सीमा भानू

ललित, संशोधनात्मक, चरित्रात्मक, बालवाङ्मय ते संपादन अशा साहित्याच्या सर्वच क्षेत्रांत संचार करणाऱ्या डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो यांचे ‘टिपंवणी ’ हे आत्मकथनात्मक पुस्तक ग्रंथालीने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. विपरीत परिस्थितीतून कष्टांनी वाट काढणाऱ्या एका साहित्यिकेच्या आयुष्याचा धांडोळा यानिमित्ताने घेतला गेला आहे.

पुस्तकाचे शीर्षकच त्याच्या वेगळेपणामुळे आणि अपरिचिततेमुळे लक्ष वेधून घेते. या शीर्षकाचे स्पष्टीकरण पुस्तकाच्या प्रारंभीच येते. टिपं म्हणजे थेंब. वणी म्हणजे पाणी. ‘थेंबाथेंबाने अश्रू ढाळणे म्हणजे टिपंवणी’ असा खुलासा लेखिकेने केला आहे. बऱ्या-वाईट अनुभवांचे, आनंदाच्या क्षणांच्या अश्रूंचे आणि दु:खाच्या क्षणांचेही कण टिपायचा प्रयत्न आपण येथे केला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

वसईतील ख्रिस्ती समाज आणि त्यांची मराठीशी जोडलेली नाळ सुपरिचित आहे. सिसिलिया काव्‍‌र्हालो हे त्यापैकीच एक ठळक नाव. वसईजवळील माणिकपूरच्या कुशीतील बरामपूर हे लेखिकेचे गाव. भाषा : वडवळी. या भाषेचा मोठा प्रभाव या पुस्तकावर आहे. काही पोर्तुगीज शब्दही ओघात येतात. वडवळी भाषेतील संवाद पुन्हा मराठीत दिले आहेत. पण एरवीचे प्रचलित शब्द तसेच ठेवले आहेत. जसे मामाय म्हणजे आजी, तर मोठेपाय म्हणजे आजोबा. पाय म्हणजे वडील.. जे सतत आल्याने आपोआप ओळखीचे होऊन जातात.

हे आत्मकथन छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांतून समोर येते. एखादी घटना किंवा व्यक्तीबद्दल माहिती देणारी अशी अनेक प्रकरणे पुस्तकात आहेत. आत्मकथनात इतकी छोटी प्रकरणे सहसा बघायला मिळत नाहीत. पण अनेक छोटय़ा गोष्टींचा आवर्जून उल्लेख केल्याने या शैलीचा उपयोग केला गेला असावा. वसई परिसर हा म्हटला तर मुंबईजवळचा भाग. पण महानगरीची वैशिष्टय़े वसईमध्ये आजही फारशी आढळत नाहीत. मग ६० वर्षांपूर्वी ती कशी असणार? हा एखाद्या छोटय़ा खेडय़ासारखा परिसर. तिथले वातावरण, पाण्याचा खडखडाट, सोयींचा अभाव, गरिबी या सगळ्याचे वर्णन पुस्तकात जागोजागी येते. अगदी कमी साधनांमध्ये लोक कसे राहतात याचा वस्तुपाठच जणू. लेखिकेचे जन्मापासूनचे सारे आयुष्य याच भागात गेले आणि तिची कारकीर्दही इथेच घडली. त्यामुळे इथल्या जागांचे, व्यक्तींचे  बारीकसारीक उल्लेख सतत येत राहतात. एकप्रकारे हा वसईचा परिसर पुस्तकात जणू एक पात्र बनूनच येतो असे म्हटले  तर ते वावगे ठरणार नाही.

पुस्तकातील बराच भाग अर्थातच लेखिकेच्या जडणघडणीवर बेतलेला आहे. फारसे न शिकलेले, पण वाचनाची आवड असलेले वडील. न शिकलेली, पण व्यवहाराने संसार करणारी आई. आणि पाच भावंडे, तुटपुंजी कमाई यात ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे म्हणायला लेखिकेला फारसा वावच नाही. तरीही परिस्थितीचा बाऊ करायचा नाही, हा लेखिकेचा स्वभाव कथनात दिसून येतो. त्यातल्या त्यात आनंदाचे प्रसंग आले ते आजोळी सुटीत घालवलेल्या दिवसांमध्ये. आजोळ म्हणजे आईचे माहेर हे श्रीमंत असल्याने तिथे या भावंडांना मजा करायला मिळायची. आजी (मामाय) खूप प्रेमळ आणि लाड करणारी. आजोबाही प्रेमळ. पण दारूचे व्यसन हा त्यांच्या आणि लेखिकेच्या घराला शाप होता. आजोबा वा वडील पिऊन आले की त्यांनी आणलेला खाऊही खायची कुणाला इच्छा व्हायची नाही. ‘चुरगळलेल्या खाऊच्या पुडीसारखा सगळा दिवसच चुरगळून जात असे..’ असे वाक्य लेखिका सहज लिहून जाते.

लहानपणी पाय अधू असल्याने खेळण्यासारख्या गोष्टींवर बंधने आलेल्या लेखिकेने स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतले. आणि मग त्याची इतकी गोडी लागली.. ती थेट डॉक्टरेट मिळेपर्यंत टिकली. परिस्थिती  नसतानाही आपल्याला जिद्दीने शिकवणाऱ्या आणि अधू पायातही ताकद आणणाऱ्या आईबद्दलची कृतज्ञता पुस्तकात वारंवार व्यक्त झाली आहे. शिक्षणाच्या काळात ‘नन्’ होण्याकडे काही काळ लेखिकेचा कल होता. पण नन् होताना ‘देवाची हाक ऐकू येते’ म्हणजे काय, याचे उत्तर कुणाकडूनच मिळाले नाही आणि तो मार्ग दुरावला. पुढे तर चर्चचे बदलते स्वरूप आणि स्त्रियांना मिळणारे मर्यादित महत्त्व हेही लक्षात  येत गेले. पुढे काव्‍‌र्हालो शैक्षणिक व लिखाणाच्या क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात  रमल्या, त्या गोन्सालो गार्सयिा महाविद्यालयाचे प्राचार्यपद मिळवेपर्यंत!

पुस्तकात अनेकांची व्यक्तिचित्रे आहेत. त्यापैकी आय, पाय आणि मामाय ही सगळ्यात चांगली उतरली आहेत. प्रांजळपणा हा या आत्मकथनाचा विशेष ठरावा. आपल्यावरच्या कौटुंबिक जबाबदारीने राहून गेलेल्या लग्नाबद्दल, स्त्री म्हणून क्षमता असूनही डावलले जायच्या  प्रयत्नांबद्दल त्या सांगतात. आपण जिथे जन्मलो, वाढलो, वास्तव्य केले, त्या गावातील ख्रिस्ती चर्च स्त्री म्हणून आपल्याला दुय्यम लेखते आणि उर्वरित महाराष्ट्रातून मात्र मराठीभाषक ख्रिस्ती समाजातील लेखिका म्हणून आपुलकीने निमंत्रणे येतात, या विरोधाभासावर त्या बोट ठेवतात तेव्हा अनेक शतकांची स्त्रीची उपेक्षाच जणू त्या व्यक्त करतात. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ वेधक आहे.

टिपंवणी’- डॉ. सिसिलिया काव्‍‌र्हालो, ग्रंथाली, पाने : ३३२, किंमत : ४०० रुपये