दिवाळी अंकांचे संस्कृती उत्पादन वगैरे..

दिवाळी अंकांमधला वाङ्मयीन कचरा पाहून आम्हाला आमच्या तितक्याच मख्ख लेखकांचा वैताग येत नाही.’

पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com

मराठी साहित्यविश्वातील दिवाळी अंकांची १२१ वर्षांची वैभवशाली परंपरा यथाव्रत दरवर्षी पार पडते. यंदाही तीत खंड पडणार नाहीए. एकेकाळी सकस साहित्यनिपजेसाठी पोषक ठरलेल्या या परंपरेचं आज जे काही झालं आहे, त्याची कारणमीमांसा करता येत असली तरी त्यातून समाजाची अवनतीच प्रत्ययास येते. परंतु ही धारणा चुकीची ठरवणं हे केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे.

 ‘एकूण वाङ्मयीन परिस्थिती आणि अत्युच्च पातळीवर टिकू शकतील असे लेखक यांच्यातलं अंतर भारतात वाढतच जातंय. आपले राजकारणातले नेते निवडण्यात आपण जरी सर्रास चुका केल्या तरी दर पाच वर्षांनी मतदार किंचितसे शहाणे होतात. रस्त्यातले खड्डे किंवा कचऱ्याचे ढीग पाहून आम्हाला कॉर्पोरेटरांची आठवण होते. पण दिवाळी अंकांमधला वाङ्मयीन कचरा पाहून आम्हाला आमच्या तितक्याच मख्ख लेखकांचा वैताग येत नाही.’

– दिलीप पुरुषोत्तम चित्रे (‘तिरकस आणि चौकस’, शब्दालय प्रकाशन)

‘संस्कृतीचंच दु:स्वप्न’ या निबंधात दि. पु. चित्रे यांनी दीड-दोन दशकांपूर्वी एकूणच देशातील आणि विशेषत: राज्यातील साहित्यिक आणि सांस्कृतिक भवतालावर अचूक कोरडे ओढले होते. त्यातल्या दिवाळी अंकांबाबतच्या मुद्दय़ाबाबत (तो लेख न वाचणाऱ्या बहुतांश वाचकांनीही!) आपल्याकडे फारच गांभीर्याने घेतल्याची बिकट परिस्थिती आज आहे. अन् ती विचारसमृद्धीतून आलेली नाही, तर इथल्या अद्भुत सामूहिक नैराश्यामुळे तिचा जन्म झाला आहे. ‘तिरकस आणि चौकस’ हे पुस्तक अकरा वर्षांपूर्वीचे. त्याच्या आदल्या वर्षी शताब्दी पूर्ण झालेल्या दिवाळी अंकांच्या परंपरेचे गोडवे अजूनही का. र. मित्र यांच्या उद्धारारंभाशिवाय थांबत नाहीत, ही मराठी प्रांगणातील एक गमतीशीर आणि मनोरंजक गोष्ट आहे.

गेली १२१ वर्षे महाराष्ट्रात दिवाळीसह दिवाळी अंक येताहेत आणि तरीही मराठी साहित्याची उंची अथवा खोली याबाबत व्हायला हवी तितकी चर्चा मात्र होत नाहीए. चित्र्यांची ज्या साहित्यिक वातावरणात जडणघडण झाली, त्यात १७५ हून अधिक मासिके होती. दिवाळी अंकांची संख्या हजाराच्या आसपास होती. महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वापासून डझनाहून अधिक उप-लाडकी लेखक-कवींची फळी या भूतलावर दिवाळी अंकांसाठी सांस्कृतिक फटाक्यांची आतषबाजी करण्यास सिद्ध होती. सत्तरीच्या दशकापासून काही वर्षे राम आणि छाया कोलारकर या दाम्पत्याने ‘सर्वोत्कृष्ट मराठी कथा’ हे वार्षिकांक काढले. त्यातील नोंदींनुसार, वर्षांला मराठीत साडेतीन-चार हजार कथांचे पृथक्करण त्यांनी केल्याचे समजते. म्हणजेच त्याहून अधिक कविता आणि एक- चतुर्थाश इतक्या संख्येने हिरीरीने कादंबऱ्या लिहिल्या गेल्या असतील. पण मराठी मध्यमवर्गीय वाचकांनी पिढी दरपिढी प्रसारित केलेल्या डझनभर साहित्यिकांच्याच पताका पुस्तकरूपाने फडफडत राहिल्या. वाचकांना आवडतात म्हणून बडय़ा दिवाळी अंकांमधून तीच ती नावे पुनरावृत्त होत राहिली. थोडे विनोदी, अंमळ कौटुंबिक, चिमुटभर रहस्यप्रधान, मूठभर शृंगारिक आणि बोटभर सामाजिक आशयाची निर्मिती अनुभवून दिवाळी अंकांचे वाचक तृप्तीचे ढेकर देत राहिले.

