सुमारे पंधरा वर्षांपूर्वी डॉ. चंद्रशेखर फणसळकरांनी त्यांची पहिली छोटी गोष्ट वा लघुतर कथा लिहिली असावी. यानंतर ते अशा कथा सातत्याने लिहीत गेले. या छोट्या गोष्टींचा पहिला वाचक मीच होतो. खरं तर श्रोता. कारण डॉ. फणसळकरांनी त्या मला ऐकवल्या किंवा चक्क रेकॉर्ड करून पाठवल्या. अनेकदा वाटतं की, त्यांच्या या गोष्टी वाचण्यापेक्षा ऐकण्याच्याच आहेत-त्याही त्यांच्याच तोंडून.एडगर अलन पो यांनी अतडकपणे सुचवलेली लघुकथेची व्याख्या प्रसिद्ध आहे : अ short story should be short and it should have a story. . फणसळकरांच्या या कथा छोट्या तर आहेतच, पण त्या कथाही आहेत, स्फुट विचार नाहीत, बारके किस्से नाहीत, कवितासदृश्य ओळीही नाहीत. त्यात पात्रं आहेत, प्रसंग आहेत आणि संवाद असले तरी (डॉ. फणसळकर मूळचे नाटककारच आहेत आणि आताआतापर्यंत नाटकात संवादच असत) या गोष्टींमध्ये झकास निवेदनही आहेत.
छोटेपणा आणि गोष्टीवेल्हाळता याशिवाय या छोट्या गोष्टींचं वैशिष्ट्य हे की त्या तिरकस आहेत, तिरसटही आहेत. तशा त्या सरळसाध्या वाटतात, पण वाटतात तेवढ्या त्या सरळ नाहीत. गंमत ही की त्या फार अनेकपदरी वा बहुपेडीही नाहीत. या कथा साध्या आहेत, पण भोळ्या नाहीत; त्या नाजूक आहेत, पण फार नेमस्त नाहीत. म्हणजे त्या मुळमुळीत नाहीत. मुळीच नाहीत. त्या मुळातच चटपटीत आहेत. वसूल विनोदी आहेत. इतक्या की त्या समस्त टवाळांना आवडाव्यात. मात्र हा विनोद खदाखदा-वाला नाही, खुदुखुदु-वाला आहे. हा तसा निखळही नाही. आताशा काही निखळ असणंच अशक्य आहे म्हणा. निरागस असणं शक्य आहे. आणि निरागस म्हणजे मठ्ठ नाही.
या कथा हसून सोडून देण्याजोग्या नाहीत; पण लांबतोंड्या, अतिगंभीरही नाहीत. त्या हसवून गंभीर आहेत. गंमत अशी की त्यांना ट्रॅजी-कॉमिक वगैरेदेखील म्हणवत नाही. त्या फार अस्वस्थ करून सोडणार नाहीत, पण एकदम स्वस्थही बसू देणार नाहीत. या चटकन चिमटीत न येणार्या गोष्टी मजेशीर आहेत. चिमटे काढणं, कोपरखळ्या मारणं, टपल्या हाणणं, टोप्या उडवणं अशा गोष्टीत या कथा आपल्याला रमवतात. यांना ॲबसर्ड किंवा पोस्टमॉडर्न म्हणवत नाही, पण या घालमेलीच्या युगाच्याच गोष्टी आहेत. हसल्याशिवाय राहवत नाही आणि हसून सोडून देता येत नाही, अशी गत आणि गंमत. आपल्याला किती गोष्टींचा सतत किती त्रास होत असतो : कुटुंबातल्या कुरबुरी, तब्येतीच्या कटकटी, आर्थिक समस्या, सामाजिक दबाव, राजकीय दडपण… हॅम्लेटने त्याच्या आता जगाला कळलेल्या स्वगतात एक यादीच दिली आहे (… the whips and scorns of time, the oppressor’s wrong, the proud man’s contumely, the pangs of despised love, the law’s delay, the insolence of office…)! या गोष्टी वाचताना आपण हे सगळं विसरतो.
