डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेले हे पुस्तक सामाजिक चळवळीतील विचारसाहित्य मांडणाऱ्या पठडीतील आहे. नावाने पुस्तक प्रथमदर्शनी पाहिले असता जे चित्र मनात निर्माण होते ते चरित्रपर पुस्तकाचे. पण हे पुस्तक या प्रकारातील नाही. शीर्षकातील ज्ञानेश्वर ते आंबेडकर हा उल्लेख व्यक्ती किंवा कालसापेक्ष नाही. लेखकाने उजव्या आणि डाव्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा संकेतार्थ म्हणून ते वापरले आहे. आतील शीर्षक पानावर कंसात वैचारिक असे वर्गीकरण दिले आहे. वस्तुत वैचारिक स्वरूपाच्या पुस्तकांना त्यांचा विषय परीघ समजण्यासाठी उपशीर्षक देण्याची पद्धत असते.
थोडक्यात शीर्षकाने वाचकांचा गोंधळ उडतो. त्या बडय़ा बंडवाल्यांत ज्ञानेश्वर पहिले…अशा अपेक्षेने वाचक पुस्तक हाती घेतील आणि वाचतील तर त्यांचा अपेक्षाभंग होईल. बसवेश्वर-ज्ञानेश्वर-सावरकर ते मार्क्स-आंबेडकर असा परिवर्तनवादी प्रवाहातील साहित्याचे मूल्यमापन करण्याचा मानस ठेवून पुस्तक लिहिले आहे असा दावा लेखकाने केला आहे. त्यातून समाजपरिवर्तनाच्या दिशा स्पष्ट होतील असा त्यांचा प्रयत्न आहे आणि लेखकाचा हा सारा प्रयत्न इहवादी भूमिकेतून मांडलेला आहे. त्यातील अध्यात्मवाद्यांचे मतभेद लेखकाने गृहीत धरलेले आहेत.
ज्ञानेश्वरांच्या आधीचे बसवेश्वर निरीश्वरवादी आणि जातिव्यवस्थेविरुद्ध काम करणारी विभूती घेऊन ज्ञानेश्वरांच्या आधीचा काल आल्याने शीर्षक गोंधळ मनात ठेवूनच वाचक पुस्तक वाचू लागतो. पुढे बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांचाही समावेश झाल्याने पुस्तकाचा विषय परीघ नेमका राहत नाही.
पुस्तकात एकूण १३ लेख असून चार भागात त्यांची विभागणी केली आहे. या विभागणीला लेखकाने लिहिलेल्या पुस्तकामागील भूमिकेत कोणताही आधार सांगितलेला नाही. या साऱ्या लेखातील विषय आणि विचार वेगवेगळे आहेत. लेखकाची समन्वयवादी दृष्टी हा एकच बांधून घेणारा धागा त्यात गुंफलेला जाणवतो.
परिवर्तनवादी साहित्याचे मूल्यमापन करताना त्याचे निकष, अपेक्षित वाचकवर्ग आणि आजच्या संदर्भात त्यातील आशय मांडणे अपेक्षित होते. यातील लेख एक अपवादवगळता २० ते २५ वर्षांपूर्वीचे आहेत हे अंदाजाने सांगावे लागते. कारण कोणत्याही लेखाच्या पूर्वप्रकाशित स्थलकालाचा उल्लेख दिलेला नाही. अपवादात्मक लेख म्हणजे आंबेडकरवादाचा विकास आणि नव आंबेडकरवादी सिद्धान्त.. यात रामदास आठवले यांचे शिवसेना-भाजप मत्रीचे सद्धान्तिक समर्थन मांडले आहे. शेवटचा लेख सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा मार्क्सवादी चकवा हा विचारापेक्षा व्यक्तिसापेक्ष अधिक आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखाकडे व्यक्तिगत विश्लेषण म्हणून पाहावे लागते.
वैचारिक लेखांनाही संशोधनपर लेखनासारखी संदर्भ शिस्त अपेक्षित असते. तसेच विषयातील तात्त्विक मीमांसा वैश्विक बदलांवर तपासून घ्यावी लागते. त्यामुळे वाचकाला विषयासोबत संवाद साधता येतो. संदर्भ तपासून घेता येतात. नव्या शक्यता अजमावता येतात. हे वैचारिक स्वातंत्र्य मांडणे आणि मानणे ही अशा लेखनामागील प्राथमिक अपेक्षा असते.
एकंदरीत साऱ्या लेखांतून समन्वयवादी सूत्र जाणवते. विकासवादी सामाजिक परिवर्तनासाठी ती एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तसेच मराठी साहित्यातील परिवर्तनवादी विचारधारेवर संशोधन करणाऱ्यासाठी यातून अनेक विषय उपलब्ध होऊ शकतात. याच गोष्टी जमेच्या म्हणून सांगता येतील.
‘ज्ञानेश्वर ते आंबेडकर’ –
डॉ. श्रीपाल सबनीस,
दिलीपराज प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – २३१, मूल्य – २५० रुपये.

दलितांचा आवाज गेला कुठे?