-राहुल नरवणे

मुलाखती आवडत असल्याने माहितीपट क्षेत्रात शिरलेला हा चित्रकर्ता. त्याला मराठवाड्यातील मंदिरांचे दुर्लक्षामुळे होणारे नुकसान दिसत होते. त्यांच्या दस्तावेजीकरणासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. त्यावरचा माहितीपट नुसताच गाजला नाही, तर मंदिरांच्या बचावासाठी यंत्रणाही तयार झाली. हौसेच्या कामातून घडलेल्या बदलाने पुढल्या संशोधन आणि डॉक्युमेण्ट्रीचा मार्ग तयार होत गेला…

माहितीपट प्रकार इतर कोणत्याही प्रकारापेक्षा जास्त आकर्षित करतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यातील जिवंतपणा! तुम्ही त्या विषयाशी/ व्यक्तीशी थेट जोडले जाता. त्यामुळे त्या विषयाच्या खूप खोलात जाणे, तो विषय आपलासा करणे हे क्रमप्राप्त होते. त्या विषयांचे संशोधन हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मग त्या संदर्भात वाचन, प्रवास, लेखन, नवीन माणसांना भेटणं हे सगळे आपसूक होतं! अनेकदा नवनवीन विषयांचा तुमचा परिचय होतो आणि त्यातील एखादा विषय तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होतो. कधीतरी तर तो विषयच तुमचं आयुष्य होऊन जातो.

फार पूर्वीपासूनच मुलाखती ऐकणं हा माझ्या आयुष्याचा अत्यंत आवडीचा भाग राहिला आहे. तासनतास फक्त मुलाखाती ऐकत बसणं, त्यातून जे अनेक संदर्भ लागतात, अनेक गोष्टी उलगडतात तेच माझं डॉक्युमेण्ट्रीकडे आकर्षित होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं.
एखाद्या मोठ्या व्यक्तीवरचा माहितीपट आपल्याला त्यांच्या काळाचं आणि त्यांच्या आधीच्या पिढीचं दर्शन घडवतो. उदा. कवी गुलजार यांनी पंडित भीमसेन जोशींवर केलेला माहितीपट. यात पंडितजी आणि त्यांची कारकीर्द गुलजार आपल्यासमोर मांडतात; पण त्याबरोबरच त्यांच्या आधीचा काळ, त्या वेळचे समाजजीवन, सामाजिक मान्यता, कलेविषयीच्या संकल्पना, त्यात संगीत साधनेसाठीचा पंडितजींचा संघर्ष याची त्यांच्या अनुभवातून मांडणी थेट स्वरूपात दिसते. बदलता काळ, समाजाच्या बदलत्या मान्यता, पंडितजींना मिळणारी लोकप्रियता… तपशीलात अनुभवता येतो.

हेही वाचा…फडणीसांची ‘सुंदर ती दुसरी दुनिया’

डॉक्युमेण्ट्रीचं मूलभूत शिक्षण असं मी कुठे कधी घेतलं नाही. उमेश कुलकर्णीचं ‘शूट या शॉर्ट’चं वर्कशॉप केलं होतं. त्यात पुढे अनेक वेळा सहभागी झालो. नंतर ‘अरभाट फिल्म’ सोबत जोडलो गेलो. त्यांचे वेगवेगळे वर्कशॉप, फिल्म क्लबला जाणं हे नित्याचं बनलं. फिल्म फेस्टिवलची हजेरी आणि मुबी तसेच सर्व ओटीटी फलाटांवर डॉक्युमेण्ट्री पाहणं यातून माझं त्याबाबतचं प्रत्यक्ष शिक्षण झालं.

गेल्या काही वर्षांत व्यावसायिक प्रकल्पांमध्ये काम करत स्वत:चा कॅमेरा आणि डॉक्युमेण्ट्रीसाठी लागणाऱ्या आवश्यक तांत्रिक घटकांना जमवत राहिलो. त्यासाठी काही ठिकाणी व्यावसायिक फोटोग्राफर आणि एडिटर म्हणूनही काम केलं. त्यातून याचं तंत्र आत्मसात झालं. गेल्या पाच वर्षांपासून स्वतंत्रपणे व्यवसायिक जाहिराती केल्या, तसेच मुलाखतीचे चॅनेल चालवले. आता ‘रे मीडिया आणि फिल्म्स’ या नावाने स्टुडिओ चालवत आहे. ज्यात या सर्व प्रकारच्या डॉक्युमेण्ट्रीवर काम सुरू आहे. सत्यजित रे, मणी कौल, श्याम बेनेगल, अमित दत्ता, उमेश कुलकर्णी हे माझे आवडते चित्रकर्ते.

