शाळेतून आल्यावर समीरने दप्तर भिरकावून दिलं. त्याचा पट्टा तुटला होता. बटणं निघाली होती. त्यामुळं डबा आणि पाण्याची बाटली तर बाहेरच पडली. त्यातला उरलेला खाऊ आणि पाणी फरशीवर सांडलं. कंपासपेटी बाहेर पडली आणि त्यातल्या सगळ्या वस्तू बाहेर पसरल्या. आतली वह्या-पुस्तकं चुरगळली होती. हे सगळं पाहून आजीला राग आला. पण समीरला रागावून काही समजलं नसतं म्हणून आजीनं रात्री गोष्ट सांगूनच त्याला समजावायचं ठरवलं. रोज रात्री एक गोष्ट सांगायचा आजीचा नेम होताच ‘‘आजी, गोष्ट…’’ अंथरुणावर पडताच समीरनं घोषा लावला. आजी म्हणाली, ‘‘चल, आज तुला दप्तराचीच गोष्ट सांगते, ऐक…’’
‘‘नील एक अभ्यासू आणि हुशार मुलगा होता. अभ्यासात, खेळात, सगळ्यात अगदी पुढे, अक्षर सुंदर, चित्रकला छान अगदी आदर्श विद्यार्थीच होता म्हणा ना! शिक्षकांचाही तो फार लाडका होता. आज सहामाही परीक्षेचा निकाल होता. नीलला भरपूर मार्क्स मिळाले होते. आनंदानं नाचतच तो घरी आला. आईनं केलेली मस्त पावभाजी खाऊन, भरपूर खेळून दमूनच तो झोपी गेला. झोपेत त्याला मध्येच कोणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. त्यानं लक्षपूर्वक ऐकलं तर कोणीतरी हुंदके देत होतं. त्यानं झोपेतच विचारलं, ‘‘कोण रडतंय? काय झालंय?’’
उत्तर आलं, ‘‘नील, मी तुझं शाळेचं दप्तर आहे !’’
‘‘अरे, पण तुला रडायला काय झालं?’’ नीलनं विचारलं.
दप्तर रडत रडत म्हणालं, ‘‘अरे, तू स्वत: इस्त्रीचे कपडे, पॉलिश केलेले शूज घालतोस, छान भांग पडतोस, पावडर लावतोस; पण मला मात्र असं गबाळ्यासारखं ठेवतोस. मी किती मळलो आहे ते पाहिलं तरी आहेस का? आणि माझ्यात इतके कप्पे असताना तू सगळं एकाच कप्प्यात का कोंबतोस? काल तर तू कंपासपेटी उघडीच ठेवलीस, मग कर्कटचं आणि कंपासचं टोक घुसलं माझ्या पोटात. आई गं… अजून दुखतंय पोट माझं. बॉलपेन लीक झाल्यानं माझ्या अंगावर सगळे शाईचे डाग पडले आहेत. टिफीन सांडल्यानं माझ्या अंगाला सगळा वास येतो आहे. इतकं कुबट वाटतंय मला. शी! वॉटर बॉटल उघडी झाल्यानं माझं अंग ओलं झालं आहे. खूप थंडी वाजते आहे रे मला! आतली पुस्तकं दुमडल्यामुळे चुरगळली आहेत. वह्यांची आणि पुस्तकांची कव्हर निसटली आहेत. हातात सापडेल ते कोंबले आहेस. आत खडे भरले आहेस ते मला टोचताहेत; पण हे सगळं पाहत असून तुला त्याचं काहीच वाटत नाही. शाळेतून येताना तू मित्राबरोबर खेळतोस तेव्हा मला तसंच लोंबकळत ठेवतोस. कधी माझ्या पट्ट्याला पीळ देतोस. माझ्या गळ्याला फास बसतो रे! आई -आजी तुला सारखं सांगतात की, दप्तर नीट भर, नीट ठेव. वेळच्या वेळी धुवायला दे; पण तू लक्षच देत नाहीस. शाळेतून आलास की देतोस भिरकावून मला पलंगावर आणि जातोस खेळायला. आज तर तू मला पलंगाखालीच ढकललंस. सगळीकडे धूळ लागली माझ्या अंगाला. अंगही दुखत आहे. मग मी रडू नको तर काय करू? तुला असं कोणी वागवलं तर चालेल? मी नसलो तर शाळेचं सगळं साहित्य कसं घेऊन जाशील तू? पाऊस आला तर कसं वाचवशील पुस्तकं – वह्यांना? मी आहे म्हणून सुरक्षित आणि नीट राहतं तुझं शाळेचं सामान; पण तुला माझी पर्वाच नाही.’’ आशू खडबडून जागा झाला. सगळं स्वप्न होतं तर… पण त्याला जाणवलं, खरंच दप्तराची तक्रार काही चुकीची नव्हती, चूक आपलीच होती. त्यानं पलंगाखालचं दप्तर उचललं. खरंच ते फार मळलं होतं व त्यात टिफीनमधले पदार्थ सांडल्यामुळे घाणेरडा वास येत होता. पाणी सांडल्यामुळे ते ओलंही झालं होतं. आज सुटीचा दिवस असल्यानं त्यानं ते साबण लावून स्वच्छ धुतलं, वाळवलं. वह्या पुस्तकांची कव्हर नीट चिकटवली. कंपासपेटी नीटनेटकी लावली व व्यवस्थित बंद केली. बॉलपेन पुसून त्याला टोपण लावलं. आता दप्तर एकदम मस्त दिसू लागलं. दुसर्या दिवशी शाळेत जाताना नील स्वत: नीट तयार झाला.’’ आजीची गोष्ट संपली. पण आजीला नीलच्या गोष्टीतून काय सांगयचं आहे ते समीरच्या लक्षात आलं. सकाळी त्याला दप्तर नीट करताना पाहून आजी हळूच हसली. तिने ज्यासाठी ही गोष्ट सांगितली तो हेतू साध्य झाला होता. दप्तराचं दु:ख कळल्यामुळे आता समीर ते अगदी नीटनेटके ठेवतो. स्वत:इतकीच त्याचीही काळजी घेतो.
udrcsk1950@gmail.com