थोडं हसतो. …आणि मग लक्षात येतं की गंडलोच आपण. हे सगळं आहेच या गोष्टींमध्ये! या छोट्या गोष्टींमधल्या असल्या गोष्टींची एक लांबलचक यादीच होईल. खरं तर आपल्याला विश्वाची चिंता लागली आहे या तोर्यात हा लेखक लिहीत नाही आणि तरीही या कथा वाचताना हे वाटत राहतं की is wrong with this world. आपण डोक्यातल्या डोक्यात हसत असतानाही हे आपल्या लक्षात येतंच. आणि हे डॉ. फणसळकरांच्या सर्वच लिखाणात आढळतं. विनोद आणि गांभीर्य इथे एकत्र नांदतात. आयुष्य उत्सवाकरता आहे हे मान्य करून वर ते मिरवतही असताना, जीवनातल्या सनातन दु:खाचा सल कायम जाणवत राहतो. बराचसा परिचितच विनोद समाजावर ताशेरे ओढत असतो. असं लिखाण स्वत:ला सोलायला काहीदा विसरतं. मग हे लिखाण खोल रुतत नाही. या भयानक भवतालाला आपण जबाबदारच नाही असा सूर अशा लिखाणात उमटतो. आणि वर्तमानाच्या अमानुषतेचा निव्वळ उल्लेख केला की संपलं लेखकाचं काम असंही वाटतं. (म्हणजे त्या लेखकाला.) लिखाणात शाश्वत-अशाश्वताचा तणाव हसत-हसवत उमटला की हसू तर येतंच, पण हसून सोडून देता येत नाही. ‘
असं लिखाण जमतं कारण कदाचित अशा लिखाणाला श्रेष्ठ होण्याची ईर्षाच नसते; सर्वसामान्य असण्यात (सामान्य नव्हे!) ते समाधानी असतं. अशा वेळी हलकंफुलकं वजनदार होऊ शकतं, हे आपल्या ध्यानात येतं.‘रस’ ही संकल्पना संस्कृत नाटकांइतकीच जुनी झाली आहे. पण कधीकधी कमालीची कामी येते. या छोट्या गोष्टींमध्ये हास्य रस आहे असं मानलं (आणि असं मानायला जागाच जागा आहे), तर अद्भुत, भयानक आणि बीभत्स हे रस मी-मी करत पुढे येतात, हा हसरा मुखवटा फाडून बघतात. तो नेहमी सपशेल फाटत नाही, कधीकधी किंचत भेदला मात्र जातो. या मिश्किल, प्रांजळ, लहान गोष्टी गंभीर नाहीत, पण माफक आहेत. ठसकावून सामाजिक नाहीत, पण भवतालाबद्दलच्या आहेत. या अस्वस्थ करणार्या नसतील, पण काहीशा चलबिचल निर्माण करणार्या आहेत, प्रचंड विदारक नाहीत, पण किंचित विचलित करणार्या आहेत.
या कथा वाचून सोडल्या तर फक्त हसवतात आणि स्मरणात धरल्या तर बर्याच सतावतात. या कथा एकेकट्या काही साधतातच, पण एकंदरीतपणे आणखीनच काही देतात.रूपावर मांड नसली तर आशय हलतच नाही किंवा उधळतो तरी. लेखकाचं भाषेवर प्रेम आहे. मजा ही आहे की भाषेचंही या लेखकावर प्रेम आहे. समजून भाषा योजली की ती आपोआप खुलते आणि अनलंकृत भाषा अधिकच झळाळते. डॉ. फणसळकरांची भाषा प्रांजळ असल्यानेच ती विना-अडसर आशय प्रकटवते. आविर्भाव नसला की भाव उमलतोच. या छोट्या गोष्टी वाचून पाहा. मर्मदृष्टी मिळेल न मिळेल (ते थोडं लिखाणावर आणि बरंचसं वाचकावर अवलंबून आहे); पण तुम्हाला मजा मात्र येईल. कथाचाळिशी, डॉ. चंद्रशेखर फणसळकर, राजहंस प्रकाशन,
पाने-२०४, किंमत-३९० रुपये.