फाइन आर्ट्सचा विद्यार्थी असल्यामुळे चित्रं -शिल्पाची ओढ कायमच होती, पण त्याहीपेक्षा उत्सुकता होती ती त्यातील कथाभाग काय असेल याची. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम. ए. इंडोलॉजी केलं. त्यामुळे इतिहास, त्याचे वेगवेगळे कालखंड याबाबतची माहिती होती. कल्याणी – चालुक्य काळातील मंदिरे हा माझा अभ्यासाचा आणि आकर्षणाचा विषय राहिला. मराठवाड्यातील मंदिरांचे दुर्लक्षामुळे होणारे नुकसान यावर माझी मित्रांमध्ये भरपूर चर्चा व्हायची. इतिहास आणि कलेच्या दृष्टिकोनातून मंदिर किती महत्त्वाचे यावर अभ्यास सुरू असताना त्याची वर्तमानातील परिस्थिती भीषण दिसत होती. त्या मंदिरांवर उत्तम अवस्थेतील शिल्प आहेत, सर्व प्रकारच्या सूरसुंदरी, विष्णू अवतारातील अत्यंत महत्त्वपूर्ण शिल्प तसेच मिथून शिल्प असा एक उत्तम शिल्पाचा पट आहे. फक्त अनास्था आणि दुर्लक्ष या कारणामुळे केदारेश्वर मंदिर पुढील ४-५ वर्षांत जमीनदोस्त होईल असे दिसत होते. त्यातच तिथे बाजार भरायचा, त्यात मूर्तींची तस्करी हा या भागातील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता.

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : ‘स्व’च्या शोधातला टप्पा…

धर्मापुरी हे मंदिराची खाण असणारे शहर. पण तेथील लोकांनी नालीसाठी, घरच्या पायरीसाठी येथील दगडाचा वापर केलेला दिसतो. तिथं आपण काय करू शकतो यावर उत्तर फक्त डॉक्युमेण्ट्री हे होतं. याचं अस्तित्व कलेसाठी तरी जपणं महत्त्वाचं वाटलं. त्यातून ‘केदारेश्वर टेम्पल’ या माहितीपटाची निर्मिती झाली. त्याच काळात एम.टी.डी.सी. आणि पुणे फिल्म फेस्टिवल यांनी एकत्र येऊन ‘हेरिटेज प्रमोशन’साठी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात ही डॉक्युमेण्ट्री दाखवली गेली. पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये आपली फिल्म दाखवली जातेय ही पुढील सर्व कामाला पाठबळ देणारी घटना होती. मुकुंदराजांच्या ‘विवेकसिंधू’मध्ये अंबाजोगाईच्या सौंदर्याचं वर्णन आहे. हा विषय माझ्या जवळचा असल्यामुळे त्यावर आधारित डॉक्युमेण्ट्रीवर काम सुरू केलं. ‘योगेश्वरी’ ही बहुतांशी कोकणस्थांची कुलदेवता. तिच्या कथा, हत्तीखाना, सकलेश्वर इत्यादी मंदिरांचा परिचय करत ‘मनोहर अंबानगरी’ हा माहितीपट तयार झाला. कला आणि कलाकृतीकडे अनंत नजरेतून पाहिलं जाऊ शकतं. स्थळ, काळ आणि वेळेनुसार त्यांचे संदर्भ बदलतात. मंदिर स्थापत्यामधून दृश्य स्वरूपात निघणारा परिणाम अनेक कलांच्या मिश्रणातून बाहेर आलेला असतो. मंदिर पाहताना आपण ती फक्त धार्मिक भावनेतूनच पाहतो. त्यामुळे त्याचे अनेक पैलू झाकोळले जातात. अंबाजोगाईमध्ये सर्वच प्रकारचे मंदिर स्थापत्य आहे. साहित्य, इतिहास याची एक उत्तम परंपरा आहे. आद्याकवी मुकुंदराज, दासोपंतांची पासोडी या सोबत आजही लिखाणांमध्ये परंपरा सांगणारे लेखक आहेत. मराठवाड्यात अंबाजोगाई एक ओळख आहे. ‘मनोहर अंबानगरी’मध्ये या माहितीपटात त्याचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक सर्व पैलू शोधण्याचा प्रयत्न केला. या डॉक्युमेण्ट्रीचा प्रवास फार गुंतवणारा होता. सलग चार ते पाच वर्ष त्यावर काम केले.

यात अभिमानाचा भाग असा वाटतो की, माहितीपटात दाखवलेल्या सर्व ठिकाणी काही ना काही चांगला परिणाम साधला गेला. हे सर्व माहितीपट तेथील बदलांचे निमित्त होऊ शकलं. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी येथे पुरातत्त्व खात्याने दखल घेऊन ते मंदिर पूर्वस्थितीत आणले. ‘मनोहर अंबानगरी’ या डॉक्युमेण्ट्रीमुळे लोकांमध्ये जाणीव जागृत झाली. अंबाजोगाईमधील अनेक ठिकाणे पुनर्जीवित झाली. मंदिर आणि त्यांचे सर्व पैलू, सूरसुंदरी, अष्टनायिका, ग्रामदेवता त्यांचे उत्सव अशा काही विषयांवर काम सुरू झालं. यावर पुढेमागे काही तरी माहितीपटांतूनच उतरेल. डॉक्युमेण्ट्री या विषयाची आपल्याकडे आज फार गरज आहे असं वाटतं.

