प्रसाद शिरगावकर
तीन दशकांपूर्वी सर्वांसाठी अवतरलेले संगणक-मोबाइल आणि तंत्रज्ञानातील मर्यादित प्रगती उपभोगाच्या बाल्यावस्थेत होती; तेव्हा जीवन आतापेक्षा कमी तणावाचे, कमी निराशेचे आणि कमी व्यापाचे होते. पुढे माणसांच्या समाजप्रियतेच्या अट्टहासातून माध्यमक्रांतीही टप्प्याटप्प्याने अद्ययावत रूपांत प्रगटली. घरटी एकपासून ते माणशी दोन-तीन गॅझेट्स अनिवार्य बनली. पण माध्यमसाक्षरताच नसल्याने त्यांच्या वापराचे दुष्परिणाम लख्ख होईस्तोवर आबालवृद्धांना डिजिटल व्यसनाने पछाडून टाकले. आता तंत्रज्ञान गरजेपुरते हाताळण्यासाठी, त्याला आपल्यावर वर्चस्व गाजवू न देण्यासाठी पावले पडतायत. ‘डिजिटल डिटॉक्सिंग’ म्हणजे नक्की काय, ते करणार्यांच्या अनुभवांसह पदवीनंतर शहरी गजबजटाला कंटाळून ‘सोशल डिटॉक्सिंग’साठी गाव गाठणार्या तरुणाची कहाणी…
‘‘मी काही फारसा वापरत नाही मोबाइल, अगदी गरजेपुरता वापरतो.’’ असं मला वाटायचं. एक बातमी वाचली, ‘‘भारतीय लोक दिवसाला सरासरी पाच तास मोबाइल वापरतात.’’ मग मी माझ्या मोबाइलवरचा दैनंदिन वेळ तपासून पाहिला. तर मी खरोखर त्या दिवशी चार तास मोबाइल वापरलेला होता! मला दोनशेहून अधिक ‘नोटिफिकेशन्स’ आलेली आणि मी दोनशेहून जास्त वेळा माझा फोन ‘अनलॉक’ केलेला. हे केवळ सकाळी उठल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत! आणि हे फक्त माझं नाही. ‘ईवाय’ या संस्थेच्या दीडेक वर्षांपूर्वीच्या अहवालानुसार, आपण भारतीय लोक वर्षभरात एक लाख कोटींहून अधिक तास आपल्या मोबाइलमध्ये व्यग्र असतो! आणि त्यातला जवळपास सत्तर टक्के वेळ सोशल मीडिया, गेम्स आणि व्हिडियोजवर जातो.
फोनचा सगळ्यात जास्त वापर त्यावर असलेल्या फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स यांसारख्या सोशल मीडियाच्या ॲप्ससाठी केला जातो. या सर्व माध्यमांमधून, त्यातल्या वेगवेगळ्या पेजेस, ग्रुप्स आणि चॅनल्समधून येत असलेल्या असंख्य प्रकारच्या पोस्ट्स, मेसेजेस, फोटोज, व्हिडियोज्, रील्सच्या अखंड अजस्र धबधब्याखाली आपण अहोरात्र उभे राहत असतो. समाजमाध्यमांवरून येणार्या या अवाजवी, अवास्तव आणि बिनगरजेच्या गोंगाटाचं, कोलाहलाचं आपल्या सगळ्यांना कमालीचं व्यसन लागलं आहे. घरातली ही ईनमीनतीन-चार माणसं हीसुद्धा एकत्र असण्याच्या वेळांमध्ये आपापल्या मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेली असतात. प्रत्येक वेळी काही सेकंद ते एखाद-दोन मिनिटंच जात आहेत असं आपल्याला वाटतं. पण खरोखर आपण किती वेळ या बिनगरजेच्या धबधब्यात भिजत राहातो हे तपासत राहायला हवं.
मोबाइलला अहोरात्र चिकटून राहणं आणि त्यावरून आपल्यावर कोसळणारा कंटेंट दिवसातले पाच-सहा तास बघत राहणं ही आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे, हे आता संशोधनातून दिसून आलंय. त्यानं मानसिक थकवा येतो, झोपेचा दर्जा खालावतो, आपलं मन एकाग्र करण्याची क्षमता दुबळी होत जाते, आपल्याला विनाकारणांची चिंता
(anxiety) येत राहते. त्यामुळे आपल्या स्वत:च्या मनो-शारीरिक आरोग्यासाठी डिजिटल विश्वाच्या दुष्टचक्राचा भेद करून त्यातून बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे. हे करण्याच्या प्रक्रियेला डिजिटल डीटॉक्स म्हणतात. (म्हणजे डिजिटल विश्वातून आलेल्या विषापासून मुक्त होणे) अर्थातच, आपल्याला आपल्या आयुष्यातून मोबाइल स्मार्टफोन आणि सर्व समाजमाध्यमांवर पूर्णपणे हद्दपार करणं शक्य नाही. रोजच्या खरेदीसाठी लागणार्या डिजिटल पेमेंट्सपासून ते प्रवास करताना लागणारे मॅप्स, शिकण्यासाठीचे व्हिडियोज्, कुटुंब आणि मित्रांसोबत संपर्कात राहाण्यासाठीची मेसेजिंग ॲप्स हे महत्त्वाचे आहेतच. मात्र आपण हे गरजेसाठी वापरत आहोत का त्यात वाहवत जात आहोत हे आपलं आपण वेळोवेळी तपासत राहिलं पाहिजे. आणि सोशल मीडिया वापरत राहणं हीच आपली गरज बनली आहे, त्याचं आपल्याला व्यसन लागलं आहे, हे लक्षात आलं तर डिजिटल डीटॉक्स करावं!
