तुटवडा संकट बनून येत नाही. प्रत्येक शहराच्या नजीकच्या शेतीभागांमध्ये बाजारपेठेला पुरवण्याइतपत कढीपत्ता पूरक पीक म्हणून लागलेला दिसतो. पुणे जिल्ह्यातील दौंड, यवत, केडगाव आणि अहिल्यानगरमधील मांडवगड, फराटा येथून कढीपत्ता येतो. मुंबईतील बाजारपेठेत प्रामुख्याने नाशिक-खेड-मंचर आदी परिसरांतील पूरक शेतींमधून कढीपत्ता पाठविला जातो. नागपूरमध्येदेखील नजीकच्या परिसरातून पुरवठा होतो. गेल्या तीनेक आठवड्यांत या पुरवठादार पट्ट्यांमधील कढीपत्ता आक्रसला तेव्हा आंध्र प्रदेशातून कढीपत्ता आयात करण्यावाचून व्यापार्यांकडे पर्याय उरला नाही.
काही ज्ञानपत्ते…
शास्त्रीय नाव ‘मुर्रया कोईिनगी’ असलेला कढीपत्ता फोडणीतला महत्त्वाचा घटक असला, तरी औषधी म्हणून देखील मानला जातो. ‘गोडनिंब’ हीदेखील त्याची एक ओळख. मोठ्या आणि लहान पानांचा कढीपत्ता हे दोन प्रकार आढळतात. धारवाड कृषी महाविद्यालयाने कढीपत्त्याच्या तीन प्रकारच्या अधिक चवीच्या जाती विकसित केल्या. मोठ्या पानांना तुलनेेने सुगंध कमी येतो. बलवर्धक, कृमी आणि वायूनाशक हे कढीपत्त्याचे महत्त्वाचे गुण. यकृताची समस्या आणि मधुमेहींना तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी कढीपत्ता सेवन करण्यास सांगितले जाते.
भारताची निर्यात…
आपला देश हा कढीपत्ता निर्मिती आणि निर्यातीत प्रमुख देश आहे, हे कधीही कानावर आले होते का? मग कढीपत्त्याच्या आत्तापर्यंतच्या इथल्या मुबलकतेमुळे असलेली किरकोळता हे त्याचे कारण. निर्यातीमधील एकूण ८१ टक्के अमेरिकेला त्यानंतर मग आखाती देशांना भारतातून कढीपत्ता जातो. सिंगापूर हेदेखील आपल्या कढीपत्त्याचे प्रमुख खरेदीदार. या बाजारपेठेत असलेल्या भारतीयांनी त्याची मागणी स्वयंपाकउपयुक्त म्हणून कायम वाढती ठेवली. पण बहुतांश निर्यात तमिळनाडू (चेन्नई-कोईम्बतूर) आणि दिल्लीमधून विमानमार्गे होते.
