संतोष शेणई
डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचे ‘मी कोकणचो डॉक्टर’ हे पुस्तक एखाद्या ग्रंथपालाने विनोदी साहित्याच्या यादीत टाकले, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका खेड्यात सेवा करणार्या या डॉक्टरचे कोकणी माणसांबरोबरचे अनुभवच इतके खुमासदार आहेत, की या पुस्तकाची नोंद विनोदी साहित्याच्या गटात केली जाऊ शकते. हे पुस्तक म्हणजे एका डॉक्टरचे आत्मानुभव आहेत. एका मर्यादित अर्थाने आत्मचरित्र म्हणा हवे तर. कोकणातील वास्तवाच्या नोंदी डॉक्टरांनी केल्या आहेत. या पुस्तकातून खेड्यात डॉक्टर आजारांशी कसे झुंज देतात याचेही चित्र उभे राहते.

गावांतील अंधश्रद्धा, औषधाचा पूर्ण डोस घेण्याबाबतचे अज्ञान व पैशाचा अभाव, आरोग्याविषयीच्या गैरसमजुती असेही एक चित्र आपल्यासमोर येते. डॉ. कुलकर्णी कोकणातील वैद्यकीय अनुभव मांडतात खरे, पण त्यातून उभे राहणारे चित्र हे सार्या भारताचे आहे. एकीकडे आपण वैद्यकीय क्षेत्रात किती प्रगती केली, हे पुण्या-मुंबईसारख्या महानगरात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील हॉस्पिटॅलिटीचा अनुभव घेत दाखवता येते, पण त्याच वेळी खेड्यातल्या डॉक्टराला उपकरणांचा अभाव असतानाही सर्वच विषयात स्पेशालिस्ट व्हावे लागते हेही इथले वास्तव, याकडे हे पुस्तक लक्ष वेधते. आरोग्य सुविधांच्या या विषमतेकडे लक्ष वेधण्यासाठी कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न डॉ. कुलकर्णी यांना करावे लागत नाहीत, केवळ तो अनुभव मांडणे एवढेच पुरेसे होते. या बरोबरच एक इरसाल मालवणी संस्कृती या पुस्तकातून आपल्यासमोर येते.

तीस वर्षांपूर्वी कोल्हापुरातील एक तरुण डॉक्टर जोडपे शिक्षण संपवून प्रॅक्टिससाठी गाव शोधत निघाले. गगनबावड्याच्या घाटाने खाली उतरले आणि तळेरे हे छोटेसे निवांत गाव त्यांना आवडले आणि तिथेच मुक्काम ठोकायचा त्यांनी ठरवले. तरुणाईतली ईर्षा होती. राहू तेथे महाल बांधू ही धमक होती. मग कसलाही हिशेब न मांडता आणि भविष्याचे कोणतेही आडाखे न बांधता डॉ. मिलिंद व डॉ. ऋचा कुलकर्णी यांनी येथे मुक्काम ठोकला. तीस वर्षांत कितीतरी धमाल किस्से घडले. असंख्य खुमासदार अनुभव घेता आले. इरसाल, नको इतकी स्पष्टवक्ती आणि तितकीच माया लावणारी माणसे भेटली. डॉक्टरवर श्रद्धा असलेल्या पेशंटशी नाते जुळत गेले. या सार्याची गुंफण कहाणी म्हणजे हे पुस्तक. त्यात कोणताही आव नाही, की अभिनिवेष नाही. साधेसरळ चित्र डॉक्टरांनी मांडलेय.