नव्वदोत्तरीपासून साहित्यिक व्यवहाराच्या धमन्या बदलल्या. आर्थिक तोटय़ाच्या सबबीमुळे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या साहित्यिक मासिकांना व्यवहार आटोपता घ्यावा लागला. तरी जाहिरातींचे गणित जुळवत अनेकांनी दिवाळी अंकांच्या यज्ञात हात पोळून घ्यायचे सोडले नाही. या काळात सर्वदूर पसरलेला वाचकांचा आधीच कमी असलेला टक्का आणखी आक्रसला गेला. मोबाइल, गॅझेट्स आणि जागतिकीकरणाची चव चाखायला देणारी समाजमाध्यमे ही कारणे होतीच; पण इतक्या वेगाने होत असलेल्या तांत्रिक बदलांना सामोरे जाताना वाचक वेळेच्या बाबतीत शतखंडित होत गेला. दिवाळी अंक का वाचायचा, असा प्रश्न त्याला पडायला लागण्यासारखी परिस्थिती झाली. याचं कारण सांस्कृतिकदृष्टय़ा, भाषिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा उन्नयन करणारे साहित्य म्हणजेच कथा-कविता-कादंबरी-नाटय़ त्याला वाचायला मिळेल का, याबद्दल संभ्रमित होण्यासारखीच अवस्था निर्माण झाली. दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या, भवतालाची स्पंदने टिपणाऱ्या एखाद्या सर्वोत्तम कथेची, सर्वोत्तम कादंबरीची, काव्याची चर्चाच न होणारा थंड काळ गेल्या दशकात उदयाला आला. त्यामुळे लिहिणाऱ्या लेखकांची जुनी पिढी आपल्या काळातील ‘आरभाट’ गोष्टींच्या स्मरणरंजनाचे चिपाड आत्ताच्या काळातील साऱ्याच गोष्टींना ‘चिल्लर’ ठरविण्याच्या निकषांबरहुकूम ओतत राहिली. नव्या लेखकांची पिढी समाजमाध्यमांचा आधार घेऊन आपले साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी आटापिटा करण्यात थकू लागली.

संपादकांचा भूमिकाबदल..

मराठी भाषा आणि संस्कृतीवृद्धीचा आपणच विडा घेत असल्याच्या आविर्भावात निघणाऱ्या सर्वाधिक खपाच्या दीड-दोन डझन अंकांपासून ते गल्लीतल्या हौशी साक्षरांना अल्प/ दीर्घकाळासाठी साहित्यिक असल्याची अनुभूती देणाऱ्या, स्थानिक जाहिरातींनी खच्चून भरलेल्या अंकांना गेल्या दशकापासून एकसारखीच भूमिका वठवावी लागते आहे. ती म्हणजे लेखकाकडून अमुक शब्दसंख्येचा लेख मिळविण्यासाठी जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तगादा लावण्याची. आज दिवाळी अंकांच्या संपादकांना जाहिरातींची कमी नसली तरी आपापल्या अंकाच्या वकुबाबरहुकूम मजकूर मिळवण्याची चिंता सर्वाधिक जाणवते आहे.  काही सन्माननीय अपवाद वगळता संपादकांची साहित्य ‘रिपेअर’ करणारी पिढी आज अस्तित्वातच राहिलेली नाही. कथा, कादंबरी आणि कविता यांच्या गुणवत्तेचा निकष तपासण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी केवळ बडय़ा नामवंतांचे सुमार साहित्य केवळ अंकाच्या जाहिरातीत नावासाठी वापरले जाऊ लागले आहे. लेखकांच्या लेखनाला आकार देणारे, त्यांच्याकडून आवर्जून एखादा विषय लिहून घेणारे संपादक आज मुबलक प्रमाणात नसणे, हे या काळाचे खरे दु:ख आहे. जनमानसास अधिक परिचित असलेल्या नावांना लिहायला (मग ते कुठल्याही क्षेत्रातील असो!) लावून किंवा शब्दांकनाचा मार्ग निवडून आपला अंक  ‘खपणीय’ बनवण्याच्या असाहित्यिक प्रयत्नांत बरेचसे संपादक अडकलेले आढळतात.

