हेमंत प्रकाश राजोपाध्ये

गेले वर्षभर ‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करणाऱ्या या मालिकेचा प्रवास आज समाप्तीला येऊन ठेपला आहे. भारतीय उपखंडासारख्या विशालकाय अशा भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या समाजांच्या ऐतिहासिक जडणघडणीचा सर्वागीण इतिहास एका लेखमालेत, ग्रंथात वा ग्रंथमालांमधूनच काय, अनेक दशके खपून काम करणाऱ्या अनेक अभ्यासकांच्या पिढय़ांच्या खंडांमधूनही पूर्ण लिहून व्हायचा नाही! मात्र, या इतिहासाविषयीच्या धारणांच्या आजच्या रूढ चौकटी- ज्या प्राथमिक संकल्पनांभोवती फिरताना दिसतात- आपण या लेखमालेच्या अनुषंगाने निवडल्या. त्या संकल्पनांविषयी आजच्या समाजात रूढ असलेल्या धारणांचे बहुरंगी, बहुस्तरीय पदर उलगडण्यासाठी आपण प्राचीन, मध्ययुगीन प्राथमिक संदर्भ-साधने आणि स्रोतांचा आधार घेतला. सध्याच्या समाज- संस्कृतिकारणाला आकार देणाऱ्या मतप्रणालींचे प्रवाह आणि या प्रवाहांची ठळकपणे जाणवणारी मुख्य वैशिष्टय़े लक्षात घेत या संकल्पनांचा, धारणांचा उलगडा करण्याचा प्रयत्न या लेखमालेद्वारे केला गेला.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Two women arrested for kidnapping six-year-old boy
सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक; मुलाची सुटका… ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांनी ‘असा’ लावला छडा
demonetisation decision taken by modi government in 2016 was illegal and wrong says justice bv nagarathna
‘निश्चलनीकरणाचे परिणाम उद्दिष्टांच्या विरोधात’, सामान्य माणसाला झालेल्या त्रासाने अस्वस्थ- न्या. नागरत्न
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

या साऱ्या धारणांचा उलगडा करताना आणि आकलन करवून घेताना लक्षात घ्याव्या लागणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या. पहिली गोष्ट अशी की, इतिहास-पुराणांची, जातककथांसारख्या साहित्याची किंवा नीतिपर ग्रंथांची भव्य आणि उज्ज्वल परंपरा उपखंडाला लाभली आहे. पण त्या इतिहासलेखन पद्धतीमध्ये सुसूत्रता आणि एकवाक्यता दिसत नाही. प्राचीन काळातल्या शिलालेखांतून मिळणाऱ्या प्रशस्तीपर काव्यांतून, व्यापाऱ्यांनी खोदलेल्या लेण्यांतून किंवा मध्ययुगीन बखरी, तवारिखा, स्मृतिचित्रे व रोजनिशांतून मिळणाऱ्या समकालीन नोंदींतून तपशिलांच्या आधारे आपल्याला मिळत असलेली माहिती तत्कालीन राजकुले, ब्राह्मण-श्रमणांच्या आश्रमांपर्यंत वा व्यापारी मार्गापर्यंतच सीमित राहते. संस्कृत, पाली आणि प्राकृत साहित्यातील तपशिलांतून तत्कालीन समाजजीवन, राजकारण कसे होते, याची ढोबळ कल्पना येत असली, तरी भौतिक साधने, पुरातत्त्वीय अवशेष, नाणी यांच्यातून पुढे येणारा इतिहास या साधनांना नेहमीच पूरक ठरतो असे दिसत नाही. त्या अनुषंगानेच एक महत्त्वाची बाब ही की, आपल्या आजच्या भारतीय आणि उपखंडीय समाजामधील ऐतिहासिक दृष्टी ही राष्ट्र-राज्य व धर्म-श्रद्धाप्रणालीवर बेतली आहे.

