नीता कुलकर्णी

नदी वाहते तेव्हा तिच्यासोबत काय काय बहरत असतं.. कोणत्या गोष्टी जपल्या जातात? कोणत्या नकोशा गोष्टी वाहून जात असतात? का हवी असते वाहणारी नदी? नदीच्या काठावरचं आयुष्य हा काय अनुभव असतो, हे त्या काठांवरच्या गावांनाच चांगलं ठाऊक असतं. नदी त्या गावांना प्रवाहीपण देते. आणि जगण्याची शांत, संथ लयसुद्धा! शेतशिवार फुलवते. झाडंझुडं, रानं पोसते. प्राणीपक्ष्यांना आसरा देते. गावातली घरं घट्ट  जोडून ठेवते. नाती आणि माणुसकी खोल रुजवते. आणि अचानकच त्या नदीचा प्रवाह भिंती बांधून अडवून टाकला तर..?

nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

ज्येष्ठ लेखक व चित्रकार ल. म. कडू यांची ‘धरणकळा’ ही कादंबरी या नदीचीच गोष्ट सांगते. त्यांच्या ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीचा हा पुढचा भाग आहे. धरण बांधल्याने नदीचं प्रवाहीपण संपून गढूळ झालेल्या गावाची ही कथा आहे. फक्त गावच नाही, तर माणसांतली नाती, शेतं, ऋतुचक्र सारंच बदलून जातं. सधन नसलं, तरी सुसंस्कृतपणा जपणाऱ्या गावाचा आत्माच हरवून जातो. स्वत:ची जपलेली अस्सल भाषा लोप पावते. ‘आपटय़ाचा माळ’, ‘राहीबाईचा थांबा’ अशी खास खुणा जपणारी नावं, शेताच्या सीमांच्या ओळखीच्या खुणा लुप्त होतात. त्यांच्या जागी ‘एजंट, पार्टी, एकर, सातबारावरचं आळं’ हे शब्द मोठे होऊन बसतात. गावच्या जत्रेत मिळणाऱ्या कडक बटरच्या जागी मिसळ-पाव येतो. मोर, साळुंक्या, चिमण्या, भोरडय़ा अशा पक्ष्यांचे आवाज थांबतात. व्हावळ, जांभूळ, ऐन, असाणा, बहावा या झाडांचं सरपण होतं. गावाची फुप्फुसं बघता बघता काजळीने भरून जातात. ‘मरणकळा’ असतात, तशाच या ‘धरणकळा’ आहेत.

ही कथा सुरू होते १९५८ साली! यात धरण बांधायच्या वेळेपासून गावातले बदल टिपणारा तरुण नायक आहे. त्याला पाण्याखाली जाणारं गाव दिसतंय. आणि पुढे येणाऱ्या बकालीची चाहूलही त्याला लागली आहे. तो फार तरल मनाचा संवेदनशील माणूस आहे. इतका, की खालेल्ल्या फळाची बीसुद्धा फेकायची नाही, ती रुजवून तिची रोपं जगवायची, हा त्याला घरातून मिळालेला संस्कार आहे. बी रुजवली नाही तर ते ‘आईपासून पोराची ताटातूट केल्यासारखं असतं’ असं तुकारामाचे भक्त असणारे त्याचे वडील म्हणतात. पाण्यावरचे तरंग बघत असताना एका विशिष्ट ठिकाणी उडी मारून खाली गेलो तर आपलं बुडालेलं घर सापडेल का,असा विचारही त्याच्या मनात येतो. सातेरी मुंग्यांचं वारूळ त्याला गुलाबाच्या फुलासारखं दिसतं. तो गावातल्या वस्तीतले, माणसांतले आणि निसर्गातले बदल खंतावून बघत राहतो. धरण बांधल्यावर दोनच वर्षांत त्याची िभत फुटते. गावातले भूधारक मनात उमेद धरून पुन्हा त्यांच्या वाटय़ाला आलेली छोटीशी जमीन कसायला घेतात. गावाला पुन्हा आपली लय सापडेल असं वाटतं. पण िभत पुन्हा उभी राहते. शेतकऱ्याच्या नशिबातलं दुष्टचक्र पुन्हा फिरू लागतं.

