आठवण

शिवचरित्रयाग’ प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मला लाभलं, ही बाबासाहेबांकडून मला मिळालेली मर्मबंधातली ठेव आहे!

दिलीप माजगावकर

त्रेसष्ठ साल होतं. महिना आठवत नाही, पण एप्रिल असावा. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला होतो. नापास झाल्यानं आणि घरची परिस्थिती बेताची असल्यानं नोकरी करत होतो. बाजीराव रोडवर चितळ्यांच्या दुकानाला लागून केळकर बंधूंची शोरूम होती. ते किर्लोस्करांचे प्रमुख वितरक होते. मी तिथे टाइपिस्ट म्हणून नोकरीला लागलो. पण पहिल्याच दिवशी माझे टाइिपगचे प्रताप पाहून साहेबांनी हाय खाल्ली आणि मला फाईिलगचं काम दिलं. कामात काही मन लागत नव्हतं.. लागण्याचं काही कारण नव्हतं. एकच सुख होतं : शोरूमच्या दर्शनी भागातल्या मोठय़ा काचेतून रस्त्यावरची रहदारी न्याहाळता येत होती. असाच त्या दिवशी रस्ता बघत बसलो होतो. तेवढय़ात बाबासाहेब झपझप चालत येताना दिसले. त्यांना अर्थात मी तिथे कामाला आहे याची कल्पना होती. त्यांनी मला पाहिलं आणि खुणेनंच बाहेर बोलावलं. ओरडून, पण गमतीनं डोळे मिचकवत म्हणाले, ‘‘काय करताय? नुसत्या मुली बघत बसला आहात ना? चला- माझ्याबरोबर सातारला.’’

मी विचारलं, ‘‘सातारला काय आहे?’’ म्हणाले, ‘‘उद्यापासून माझी व्याख्यानमाला आहे. मला सोबत म्हणून चला.’’

मला निमित्त हवं होतं. मी म्हणालो, ‘‘साहेबांना सांगून येतो.’’ म्हणाले, ‘‘काही नका सांगू. नाही म्हणाले तर?’’ मी त्या दिवशी जो बाहेर आलो ना, त्यानंतर परत त्या ऑफिसमध्ये पाऊल टाकलं नाही. कारण पुढचे दहा दिवस मी सातारला होतो. त्यामुळे कोणत्या तोंडानं मी पुन्हा नोकरीवर जाणार होतो?

मी आणि बाबासाहेब नंतर त्यांच्या घरी आलो. त्या काळात मी त्यांच्या इतक्या निकट होतो, की अनेकदा त्यांच्या घरीच मी राहत असे. दिवस-रात्र त्यांच्याभोवती असायचो. घरी येताना वाटेत माझ्या थोरल्या बहिणीचा मुलगा संजीव देशपांडे आम्हाला भेटला. तोही माझ्याच वयाचा. त्यालाही बाबासाहेबांनी बरोबर घेतलं. आम्ही तिघं स्वारगेटवर आलो. सातारला जाणारी गाडी दोन वाजता होती. आम्ही थोडं खाऊन घेतलं. तास- दीड तास काढायचा होता. एका बाकावर आम्ही बसलो. बाक अरुंद आणि पुढे निमुळता होता. बाबासाहेब म्हणाले, ‘‘मला झोप येतीय. मी झोपतो. तुम्ही बाकावर पुढे बसा- म्हणजे मी खाली पडणार नाही.’’ ते शांत झोपले.

तासाभरानं गाडी आली. बाबासाहेब ताजेतवाने झाले. आम्ही पाचच्या सुमारास सातारला पोचलो. मी विचारलं, ‘‘आपण राहणार आहोत कुठे?’’ ते म्हणाले, ‘‘तीच थोडी पंचाईत आहे. कारण आपण एक दिवस आधीच आलो आहोत. ज्या अच्युतराव कोल्हटकरांनी ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे, त्यांना मी उद्या येतो असं सांगितलं आहे.’’ मी म्हणालो, ‘‘पण त्यांना सांगू ना आपण आज आलो.’’ पण बाबासाहेब इतके संकोची- की ते ‘नको’च म्हणाले. माझा भाचा संजीवचं आजोळ सातारचं. तो म्हणाला, ‘‘आपण आजोबांकडे जाऊ.’’ बाबासाहेब तयार झाले. पण म्हणाले, ‘‘इतक्या लवकर नको. आपण इथून माहुलीला जाऊ. नंतर खाणावळीत जेवू आणि मग जाऊ.’’