लेखकांचा भूमिकाबदल..

लिहिणारा चलती असलेला लेखक एकाच वेळी पाच-दहा संपादकांना मजकूर देण्याचे कबूल करत असल्याने तो त्याच्या उपजीविकेच्या साधनासाठी राबून मग उरलेल्या वेळेत आपली लेखनचुष भागवतो. त्या उरलेल्या वेळेत तो व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ओटीटी फलाटावरील मनोरंजनाचा किंवा आणखी कशाकशाचा उपभोक्ता असला तर त्याच्या लेखनसाधनेत व्यत्ययाची कारणे अफाट! अन् लेखकाची ही जी अवस्था आहे, तीच थोडय़ाफार फरकाने वाचक नावाच्या प्राण्याचीही बनली असल्याने त्याची न वाचण्याची किंवा दिरंगाई करण्याची कारणेही अनंत! त्यामुळे लेखकाला आपण लिहिलेल्या अचाट प्रतिभेच्या, समाजाला धक्का देणाऱ्या विचारांचे साहित्य वाचकांपर्यंत कितपत पोहोचतंय याची प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता धुसर बनते. मग तो समाजमाध्यमांद्वारे आपल्या लेखनाची उर फुटेस्तोवर जाहिरात करून, वर शंभर सम‘विचाऱ्यां’ना टॅग करून या प्रांगणात उच्छाद आणण्याच्या उद्योगास आरंभ करतो. त्यातून वाचक मिळण्याऐवजी दूर जाण्याचीच अधिक शक्यता असल्याने त्याच्या कालोत्कट साहित्यप्रतिभेच्या विघटनाला सुरुवात होते. हे दृष्टचक्र गेल्या दहा वर्षांपासून अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे.

..तरीही साहित्याचा पिसारा फुलतोय!

आता इतक्या साऱ्या निराशाजनक भवतालामध्येही शेकडो दिवाळी अंक निघताहेत हा निव्वळ चमत्कार म्हणावा लागेल. कारण मराठी वाचकांची नवी पिढी तयार होण्याचे कार्य मराठी माणसांनीच दीड-दोन दशकांपूर्वी हाणून पाडले. आपले अपत्य इंग्रजी माध्यमात घालण्याचा दुराग्रह आपली भाषिक संस्कृती नष्ट करीत असल्याची जाणीव कुणालाच नव्हती. परिणामी ‘बाल’साहित्य प्रसवणाऱ्या खूपविक्या मासिकांचे गळे कसे घोटले गेले आणि ‘बाल/कुमार’ साहित्य प्रांतात खूप नाव कमावलेल्या लेखकांची सद्दीही रद्दीसमान कशी झाली, याबद्दल थोडीदेखील चाड कुणाला उरली नाही. त्याची परिणती ही आज उरलेल्या वाचन-वकुबाचे चित्र दर्शविते. दिवाळी अंकांत येणाऱ्या साहित्याबाबत चर्चा करायला, त्याच्या भलेबुरेपणाबद्दल प्रश्न विचारायला वाचकांनी सुरुवात केल्यास वर्षभरात येणाऱ्या वाचनीय मजकुरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडेल. खऱ्या अर्थाने दर्जेदार निर्मितीबाबत लेखक-संपादक सजग होतील. आज वर्षांतील सर्वोत्कृष्ट मराठी कथांची निवड करणारे कोलारकर दाम्पत्य नाही, की दिवाळी अंकांतील उत्तम साहित्य पारखून त्याचे संकलन करणारे ‘अक्षर दिवाळी’सारखे ऐंशीच्या दशकातील उपक्रमही नाहीत. तरीही कथा-कादंबरी-काव्य या पारंपरिक साहित्यप्रकारांबरोबरच भविष्य, अर्थ, आरोग्य आणि बहुविध विषयांना अनुसरून अंक निर्माण होताहेत. लाखो-कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते आहे. कागदापासून छपाई, अंकबांधणी उद्योगात शेकडो रोजगार तयार होताहेत. गंमत म्हणजे दूरचित्रवाहिन्याही या उद्योगात उतरत आपापल्या वकुबाचा अंक काढून जाहिरातींद्वारे खपाचा उच्चांक दाखवीत आहेत. नवखा भाबडा वाचक त्या जाहिरातींना बळी पडून तो खरेदी करतो, अन् ‘दिवाळी अंक किती वाईट असतात बुवा!’ असा ग्रह करून घेतो. दिवाळी अंकांचे संच उत्सुकतेने खरेदी करणारे वर्षभर तो फडताळात धुळीची पुटे चढेपर्यंत वाचण्याची तसदी घेत नाहीत. सध्या भूमितीय श्रेणीने वाढत चाललेल्या या जमातीला दिवाळी अंकांचा आर्थिक गाडा चालविण्याचे श्रेय द्यावे लागेल. पण वाचन असोशी निर्माण करून, स्वत:च्या आळसकेंद्री आणि ‘माध्यम’आहारी सवयींना या समुदायाने लवकरच सोडले नाही तर दिवाळी अंकांचे संस्कृती उत्पादन वगैरे बाबी स्वप्नवत ठरतील. शेवटी ‘ज्या वकुबाचा समाज, त्या दर्जाचे साहित्य’ हा जगाचा नियमच आहे. आपल्याला कुठे जायचे आहे, हे आपणच ठरवायला हवे.

