केंद्र सरकारातील उच्चपदस्थ वडिलांचा अतिशय बुद्धिमान सुपुत्र… डेहराडूनच्या विख्यात डून स्कूलमध्ये शिकून पुढे दिल्ली आय. आय. टी.मधून मेकॅनिकल इंजिनीअर होतो. इथे त्याला त्याच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव पाडणार्या भारत आणि इंडियामधल्या फरकाची जाणीव होणं… मग अमेरिकेत एम.आय.टी.मध्ये उच्च शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर भारतात एक-दोन नोकर्या करून डॉक्टरेटसाठी पुन्हा अमेरिकेत पड्र्यू युनिव्हर्सिटीत जाणं…

दरम्यान परीक्षेत यशस्वी होणं आणि सर्जनशील असणं यांतला फरक उमगणं… डॉक्टरेट सन्मानासह भारतात कायमचं परतणं… पुन्हा शिक्षणाचा सार्थ उपयोग करून घेणार्या नोकरीचा शोध… चारचौघांच्या बाबतीत अशा प्रवासाची पुढली स्टेशनं म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी, भरपूर कमाई, सुखसोयींनी सज्ज घर, सुबक देखणं चौकोनी कुटुंब वगैरे… म्हणजे लौकिकार्थाने ‘यशस्वी’ होणं, आयुष्यात ‘सेटल’ होणं…

पण काही कहाण्या अशा चाकोरीबद्ध ‘सक्सेस स्टोरीज’च्या दिशेने जात नाहीत, कारण डॉ. ललित पांडे नामक नायकाने रूढार्थानं जे यश मानलं जातं त्यावर स्वत:साठी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं असतं. पैसा किंवा नाव कमावणं त्याला ध्येय म्हणून मान्य नसतं. आपल्या या उच्च शिक्षणाचा, संपादित कौशल्यांचा आणि समाजाच्या प्रगतशीलतेचा मेळ कसा बसवायचा? या आणि अशांसारख्या प्रश्नांचं मोहोळ त्याच्या विचारांच्या केंद्रस्थानी असतं! चारचौघांसारखं स्वत:ला यशस्वी सिद्ध करण्यात या प्रश्नांची उत्तरं नव्हती. आपल्या शिक्षणाचं सार्थक होईल आणि आपण मनोमन समाधानी होऊ अशी नोकरी/ कामं ते ठिकठिकाणी शोधत राहिले. सगळ्यात महत्त्वाचं होतं स्वत:च्या विवेकबुद्धीला पटणारं काम.

बांधिलकी होती ती फक्त आपण शिक्षणाने कमावलेल्या शक्यता आणि समाजाच्या गरजा यांची सांगड घालू पाहणार्या स्वत:च्या आतल्या आवाजाशी. सध्याच्या युगात हे म्हणजे आकाशीचा चंद्र मागण्याइतकं (अ)प्राप्य ठरावं, हे समाजाचं दुर्दैव. पण सुदैवाने त्यांच्या आईवडिलांना लेकाच्या मनाला व्यापून राहिलेलं ‘अँग्री यंग मॅन’चं द्वंद्व कळत होतं. पण त्या अतिशय तर्कशुद्ध, मूलभूत प्रश्नांची उत्तरं त्याची त्यालाच शोधायची होती, आणि ती सापडेपर्यंत व्यवसायाची/ जीवनाची दिशा ठरणार नव्हती. या उच्चशिक्षित तरुणाच्या व्यक्तिगत शोधयात्रेचं मूळ समाजाभिमुखतेत होतं आणि हा विरोधाभास बहुतेकांच्या समजेबाहेरचा होता, कारण या दिशेने कधी विचारच केला जात नाही.