जगातील सर्व ज्ञान मालवणी माणसाकडे असते, त्यामुळे तो आपले तेच खरे म्हणतो. तो गजालीत रमतो, भंकस करतो आणि समोरच्याला मस्त चिमटेही काढतो. तो बेरकी आहे, चलाख देखील. गबाळगावंढ्याचे सोंग घेऊन समोरच्या शहाण्यासुरत्याला तो वेड्यात काढेल. तो शहाळ्यासारखा वरून कठीण व आतून गोड प्रेमाने भरलेला असतो. तो फणसासारखा दिसताना काटेरी व आतून रसाळ गोड गर्यांसारखा असतो. या मालवणी माणसावर उपचार करताना डॉक्टरांना त्याची स्वभाववैशिष्ट्ये उमगत गेली आणि तो त्यांना मनापासून भावला. कोकणात, कोकणी माणसांत डॉक्टरांचा आणि पंचक्रोशीतील गावकर्यांचा त्यांच्यामध्ये जीव गुंतत गेला, याची ही कहाणी. ही कहाणी केवळ रुग्णसेवेची नाही, तर त्यात मालवणी ग्रामसंस्कृतीतील माणूसपणाचा शोध घेतलाय.

यातील सगळेच अनुभव सुखदायक नाहीत. सुखकर्ता डॉक्टरांना दु:खदाता रुग्णही भेटलेले आहेत. इथल्या श्रद्धा-अंधश्रद्धांबरोबरच, सासूकडून होणारा छळ किंवा महिनोन्महिने नवर्यापासून दूर राहावे लागलेल्या सासुरवाशिणी, एखाद्या प्रेमप्रकरणात अडकलेली मुलगी यांचे नसलेले आजारही डॉक्टरांना योग्य तपासणी करून त्यावर इलाज शोधावे लागतात. येथे केवळ रुग्ण व डॉक्टर एवढेच नाते राहत नाही, त्यापलीकडचे एक विश्वासाचे स्थान असते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधांचे डोस न घेता ते आपल्या मनाप्रमाणे घेणारे पेशंट, रात्री-अपरात्री घरी येणार्या सीरियस पेशंटमुळे उडणारी तारांबळ, दवाखान्यातील दवाईसुंदरीच्या चलाख स्वभावामुळे आणि तत्परतेमुळे पेशंटना मिळणारा दिलासा, पेशंटला सलाईन चढवताना आलेले मजेशीर, तसेच तापदायक अनुभव, उत्साह घेऊन येणारा मुंबईचा चाकरमानी, मध्यरात्री रिक्षातून येणारी डिलिव्हरीची पेशंट, आपल्या वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित किस्से डॉक्टर सांगतात तेव्हा त्यातील गमतीचे अनुभव आपल्यालाही हसवतात. काही तर्हेवाईक पेशंटची डॉक्टरांशी होणारी जुगलबंदी ऐकण्यासारखी असते. या सगळ्याला कौटुंबिक व आर्थिक करुणेची झालरही आहे.

अनेकदा रुग्णांची आणि डॉक्टरांची असहायता पाहून आपले हृदय पिळवटून जाते. निरागसपणाचेही दर्शन होते. त्याच वेळेला निष्पाप जीवांच्या लबाडीतून हसूही येते. त्यात कुणी कुणाला फसवत नाही, पण परिस्थिती आपल्याला हसवते आणि रडवते. लोक किती निराधार असतात, असहाय असतात याची जाणीव होत राहते. हे वास्तव डॉक्टरांनी विलक्षण सुंदररीत्या मांडलेय. बरे हे मांडताना कुठेही डॉक्टरांनी समाजकार्याचा आव आणलेला नाही, आपण काहीतरी महान काम करतो आहोत असेही ते भासवत नाहीत. डॉ. ऋचा यांच्या वैद्यकीय कौशल्याचे नमुनेही डॉक्टरांनी सांगितले आहेत. डॉक्टरांची उत्तम विनोदबुद्धी, विनोदाची जाण आणि माणसांच्या स्वभावातील विसंगती अचूक टिपण्याचं भान यामुळे हे लेखन खुमासदार झालेय.

मी कोकणचो डॉक्टर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, समकालीन प्रकाशन, पाने-१२०, किंमत-२०० रुपये.