स्मरणरंजनात्मक आठवणींचा कोलाज

माडगूळकर कुटुंब कोल्हापूरहून पुण्याला स्थायिक झालं. तिथून पुस्तकाची सुरुवात होते

(संग्रहित छायाचित्र)

जुई कुलकर्णी

आपल्या घरातील, नात्यातील, ओळखीतील, एखाद्या जुन्या काका, मामाकडून आपण स्मरणरंजनाचे किस्से ऐकतो तेव्हा आपल्याला कसं वाटतं, तेच ‘दरवळतो पूरिया’ हे पुस्तक वाचून वाटतं. फक्त इथं हे किस्से आहेत महाराष्ट्राने ज्यांच्यावर भरपूर प्रेम केलं अशा गदिमांच्या परिवाराचे. शरतकुमार माडगूळकर हे गदिमांचे पुत्र. त्यांनी त्यांची आई विद्या माडगूळकर यांचे शब्दचित्र या निमित्ताने रेखाटले आहे.

माडगूळकर कुटुंब कोल्हापूरहून पुण्याला स्थायिक झालं. तिथून पुस्तकाची सुरुवात होते. नंतर कोल्हापूरमधल्या आजोळच्या आठवणी येतात. मग पुस्तकातून अनेक व्यक्ती आणि किस्से येत राहतात. अर्थात आईवर असलेला लिखाणाचा फोकस ढळत नाही. पुस्तकाची भाषा साधी सोपी, वर्णनात्मक आणि प्रासादिक शैलीतील आहे. पुस्तक वाचणे सहज शक्य होते.

या पुस्तकाच्या निवेदन शैलीला असलेल्या घरगुती स्वरूपामुळे पुस्तकात निश्चित घटनानुक्रम नाही. कुठलीही घटना कुठेही येते. अर्थात शेवट विद्याबाईंच्या काहीशा एकाकी वृद्धत्व आणि मृत्यूने होतो. कारण गदिमांच्या मृत्यूनंतर सोळा वर्ष विद्याताई होत्या. संपूर्ण आयुष्य त्यांनी ज्या नवऱ्याच्या सेवेत झिजत घालवले, तो नवरा वृद्धत्वात मात्र साथ सोडून लवकर गेला.

