अतुल देऊळगावकर
संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाच्या वसुंधरादिनी (२२ एप्रिल) ‘आपल्या ग्रहासाठी गुंतवणूक’ असा विषय निवडला आहे. आपण दिवसेंदिवस निसर्गाला पारखे होत चाललो आहोत. माणसाच्या निकोप वाढीसाठी आणि त्याच्या मन:स्वास्थ्यासाठीही निसर्गाशी असलेलं त्याचं मूळचं नातं पुनस्र्थापित करणं हाच पृथ्वी आणि मानवाला वाचविण्याचा एकमेव मार्ग आहे..
वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचा ‘कोलाहल’ हा काव्यसंग्रह जनअरण्य व मनअरण्य या दोन्हींचाही ठाव घेणारा आहे. ओळख व जवळीक असलेल्या संस्कृतीच्या सर्व खुणा सभोवतालातून कशा हद्दपार होत आहेत, नातीगोती, वाद-संवाद कसे हरवत चालले आहेत, अशा अविवेकी विकास व निर्घृण शहरीकरणामुळे आलेल्या ‘रोकड’ व्यवहारातून संवेदनशीलताच नाहीशी झाल्याने कवीमन कासावीस झालं आहे. संयमित, तरीही प्रखर शब्दांतून त्यांचं काळाविषयीचं भाष्य सुन्न करणारं आहे. त्यांच्या ‘ओझोन व्हॅली’ (२००८) कवितेत ते म्हणतात..
‘लाव सुरुंग उडव डोंगर रस्त्यावर आण ओकेबोके तुडव तुडव तुडव खडे चार खडे बोल घशात घाल गाडून टाक माणसं फाडून टाक आकाश होऊन जाऊ दे एकदा आरपार पृथ्वी. ’
तर पुढच्या पिढय़ांना अशा रया गेलेल्या पृथ्वीचा वारसा मिळणार! मोकळी मदानं व जागा नसलेली, बेसूर, भेसूर, उर्मट, कर्कश्श व एकसाच्यातली शहरं वाटय़ाला येणार. रवींद्रनाथ, मोहनदास गांधी व कृष्णमूर्ती असल्यांचं काहीबाही ऐकून बिचाऱ्या अनंत धिमनवार यांनी अशी कल्पना केली होती..
‘छप्पर भिंती खडू फळ्याविण, अशी असावी शाळा
पुस्तक पाटी नको, नसाव्या अभ्यासाच्या वेळा’
आता पटांगणांविना (उदास) शाळा व उद्यानांविना (सुन्न) शहरं होत चालली आहेत. गावांनीसुद्धा हीच वाट धरली आहे. आपण मुलांना भिंतींमधल्या कोंडवाडय़ात गुंतवलं. उपकरणं आणि चिमुकल्या ते मोठय़ा पडद्यांच्या जगात ढकललं. परिणामी मुलं निसर्गाला पारखी होऊ लागली. ही प्रक्रिया आपल्याकडे चालू वर्तमानकाळ आहे. धनवान देश याबाबतीतही आपल्या पुढे होते. तिकडे १९८० पासूनच विकासाचा अविचारी वरवंटा तयार केला गेला. काही विवेकी लोक ‘विकास’फळांकडे लक्ष ठेवून होते. अमेरिकेत व युरोपात बागेत मुलांचं खेळण्याचं प्रमाण काही वाढत नव्हतं. अतिदक्ष पालकांना मुलं बागेत एकटी गेल्यास त्यांच्या सुरक्षिततेची भीती वाटू लागली. लहान मुलं बाहेर खेळताना दिसेनाशी झाली. पाहता पाहता सगळेच घरकोंबडे व एकलकोंडे होऊन गेले. अमेरिकी पत्रकार व लेखक रिचर्ड लुव्ह यांनी बालक, पालक व मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी सलग दहा वर्ष संवाद साधला. लुव्ह यांनी ‘लास्ट चाइल्ड इन वुड्स : सेव्हिंग अवर चिल्ड्रेन फ्रॉम नेचर डेफिसिट डिसऑर्डर’ (२००५) या पुस्तकात ‘‘निसर्गापासून फारकत घेतलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होत असून, ती घाबरट होत आहेत. त्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमता अतिशय मर्यादित असतात. त्यांच्यात होणाऱ्या अनेक मनोविकारांची पायाभरणी ही बालपणातच होते..’’ असं निदान केलं आहे. ते या अवस्थेला ‘निसर्ग कमतरतेचा विकार’ असं संबोधतात. अलीकडच्या काळातील वेगवेगळ्या निरीक्षणांतून असेच निष्कर्ष येत आहेत.

