वस्त्रोद्योग

‘ट्वेंटी फोर्टीमध्ये मोदी पंतप्रधान झाले! आणि आता ते सतत कपडे बदलत आहेत.’

आज कालचाच सदरा घालणार होतो.

दुपारी उठून सकाळचे सर्व विधी साग्रसंगीत पार पाडले. उदरभरण नोहे, परंतु यज्ञकर्म जाणून चहा-चपातीची भरपेट न्याहारी घेतली. दारामागे टांगलेली पाटलूण चढवली. आमच्या पाटलुणीस नको तेव्हा घरंगळण्याची सवय. तेव्हा पट्टय़ाने ती जागीच आवळली. गोद्रेजच्या कपाटातून इस्त्रीचा सदरा काढला. वस्तुत: आज त्याचा दिवस नव्हता.

आज कालचाच सदरा घालणार होतो. परंतु आम्ही जातिवंत पत्रकार. त्यामुळे आमची घ्राणेंद्रिये जास्तीच तिखट. त्यांस जाणवले की आज या सदऱ्यावर अख्खा ट्रिपल एक्स फवारला तरी समुद्रकाठच्या अल्पवस्त्रांकित क्यालेंडरबालांचा जमाव सोडा, साधी गृहमक्षिकाही बसणार नाही. उलट प्रदूषण नियंत्रण मंडळवाले दंड ठोठावण्याची शक्यता जास्त! तेव्हा ताजेताजे खमिस अंगी चढवले व निहित कर्तव्याकरिता बाहेर पडलो, तेव्हा आमच्या ओठांवर एकच भावगीत होते, निर्मा.. वॉिशग पावडर निर्मा..!! आणि मनात एकच सवाल होता-आम्ही सर्वसाधारणपणे सरासरी दोन दिवसांतून एकदा आमचा कपडेपट बदलतो. मग मत्प्रिय साहेबांवर (पक्षी : नरेंद्रभाई मोदी, एनआरआय पंतप्रधान, भारत) अशी काय बरे राष्ट्रीय आपत्ती येत असावी, की त्यांना दिवसातून सोळा वेळा कपडे बदलावे लागतात?

शंकानिरसनार्थ थेट त्यांनाच भेटावे असे एकदा आमच्या मनी आले. परंतु मग म्हटले, नको. आताच कुठे ते कुठे तरी जाऊन कुठे तरी जाण्याच्या तयारीत असतील! तशात हल्ली त्यांची एक-दोन वाक्यांत बोलण्याची सवयही सुटली आहे. परवा अमितभाई सांगत होते, की साधा ढोकला मागवायचा असला तरी पंधरा मिन्टे भाषण देतात ढोकल्यावर!

आता सर्व समस्यांची रामबाण उत्तरे ज्यांच्याकडे तेच असे बाद झाल्यावर उभ्या िहदुस्थानात मनीचा प्रश्न विचारावा अशी दोनच स्थळे उरतात. एक म्हणजे बाबा बंगाली. किंतु ही समस्या मूठकरनी, जादूटोणा, वशीकरण, लवमरेज, सौतन, नौकरी, किसी ने कुछ खाया पिलाया हो वगरे प्रांतातील नव्हती. तेव्हा राहिला दुसरा पर्याय. तो म्हणजे आमचे बोरुबंधू. सगळेच जाणतात की आमचे पत्रकारूनारू म्हणजे अवघ्या दुनियेचे नवनीत गाइड! त्यांच्याकडे उत्तर नसते ते एकाच प्रश्नाचे, की यंदा आपले प्रिय मालक आपणास किती पर्सेट बोनस देणार? बाकी मग काहीही विचारा ना गडय़ांनो! किसी भी समस्या का समाधान हंड्रेड पर्सेट गॅरंटी के साथ!

पहिले नमन हे अर्थातच रा. रा. राजदीप सर्देसायांस करणे आम्हास भाग होते. कां की, आमुच्या लहानपणी तेच तर आमचे आदर्श होते. बालपणी आम्हीही असे आरशासमोर उभे राहायचो, शर्टाच्या बाह्या मुडपायचो, कपाळीचे केस विस्कटायचो आणि गोल कंगव्याचा बूम करून म्हणायचो, क्यामेरापर्सन अमुककुमार के साथ धिस इज अप्पादीप बळवंत. एनडीटीव्ही. शनवारपेठ, पुणे! असो. बालपणी सगळेच गर्दभ राशीचे असतात!!