पण करायचं कसं?
सगळ्यात पहिली पायरी म्हणजे डिजिटल विश्वाचं आपल्याला व्यसन लागलं आहे का, हे तपासणं आणि असल्यास ते स्वीकारणं. त्यासाठी आपण फोन खरोखर किती वेळ वापरत आहोत, हे बघायला हवं. ॲण्ड्रॉइडवर Digital Wellbeing आणि iPhone वर Screen Time नावाची सोय फोनच्या सेटिंग्जमध्येच असते. रोज रात्री झोपण्याच्या आधी ती उघडून, आपण दिवसभरात फोनचा कसा आणि किती वापर केला हे बघायचं. हे सलग आठवडाभर करून बघितलं तर तुमचे अक्षरश: डोळे उघडतील! यामध्ये बिनकामाचा समाजमाध्यमांचा वापर सर्वांत अधिक दिसत असेल, तर तो जाणीवपूर्वक कमी करण्यासाठीची पावलं उचलायची.
‘‘मी आजपासून अनावश्यक स्क्रीन टाइमचा वापर कमी करेन,’’ हे नुसतं ठरवून होत नाही. नुसत्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे घडत नाही. तर हे साधण्यासाठी स्वत:हून वापरावरती काही अडथळे निर्माण करावे लागतात. पहिला अडथळा म्हणजे दिवसामधले मोबाइलमुक्त तास ठरवायचे. सकाळचा एखादा तास आणि रात्री झोपायला जायच्या आधीचा एक तास अशा दोन तासांपासून सुरुवात करता येते. या तासांमध्ये मोबाइलचा डेटा आणि वाय-फाय पूर्णपणे बंद करून ठेवायचे. शक्यतो फोन स्वत:पासून लांब ठेवायचा. हे करूनही फोन सारखा बघितला जात असेल, तर अनावश्यक ॲप्स काही काळासाठी बंद करून ठेवण्याची सोय Digital Wellbeing मध्ये आहे. त्या ॲप्समधून कोणतीही नोटिफिकेशन येणार नाही किंवा ती ॲप्स आपल्याला उघडताच येणार नाहीत, अशी सोय करायची. इथून सुरुवात करायची. मग शक्य झालं तर हे तास वाढवायचे.
दुसरा एक अगदी सोपा मार्ग, ज्या वेळांमध्ये आपण स्वत:ला मोबाइल वापरण्याची परवानगी दिलेली आहे, त्या वेळेसाठीचा आहे. तो म्हणजे सर्व बिनकामाच्या ॲप्सच्या नोटिफिकेशन्सचे आवाज बंद करणे. आपले शेकडो व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि सोशल मीडिया फीड्स यांवर सतत काही ना काही घडत असतं. त्या सगळ्याचे टिंग… टिंग… टिंग… आवाज अहोरात्र येत असतात आणि ते आवाज आपल्याला फोन उघडायला प्रवृत्त करत असतात. हे आवाज बंद झाले की, आपोआप सतत फोन अनलॉक करून बघण्याचा वेळ कमी होत जातो.
याचा पुढचा टप्पा समाजमाध्यमांपासून पूर्ण लांब राहण्याचा. नोटिफिकेशन्सची आवाज बंद करूनही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स यांवर आपला खूप वेळ जातोय असं आपल्या लक्षात आलं, तर दर काही महिन्यांनी ज्या ॲपवर आपला सगळ्यात जास्त वेळ जातोय, त्यापासून किमान आठवडा किंवा दहा दिवस लांब राहायचे. ते पूर्णपणे बंद करायचे. त्यासाठी ते ॲप मोबाइलवरून चक्क ‘अनइन्स्टॉल’ करून टाकायचं. यामुळे आपला दिवसातला वेळही प्रचंड वाचतो आणि या ॲप्सशिवाय आपलं काहीही अडत नाही, याची पुन:पुन्हा जाणीव होत राहते.
पहिल्या मार्गामुळे आपण आपला मोबाइल कमी वेळ वापरतो. तर दुसर्यामुळे आपण कमी वेळा वापरतो. यापलीकडे जाऊन, एखाद्या सुट्टीच्या दिवशी संपूर्ण चोवीस तास मोबाइल न वापरण्याचा पण करायचा किंवा एखाद्या आठवड्याअखेर संपूर्ण दोन-तीन दिवस मोबाइलपासून दूर राहायचं, असे डीटॉक्सचे काही उपाय लोक सुचवतात. मात्र हे मला जमलेलं नाही. आणि जमलं असतं तरी त्याचा फारसा उपयोग झाला असता असं मला वाटत नाही. कारण हे व्यसन एखाद्या दिवसात लागलेलं नाही. ते रोजच्या दोनशे अनलॉक्समधून, रोजच्या टिंग टिंग आवाजांमधून थोडं थोडं लागलेलं आहे. आठवड्यातून एक दिवस उपवास करायचा आणि उरलेले सहा दिवस पुन्हा त्याच धबधब्याखाली उभं राहायचं, याने सवय बदलत नाही. रोजच्या दिवसातला मोबाइलचा वापर कमी करणं, हाच जास्त प्रभावी डीटॉक्स आहे, करून बघा.
prasad@aikatta.in
(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)