२०१० साली समृद्ध देशांत ५० टक्के, तर अविकसनशील देशांत ८०-९० टक्के तरुण नराश्यग्रस्त असल्याचं सर्वेक्षणात आढळलं होतं. मनोविकारांची जागतिक साथ आली असून, तिचं प्रमाण वाढत असल्याचं तज्ज्ञ सांगू लागले. असुरक्षिततेची भीती, नात्यांतील तणाव व चिंता यामुळे नराश्यग्रस्त वाढीस लागले. जगभरातील अनेक ज्ञानशाखांचे संशोधक वाढत्या मनोविकारांमुळे अस्वस्थ झाले. त्यामुळे २०१२ साली ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने ‘निसर्गबंध व बालक’ या विषयावर जागतिक परिषद भरवली. दक्षिण कोरियाच्या जेजूमध्ये आयोजित केलेल्या या परिषदेमध्ये १५० राष्ट्रांचे १०,००० प्रतिनिधी जमले होते. तिथे ‘निरोगी पर्यावरण आणि निसर्गाशी बंध जोडण्याचा बालकांचा हक्क’ सर्वानुमते संमत झाला. परिषदेने ‘जनतेचं आणि विशेषत: बालकांचं निसर्गाशी असलेलं नातं तुटत चाललं आहे. पुढे चालून ज्यांना निसर्गाचा सांभाळ करावयाचा आहे असे बालकच त्यापासून तुटून निघाले तर निसर्ग आणि बालक यांचं भविष्य कसं असेल? मुलांना निसर्गापासून दूर करणं हे भयंकर क्रौर्य असून, त्यामुळे मुलांची आकलनक्षमता व सर्जनशीलता मंदावत आहे. त्याचा त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. अशा शतखंडित जगाला सांधण्यासाठी व बांधण्यासाठी शांततेची नदी खळखळून वाहू देणं आवश्यक आहे..’ असा ठराव मंजूर केला. असे प्रयत्न अनेकांना कृतीप्रवण करत राहतात.
आता आपल्याला अरण्यकांड, प्राण्यांची होळी याबद्दल यित्कचितही खंत वाटत नाही. निसर्गविनाशाने हळहळणाऱ्यांना ‘प्रॅक्टिकल’ नसल्याच्या शिव्या खाव्या लागतात. पर्यावरणीय तत्त्वज्ञ पॉल शेफर्ड मानवी वेडाचाराची चिकित्सा करताना म्हणतात, ‘निसर्गाशी जवळीक असल्यास निसर्गातील व्यवहार अनुभवत ‘स्व’पलीकडे पाहणं स्वाभाविक असतं. शहरीकरणाचा वेग वाढत गेल्यानंतर शहरवासीयांची बाल्यावस्थेतच निसर्गापासून फारकत होत गेली. बालकांचं बाहेर पडून बागडणं बंद होत गेलं, तसतशी बालपणापासूनच आत्मकेंद्रीतता वाढत गेली. ‘स्व’पलीकडील जग आकसत गेलं. अस्सल व आतून येणारं निसर्गप्रेम आटत गेलं. त्याचं उत्परिवर्तन होऊन ती लटकी माया उद्यानं व प्राणिसंग्रहालयांत क्वचित वा किंचित शोभेपुरती वा रंजनापुरती ठेवली गेली. तिथूनच निसर्गनाशाविषयी अलिप्तता, दुरावा निर्माण होत गेला. (स्वत:पासूनही दुरावण्याची आणि एकाकी होण्याची बीजे इथेच पडत गेली.) उलट, निसर्गाला नगण्य लेखण्याचे संस्कार होत गेले. माणूसकेंद्री विचार दृढ होत राहिले. निसर्गाविषयी भय आणि संशय बळावत चालला. युरोप-अमेरिकेत अशा पिढय़ान् पिढय़ा घडत गेल्या. निसर्गावर अमर्याद नियंत्रण व मालकी प्रस्थापित करून शक्य तितक्या व वाढत्या वेगाने संपत्तीची निर्मिती करणे हेच उद्योगांचे व औद्योगिकीकरणाचे उद्दिष्ट राहिले. ही विचारसरणी होत गेली. भाषा बदलत गेली. कृत्रिमता वाढत गेली. त्यातून एकसुरी संस्कृतीचा समाज (मोनोकल्चर) निर्माण करण्यासाठी जागतिकीकरणाचा वेडाचार अथकपणे चालू झाला.’