आम्ही तिघं बस पकडून माहुलीला गेलो. संपूर्ण प्रवासात आणि माहुलीच्या घाटावर बाबासाहेबांनी माहुलीचा आणि रामशास्त्रींचा इतिहास अगदी तपशीलवार आम्हाला सांगितला. आम्ही सातारला परतलो आणि संजीवच्या आजोळी गेलो. घरी फक्त त्याचे म्हातारे आजोबा होते. त्यांनी दार उघडलं. नातवाला बघून त्यांना आनंद झाला. त्यांनी आमची जुजबी चौकशी केली. त्यांचा नातू त्यांना म्हणाला, ‘‘आजोबा, ते आज रात्री आपल्या घरी राहणार आहेत.’’ आजोबांच्या चेहऱ्यावर नाराजीचे त्रासिक भाव दिसले. ते त्याला म्हणाले, ‘‘अरे, हे माझ्या ना ओळखीचे, ना पाळखीचे. इथे जागाही नाही. झोपणार कुठे?’’ माझा आणि बाबासाहेबांचा चेहराच पडला. मग म्हणाले, ‘‘इथे बाजूला गोठा आहे बघ. तिथे मी दोन सतरंज्या देतो, त्यावर झोपू दे.’’ त्यांनी नातवाला स्वतच्या खोलीत नेलं आणि आम्ही दोघं त्या गोठय़ात झोपलो.

साताऱ्याला मुख्य रस्त्यावर मुकुंदराव दाबके यांचं इलेक्ट्रिक सामानाचं दुकान होतं. तिथे दुसऱ्या दिवशी दहाला आम्ही गेलो. अच्युतराव तिथे आले. बाबासाहेबांना बघून त्यांना आनंद झाला. त्यांनी विचारलं, ‘‘केव्हा आलात?’’ बाबासाहेब म्हणाले, ‘‘आत्ता- सकाळीच आलो.’’ नंतर अच्युतरावांच्या घरी गेलो. त्यांना बाबासाहेबांविषयी विलक्षण आदर आणि प्रेम. गेल्यावर कळलं, की सातारच्या राणीसाहेब श्रीमती सुमित्राराजे भोसले यांनी बाबासाहेबांना राजवाडय़ावर भेटीसाठी बोलावलं आहे. बाबासाहेबांना अतिशय आनंद झाला. सुमित्राराजेंविषयी बाबासाहेबांच्या मनात अतीव आदराची भावना होती. कारण छत्रपतींच्या त्या थेट वंशज होत्या. यासाठीच बाबासाहेबांनी शिवचरित्र त्यांना अर्पण केलं होतं.

बाबासाहेब बाजूच्या खोलीत मला घेऊन गेले. म्हणाले, ‘‘दिलीपराव, आपण एका मोठय़ा राजघराण्यात जातो आहोत. राणी सरकारांना मुजरा करायला लागेल.’’ मी म्हणालो, ‘‘अहो, मला मुजरा वगरे करता येत नाही. मी नमस्कार करतो.’’ म्हणाले, ‘‘मी शिकवतो.’’ इतकं करूनही ऐनवेळी मी घोटाळा केलाच. त्यांच्याकडच्या जाड जाड उंची गालिच्यावरून चालताना मी अडखळलो.. पण सावरलो.

त्या भेटीत मला जाणवलं की, राणीसाहेबांनी संपूर्ण शिवचरित्र वाचलं असल्यानं त्या बाबासाहेबांशी फार आदरानं आणि प्रेमानं बोलत होत्या. पण बाबासाहेब विलक्षण संकोचून फार कमी बोलत होते. मात्र, भेटीचा आनंद मात्र बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