१९ व २० व्या शतकाच्या जागतिक इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्वाची गोष्ट ही की, या इतिहास-पुराणलेखन कार्याला एक विवक्षित शिस्त आणण्याचे प्रयत्न वसाहतपूर्व काळात झालेले दिसत नाहीत. त्यामुळेच आपल्या इतिहासविषयक धारणांच्या धाग्यांची उकल करताना वासाहतिक आणि वसाहतोत्तर काळातील संकल्पनांचा आपल्या समाजावर पडलेल्या सखोल प्रभावाची मीमांसा करणे गरजेचे ठरते. आधुनिक इतिहासलेखनाचा प्रारंभ आपल्याकडे युरोपीय सत्तांच्या उपखंडातील आगमनानंतर झाल्याचं दिसून येतं. ढोबळमानाने पौर्वात्यवादी, उपयुक्ततावादी आणि राष्ट्रवादी या तीन विचारसरणींच्या प्रभावातून हे लेखन सुरू झालं. यापकी उपयुक्ततावादी इतिहास परंपरेची धारणा उघडपणे अशी होती की, युरोपीय राष्ट्रांनी भारतीय उपखंडाचा ताबा घेणं ही उपखंडाचे ‘मागासपण’ नाहीसे करण्यासाठी घडलेली हितावह गोष्ट आहे. या परंपरेचा महत्त्वाचा शिलेदार होता- जेम्स मिल्ल! त्याने भारतीय इतिहासाची विभागणी ‘हिंदू काळ’, ‘मुस्लीम काळ’ आणि ‘ब्रिटिश काळ’ (ब्रिटिश काळाला मात्र मिल्लसाहेब ‘ख्रिस्ती काळ’ असे संबोधत नाही!) अशी केली. या प्राथमिक वर्गवारीच्या चौकटीवरच त्याने इतिहास लिहिला. यातून प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन या काळाच्या विभागणीला धार्मिक चौकटीत पाहायची पद्धत उपखंडाच्या इतिहासलेखन पद्धतीत रूढ झाली. दुसरीकडे विल्यम जोन्स, फ्रेडरिक मॅक्स म्युल्लरसारख्या पौर्वात्यवादी इतिहासकारांनी प्राचीन भारतीय वैदिक आणि संस्कृत भाषाशास्त्राच्या मीमांसेतून प्राचीन ग्रीक आणि संस्कृतभाषक लोकांचे मूळ एकवंशत्व कल्पून दोन्ही भाषकसमूहांचे कथित मूळ स्थान वगरे संदर्भात मांडणी केली. त्यांच्या या मांडणीद्वारे अभिजन वर्गात वैदिक, संस्कृत, बौद्ध, पाली भाषांच्या अभिजात परंपरांविषयी काहीसे स्मरणरंजनपर श्रेष्ठत्व रुजवले गेले.

या दोन इतिहासलेखन पद्धतींच्या प्रभावातून ब्रिटिशकाळात एतद्देशीय इतिहासकारांमध्ये राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या परंपरेची पायाभरणी झाली. यातून केवळ राष्ट्रवादी इतिहासकारांच्या परंपरेलाच चालना मिळाली असे नाही, तर इंग्रजी शिक्षण घेऊन आधुनिकतेला सामोरे जाणाऱ्या धार्मिक संघटनांमध्येही इतिहास व परंपरांविषयक मांडणीच्या नव्या धारणा तयार झाल्या. हिटलरपूर्व काळात तथाकथित ‘आर्य वंशा’विषयीच्या श्रेष्ठत्वकल्पना, युरोपीय प्रबोधनपर्व, सुवर्णयुग वगरे संकल्पनांची भारतीय प्रारूपे यातूनच निर्माण झाली. ‘आर्य समाज’सारख्या चळवळी किंवा अन्य राष्ट्रवादी लेखनपरंपरांतून हिंदू व अन्य एतद्देशीय श्रद्धाविश्वांचे ‘रिलिजन’ या पाश्चात्त्य चौकटीत पुनर्माडणी करण्याचे उद्योग वाढीला लागले. याच परंपरेचे अनुकरण वा प्रतिप्रभाव अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या सर सय्यद अहमद खान यांच्या मुस्लीम प्रबोधनाच्या चळवळीवर पडून हिंदू आणि मुस्लीम यांच्या सांस्कृतिक इतिहासाच्या वेगळेपणाची आणि त्यानुसार हिंदू-मुस्लीम आपपरभावाची बीजे रुजली गेली. पुढे त्याची परिणती उपखंडाच्या फाळणीपर्यंत झाली.