आपल्या मनाची घडण कशी घडत गेली, याचा शोध घेताना फ्रॉइड यांना अबोध मन महत्त्वाचं वाटलं, तर त्यांचे शिष्य युंग यांना समूहाचं अबोध मन कारणीभूत वाटलं. डॉ. थिओडोर रोझॅक हे कामभावना, मिथके-प्रतीके यापलीकडे जाऊन अबोध मन व निसर्ग यांच्या नात्याचा वेध घेऊ लागले. ‘निसर्ग ही माणसाच्या अबोध मनात दडलेली उपजत प्रेरणा आहे. त्यामुळेच जन्मापासूनच चंद्र-तारे, नदी-नाले, वृक्ष-वेली, फुले-फळे यांच्याविषयी त्याला आस्था व ओढ असते,’ असं सांगून रोझॅक यांनी पर्यावरणीय अबोध मनाची (इकॉलॉजिकल अनकॉन्शस माइंड) महती सांगितली. निसर्ग व मानव यांच्यातील आदिबंध हा धर्म, तत्त्वज्ञान, आदर्शवाद याहूनही अधिक दृढ, सघन व खोल आहे, याकडे लक्ष वेधण्याचं ऐतिहासिक कार्य रोझॅक यांनी केलं आहे.
अनेक कूट प्रश्नांचा पाठपुरावा करणाऱ्या फ्रॉइड यांनी ‘मी कोण?’सारखाच मूलभूत महाप्रश्न (अनेक उपप्रश्नांना जन्म देणारा) उपस्थित केला. यातूनच निर्माण झालेल्या ‘मानव आणि विश्व , मानव आणि निसर्ग यांच्यात काही नातं आहे का?’ या प्रश्नाचं उत्तर देताना मात्र ते समग्र विचार करू शकले नाहीत. ते म्हणाले, ‘या विश्वामध्ये जिवाची आणि मानवी मानस यांची निर्मिती ही एक विक्षिप्त घटना म्हणता येईल.’ त्यांचा मानवी मानसाबाबतचा हा सुटा दृष्टिकोन आजही मानसशास्त्राच्या मानगुटीवर बसून राहिला आहे. त्यामुळे तो केवळ वैयक्तिक पातळीपर्यंत अडकून राहिला होता. विश्व हे अफाट व अथांग आहे, तसंच मनोविश्वदेखील अमर्याद आहे. त्याला ती विश्वात्मकता देऊन रोझॅक यांनी या महाप्रश्नाच्या व्याप्तीचा विस्तार केला.
पृथ्वीचीच पिळवणूक करण्याच्या मनोवृत्तीतून निर्माण झालेल्या सध्याच्या शहरकेंद्री औद्योगिक संस्कृतीकडून पर्यावरणीय अबोध मनाचे निष्ठुरपणे दमन केलं जात आहे. या संस्कृतीने पर्यावरणविरोधी लोकस्वभाव (इथॉस) तयार करण्यातच गुंतवणूक केली आहे. आता त्यातून बाहेर पडून मानसशास्त्रज्ञांनी फ्रॉइडसारखी धीरोदात्त भूमिका घेत संपूर्ण मानवी संस्कृतीचं मनोविश्लेषण केलं पाहिजे. सध्याची धोरणे मानव व निसर्ग या दोघांचाही पराभव करणारी आहेत. याउलट, ती परस्परांचे रोगनिवारण करणारी असावीत. पर्यावरणयुक्त मानसशास्त्रावर आधारित परिसरोपचार (इकोथेरपी) अधिक खोलवर रुजणं गरजेचं आहे. आपलं वर्तन निसर्गप्रेमी असलं तरच आपलं पर्यावरणीय अबोध मन निरोगी होत जाईल आणि पृथ्वीचा जीर्णेद्धार होऊन ती पूर्ववत होईल. थोडक्यात, निसर्ग व मानव हे अद्वैती सूत्र केंद्रस्थानी आणून त्याचं तत्त्वज्ञान व मानसशास्त्र निर्माण होणं आवश्यक आहे. त्यातून नवीन जग तयार होऊ शकेल.. अशी मांडणी करून जगातील तत्त्वज्ञ व मानसशास्त्रज्ञ प्रयत्नांना लागले आहेत.
