डॉ. सूरज मिलिंद एंगडे
भारतातल्या दलित समाजाला जेव्हा-जेव्हा सामूहिकरीत्या दडपलं गेलं, शैक्षणिकरीत्या मागे टाकलं गेलं, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून उग्र प्रतिकार झालेला आपल्याला दिसतो. अशीच एक विचारांची चळवळ जगाच्या साहित्याच्या इतिहासात नोंदली गेलेली आहे. त्या चळवळीचे नाव आहे- ‘दलित साहित्य’. या चळवळीचे अनेक नायक आणि प्रवर्तक आहेत. त्या नायकांच्या मांदियाळीतील एक अतिमहत्त्वाचे नाव म्हणजे कवी, लेखक दया पवार. दया पवार हे मला दलित साहित्याच्या स्मृतीतले एक रहस्य म्हणून सामोरे येतात. रहस्यमयी ही त्यांची ख्याती त्यांच्या आत्मकथनातून घडते, असे मला वाटते.

‘बलुतं’ची आख्यायिका

आपल्यावर गुदरलेली परिस्थिती त्यांनी जेव्हा शब्दांकित केली तेव्हा ती जातिभेदाला आतून सुरुंग लावणारी ठरली, पण दलित साहित्याची ओळखदेखील ठरली. तत्पूर्वी अधोरेखित होणारे दलित जीवन हे दैन्याचे आणि ‘अन्यां’च्या दयाळूपणासाठी उपलब्ध असायचे. साहित्यिक व सर्जनशील लेखनात दलितांचे उद्गार हे एका साच्यातले समजले जायचे. अमुक अमुक ग्रामीण भागातले मागासलेले किंवा अमुक तमुक झोपडीतील वावरणारे, समस्या असणारे अशी त्यांची साधारण ओळख असायची. तिथल्या मानवतेला एक सजगता, संवेदनशीलता आणि वैचारिकता ‘बलुतं’ने मिळवून दिली.

‘बलुतं’ ही संज्ञा नवीन आशय देणारी ठरली. त्यातून फक्त दलितच नव्हे तर जे जे व्यवस्थेने बांधले गेलेले आहेत अशा सार्‍यांनाच ‘बलुतं’मध्ये सन्मानाचं स्थान मिळालं व एका अर्थाने तिथे एक ‘सेक्युलर जुगलबंदी’ सुरू झाली.

‘बलुतं’ हे एक ‘आख्यायिका’ म्हणून दलित जगतात वावरते. त्या आख्यायिकेच्या आधारे कमी-अधिक प्रमाणात सर्वांनी दया पवारांच्या जीवनात शिरकाव केला व त्यांना ते उमजले. याबरोबरच स्वत:ची सावलीदेखील त्यांना त्यांच्यात दिसली. दयाने दलितांची ओळख ही स्मृती व लेखन यांची सांगड घालून तयार केली. बालपण, घरची परिस्थिती, सामाजिक अवस्था व शहरी झोपडपट्टीतले जीवन यांंचा एक बोलका प्रयोग त्यांनी सादर केला.

दया पवारांच्या जीवनात आपल्याला पूर्वाश्रमीच्या महार जातीचा इतिहास, त्यांच्या पूर्वजांची अवस्था, सामाजिक पार्श्वभूमी याची ओळख एका सामान्य नायकाच्या जीवनातून कळते. मी मूळ मराठीतील ‘बलुतं’ वाचले नव्हते. त्याचे भाषांतर जेरी पिंटो यांनी इंग्रजीत केले, ते मी आवर्जून मागवून घेतले व स्वत:शी जोडून घेतले. एका अर्थाने मी स्वत: त्यात प्रवेशकर्ता झालो.

एखाद्या ‘लढवय्या’च्या रूपात स्वत:ला ढाळून दया पवारांनी त्यांच्या जीवनातील अनेक घटिते सर्वांपुढे अत्यंत पारदर्शकपणे जगासमोर खुली केली. याचा अर्थ त्यांनी स्वत:च्या नाजूक आठवणी कष्टपूर्वक समाजाच्या भल्यासाठी मांडल्या. हे त्यांनी अशा काळात केले, जेव्हा एरवी भारत स्वतंत्र झालेला असूनही दलित जीवन मात्र दुर्लक्षिततेच्या आणि वंचनेच्या पातळीवर होते. त्या काळात सांविधानिक अधिकारांची दुहाई देत ज्या दलितांनी हक्काची मागणी केली, त्यांना अमानुष अत्याचारांचा सामना करावा लागला होता. जेव्हा तुमच्या जीवनाचे हसे केले जाते आणि तुमच्या अस्तित्वावर एक सततची नकारात्मकता लादली जाते, एक न्यूनगंड पेरला जातो; तेव्हा स्वत:चे चरित्र एक ‘प्रयोग’ म्हणून मांडणे ही एक अत्यंत धाडसाची कृती ठरते. दया पवारांची व्यक्तिरेखा त्यांच्या लेखकीय कुशलतेचा पुरावा देते. आपले लोक वडासारखे पसरत जातात आणि कुणी त्यांना रोखू पाहिले तर ते आपल्या बुनियादी अस्तित्वाचे मार्ग शोधून काढतात, अधिक बळ प्राप्त करतात आणि सर्वांना आपल्या सावलीत घेतात, हा वस्तुपाठ ‘बलुतं’ने घालून दिला.