रा. रा. राजदीप यांस गाठले तेव्हा ते निवांतपणे आपलेच पुस्तक वाचत बसले होते! आम्ही त्यांना थेटच सवाल केला, की मोदीजींना दिवसातून १६ वेळा कपडे का बदलावे लागतात?

त्याबरोबर राजदीप यांनी शर्टाच्या बाह्या मुडपल्या. स्वत:चे केस विस्कटले. म्हणाले, ‘सी, आपल्याला याचेकडे जरा वेगळ्या अँगलने पाहावे लागेल. इन टू थावजंड टू गुजरातमध्ये रायट झाले. आता मोदी हे १६-१६ वेळा कपडे बदलून संघापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.’

‘ते कसे काय?’

‘सी, इन टू थावजंड टू गुजरातमध्ये रायट झाले.’

‘बरोबर!’

‘ट्वेंटी फोर्टीमध्ये मोदी पंतप्रधान झाले! आणि आता ते सतत कपडे बदलत आहेत.’

‘हो!’

‘दॅट शोज की यात काही तरी गडबड आहे. याची सीबीआय चौकशी झाली तर सगळे सत्य बाहेर येईल! कारण इन टू थावजंड टू गुजरातमध्ये..’

राजदीप यांच्याकडून बाहेर पडलो तेव्हा आम्हाला आमचा मूळचा प्रश्न कोणता हेच क्षणभर आठवेना! डोक्याचा अगदी गोध्रा झाला होता. पण हा आजचा सवाल कोणाला तरी विचारणे भागच होते. आमचे सदासंतप्त अँकरू अर्णबराव गोस्वामी यांच्याशिवाय याचे उत्तर कोण देऊ शकणार? पण त्यांना सवाल कसा विचारणार?

एकच क्षण! बोलबोलबोलत असताना ते निमिषमात्रच श्वास घेण्यासाठी थांबले आणि आम्ही तो क्षण लगबगीने पकडला! त्यांस म्हटले, की सर, आपले मोदीजी आहे ना मोदीजी, ते सतत कपडे का हो बदलतात? तर हातातील पेन्सिल आमच्यावर रोखून ते उलटे आमच्यावरच ओरडले, ‘सिक्स्टिन टाइम्स! सिक्स्टिन टाइम्स!! मी माझा सूट चार दिवसांतून एकदा बदलतो. वेळच मिळत नाही बोलण्यातून! हाऊ कॅन ही? नेशन वॉट्स टू नो..’

कोणी स्वत:ला राष्ट्र मानू लागले की आमच्या काळजात तर भयच दाटून येते. आमच्या राहुलजींचे तसे नाही. ते स्वत:स राष्ट्र नव्हे, पण राष्ट्राहून अधिक राष्ट्रप्रेमी मानतात!

राहुल म्हणजे राहुल कँवल. टुडेच्या इंडियाचे आधारस्तंभ. काही चावट लोक त्यांस राहुल कमळ असेही म्हणतात. त्यांना विचारले तर ते म्हणाले, ‘ये हमारी संस्कृती है. तेच लोक कपडे बदलतात जे स्वच्छ राहू इच्छितात! मी आता तसा ट्विटच करणार आहे.’

‘पण सोळा वेळा?’

‘मी सतरा वेळा ट्विट करीन!’

‘ट्विटचे नाहीहो. कपडय़ांचे..’

‘सो व्हॉट? मी तर म्हणेन या देशातील प्रत्येकाने दिवसातून सोळा वेळा कपडे बदलले पाहिजेत. यामुळे देशातील वस्त्रोद्योगास किती भरभराट येईल, याचा विचार आपण करणार आहोत की नाही? मी हे पण ट्विट करणार आहे.’

हे ऐकले आणि एका झटक्यात आमचा अज्ञान अंधकार दूर झाला. मनात आले, अरे हा तर गांधीजींचा विचार! त्यांनी भारतीय वस्त्रोद्योगासाठी खादीचा विचार दिला. स्वत: एकच पंचा नेसले.

आमचे साबरमतीचे नूतन संत त्याच वस्त्रोद्योगासाठी झटत आहेत. सोळा सोळा कपडे नेसून!

काळ बदलला आहे.

कपडय़ांच्या फॅशनमध्ये एवढा बदल

तर होणारच!

-balwantappa@gmail,com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व 'ध' चा 'मा' बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Articles on textiles

Next Story
गोलमाल!