सध्या चालू असलेल्या व वाढत चाललेल्या निसर्गविनाशाकडे माणूस कसं व का पाहतो, यावर कसून संशोधन चालू आहे. आजवर पर्यावरण चळवळींनी उपभोगवाद व चंगळवादी शैलीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. शहरवासीयांच्या गुन्ह्य़ांचा पाढा वाचून अपराधगंड निर्माण केला. यासंबंधी रोझॅक यांनी कठोर आत्मपरीक्षण केलं. ते म्हणतात, ‘मी संताप आवरून लोकांची भूमिका ऐकायला लागलो. ते नासाडी का करतात, त्यामागील कारणांचा विचार करायला सांगितलं. उदासीनता, हाव वा अज्ञान ही कारणं वाटत नव्हती. निसर्ग आणि त्या व्यक्ती यांच्यामधील नात्यात बिघाड झाला आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं. ते निसर्गविनाशामुळे दु:खी होत. प्रदूषणाचा वाढता पसारा त्यांना अस्वस्थ करत असे. त्यांना भूतकाळातील रम्य निसर्गाच्या आठवणी व्याकूळ करत होत्या.’
लोकांना ते जीवनशैलीच्या सापळ्यात अडकले असल्याची कधीतरी जाणीव होते. मात्र, सततच्या आरोपांमुळे लोक संतापतात आणि मग हट्टाग्रही बनतात व पुढे निर्ढावतात. त्यांच्या भावनांना दुसरीकडे वाट करून देतात. नराश्य आल्यावर खरेदी करायला जातात, एरवीपेक्षा अधिक खात सुटतात. वस्तूंची खरेदी करताना त्यांचा ताबा मिळवल्याचा, सत्ता गाजवल्याचा, प्रतिष्ठा व सन्मान लाभल्याचा आनंद त्यांना मिळतो. नंतर ते त्या सवयींच्या सापळ्यात अडकून राहतात. परंतु हे कबूल करण्यात त्यांना शरिमदेपणा वाटतो. अपराधगंड बळावत जातो. त्यामुळे हे व्यसन अव्याहत चालूच राहते. व्यसनाची व्याख्या ‘एखादे घातक, विनाशक व स्वत:स कमीपणा आणणारं वर्तन वारंवार करण्याची टाळता न येणारी सक्ती’ अशीच केली जाते. म्हणजे विषण्णता घालवण्यासाठी, त्या कोंडीतून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नांतून हा मार्ग निवडला जातो. दुष्ट भावनेतून खरेदी, उधळमाधळ व नासाडी केली जात नाही. अशा प्रकारे वाईट पर्यावरण सवयी हा सक्तीचा विकार झाला असून, तो त्यांना थांबवताच येत नाही. या वेडाला सुरेख ताíककतेची जोड दिली जाते. त्याला बाजारपेठेची साथ मिळते व त्यानुरूप अर्थव्यवस्था रचली जाते. वाईट पर्यावरणीय सवयींची मूळं इतकी खोलवर जाऊन त्याचा आता वृक्ष झाला आहे. लोकांना आपल्या कृतींमुळे कर्बउत्सर्जन वाढतंय, कचरा वाढतोय हे माहीत असूनही त्यांना आपली जीवनशैली बदलता येत नाही. दूषणं देऊन लोकांवर त्याचा काडीमात्र परिणाम होत नाही.