गदिमा म्हणजेच गजानन दिगंबर माडगूळकर- ज्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. ते अष्टपलू कलाकार होते. कवी, लेखक, चित्रपट लेखक, चित्रपट दिग्दर्शक, गीतकार, चित्रपट- निर्माते अशा अनेक क्षेत्रांत गदिमा वावरले. शून्यातून सुरुवात करून अफाट यश, प्रतिष्ठा आणि संपत्ती त्यांनी मिळवली. गीतरामायण लिहून अनेक पिढय़ांवर गारुड केलं. त्यांच्या या सगळ्या कर्तृत्वामागे विद्याबाई खंबीरपणे उभ्या होत्या. या स्त्रीने त्यांना अक्षरश: सांभाळलं असं म्हणता येईल. संसार प्रत्येक स्त्री करते, पण कलाकाराचा संसार करणारी स्त्री अंमळ अधिक कणखर असावी लागते. गदिमांनी अनेक हिट चित्रपट दिले, अनेक अजरामर गाणी लिहिली, अनेक पुरस्कार मिळवले, अनेक सन्मानाच्या पदांवर काम केले. भरपूर पसा, ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा मिळवली. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात गदिमा हे एक सोनेरी पान आहे. या सगळ्या झगमगाटी कर्तृत्वामागे घरात शांतपणे तेवत राहून ताकद देणाऱ्या समईसारख्या असणाऱ्या विद्याबाई होत्या. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं म्हणतात. कित्येक वर्षांच्या पुरुषप्रधान व्यवस्थेत अशा म्हणी तयार होतातच. बरेचदा त्या म्हणी कटू सत्य सांगतात, पण ही व्यवस्था निमूटपणे अंगीकारून बायकांच्या अनेक पिढय़ा राबत राहिल्या. विद्या माडगूळकर अशाच पिढीच्या प्रतिनिधी. माहेरून कोकणस्थ असलेल्या विद्या पाटणकर यांचं या दुष्काळी माणदेशातून आलेल्या देशस्थ ब्राह्मण असलेल्या गजानन माडगूळकरांशी लग्न झालं. १९४२ साली झालेला हा प्रेमविवाहही त्या काळाच्या मानाने बंडखोरीच होती. विद्याबाईंकडे सुरेल गाता गळा होता, पण भविष्यात त्याचं काही झालं नाही. त्या काळात बहुतेक पुरुष असायचे तसेच गदिमा वर्चस्ववादी पती होते. विद्याबाईंकडे गृहकृत्यात समरसून डुबून जाण्याचा स्वभाव होता. घर सजवायची त्यांना विशेष आवड होती. त्यांचा स्वभाव जरा भिडस्त होता आणि नातेवाईकांना, स्नेह्यंना सांभाळायची आवड होती. त्या काळानुसार त्यांच्याकडे शिक्षण फारसे नसले तरी व्यवहारचातुर्य होते. आणि संसाराला लागते ती माणसं जोडण्याची हातोटी होती. विद्याबाईंनी पुण्यातल्या ‘पंचवटी’ बंगल्यात जणू राज्य केलं. बंगला आणि बाग सजवली. हाताखाली भरपूर नोकर-चाकर नांदवले. यासाठी आवश्यक असतो तो सढळ हस्ते खर्च केला. या खर्चाच्या सवयीविषयी नवऱ्याची बोलणी खाल्ली. गदिमांना निसर्गाविरुद्ध जाणे अमान्य असल्याने सात अपत्यांचा जन्म झाला. नशीबही असं की, सहा अपत्यांनंतर ऑपरेशन करून घेतले, तेही अपयशी ठरले आणि सातवे अपत्य जगात आले. इतका सारा पोरवडा सांभाळून संसार करणं सोपी गोष्ट नव्हती. त्यातून नवरा बेभरवशी कामाच्या क्षेत्रात आणि बहुतांश वेळा गावाबाहेर, घराबाहेर असे. सेलिब्रिटी नावाची संकल्पना त्या काळातही होती आणि हे गदिमांचे घर तर सतत सेलिब्रिटींनी भरलेलं होतं. या सगळ्या मोठय़ा व्यक्तींची उठबस, आदरातिथ्य विद्याबाईंनी मोठय़ा प्रेमाने केलं. त्या काळाच्या मानाने विद्याबाईंनी केलेले मुलांचे लाड विशेषत्वाने दिसतात. अगदी स्वत: कट्टर शाकाहारी असताना त्या काळात मुलांना हवं म्हणून स्वत: मटण शिजवणं अशा चौकटी देखील त्यांनी मोडल्या.

या पुस्तकाची निर्मिती हंस प्रकाशनाने केली आहे आणि ती उत्तम आहे. आतमध्ये असेलेले गदिमा परिवाराचे जुने ब्लॅक अँड व्हाइट फोटो पुस्तक मांडणीत शोभून दिसतात. या पुस्तकात पन्नास ते सत्तरच्या दशकातील कोल्हापूर आणि पुणं देखील दिसतं. त्या काळातलं समाजजीवन वाचकासमोर उभं राहतं.

‘दरवळतो पूरिया’ या पुस्तकाकडे  एकप्रकारे चाळीस ते साठ या दशकांमधील महाराष्ट्रातील स्त्रीचे प्रातिनिधिक चित्र म्हणूनदेखील बघता येईल. या पुस्तकात त्या काळातल्या स्त्रीजीवनाचं चित्र रेखाटलेले आहे. त्या काळात स्त्रियांमध्ये असलेला शरणभाव, नंतर स्त्रिया शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहू लागल्या तसं अवघ्या दोन-तीनच पिढय़ांमध्ये गायब झाला आहे, हे आता दिसतंच आणि हे अतिशय चांगलं आहे. तो काळ स्मरणरंजकता म्हणून कितीही कुरवाळत राहिलं, तरी स्त्रियांच्या दृष्टीने केवळ भयंकर होता आणि तो तसला काळ संपल्याबद्दल फार बरं वाटतं.

‘दरवळतो पूरिया’,

शरतकुमार माडगूळकर,

हंस प्रकाशन,

पृष्ठे – १८४,  किंमत – २५० रुपये .

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Daravalato puriya sharatkumar madgulkar book review abn

Next Story
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : मातीचे डाग पायावर घेऊन वावरणारा साहित्यिक
ताज्या बातम्या