पुस्तक परीक्षण : नैतिक प्रश्न उभे करणाऱ्या विज्ञानकथा

वैज्ञानिक संशोधनातील गुंतागुंतीचा भाग वाचकांना सहज कळू शकेल अशी भाषिक शैली आहे. 

डॉ. नीलांबरी मंदार कुलकर्णी neelambarkulkarni@yahoo.com
दीनानाथ मनोहर हे कादंबरीकार, कथाकार म्हणून मराठी साहित्यविश्वात सुपरिचित आहेत. त्यांनी ‘रोबो’, ‘कबीरा खडा बाजार में’, ‘मन्वंतर’ यांसारख्या कादंबऱ्यांतून समकालीन संस्कृतीची चिकित्सा केली आहे. ‘डायनासोरचे वंशज’ या त्यांच्या विज्ञानकथा संग्रहातील कथांच्या आशयसूत्रांमध्येही वैज्ञानिकतेबरोबरच संस्कृतीचिकित्सेचा धागा जोडला गेल्याचे सुस्पष्टपणे दिसते. समकालीन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या संग्रहात दहा कथा आहेत. विज्ञानकथा हा भविष्यवेधी कथनप्रकार असतो. विज्ञानकथेमध्ये वर्तमानातील विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे मानवजातीवर भविष्यात काय परिणाम होतील, किंवा भविष्यात विज्ञान-तंत्रज्ञान कसे विकसित होईल आणि त्याचे मानवी नातेसंबंध, समाजजीवनावर काय परिणाम होतील, याचा काल्पनिक वेध घेतलेला असतो. त्यात फँटसीला महत्त्वाचे स्थान लाभलेले असते.

या संग्रहातील ‘स्क्रीन कॉन्टॅक्ट’, ‘डायनासोरचे वंशज’ यांसारख्या कथांतून भूतकाळातील मानवी जीवन, संस्कृती आणि वर्तमानकाळातील वैज्ञानिक संशोधनाच्या पायावर फँटसीचा आधार घेत अज्ञात व गूढ जीवसृष्टीचे धागे मानवी जीवनाशी जोडून रहस्यमय व उत्कंठावर्धक कथानके आकाराला आली आहेत. गिमबुटास या इतिहास संशोधक स्त्रीने युरोपमधील रोमन साम्राज्यापूर्वी क्रेट द्वीपावर अस्तित्वात असलेल्या मिनोयान या संस्कृतीवर केलेल्या संशोधनाचे तपशील ‘स्क्रीन कॉन्टॅक्ट’ कथेमध्ये येतात. ते वास्तव आहेत. ई-मेलद्वारे येणारी स्क्रीनसेव्हर किंवा वेगवेगळी डाऊनलोडेबल अ‍ॅप्स आणि त्यातून संगणकात शिरणारे व्हायरस हे वास्तव तर आता आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग बनून गेले आहे. पण त्यांची सांगड घालून अज्ञाताविषयी मानवी मनाला असणारे भयमिश्रित कुतूहलाचा वापर करत ही कथा आकारास येते.

‘डायनासोरचे वंशज’ कथेत मानवी मेंदूची उत्क्रांती, रेप्टालियन मेंदूच्या संदर्भातील संशोधन आणि त्याची मानवी मन, प्रवृत्ती, स्वभावधर्म यांच्याशी सांगड घातली गेल्याने रोचक व थरारक नाटय़ आकारास आले आहे. यातही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर रेप्टालियन वंशाशी नाते असण्याबाबत  झालेले आरोप इत्यादी तपशील वास्तवाशी नाते सांगणारे आहेत. ‘अनुत्तरित प्रश्न’ या कथेचा विषय अनोखा आहे. ध्वनींच्या तुकडय़ांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचनांतून असंख्य चिन्हे तयार होऊ शकतात. मोर्स कोडसारखी टेलिग्रामची भाषा त्यातूनच आकाराला आली आहे. पण दैनंदिन जीवनात सातत्याने येणाऱ्या लयबद्ध आवाजाच्या पॅटर्नमध्ये कोणाला असे संदेश मिळू लागले तर..? या अनोख्या कल्पनेभोवती गुंफली गेलेली ही छोटीशी कथा मात्र विज्ञानकथेपेक्षा रहस्यकथेच्या अंगाने जाते. कारण ती पारलौकिक शक्तींचा अप्रत्यक्षपणे निर्देश करते.

चतुर्मिती विश्व किंवा आपल्या त्रिमिती विश्वापलीकडे अस्तित्वात असणारी विश्वे आणि त्यांचे आपल्या विश्वाला छेदून जाणे, हे वैज्ञानिक सत्य आणि त्यातून निर्माण झालेल्या बम्र्युडा ट्रँगलसारख्या आख्यायिका सामान्य माणसाला चक्रावून टाकतात. ‘तिळा, उघड’ ही कथा त्यावरच आधारित आहे. ‘अस्तंभ्याची ढाल’ या कथेत अशाच प्रकारे दुसरे विश्व व तेथील किंवा परग्रहावरील जीवसृष्टी यांना अश्वत्थाम्याच्या पौराणिक मिथकाची जोड कशी दिली आहे, ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ‘अखेर’ या कथेत स्थळकाळाची मर्यादा ओलांडून भविष्यात प्रवेश करणाऱ्या एका जेनेटिक इंजिनीअर स्त्रीची कहाणी उलगडते. या आणि ‘संस्कार’ या कथेतून भारतीय समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेचे दर्शन घडते. पुरुषसत्ताक व्यवस्थेतील शोषणाचे दर्शन सूक्ष्म रूपात घडतेच; पण वैज्ञानिक संशोधनाचे सूत्र वापरून त्या मूल्यांविरुद्ध प्रश्न विचारले जातात, बंडखोरीही केली जाते.