काही नोकर्या करून झाल्या, पण उत्तर आणि संधी सापडेना म्हणून १९८४ मध्ये अलमोड्यात स्वत:च ‘उत्तराखंड सेवा निधी और पर्यावरण शिक्षा संस्थान’ (USNPSS) ही गैरसरकारी संस्था स्थापन केली. पर्यावरणविषयक शिक्षण, प्रबोधनाच्या आपल्या पसंतीच्या कामाकडे नेणारी वाट शोधायला सुरुवात केली.

वास्तविक इतका खडकाळ रस्ता निवडण्याची गरज नव्हती, कारण त्यांचं सुखवस्तू कुटुंब हे फक्त उत्तराखंडात नव्हे तर देशभरात प्रतिष्ठा कमावलेलं होतं. वडील कॅबिनेट सेक्रेटरी/ नंतर दोन राज्यांचे गव्हर्नर असलेले बी. डी. पांडे, मोठे भाऊ अरविंद पांडे पंतप्रधानांच्या कार्यालयात जॉइंट सेक्रेटरी, वहिनी प्रसिद्ध पत्रकार मृणाल पांडे, वगैरे… पण मळलेली वाट स्वत:साठी नको असलेल्या ललितजींनी देवाण-घेवाणीत सहज मिळू शकणारी मखरं ‘पोलिटिकली इनकरेक्ट’पणामुळे कायम नाकारली.

समाजकार्य म्हणजे चलाखी आणि स्वार्थाचं बेमालूम मिश्रण या सद्य समीकरणाशी ललितजींचा संबंध शून्य! आदर्शवादावर उदात्त गप्पाही कधी कोणाशी मारल्याचं आजवर ऐकलं नाहीये. स्वत:ची जीवनशैली अविश्वसनीय वाटावी इतकी साधी ठेवलेली. कुठलाही कीर्ती वा पदाचा हव्यास नसल्याने यत्र, तत्र, सर्वत्र दिसणार्या ग्लॅमरस शहरी मंडळींमध्ये ते नसतातच. नेति नेतिच्या अरण्यात वर्षानुवर्षं खर्ची घालणार्या ललितजींची आयुष्य आणि ध्येयाबद्दलची कोडी सहज सुटण्यासारखी नसतातच. त्यांनी निवडलेल्या मार्गाबद्दल बोलायचं तर…

पर्यावरणाचं संरक्षण हा आता जागतिक चर्चेचा विषय राहिलेला नसून, चिंतेचा विषय झाला आहे. वरठढररचं मोठं योगदान म्हणजे उत्तराखंडात याविषयी जागरूकता निर्माण करणं व कुमाऊंनी सर्वसामान्य जनतेला एकत्र आणणारं व्यासपीठ उपलब्ध करून देणं. एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे उत्तराखंडात सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी पर्यावरण या विषयाची वर्कबुक्स तयार करून पुरवणं. ही पुस्तकं नेमानं सुधारित आणि संपादित केली जातात. तज्ज्ञ आणि शालेय शिक्षकांच्या भरपूर शोधकार्यानंतर तयार होणारी ही पुस्तकं इतकी अर्थवाही आणि परिणामकारक आहेत की, देशभरात शाळांनी वापरावीत.

असंच भरीव काम म्हणजे या संस्थेतर्फे कुमाऊन आणि गढवालमधल्या वेगवेगळ्या खेड्यात ३५० बालवाड्या चालवून ‘अर्ली चाईल्डहूड केअर ॲण्ड एज्युकेशन’ हा कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाचा परिणाम काहीच वर्षांत इतक्या ठळकपणे समोर आला की, राज्यातील सर्व बालवाडी प्रमुखांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी आता वरठढरर वर सोपवण्यात आली आहे. संस्थेचा प्रकाशन कार्यक्रमही आहे- ज्यात पर्यावरण, शिक्षण, प्रौढांची साक्षरता, किशोरांसाठी वाचनसामग्री वगैरे प्रकाशित केलं जातं आणि अत्यल्प किमतीत विकलं जातं. पुस्तकं काळजीपूर्वक निवडून गावोगावी वाचनालयं चालवली जातात. भर विचारांना चालना आणि सहज करता येतील अशा कृतींवर असतो हे आलंच.

