राजधानी दिल्लीचं नाव घेतलं की बहुतांशवेळी नकारात्मक बाबी डोळ्यासमोर येतात. तिथे जाऊन राहायचं असा विचारही कोणी करत नाही. अगदीच नाईलाज झाला तर कधी एकदा महाराष्ट्रात परत जायला मिळेल असा मराठी माणसाचा सर्वसाधारणपणे होरा असतो. त्यात काही लोक दिल्लीला येतात, तिथे स्थिरावतात, आणि मग तिथलेच होऊन जातात. केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या सुप्रिया देवस्थळी या अधिकारी अशाच अपवादात्मक लोकांपैकी एक आहेत. गेल्या आठ वर्षांच्या इथल्या वास्तव्यावर त्यांनी थेट पुस्तकच लिहिलं आहे. यावरून त्यांना दिल्ली किती आवडलं असावं याचा अंदाज येऊ शकतो.

‘दिल्ली डायरी’ नावाप्रमाणेच दिल्लीतल्या अनुभवांची गाथा आहे. अगदी दिल्लीची माहितीपुस्तिका नसली तरी हे पुस्तक वाचलं तरी दिल्लीविषयीची महत्त्वाची माहिती मिळते. एखादा सरकारी अधिकारी दिल्लीत येतो म्हणजे त्याच्यासाठी अगदी पायघड्या असतील, छान टुमदार बंगला मिळेल, हाक मारली की तीन-चार नोकर हाताशी असतील अशी एक सर्वसाधारण कल्पना असते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात या गृहीतकाला तडा बसतो. दिल्लीत मोठ्या संख्येने सरकारी अधिकारी असल्यामुळे सगळ्यांनाच अशी राजेशाही वागणूक मिळत नाही. २४ वर्षांच्या सेवेनंतरही घर शोधण्यासाठी लेखिकेची जी दमछाक झाली ते पाहून दिल्लीचा चेहरा आपल्यासमोर येण्यास सुरुवात होते. या घरशोध मोहिमेत लेखिका वाचकांनाही सहभागी करून घेतात.

‘घर से निकलते ही’ या प्रकरणात दिल्ली दिसण्यास सुरुवात होते. भाजी बाजार, किराणा माल, विविध वस्तुंच्या नावाची ओळख करून घेताना कशी तारांबळ उडाली याचं रसभरीत वर्णन लेखिकेनं केलं आहे. महाराष्ट्रातली ‘मंडई’ ते दिल्लीतली ‘सब्जी मंडी’ हा फरक या प्रकरणात तातडीने वाचकांच्या लक्षात येईल.

दिल्लीतले रस्ते मोठे आणि आकर्षक आहेत. लेखिकेच्या साथीने या रस्त्यांची सफर रोचक झाली आहे. दिल्लीच्या रस्त्यांना दिलेल्या नावांमध्ये तो इतिहास झळकतो. मधू दंडवते मार्ग, शिवाजी स्टेडिअम, तिलक ब्रिज अशी मराठी नावंही इथल्या रस्त्यांना आहेत. रस्त्यांच्या बरोबरीने मोठमोठाले बागबगीचे तिथली गंमतजंमत. तिथे होणारे अनेक कार्यक्रम, याबद्दलही पुस्तकात भाष्य आहे.

‘सूरज को दिल्ली से इश्क है’ या प्रकरणात दिल्लीच्या तीव्र वातावरणाचा आढावा घेण्यात आला आहे. तीव्र उन्हाळा आणि तितकाच तीव्र हिवाळा ही दिल्लीच्या वातावरणाची वैशिष्ट्ये आहेत. वातावरणात आणि त्यानुसार दिल्लीकरांच्या जगण्यातले बदल लेखिकेने सूक्ष्मपणे टिपले आहेत. ‘खाता रहे मेरा दिल’ या प्रकरणात दिल्लीच्या खाण्याबद्दलचा ऊहापोह केला आहे. सध्या रिल्सच्या माध्यमातून शहरातली खाद्यसंस्कृती समजून घेण्याकडे कल असतो. मात्र दिल्लीतल्या खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा तपशील लेखिकेने पुरवला आहे. फक्त पदार्थच नव्हे तर विविध हॉटेल्स, त्यांचा इतिहास याबद्दलही माहिती या पुस्तकात आहे. दिल्ली शहराचा आवाका पाहता सगळ्याच ठिकाणांचा उल्लेख शक्य नसला तरी महत्त्वाची ठिकाणं लेखिकेने टिपली आहेत. राजकीय आणि सामाजिक पातळीवरच्या सर्व महत्त्वाच्या व्यक्ती इथे राहतात. त्याचबरोबर देशातील उच्चाधिकारी घडवण्यात दिल्लीचा मोठा वाटा आहे. स्पर्धा परीक्षांचं माहेरघर असलेल्या दिल्लीत याबद्दल माहिती आली नाही तरच नवल. त्यात लेखिका स्वत: अधिकारी असल्यामुळे तसंच भविष्यातील अधिकारी घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असल्यामुळे हे प्रकरण अतिशय उत्तम झालं आहे. या प्रकरणात लेखिकेने सर्वाधिक जीव ओतला आहे. त्यात त्यांना स्वत:चा प्रवास दिसला नाही तरच नवल. स्पर्धा परीक्षेच्या मांडवातून गेलेल्या प्रत्येकाला तो विशेष आवडेल यात शंका नाही.

माहिती आणि चिंतन असा दोन्हींचा मिलाफ ‘दिल्ली डायरी’ या पुस्तकात पाहायला मिळतो. दिल्ली हे बहुसांस्कृतिक शहर असलं तरी मराठी माणसाचं वर्चस्व अजूनही दिल्लीत हवं तितकं प्रस्थापित झालेलं नाही. मोजके तीनचार नेते सोडल्यास मराठी माणसाला दिल्ली म्हणावा तसा फारसा आधार नाही. सामान्य मराठीजनसुद्धा इथे यायला पाहत नाहीत. या सर्व मुद्दयांवर लेखिकेने भाष्य केलं आहे. मात्र ते आणखी सविस्तर यायला हवं होतं असं वाटलं.

सरकारी अधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव हाही या पुस्तकातला महत्त्वाचा भाग आहे. दिल्लीतले सरकारी अधिकारी म्हणजे फक्त नेत्यांच्या मागे मागे फाइली घेऊन जाणारे नसतात ही बाब हे पुस्तक वाचल्यावर सिद्ध होते. सरकारी अधिकार्‍यांच्या सवयीवर प्रसंगानुरूप मार्मिक टिप्पणी लेखिकेने केली आहे. दिल्ली म्हटलं की प्रदूषण हेही आता दुर्दैवी समीकरण झालं आहे. त्याबद्दलही भाष्य आहेच.

याशिवाय दिल्लीतील विविध सांस्कृतिक, वार्षिक कार्यक्रम, तिथले अनुभव, सणसमारंभ, मराठी सण, दिवाळी पहाट याबद्दलही लेखिकेचे अनुभव वाचायला मिळतात. दिल्लीची जीवनवाहिनी असलेल्या दिल्ली मेट्रोचे अनुभव फारसे वाचनास येत नाहीत. तेही यायला हवे होते असं वाटतं.

दिल्लीकडे पाहण्याचा मराठी माणसाचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रात बसून हा दृष्टिकोन बदलण्यासाठी हे पुस्तक नक्कीच कामी येईल यात शंका नाही.

‘दिल्ली डायरी’

 सुप्रिया देवस्थळी, ग्रंथाली,

पाने-१८५, किंमत- २७० रुपये.

rohannamjoshi86@gmail.com