या संग्रहातील कथांमध्ये दमदारपणे येणाऱ्या संस्कृतीचिकित्सेच्या या घटकाचा महत्त्वाचा भाग म्हणजे या कथांतून प्रकट झालेले नैतिक भान होय. ‘हिरव्याकंच वृक्षराजीच्या साम्राज्यात’ या कथेत कॉर्पोरेट सेक्टरद्वारा आदिवासी आणि स्थानिक समाजाचे अत्यंत सोफिस्टिकेटेड पद्धतीने शोषण होत असते. या शोषणाचा दंभस्फोट तर घडवला जातोच, पण हायबरनेशनसारखी दीर्घनिद्रेची अवस्था मानवी समाजावर लादली जाणे योग्य आहे का, यासारख्या नैतिक प्रश्नांनाही ही कथा भिडते. माणसाच्या मूलभूत स्वातंत्र्याचे, अस्तित्वाचे, मानवी समाजाच्या आत्मभानाचे प्रश्न सूचकपणे  ती उपस्थित करते. भांडवलीशाही बाजारव्यवस्था वैज्ञानिक शोधांचा वापर ज्या पद्धतीने करते ते आधुनिक समाजाचे शोकात्म अध:पतन होय. ‘अवघे धरू सुपंथ’ या शिक्षण क्षेत्राशी संबंधित कथेतूनही हीच  शोकांतिका व्यक्त झाली आहे. अध्ययनशास्त्राचे म्हणजे अभ्यास करण्याच्या पद्धतीचे एक आमूलाग्र नवे तंत्र विकसित करणाऱ्या संशोधकांच्या जीवावर उठण्याइतपत कॉर्पोरेट मल्टिनॅशनल्स धोकादायक असू शकतात, हे या कथेतून दिसते.

उत्कंठावर्धकता, रहस्यमयता ही या संग्रहातील कथांच्या रचनेची वैशिष्टय़े आहेत. त्यासाठी फँटसीबरोबरच निवेदन पद्धतीचा चांगला वापर करून घेतला आहे. बहुतेक कथांचे निवेदन प्रथमपुरुषी पद्धतीने झाले आहे. त्यामुळे निवेदक पात्राला माहीत नसलेल्या अनेक गोष्टींचे रहस्य राखणे शक्य झाले आहे. किंवा तृतीय पुरुषी निवेदक असला तरी तो एखाद्या पात्राचा दृष्टिकोण स्वीकारतो. उदा. ‘स्क्रीन कॉन्टॅक्ट’   कथेतील निवेदक चंदन या पात्राच्या दृष्टिकोणातून कथा सांगतो, त्यामुळे चंदन कॉम्प्युटरवर काम करत असताना स्क्रीनसेव्हर चालू झाला की नेमकं काय घडतं, हे चंदनला समजत नाही. निवेदकाने त्याच्या दृष्टिकोणाची मर्यादा स्वीकारल्याने तोही त्या घटनांचे निवेदन करत नाही व रहस्यमय उत्कंठा पेरली जाते. फ्लॅशबॅक तंत्र (‘अवघे धरू सुपंथ’), नायिकेने लिहिलेल्या दैनंदिनीचा रूपबंध, दोन निवेदक (‘तिळा, उघड’), प्रसंगातील महत्त्वाचे तपशील दडविणारी कुतूहलजनक सुरुवात (‘अस्तंभ्याची ढाल’, ‘तिळा, उघड’), वाचकांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारा खुला शेवट (‘स्क्रीन कॉन्टॅक्ट’, ‘डायनासोरचे वंशज’) यांसारखी वेगवेगळी रचनातंत्रे वापरून विज्ञानकथेला आवश्यक तो फँटसीयुक्त भविष्यवेधी कोडय़ाचा रूपबंध निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. वैज्ञानिक संशोधनातील गुंतागुंतीचा भाग वाचकांना सहज कळू शकेल अशी भाषिक शैली आहे.  सामान्यत: शहरी भागात वापरली जाणारी प्रमाणभाषाच निवेदन व संवादासाठी वापरली असली तरी पात्रांच्या सामाजिक दर्जानुसार भिल्ली बोलीसारख्या बोलीतही संवाद आले आहेत. कथांमागे दडलेल्या मानवतावादी व चिकित्सक दृष्टिकोणामुळे लक्षणीय झालेला हा विज्ञानकथा संग्रह वाचकांना विचारप्रवृत्त करेल आणि रोचकही वाटेल.

‘डायनासोरचे वंशज’-  दीनानाथ  मनोहर, समकालीन प्रकाशन,

पाने : १८४, किंमत : २५० रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dinosaurche vanshaj book by dinanath manohar zws

ताज्या बातम्या