संस्थेत कामासाठी आलेली साधीशी पहाडी तरुणी अनुराधा! तिने आपल्याशी लग्न का करू नये, हे तिला पटवण्यात चाळिशीतल्या ललितजींना यश न आल्याने, पुढे ती ‘पांडे’जींची आयुष्यभरासाठी जोडीदारीण झाली. तिच्या येण्यामुळे संस्थेच्या कार्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण सुरू झालं आणि त्याचा परीघ रुंदावतच गेला. २००१मध्ये स्थापन केलेल्या ‘उत्तराखंड महिला परिषद’ या संघटनेशी ४५०वर खेड्यांमधल्या १६०००च्या आसपास महिला जोडल्या गेल्या आहेत.

जिथे मुलींच्या उघड बालहत्या होत, अजूनही घरात मुलीचा जन्म म्हणजे नकोशी घटना असे, व आजही बहीण-भावात फरक हीच रीत मनाली जात, त्या समाजात हे अत्यावश्यकही होतं.

पुरुषसत्ताक, रूढीवादी समाजात मुलींचे हक्क, घरात निर्णय घेण्यात सहभाग, शिक्षणाची समानसंधी याबद्दल चर्चा व जागरूकता सुरू झाली. त्याबरोबरच रोजच्या जीवनातले व्यावहारिक मुद्दे म्हणजे जमिनींची धूप करणार्या चहाच्या मळ्यांना डोळस विरोध, रेनवॉटर हार्वेस्टिंग घरोघरी आणणं, स्वच्छतागृहं बांधणं ही कामं हाती घेतली गेली. ज्याने घरबसल्या कमाई होऊ शकते असं लोकरीचं विणकाम आणि प्रादेशिक फळांची सरबतं, चटण्या आणि मुरंबे बनवून विकण्याचं प्रशिक्षण गावोगावी केलं. पंचायतीत सत्ता हाती घेऊन तिचा योग्य वापर यांसारखे विषयही घेतले गेले.

महिलांच्या प्रश्नांना एकजुटीने भिडत मैत्री आणि कार्याचं जाळं पसरत गेलं. ज्योत से ज्योत जले! एकदा का मुलगी/ बाई संस्थेत दाखल झाली की तिचं व्यक्तिमत्त्वच बदलतं. हे सगळं एकिकडे, एकदा मृणाल पांडेंनी बोलता- बोलता आम्हाला एक छोटीशी आठवण सांगितली होती. आदल्याच दिवशी म्हणे ललित एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमधून घरी येणार होते. तर अनुराधाने घराच्या प्रत्येक पायरीवर खास कुमाऊंनी ‘ऐपन’ रांगोळी घालून, प्रवेशद्वार फुलांनी सजवून त्यांच्या मंगल स्वागताची तयारी केली होती.

कमालीचा पारदर्शक माणूस. ललितजींशी बोलताना नेहमीच जाणवतं की आपण फार काही केलंय असं ते मानत नाहीत, पाय घट्ट जमिनीवर रोवलेले आहेत. वास्तविक एखादी संस्था तिच्या वाढत्या व्यापासकट चाळीसेक वर्षं चालवणं म्हणजे स्वत:बद्दल, संस्थेबद्दल भरभरून बोलेल ना माणूस; पण ‘क्रिटिकल इन्साइडर’ ललितजींचं तसं नाही. ते कधी आत्मसंतुष्टीच्या भोवर्यात अडकत नाहीत.

वेळ नसल्याची तक्रार कधी त्यांच्या तोंडून ऐकलेली नाही. केलेल्या कामांपेक्षा अजून बाकी असलेली कामं, काय काय सुधारायला हवं आहे, काळानुसार नजीकच्या भविष्यासाठी बदलायला झालेल्या प्राथमिकता यावर खुलेपणाने बोलायला त्यांना आवडतं. तेवढ्याच ताकदीने, नि:स्वार्थ सेवा, जन-जागृती वगैरे भ्रामक दावे मोडून काढण्यात येतात.

