सामान्यपणे सगळ्यांची नावडती चव म्हणजे कडू. म्हणूनच कारल्याची भाजी, मेथ्यांची आमटी या पदार्थाना प्रत्येक घरात भरपूर विरोधक असतात. पण कडू चवीची गंमत अशी आहे, की ती स्वत: चविष्ट किंवा रुचकर नसली तरी रुची वाढवणारी आहे. आयुर्वेदशास्त्राच्या मते, मनुष्याचे प्राय: सर्व आजार हे अग्निमांद्यजन्य असतात. साहजिकच सगळ्या आजारांत अन्नावरील वासना उडणे, तोंडाला चव नसणे ही लक्षणे आढळतातच. ही तोंडाची गेलेली चव परत आणण्याचं सामथ्र्य कडू रसात आहे. आयुर्वेदाची औषधे कडू असतात, अशी तक्रार करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं. (रसांचं काम जिभेपासून सुरू होतं. त्यामुळे कडू औषधावर गोड आवरण घालावं, किंवा त्याच्या कॅप्सुल्स बनवाव्या, किंवा गोड सिरप बनवावं, या अपेक्षा अशास्त्रीय आहेत. जिभेच्या चोचल्यांनी झालेल्या आजाराचं प्रायश्चित्त जिभेला नको? ये बहुत नाइन्साफी हैं.)
आता इतक्या नावडत्या चवीचं कुणी चुकून तरी अतिसेवन करू शकेल का? पण जगात काहीही घडू शकतं.
माधुरी ही चाळिशीची तरुणी माझ्याकडे आली ती वजन कमी होतंय, अशी तक्रार घेऊन. तिच्या आहारात, दिनचय्रेत त्याचं काही कारण सापडेना. तेव्हा मी तिला विचारलं, ‘काही औषध घेते आहेस का नियमित?’
‘हो, ते सांगायचं राहिलंच. मी रोज महासुदर्शन काढा घेते.  दररोज चार-चार चमचे घेते- दोन वेळा.’
‘रोज? कशासाठी? किती दिवस झाले? आणि कुणी सांगितलं हे?’ मी प्रश्नांची सरबत्तीच केली.
‘कुणी नाही सांगितलं. मी मनानेच घेते. चांगला असतो ना तो काढा, म्हणून. वर्ष झालं- घेतेय.’ अशावेळी वैद्य shocks, दुसरं काय?
कडुनिम्बाचा रस, कारल्याचा रस, भिजवलेले मेथीचे दाणे, कोरफडीचा रस अशा कडू पदार्थाचं स्वत:च्या मनानं दीर्घकाळ सेवन करणारे पुष्कळ लोक असतात.
कडू हा रस वायू आणि आकाश या दोन महाभूतांच्या आधिक्यानं बनतो. साहजिकच तो पचायला हलका आणि अग्निदीपक आहे. आपल्या रोजच्या आहारात या रसाचे पदार्थ मोजकेच असतात. हळद, जिरे, शहाजिरे, िहग, मोठी वेलची, जायपत्री असे मसाल्याचे पदार्थ कडू आहेत. पडवळ, वांगी, कारले अशा भाज्याही कडू आहेत. गुडूची (गुळवेल), गोजिव्हा, आघाडा, सातला, अरिष्ट, मंडुकपर्णी अशा अनेक उत्तमोत्तम कडू भाज्या तर आज शहरांतील लोकांना माहीतही नाहीत. (रंगीबेरंगी परदेशी भाज्यांचं आपलं आकर्षण वाढत चाललंय.) चंदन, वाळा हे कडू पदार्थ सरबतरूपात कधीतरीच पोटात जातात.
तोंडाला चव नसणे, विष, कृमी, ताप, शरीराची व कुठल्याही एका अवयवाची आग होणे, त्वचाविकार, खाज यांचा नाश करण्यात कडू पदार्थ श्रेष्ठ असतात. मेद, वसा, पित्त, कफ, मूत्र यांचं  शोषण करून शरीरात त्यांची फाजील वाढ होऊ न देण्याचं काम हा रस चोख करतो. अग्निदीपन, पाचन, मेदाचं लेखन, आवाज (स्वर) आणि आईचं दूध (स्तन्य) यांचं शोधन ही या रसाची अन्य कामं म्हणजे मनुष्याला जणू बोनसच. हा रस काहीसा रूक्ष आहे. त्यामुळे कडू पदार्थाबरोबर पुरेसा स्नेह वापरावा. आपल्याकडे भाज्यांना तेलाची फोडणी असते ती त्यासाठीच. (म्हणूनच मग कडूझार कारल्यासाठी सुग्रणीचा तेलावरचा हात आपोआपच सढळ होतो.)
कडू रसाचं वैशिष्टय़ म्हणजे तो मेध्य आहे. मेधा म्हणजे बुद्धिमत्ता. तिची परीक्षा ग्रंथादी धारणशक्तीने करावी, असं चरकाचार्य सांगतात. वाचून, ऐकून, बघून प्राप्त केलेली माहिती किती आणि किती काळ स्मृतीमध्ये धारण केली जाते, यावरून ‘मेधा’ निश्चित होते. ब्राह्मी, शंखपुष्पी, ज्योतिष्मती, गुडूची, मंडूकपर्णी ही सर्व मेधावर्धक द्रव्ये कडू आहेत. पूर्वी भाज्यांच्या स्वरूपात यांचा आहारात समावेश असे.