‘उपखंडातील जातिव्यवस्था’ हा विषय आपल्याला लेखमालेत घेता आलेला नाही. मात्र राजे- महाराजे आणि सुलतान- नवाबांच्या पदरी असलेला उच्चवर्णीय, उच्चजातीय वर्ग इंग्रजी शिक्षण घेऊन ब्रिटिश सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरकाव करता झाला होता. हे सरकारी नोकरीचे फायदे तुलनेने अतिकर्मठ आणि सामाजिक दृष्टीने मागासवर्गीय जातसमूहांचे प्राबल्य असलेल्या मुस्लीम समाजात उशिरा पोहचले. त्यातून हिंदू-मुस्लीम या धार्मिक द्वैताला वर्गीय वेगळेपणाची किनारही मिळाली. त्याचे पडसाद फाळणीविषयक मांडणीमध्ये दिसून येतात. मात्र, जातिव्यवस्थेवर आणि जातविषयक मांडणीवर वासाहतिक काळात झालेल्या परिणामांची मीमांसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘Annihilation of Caste’ पासून लुई दुमों, रोझलिंड ओ’हॅन्लन, निकोलस डर्क्‍स, सुसान बॅले, सुमित गुहा यांसारख्या अभ्यासकांच्या ग्रंथांतून दिसून येते. ‘धारणांच्या धाग्यां’ची उकल जातिव्यवस्थेच्या परंपरेची आणि या व्यवस्थेला, लिंगभावाला आणि अन्य शोषणपर व्यवस्थांना उलथवून टाकणाऱ्या तत्त्वज्ञांच्या लेखनाची मीमांसा केल्याशिवाय अपूर्ण राहत असली, तरी उकलीची ही प्रक्रिया वेगवेगळ्या माध्यमांतल्या लेखन-वाचनातून आणि अभ्यासकीय चर्चातून आपल्याला करत राहावी लागेल.

लेखमालेचा प्रारंभ आपण ‘भारतवर्ष’ या कल्पनेविषयीच्या धारणांच्या विकसनाची प्रक्रिया तपासत सुरू केला. आर्यावर्तात राहणाऱ्या वेदकालीन समूहांतली ‘देव-असुर’ या प्रतिमांची निर्मितीप्रक्रिया, या दोन्ही समूहांचे परस्पर साहचर्य, तसेच मानवी धारणा व आपपरभावातून आलेल्या समूहनिष्ठेच्या आधारे चांगला-वाईट ठरवण्याच्या पद्धती हे विषय आपण हाताळले. भारतवर्ष ते आधुनिक वसाहतोत्तर काळातील भारतीय गणराज्य यांविषयीच्या आपल्या धारणा वर नमूद केलेल्या इतिहासलेखन पद्धतींच्या प्रभावातून साकारल्या आहेत, हे सुज्ञ वाचकांना वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. देव-असुर या कल्पनांतून साकारले गेलेले द्वैत हे वास्तविक एकाच भौगोलिक परिसरातील उपासनाभिन्नत्व किंवा जीवनशैलीतील भेद अथवा परस्पर हेवेदावे-ईर्ष्यापर जाणिवांतून साकारले गेल्याचे आपण इंद्र-वृत्र यांच्या कथेद्वारे पाहिले. वेदकालीन वसिष्ठ-विश्वामित्र यांच्या संघर्षांचे पडसाददेखील दाशराज्ञ युद्धाच्या अनुषंगाने आपण पाहिले. वेदकालीन साहित्यातील ही कथाबीजे आणि धारणांची बीजे उपखंडातील समाजात खोलवर रुजली. त्यांनी वेगवेगळ्या काळांतील मानवी सहजीवनातील सौहार्दपर आणि संघर्षपर मालिकांना देवासुरांच्या चौकटीत बसवायचे प्रयत्न केले. उदाहरणार्थ, अद्वैताची मांडणी करणाऱ्या आदिशंकराचार्याच्या द्वैतानुयायी आचार्यानी शंकराचार्याना ‘मायासुर’ असे असुरपर विशेषण वापरले आहे.