करोना काळाला नमवले, पण..

गेल्या वर्षी करोना आणि टाळेबंदीच्या दहशतीतही दिवाळी अंक निघायचे थांबले नाहीत. फक्त हौशा-गवशांच्या अंकांना खीळ बसली. समृद्ध परंपरावाल्या अंकांनी भीत भीत ऑनलाइन अंक काढण्याचे ठरवत लेखकांचे साहित्य गोळा करण्याचे ठरविले. काहींनी नवे लेखक गोळा करण्याच्या फंदात न पडता आपल्याच जुन्या अंकांतील गाजलेल्या लिखाणाला एकत्रित केले. पहिल्या लाटेचा भर ओसरल्याने मोकळ्या झालेल्या या काळात बहुतांश अंक सर्व प्रतींसह विकले गेले. संचातल्या अंकांव्यतिरिक्त महागडय़ा अंकात जुने साहित्य असले, तरी ते खपले गेले. प्रती कमी छापण्याचे एक कारणही त्यात असले, तरी किमान तीन अंकांना पुनर्मुद्रणे करावी लागली. या अंकांचे न थांबणे ही आनंददायी बाब असली, तरी मुबलक वाचनवेळ उपलब्ध असतानाही माध्यमांतून चांगल्या, भावलेल्या साहित्याची चर्चा व्हायला हवी तशी झाली नाही.

गरज काय? आज उरलेल्या कुठल्याही सक्र्युलेटिंग लायब्ररी आणि वाचनालय, ग्रंथालयात विचाराल तर या दशकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लेखकांची तीन नावे सांगता येणार नाहीत. वृत्तपत्रांतील पुरवण्यांच्या पुस्तक पानांवरील जाहिराती, परीक्षणे, माध्यमांवरील प्रसिद्धी ग्रंथालयांची आणि वाचकांची पुस्तक निवड ठरवत आहेत. म्हणजे या गोष्टी साध्य नसलेल्या कित्येक चांगल्या लेखकांचे साहित्य पुढे येण्याची शक्यताच उरत नाही. दिवाळी अंक हेच कोणत्याही भल्या-बुऱ्या लेखकासमोर वाचकांपुढे येण्याचे व्यासपीठ उरले आहे. त्यांचे वाचन आणि त्यावर चर्चा जितक्या प्रकारे करता येईल तितकी झाली, तर या अंकांचे फलित ठळक होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali issues glorious traditions in marathi literature zws

Next Story
अनामिक बहर हा… :कधीं कधीं न बोलणार…
ताज्या बातम्या