दया पवारांची कविता

दयांच्या कविता या एकदाच वाचून भागत नाहीत. त्या पुन:पुन्हा वाचाव्या लागतात. निदान तीन वेळा सलग वाचून आविष्कार करावा लागतो. त्या भेदक आणि टोकदार आहेत. पण त्या एका कवितिक प्रोटोकॉलमध्ये लिहिलेल्या आहेत. कवितालेखनाची एक पद्धत असते आणि ती ओलांडून म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन त्या अर्थाचा अनुभव घ्यावा लागतो. जर तुम्ही ते अनुभव स्वत:चे म्हणून स्वीकारले तर ते आपलेसे वाटू लागतात. कोणी तरी मला आंतरिक दृष्टीची एक झुळूक मिळवून दिली आहे, असे वाटून आपल्या चेहर्‍यावर स्मित फुलायला लागते.

दयांच्या कविता सूचक व अलंकारित शब्दांनी सजलेली वाक्ये त्याच्या भाषा सामथ्र्याची जाण देतात. ते एखादा प्रसंग प्रस्तुत करताना प्रत्येक मीटरात आपले प्रश्न वाक्यरचनेच्या नियमात बसवतात. म्हणजे विचारलेले प्रश्न हे संयमी कृत्य आहे हे वाचकाला जाणवते. ‘रक्तात पेरून गेलेला…’ ही कविता सळसळत्या रक्तात ‘प्रकाशाची रेघ’ दाखवते. इथे कवी व्यवस्थेने लादून दिलेल्या परिस्थितीत शिथिल होत नसून विद्रोहाची किंकाळी फोडतो. म्हणून ‘‘तोंडात कचकचीत शिवी यावी हा काही गुन्हा नाही’’, असे त्याच्या वाचकांना परखडपणे सांगू शकतो.

रामायणाचा लेखक वाल्मीकी- ज्याला दलितांचा पूर्वज म्हणून दाखविले जाते, त्याच्याच समोर दया पवार आपल्या वेदना प्रश्नांच्या रूपात मांडतात. वाल्मीकीच्या ‘महाकवी’ या उपाधीला स्वीकारून त्याच्या अवस्थेची पार्श्वभूमी स्वत:च्या वाळून टाकलेल्या बहिष्कृत महारवाड्यात मांडतो. एक कवी दुसर्‍या कवीला मैफिलीतल्या जुगलबंदीप्रमाणे सामोरा जातो. दया म्हणतात की, रामराज्याची तारीफ करणारा, शंबुकाची हत्या बिनविरोध पुरस्कृत करणारा वाल्मीकी आमच्या हृदयात कसा राहू शकतो? हा प्रश्न घेऊन सांस्कृतिक युद्धाच्या महामार्गावर लाल कंदील घेऊन दया बिनधास्तपणे उभे ठाकतात. आमच्या हिताच्या बाजूने, अन्यायाच्या विरोधात किंवा त्याच्याबद्दल एक जरी शब्द वाल्मीकीने कवितेत मांडला असता तर रामायणाचा इतिहास हा खराखुरा प्रत्येक युगात बंडाच्या स्वरूपात इथल्या शूद्रातिशूद्रांनी आपला म्हणून मांडला असता. आम्ही इथे अत्याचार व भेदाभेदाला उतरूच दिलं नसतं आणि रामराज्यात महिलेवर, दलितांवर हिंसा झाल्या नसत्या.

दया पवारांचा वारसा

दया पवार हे माझे पूर्वज आहेत. त्यांच्या गटातील अनेक लेखक, कवी, साहित्यिक यांच्या मजबूत खांद्यावर बसून त्यांच्या विचारगांभीर्याचा वारसा पुढे नेण्याचा मी प्रयत्न करतो. त्यांनी ज्या भूतलावर आपले वैचारिक पाऊल यशस्वीपणे ठेवले त्याच्यामुळे कमी-अधिक प्रमाणात माझ्यासारख्याला एक श्रोतावर्ग लाभला. दया पवारांच्या पिढीने अत्यंत आपलेपणाने आणि जाणीवपूर्वक पुढच्या पिढीकरिता एक बळकट पाया तयार करून दिला.

दयांचे खासगी विश्व आणि सामाजिक दृष्टी ही एकाच दोर्‍याची बांधलेली गाठ आहे. त्यांच्या लिखाणातून त्यांनी स्वत:बद्दल लिहीत असताना समाजाचासुद्धा एक दुर्लक्षित केलेला इतिहास सहजपणे व हृदयाला भिडेल असा मांडला. त्यासाठी त्यांना अलंकारिक भाषेची गरज वाटली नाही. आपल्याला, विशेषत: या पिढीला आणि त्याच्या पुढच्या पिढीला सत्य इतिहास मांडण्याचा आत्मविश्वास मिळवून देणारे हे लेखन आहे.