या लेखमालिकेतील ‘अयं निज: परो वेति’ (हा माझा, तो परका) या लेखात मांडल्याप्रमाणे, तथाकथित अशुद्ध भाषावापर करणाऱ्या, ‘असुर’ म्हणवल्या गेलेल्या समूहाला उद्देशून वापरली गेलेली वेदकालीन ‘म्लेच्छ’ ही परकेपणा दाखवणारी संकल्पना मध्ययुगीन मुस्लिमांना लागू झाली. हीच परंपरा आपल्याला मध्ययुगीन इतिहासाचे ललित साहित्यातून कल्पित चित्रण करणाऱ्या आधुनिक मराठी, बंगाली ऐतिहासिक कथा-कादंबऱ्या आणि चित्रांतून दिसून येते. धारणांच्या या चौकटींची अशी गुंतागुंतीची प्रक्रिया आधुनिक काळातील संभाषितांच्या निर्मितीच्या घुसळणीमध्येही मोठी भूमिका पार पाडते. प्राचीन भारतीय जनपदांच्या व्यवस्थेत चक्रवर्तिसम्राटाची कल्पना येते. भोवतालच्या राजांना आपल्या बाहुबलावर जिंकून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत, त्यांना आपले अंकित करणारा राजा विधिपूर्वक सम्राटपदावर आरूढ होत असे. धारणांच्या या चौकटींचे धागे, त्यांचे रंग, प्रतवारी वा या चौकटींच्या भुजा कालानुरूप जीर्ण होऊन बदलल्या गेल्या. मात्र, समाजमनावरील या धारणांचे संस्कार पक्के आहेत.

‘काव्यमीमांसा’ या महत्त्वाच्या साहित्य-नाटय़शास्त्रपर ग्रंथात साहित्यशास्त्रकार राजशेखर काव्याच्या-साहित्याच्या प्रथम अधिकरणाच्या तिसऱ्या अध्यायात काव्याच्या रीती-वृत्तींच्या संदर्भातील मर्यादांची चर्चा करतो. ते करताना त्याने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरेही दिली आहेत. ‘ही पृथ्वी जर असंख्य भूप्रदेश-राज्यांनी युक्त असेल, तर साहित्याच्या वृत्ती मर्यादित चार प्रकारांतच का बरे कोंडल्या गेल्या आहेत?’ असा प्रश्न करून त्याचे उत्तर देताना राजशेखर लिहितो- ‘चक्रवर्तिक्षेत्र वगरे कल्पनांनी बद्ध असलेल्या विवक्षित भूप्रदेशाहून पृथ्वीची व्याप्ती मोठी असली, तरीही त्यांची विभागणी चार प्रकारांतच केली गेली आहे. त्यामुळे विस्तृत, अमर्याद अशा पृथ्वीचा, इतर भूप्रदेशांचा या संदर्भात विचार करणे या ठिकाणी अप्रस्तुत आहे.’ याचा अर्थ विवक्षित शास्त्रास उपखंडातल्या भौगोलिक विस्तारातल्या जटिल, काहीशा विस्कळीत अशा प्रचंड विविधतेला संबंधित ज्ञानव्यवहार करणाऱ्या वर्गास अभिप्रेत असलेल्या व्यवस्थेत मर्यादित करायचं आहे हे उघड आहे. अशा नसर्गिक मर्यादा आणि चौकटी समाजातील विविधतेला आणि वैविध्यपूर्ण सामाजिक व्यवस्थांना प्रमाणित करू लागतात. प्रमाणीकरणाच्या या प्रक्रियांना बहुतांश वेळा विशिष्ट वर्गाच्या श्रेष्ठत्वाचा वा प्रामाण्याचा वास येतो. संबंधित काळातील अर्थकारण, राजकारण, धर्मकारणावर पकड मिळवणारा समूह अथवा व्यक्ती त्याला अभिप्रेत असलेल्या व्यवस्थांचा प्रभाव प्रस्थापित करतो. त्यातून अनेकदा अन्य समूहांचे दमन, शोषण होऊ लागते. अथवा त्या व्यवस्थेचे पालक, अनुयायी असलेले शासक-शासनव्यवस्था आपल्या वैचारिक-सामरिक राजकीय आकांक्षापूर्तीसाठी स्वत:ला ‘लार्जर दॅन लाइफ’ स्वरूपात दाखवू पाहतात. त्या व्यवस्थेचे अगर शासकाचे कट्टर अनुयायी, सेवक वा प्रसंगोपात भक्त निर्माण होतात. मात्र व्यवस्थांच्या अशा एकसाचीकरणाच्या आग्रहातून विवक्षित भूगोलातील वा समाजातील वैविध्य आणि बहुरंगी सौंदर्य धोक्यात येते.

अशा वेळी संवेदनशील, जाणत्या जनांना इतिहासकाळातील धारणांचे धागे तपासण्याची निकड भासते. मानवी वृत्ती-प्रवृत्तींचे वैयक्तिक व सामूहिक आविष्कार वेगवेगळ्या चौकटींतून, वेगवेगळ्या बुरख्यांतून पुनरावृत्त होत जातात. अशा वेळी इतिहासपुरुषाच्या उदरात दडलेल्या भूतकाळातील घटनांद्वारे संबंधित राजकीय, वैचारिक, सांस्कृतिक प्रणालीच्या किंवा विवक्षित भूभागातील सामूहिक इतिहासाच्या ‘पॅटर्न्‍स’चा आढावा घेत मार्ग आक्रमावा लागतो.