मग या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं कसं? काही संकल्पना व अभिकल्प (डिझाइन) यांच्यात नव्याने बदल करावे लागतील. निसर्गाकडे जाण्याचा उल्लेख आल्यास नेहमी ‘पुन्हा निसर्गाकडे’ असं म्हटलं जातं. त्यातून निसर्गाकडे जाणं म्हणजे मागं जाणं आहे असा अर्थ ध्वनित होतो. वास्तविक इथून पुढे आगेकूच करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी निसर्गाकडे जाणं आवश्यक आहे असं म्हणणं सयुक्तिक ठरेल. संपूर्ण जगभर ‘आधुनिकता = उच्च तंत्रज्ञान’ हे समीकरण बिंबवलं गेलं आहे. आता ‘आधुनिकता = उच्च निसर्ग’ हे समीकरण रुजवणं आवश्यक आहे. याचं गांभीर्य ओळखून इंग्लंडमध्ये व नंतर अनेक देशांमध्ये ‘पर्यावरणीय विद्यालय’ ही संकल्पना राबवली गेली. मुलांमध्ये निसर्गाविषयीची आवड निर्माण करण्यासाठी उद्यानयुक्त विद्यालये सुरू केली गेली. ‘निसर्गसमृद्ध जीवनाकडे’ हा परवलीचा शब्द झाला. आपलं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ठीक करण्यासाठी निसर्ग ही अत्यावश्यक बाब आहे. लुव्ह म्हणतात, ‘निसर्ग हेच आपल्या जीवनाचं सत्त्व आहे. निसर्ग म्हणजे ‘न’ जीवनसत्त्व! त्याच्या मात्रेवरच आपल्या आयुष्याची गुणवत्ता ठरते.’
आपण आपल्याला अमर मानत असलो तरी आपलं जीवन म्हणजे ‘आभाळाची क्षणिक सावली’ (त्यासाठी गोरखनाथांचं ‘भोला मन माने अमर मेरी काया’ कुमारजींकडून अनेक वेळा ऐकावं.) हे जाणून घेतलं तर प्रत्येक क्षणाचं आत्यंतिक महत्त्व ध्यानात येतं. प्रत्येक क्षण व प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. आपण काही जगातील सर्व ताणतणाव नाहीसे करू शकत नाही. तरीही आपण निसर्गासाठी काय करू शकतो? अनेक शास्त्रज्ञ व विद्वान ‘तुम्ही फक्त निसर्गावर प्रेम करा, निसर्गच त्याचे चमत्कार दाखवत राहील’ असं सांगून वेगवेगळे व छोटे छोटे कृती कार्यक्रम देत आहेत.
तान्ह्य बाळाचं आगमन होताच त्याला बाहेरचं जग दाखवा. अगदी पहिल्या दिवशी बाळाला आकाश, ढग, चंद्र-तारे, सूर्योदय-सूर्यास्त दाखवण्याची प्रथा झाली आहे. पालकांनी बालसंगोपनाच्या काळात मुलांना वेळोवेळी निसर्गाच्या जवळ घेऊन जावे. त्यांचे वाढदिवस व इतर सण साजरे करताना निसर्गापासून मिळणारा आनंद त्यांना सांगत जा. या विषयावरची पुस्तकं त्यांना भेट द्या. वनस्पती व त्यांचे उपयोग समजावून सांगा. निसर्गातील रूढ शब्दांचा साठा वाढवा. पक्षीनिरीक्षण करत आवाजावरून पक्षी/ कीटकांची ओळख करून घ्या. हे आपले सगेसोयरे आहेत, हा भावच मुळी उल्हसित करणारा आहे. संगीतज्ञ व जीवध्वनिक (बायो अॅरकॉस्टिशिअन) ब्रेनी क्रॉज हे गेल्या ४० वर्षांपासून निसर्गातील कीटक, पक्षी, मासे व प्राण्यांच्या ध्वनींचा व कूजनाचा अभ्यास करत आहेत. नसíगक आवाजांची वाद्यांच्या साहाय्याने पुनíनर्मिती करणे हा त्यांचा ध्यास आहे. ‘द ग्रेट अॅीनिमल ऑर्केस्ट्रा’ या पुस्तकात ते म्हणतात,
‘ छोटा ध्वनिमुद्रक घेऊन निसर्गात भटका. निरनिराळे ध्वनी व नाद ऐकून त्यांचे निर्माते ओळखा. पक्ष्यांची संगीत सभा ऐकणं, पशु-पक्ष्यांच्या आवाजाच्या तऱ्हा व त्यातून व्यक्त होणारे स्वभाव यातून पक्षी व प्राणी यांच्याशी जवळीक वाढायला लागते. तुकोबांनी म्हटलेला ‘मनाशी संवाद’ साधण्यासाठी हे मार्ग आहेत. तांबडं फुटताना, तिन्हीसांजेच्या वेळी व चांदण्या रात्रीत निसर्गातील विविध ऋतूंचे सोहळे पाहताना नातेवाईक व मित्र परिवारास सहभागी करून घ्या. विदुषी दुर्गाबाई भागवत व वाग्गेयकार पं. कुमार गंधर्व यांनी घडवलेलं ‘ऋतुदर्शन’ वाचा, ऐका आणि अनुभवा.