संस्थेच्या कार्यशाळा तीन-चार दिवस चालतात, सगळ्यांची एकत्र राहण्याची सोय असते. इथे प्रत्येकाला आपलं मत/समस्या न घाबरता मांडू देणारी खरीखुरी लोकशाही जिवंत असल्याचं दिसतं. खेड्यापाड्यांमधून आलेल्या घरेलू दिसणार्या मुली, बायका आणि पुरुष इथे समानतेने एकमेकांशी बोलताना, मतं मांडताना दिसतात. ललितजींनी लावलेल्या रोपट्याचा आता विशाल वृक्ष झाला आहे, संस्थेशी जोडल्या गेलेल्या सर्वांचं एका भरल्या घरासारखं भरण-पोषण करणारा, अडचणींतून मार्ग काढायला मदत करणारा, नवयुवक-युवतींना प्रगतीची दिशा दाखवणारा हा माणूस!

२००७मध्ये ललितजींना पद्मश्री मिळाली तेव्हा त्यांना जवळून जाणणार्या सर्वांना अतिशयच आनंद झाला. कमालीच्या प्रांजळ आणि विनम्र स्वभावाच्या कर्मयोग्यांच्या वाट्याला आलेला सन्मान समाजाचंही नैतिक बळ वाढवणारा असतो. तेव्हा त्यांना आईची खूप आठवण झाली. स्वत:शी आणि समाजाशी झगडणार्या लेकाला समजून असणार्या तिला, हा आगळ्यावेगळ्या ध्येयपूर्तीचा गौरव पाहायला मिळतं तर… असं वाटत राहिलं. कुटुंबात एक पद्मविभूषण होते आणि आता दोन पद्मश्री!

कार्यालयासमोरच्या प्रशस्त अंगणात २०१० पासून सुरू झालेल्या बी. डी. पांडे स्मृती वार्षिक व्याख्यानांत आजवर डॉ. करण सिंग, गोपाल कृष्ण गांधी, मार्क टली, सुनीता नारायण, रामचंद्र गुहा यांच्यासारख्या विविध विषयांतील विचारवंतांनी हजेरी लावून लोकांशी संवाद साधला आहे. ही व्याख्यानं ऐकण्यासाठी अख्ख्या उत्तराखंडातून श्रोते येत असतात व अतिशय अकृत्रिम विचारमंथन घडतं हा आमच्यासकट अनेकांचा अनुभव. राज्यात कदाचित पहाडांच्या दुर्गमतेमुळे अशी व्यासपीठं कमीच म्हणून पहाडी बांधवांना समकालीन विचारधारेशी जोडणारी ही अलमोड्यातली व्याख्यानमाला म्हणजे उत्तराखंडाच्या समाजकारणातलं एक महत्त्वाचं योगदान!

वरठढररचं कार्यालय संस्थेच्या ध्येयांना शोभणार्या एका पुरातन पहाडी आर्किटेक्चरचा देखणा नमुना असलेल्या मोठ्याशा वाड्यात आहे. बाहेर फुलझाडांनी नटलेल्या फरशांच्या प्रशस्त अंगणात इथले सार्वजनिक कार्यक्रम होतात. त्यात बाजूला मात्र एक सभासद व कार्यकर्त्यांच्या जेवणखाण व राहण्यासाठी एक छोटीशी वेगळी इमारत आहे. दूरवर ललित आणि अनुराधाचं खालच्या बाजूला असलेलं वृक्षराजीत दडलेलं पिढीजात, साधं सुंदर आतिथ्यशील घर आशावादी, प्रयत्नशील, पण श्रेयाच्या हव्यासापासून मुक्त असलेलं…

uarundhati.deosthale@gmail.com