हेही वाचा…हास्यचित्रकलेची अवघड रेषा

‘उर्वरसा’ हा माहितीपट नैसर्गिक शेतीविषयीचा आहे. रासायनिक शेती, सेंद्रिय शेती असा प्रवास करत, निसर्गाचं चक्र, बाजारपेठा, त्यांचे उद्देश या सर्वांसकट पर्यावरणावर मला त्यात बोलता आलं. पुण्यामधील ‘जीवा भावना’ ही सामाजिक संस्था पंढरपूरमधील रामहारी कदम या शेतकऱ्याला शेतीबाबत सर्व मदत करते. त्याची गोष्ट या माहितीपटामध्ये सादर झाली. देवराई लागवडीसाठी सर्वांना परिचित असणारे ‘रघुनाथ ढोले’ यांची मुलाखत या माहितीपटाचा आत्मा आहे.

‘कातळशिल्प’ या विषयावर भाई रिसबूड, ऋत्विज आपटे आणि निसर्गयात्रीच्या संपूर्ण टीमसोबत अनेक वेळा चर्चा झाली होती. पण त्याचं स्वरूप ठरत नव्हतं. कारण कातळशिल्प हा विषय सर्वच अंगानी प्रचंड मोठा आणि विस्तृत आहे. सर्व कातळशिल्पं शूट करणं अशक्य वाटणारी गोष्ट होती. म्हणून आमच्या टीमने काही मोजकी ठिकाणं निवडून त्यावर एक माहितीपट तयार केला. यात मुख्यत्वे कातळशिल्पावरील कामासाठी मदतीचं आवाहन केलं होतं. तो रत्नागिरीत पार पडलेल्या पहिल्या ‘कातळशिल्प फेस्टिवल’मध्ये दाखवला गेला होता. या माहितीपटामुळे ‘निसर्गयात्री’ टीमला ‘कातळशिल्प’ हा विषय सर्वदूर पोहोचवण्यासाठी बरीच मदत झाली.

आता एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी येथील हिरेमठ संस्थान आणि त्या मठाचे पूज्य श्री. डॉ. बसवलिंग पट्टद्देवरू अप्पाजी यांच्या कार्यावर हा माहितीपट आहे. या मठाच्या अंतर्गत चालणाऱ्या महाराष्ट्र बसव परिषदेचे कार्य साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. महात्मा बसवण्णा आणि त्यांचा लिंगायत धर्म यांचा मूळ विचार प्रसार करण्यासाठी यांनी मराठीमध्ये शेकडो पुस्तके प्रकाशित केली. या मठाने सीमाभागात धार्मिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात समाज परिवर्तनाचे मोठे कार्य केले. याचा महाराष्ट्रातील सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. या संदर्भात डॉ. गणेश देवी, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. शरणकुमार लिंबाळे आणि महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील अन्य काही मान्यवरांच्या मुलाखती माहितीपटात समाविष्ट आहेत.

हेही वाचा…वैद्याक शोधकथांच्या ‘आतल्या गोष्टी…’

डॉक्युमेण्ट्रीमुळे मला नवीन विषय, नवीन ठिकाणं, वेगळं खाद्या, भाषा यांचा परिचय करून घेता आला. या कामाच्या संदर्भाने भालकी, बसवकल्याण, बिदर, बसवन बागेवाडी, कूडलसंगम, गदग अशी लिंगायत परंपरेतील ऐतिहासिक स्थळे पाहता आली. सोबतच उदगीर, लातूर, सोलापूर, सांगली, जयसिंगपूर, कोल्हापूर या सीमाभागात सध्या फिरत आहे. प्रत्येक नवीन विषयात काम करताना अनेक नवीन गोष्टींची माहिती होतेच. त्यासोबतच काही नवीन माणसं जोडली जातात, ती आपली जगणं समृद्ध करीत कायम सोबत राहतात.

हेही वाचा…वैद्याक शोधकथांच्या ‘आतल्या गोष्टी…’

‘ओटीटी’मुळे दृश्यघटकांत झपाट्याने बदल झाले आहेत. अनंत गोष्टींचा सतत मारा होतोय हे खरं आहे, पण त्यामुळे असंख्य शक्यताही तयार झाल्या आहेत. मुळात प्रेक्षक म्हणून बरंच काही पाहण्याच्या नवीन जागा तयार झाल्या आहेत. जगभरात डॉक्युमेण्ट्रीमधील वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. आताशा माहितीपटाचे पूर्ण स्वरूपच बदललं आहे. फिक्शन आणि नॉन-फिक्शनमधील रेषा धूसर होत जातेय. या माध्यमामधील हे प्रयोग पाहणं आणि त्याचा भाग होता येणं यात खरा आनंद आहे.

narwanerahul@gmail.com