धारणांच्या धाग्यांनी बनलेले हे वेगवेगळे पट मानवी समाजाच्या उत्क्रांतीसाठी उपयुक्त ठरत असतात. बेनेडिक्ट अँडरसन या समाजशास्त्रज्ञाने संबंधित विषयांसंदर्भातील धारणांच्या धाग्यांची उकल करताना या व्यवस्थेला ‘कल्पित समूह’ (Imagined community) असं संबोधलं आहे. मानवी समूहजीवनाच्या दृष्टीने समूहनियमनासाठीच्या व्यवस्था आवश्यक असतातच. या व्यवस्था राष्ट्र, धर्म, आचारपद्धती अशा वेगवेगळ्या चौकटींतून आकार घेतात. परिवर्तनशीलता अटळ असलेल्या या व्यवस्थांच्या सुकरतेसाठी विवक्षित भूभागाच्या सांस्कृतिक-ऐतिहासिक भूगोलाच्या दृष्टीने आधुनिक राष्ट्र-राज्य प्रणालीने एक विशिष्ट भूमिका बजावण्याचे काम केले आहे. या व्यवस्थेमध्ये आपल्याला आपल्या जाणिवा अधिक व्यापक आणि उन्नत करण्यासाठी आजची आधुनिकता भाग पाडत असते. मात्र वर पाहिल्याप्रमाणे, श्रद्धा, राजकीय विचार किंवा प्रणालीचा सखोल प्रभाव मानवी समाजावर होत असल्याने अथवा वैयक्तिक संस्कारांच्या अतिरेकी हट्टामुळे अनेकदा राजकीय-सांस्कृतिक-धार्मिक व्यवस्थांविषयीचे आग्रह कर्कश्श आणि आक्रस्ताळे होताना आपण पाहतो आहोत. २१ व्या शतकात आपल्या श्रद्धा, धारणा आणि संस्कार यांच्यावरील प्रेम जपण्याचा अधिकार सर्वाना आहेच; तरीही इतरांच्या श्रद्धा-धारणांविषयीच्या सहिष्णुतेचे कर्तव्यदेखील या अधिकाराची दुसरी बाजू असल्याचे आपण लक्षात घ्यायला हवे.

‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ हे भगवद्गीतेमधलं प्रसिद्ध वचन आहे. ज्ञान हे अभ्यासातून प्राप्त होतं आणि अभ्यास म्हणजे आपण मिळवलेले ज्ञान पुन:पुन्हा तपासून पाहणे, त्याची चिकित्सा करणे, असे संस्कृत शास्त्रपरंपरेने प्रतिपादित केले आहे. आपल्या मनात रुजलेले संस्कार, वैचारिक धारणा पुन:पुन्हा तपासण्याची वृत्ती अंगी बाणवणे आणि वेळ पडल्यास आकलनानुसार पूर्वसंस्कारांची व्यर्थता वा अनुचितता लक्षात घेऊन त्या संस्कारांचा प्रयत्नपूर्वक त्याग करून अधिक उदात्त-उन्नत विचारांना अंगी बाणवता येणे हे सुसंस्कृतपणाचे, सुशिक्षितपणाचे खरे लक्षण आहे. त्यामुळेच ऐतिहासिक-सांस्कृतिक धारणांच्या अशा बहुरंगी-बहुढंगी चौकटींची चिकित्सा करत राहणे हे सुसंस्कृत भारतीयत्वाचे व उन्नत मानवतेचे खरे लक्षण मानावयास हवे.

‘धारणांच्या धाग्यां’च्या उलगडीचा हा प्रवास वर्तमानपत्रीय स्तंभाच्या रूपात तूर्तास थांबत असला, तरी आपल्या वैयक्तिक आकलनात, वैचारिक प्रवासात या प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहेत. आपल्या देशातील-उपखंडातील सामाजिक-सांस्कृतिक गतिशीलता आपल्याला त्या प्रवासात नेहमीच साथ देत राहणार आहे. त्यासाठीच- ‘चरैवेति, चरैवेति..!’

rajopadhyehemant@gmail.com

(समाप्त)