भेट संपली. आम्ही परत आलो. दुपारची जेवणं झाली. थोडा वेळ गप्पा झाल्या. व्याख्यानमाला सहाला सुरू होणार होती. हाताशी वेळ होता. बाबासाहेब अस्वस्थ होते. म्हणाले, ‘‘चला, आपण अजिंक्यताऱ्यावर जाऊ.’’ दुपारचे तीन वाजले होते. आम्ही ऐन उन्हात निघालो. निम्म्या गडापर्यंत पोचलो. तिथे एका दगडावर बसलो. बाबासाहेब विलक्षण गंभीर झाले. चेहऱ्यावर ताण दिसत होता. म्हणाले, ‘‘दिलीपराव, आज एका बाजूला मला अतिशय आनंद होतोय. ज्या एका गोष्टीसाठी मी जीव पाखडला आणि आयुष्य पणाला लावलं, ते ‘शिवचरित्र’ मी छत्रपतींच्या घराण्याच्या वारसदार असणाऱ्या श्रीमंत राणीसरकारांसमोर कथन करणार आहे. हा माझ्या आयुष्यातला अलौकिक भाग्ययोग आहे. पण दुसरीकडे मनावर थोडा ताणही आहे. खरं तर  मला व्याख्यान नवीन नाही. यापूर्वी मी विदर्भ-मराठवाडय़ात शे-पाचशे छोटी-मोठी व्याख्यानं दिली आहेत. पण पश्चिम महाराष्ट्रात- त्यातही सातारच्या गादीसमोरचं आज हे माझं पहिलं व्याख्यान आहे. मोजून एकशे वीस मिनिटं मी बोलणार आहे. वाक्य आणि वाक्य मी चिरेबंदी बांधलेलं आहे. मला एकच चिंता आहे. माझ्या आवाजाला एक विशिष्ट रिंग आहे. एक नाद आहे. सुरुवातीच्या काही मिनिटांत ती रिंग मला मिळायला हवी. ती मिळेपर्यंत माझी छाती धडधडत राहील. एकदा त्या रिंगमध्ये माझा आवाज गेला की मला काळजी नाही. पुढे मी श्रोत्यांना हलू देणार नाही..’’ असं पुढे बराच वेळ अतिशय गंभीर, शांत, खालच्या सुरात बाबासाहेब जणू स्वतशीच बोलत असावेत तसं बोलत होते. मी एकटा श्रोता होतो. थोडय़ा वेळानं आम्ही मुक्कामी गेलो.

पाच-साडेपाचला आम्ही निघालो. पांढरा पायजमा, शर्ट आणि काळसर रंगाचं जाकीट बाबासाहेबांनी घातलं होतं. तेव्हा ते ऐन चाळिशीत होते. फार छान, तडफदार दिसत होते.  निघताना त्यांच्या चेहऱ्यावर मला आत्मविश्वास दिसत होता. आम्ही जलमंदिरात पोचलो. गर्दी अगदी तुरळक होती. फार तर दीड-दोनशे लोक होते. सुरुवातीचे मानपानाचे उपचार झाले आणि बाबासाहेब माईकपाशी आले. त्यांनी ‘आदिशक्ती श्री तुळजाभवानी..’ शब्द उच्चारले.

पहिल्याच वाक्यात त्यांना हवा असणारा सूर, रिंग मिळाली. आणि सुरू झाला बाबासाहेबांच्या वक्तृत्वाचा एकपात्री रंगमंचीय आविष्कार!

पुढचे दोन तास बाबासाहेबांच्या वाणीचा प्रवाह अखंड वाहत होता. कधी खळाळत, कधी धबधब्यासारखा धडाडत, कधी डोहासारखा शांत, गंभीर! त्यांच्या पहिल्या वाक्यापासूनच सारा श्रोतृवृंद थेट तीन शतकांपूर्वीच्या शिवकालात पोहोचला होता आणि पुढचे दोन तास बाबासाहेबांबरोबर त्याच काळात वावरत होता.

पहिल्या दिवसाच्या बाबासाहेबांच्या या व्याख्यानाचा सनई-चौघडा दुसऱ्या दिवशी साताऱ्यात इतका निनादला की दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या व्याख्यानासाठी जलमंदिरात गर्दीचा महापूर लोटला. लोकांची इतकी खच्चून दाटी झाली होती की बाबासाहेबांना व्याख्यानासाठी व्यासपीठाकडे जायला कशीबशी वाट काढावी लागली.

सलग दहा दिवस सारे सातारकर केवळ व्याख्यानाच्या वेळीच नाही, तर दिवस-रात्र शिवकालात जगत होते. बाबासाहेबांच्या वक्तृत्वाची मोहिनी त्यांच्या कानात सतत रुंजी घालत होती.

आपल्या दैवताचं- शिवछत्रपतींचं गुणगान गाताना हा शिवशाहीर थकत नव्हता. आणि त्यांच्या मुखातून उधळलेले शब्दांचे मोती वेचताना श्रोत्यांचंही भान हरपलेलं होतं.

दहा दिवसांचा बाबासाहेबांनी साकारलेला हा ‘शिवचरित्रयाग’ प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मला लाभलं, ही बाबासाहेबांकडून मला मिळालेली मर्मबंधातली ठेव आहे!

पुढच्या आयुष्यात बाबासाहेबांची अनेक व्याख्यानं मी ऐकली. पण सातारच्या जलमंदिरात झालेलं त्यांचं पहिलं व्याख्यान आजही माझ्या कानात आहे. ते व्याख्यान, त्याची आटीव-घोटीव मांडणी, स्वच्छ, पण टिपेला जाऊनही थोडाही कर्कश न झालेला आवाज आजही मला ऐकू येतो.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dilip majgaonkar article remembering babasaheb purandare zws

Next Story
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : मातीचे डाग पायावर घेऊन वावरणारा साहित्यिक
ताज्या बातम्या