या रसाचं अति सेवन केलं तर शरीरात रुक्षता आणि हलकेपणा वाढतो. रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र असे  सर्वच धातू क्षीण होतात. वजन कमी होतं. रुक्षतेमुळे निरनिराळे वातव्याधी (उदा. सांधेदुखी, मलावष्टंभ, मणक्यांचे आजार, कंप, वेदनाप्रधान आजार) त्रास देऊ लागतात. केस, त्वचा, नखं, डोळे, आवाज यात रुक्षता जाणवते.  म्हणूनच ‘अति सर्वत्र वर्जयेत्’, हेच खरं.
आपल्या आहारातला सहावा रस म्हणजे तुरट रस. हे पदार्थही कुणी फार चवीनं  खातात असं नाही. आहारातील या रसाचे पदार्थ म्हणजे आवळा, जांभूळ, कवठ, मध, इत्यादी. प्राय: सर्व डाळींचा रस तुरट-मधुर असतो असं वाग्भटाचार्य म्हणतात. याशिवाय हिरडा, बेहडा, सुपारी, कात हे पोटात जाणारे अन्य तुरट पदार्थ. गंमत म्हणजे ताकाची मुख्य चव आंबट असली तरी अनुरस (गौणरस) तुरट आहे. ताक पाचक तर आहेच, पण त्याच्या तुरट रसामुळे ते तोंडातील लाळेपासून एकेक स्त्राव कमी करू लागतं. तशीही  जेवण पूर्ण झाल्यावर लाळेपासून क्रमश: सगळ्या स्त्रावांची  शरीराची गरज कमी कमी होत जाते. म्हणून जेवणाच्या शेवटी ताक प्यावं.  
वायू आणि पृथ्वी या दोन टोकाच्या महाभूतांपासून तयार होणारा हा रस रुक्ष आणि शीत आहे. पचायला मात्र हा खूप जड असतो. कफ, पित्त, रक्त यांची फाजील वाढ/ प्रकोप तो होऊ देत नाही. मलप्रवृत्ती पातळ होत असेल तर तुरट पदार्थानी ती व्यवस्थित होते. या रसामुळे जखमा लवकर भरून येतात. त्वचेचा वर्ण सुधारतो.
तुरट रस अति प्रमाणात खाल्ला तर शरीरातील रुक्षता वाढते. स्त्राव कमी होतात, त्यामुळे तहान वाढते. शुक्राचा स्त्रावही कमी होतो. आतडी शुष्क होऊन त्यांच्या हालचाली मंदावतात. पोट डब्बा भरल्यासारखं वाटतं. वर्ण काळवंडतो. पक्षाघात, झटके असे मोठे वातविकारही यातून उद्भवू शकतात.
वैद्यक व्यवसायात अगदी नवीन असतानाची गोष्ट- एकदा माझ्याकडे २४-२५ वर्षांचा एक तरुण आला होता. त्याची समस्या अशी होती की, त्याचा जबडा पूर्ण उघडत नव्हता. पुरुषांच्या हातरुमालाच्या पाच घडय़ा घातल्या तर तोही त्याच्या तोंडात जाणं कठीण झालं होतं. स्वत:ची बोटंसुद्धा तो तोंडात नीट घालू शकत नव्हता. शिवाय त्याची जीभ जड झाल्यानं त्याचे शब्दोच्चारही नीट कळत नव्हते. ‘हा कॅन्सर आहे का? याचं काही शस्त्रकर्म करता येतं का?,’ अशा बऱ्याच चौकशा इतरत्र करून नंतर तो माझ्याकडे आला होता. मग त्यानंच कबुली दिली, की तो सुपारीयुक्त सुगंधी मावा खायचा. किती? तर दिवसाला २०-२५ पाकिटं. त्यावेळी ‘कषायो जडयति जिव्हां, बध्नाति कण्ठम’ (म्हणजे तुरट रस जीभ जड करतो आणि कंठ बांधून/ आवळून टाकतो.) हे ग्रंथातील सूत्र आठवलं.
षड्रसांबद्दलची ही सगळी माहिती वाचून रसांचं योग्य प्रमाण कसं ठरवायचं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असणार. आपल्या आहारातील पोळी, भात, भाकरी हे मुख्य पदार्थ गोड असतात. बाकीचे सगळे पदार्थ हा तीन किंवा जास्त रसांचा संयोग असतो. वरणापेक्षा भाजी कमी, भाजीपेक्षा कोिशबीर कमी, त्यापेक्षा चटणी कमी.. या नियमात रसांच्या योग्य प्रमाणाचं नियोजन अगदी उत्तम साधता येतं. आता तर आपल्याला रसांचे गुण आणि कामे माहीत झाली आहेत. खाल्लेल्या आहाराचे शरीरावर होणारे परिणाम बघून आपल्यालाही  अंदाज येऊ शकतो. नाहीतर वैद्य आहेतच की सर्वत्र!                      

 

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…