जंगलात फिरताना स्पर्श, गंध, श्रवण, दृष्टी व चव या इंद्रिय संवेदनांचा कसून वापर करावा. सापासारखी जिभेने हवेची चव घ्यावी. कानावर हाताच्या तळव्याचा फुगा ठेवून हरणाप्रमाणे वाऱ्याचा ध्वनी ऐकावा. तळवे गुंडाळून डोळ्यांवर ठेवत (दुर्बणिीसारखं) घुबडाप्रमाणे पाहावं. यामुळे जंगलभ्रमणाचा आनंद द्विगुणित होतो. मातीचा स्पर्श व गंध मुलांना सुखावतो. मुलांना मातीशी, चिखलात खेळू द्या. त्यांना मातीच्या वस्तू, खेळणी तयार करू द्या. झाडावर चढून खेळू द्या. गवतावर, टेकडीच्या उतारावर लोळू द्या. पादत्राणांविना भटकू द्या. त्यामुळे आपली पंचेंद्रियं अधिक कार्यक्षम होतात. सूक्ष्म आवाज ऐकू येऊ लागतात. सूक्ष्म बदल दिसू लागतात. असा सराव वाढत गेल्यास ‘असाध्य ते साध्य’ होऊ लागतं. आपलं सुप्त सामथ्र्य प्रकटण्यास आरंभ होतो.
भूवैज्ञानिक स्थलनिश्चिती यंत्रणा (जीऑलॉजिकल पोझिशिनग सिस्टिम) वापरून कुठेही जाणं हे आता अतिशय सोपं झालं आहे. मात्र, त्यामुळे आपल्या मेंदूला होणारं दिशांचं ज्ञान कमी होत चाललं आहे. उपकरणांमुळे एखाद्या इंद्रियाचा वापर कमी होत गेला की ते अकार्यक्षम होत जातं. आकाशातील नक्षत्रांची माहिती घेऊन तसंच जंगलामध्ये झाड, ओढा अशा खुणा लक्षात ठेवून दिशा ठरवण्याचा सराव केल्यास मेंदूचा ‘जी. पी. एस.’ प्रगत होतो.
एकंदरीत निसर्गाशी नातं जोडून निसर्गाला जोपासलं तर माणूस अधिकाधिक उन्नत होत जाईल आणि पुढच्या पिढय़ांसाठी आनंदाचा ठेवा राखता येईल. या कॅनव्हासवरच संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाच्या वसुंधरादिनी ‘आपल्या ग्रहासाठी गुंतवणूक’ असा विषय निवडला आहे. २०१८-१९ मध्ये जगातील बालकांनी स्वत:च्या भविष्याच्या काळजीपोटी वर्षभर ‘शाळा बंद’ आंदोलन केलं होतं. तेव्हापासून ते समस्त वडीलधाऱ्यांना विचारत आहेत, ‘आमच्या वाटय़ाला आणलेला ‘कोलाहल’ घालवून सुंदर जग निर्माण करण्यासाठी तुम्ही गुंतवणूक कशात करणार आहात? समृद्धीने नटलेल्या पृथ्वीची विविधता आम्ही पाहू शकू?’
atul.deulgaonkar@gmail.com

Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
adequate blood supply across maharashtra
यंदाच्या उन्हाळयात राज्यभर पुरेसा रक्तसाठा 
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….