कादंबरीचा दुसरा भाग २०१८ सालचा आहे. आता गावाची परिस्थिती अधिकच लयाला गेलेली आहे. नायकाचंही वय झालेलं आहे. घडणाऱ्या गोष्टी बघत राहणे हेच त्याच्या हाती आहे. त्याची रक्ताची माणसंही त्याला दुरावली आहेत. त्याचा जीवाभावाचा जमिनीचा तुकडाही हातातून गेला आहे. ‘ऐन तुटला. बकुळ तुटली. आपटा तुटला. गणगोतच तुटलं. माझंच पान गळता गळेना..’ ही खंत फक्त उरली आहे.

‘धरणकळा’ ही धरणग्रस्तांच्या, विस्थापितांच्या समस्या मांडणारी कादंबरी! मात्र, ती कुठेही कोरडी किंवा प्रचारकी होत नाही. मुळात तिला कादंबरी म्हणावं की दीर्घकाव्य, असाही प्रश्न पडतो. अत्यंत चित्रमय आणि ओघवत्या वर्णनाच्या या कादंबरीला एक खास लय आहे. पुस्तकाची मांडणीही दीर्घकवितेसारखी आहे. त्यामुळे ते गद्यकाव्यच वाटत राहतं. यातले अनेक शब्द, रीती खास गावकुसातल्या आहेत. त्यांच्या अर्थाची सूचीही यात दिलेली आहे. पुस्तकाची निर्मिती सुबक आहे.

लेखकाची समृद्ध भाषा निसर्गाची वर्णनं आणि अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा फार ताकदीने उभ्या करते. यातली माणसं वाचत असताना तर ल. म. कडू यांनी स्वतंत्र व्यक्तिचित्रंही लिहायला हवीत असं वाटतं. त्यांनीच रेखाटलेल्या या पुस्तकातल्या चित्रांचाही विशेष उल्लेख करायला हवा. चित्रकला आणि फोटोग्राफी या दोन्ही प्रांतांतलं लेखकाचं कौशल्य त्यांच्या शैलीत ठाशीवपणे दिसतं. या कथेचा तिसरा भागही येण्याच्या अनेक शक्यता या कथेत आहेत.

पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा (जयदीप कडू) विशेष उल्लेख करायला हवा. कोरडय़ा शेतातल्या नांगरावर शेतकऱ्याचं पागोटं ठेवलेलं हे मुखपृष्ठ हुतात्मा सैनिकाची उलटी बंदूक आणि त्यावर ठेवलेल्या हेल्मेटची आठवण करून देतं. प्रगतीसाठी घेतलेल्या काही निर्णयांमुळे शेतकऱ्यालाही एका अर्थी हौतात्म्यच पत्करायला लागतं, हे सुचवणारं हे मुखपृष्ठ प्रभावी आहे.

‘धरणकळा’ वाचून झाल्यावर एक स्तब्ध अस्वस्थता मनात भरून राहते. प्रगतीची व्याख्या कशी ठरवायची? शेतकऱ्याकडून जमीन बळकावून घेणाऱ्यांना खरंच काय मिळतं? शेतकऱ्याला काय मिळतं? या ऱ्हासाला कधी पूर्णविराम असतो का? जीवनशैली पार बदलूनच माणसाची प्रगती होत असते का? माणूस आणि निसर्ग यांच्यातल्या हृद्य नात्याचा वेध घेणारी ही कादंबरी असे अनेक प्रश्न मनात उभे करते.

‘धरणकळा’- ल. म. कडू, राजहंस प्रकाशन, पाने- २२४, मूल्य- २५० रुपये.