डॉ. शुभदा कुलकर्णी

एक रसास्वाद साहित्यिक, इतिहासकार, उत्तम प्राध्यापक, कवी अशी डॉ. राजा दीक्षित यांची ओळख आहे. त्यांचा ‘कुरबॅश आणि इतर कविता…’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. कॉलेजवयीन तरुण- तरुणींपासून ते मुरब्बी राजकारणी, उत्तम संपादकालादेखील लोभावतील अशा या सर्व कविता. काव्यप्रेमींना तर अर्थातच आवडतील. ते भावगर्भ, रूमानी कवितेपासून ते आसूड ओढणाऱ्या विद्रोही कविताही सारख्याच उत्कटतेनं लिहितात. उपहास, टवाळी, रूमानी प्रेम, थोडंसं खट्याळ, चावट प्रेमही या कवितांतून येतं; परंतु ते कुठेही उथळ, हीन दर्जाचं वाटत नाही हे विशेष. हा या कवितेचा विशेष. तसंच तो कवीच्या ऋजू स्वभावाचाही. सौम्य, ऋजू स्वभावाचे असले तरी राजा दीक्षित यांना अन्यायाची, ढोंगीपणाची तीव्र चीड आहे; तीही अनेक कवितांमधून व्यक्त झाली आहे. परंतु हा विद्रोह आक्रस्ताळी, कंठाळी नाही. पण त्यांची भाषा किंचित उग्र आहे; परंतु ती आवश्यक आहे म्हणून! जातिधर्मभेदांचा, वर्चस्ववादाचा, एकाधिकारशाहीचा जो पगडा आहे, तो इतका तीव्र आहे की, त्याला प्रतिसाद म्हणून अशी भाषा येणं अपरिहार्यच.

पहिलीच कविता ‘कुरबॅश’- कुरबॅश म्हणजे हिप्पोपोटॅमसच्या कातडीपासून बनवलेला चाबुक ऊर्फ आसूड. हा दृश्यही असू शकतो आणि अदृश्यही. अगदी कुटुंबसंस्थेपासून ते देश- जगाच्या पाठीवर कुठंही हा आढळतो आणि त्याविरोधात कवीनं हा कवितेचा आसूड ओढलाय! त्यात हिप्पोपोटॅमसना आपली भाषा कळती तर त्यांनासुद्धा स्वत:चीच लाज वाटेल असं म्हणून कवी त्याच्या विद्रोहाची धार तीव्र करतो.

‘स्थितप्रज्ञ’ कवितेत तर प्रखर भाषाविष्कार, अगदी शिवीगाळही आली आहे; पण त्यातील सच्चेपणा वादातीत असल्यानं तो कंठाळी आक्रोश वाटत नाही. ‘महापूर’ कवितेतूनही एरवीचा सौम्य कवी प्रखर विद्रोह प्रकट करतो. ‘एकच कविता’ या कवितेत कवीचा नम्र, ऋजू स्वभाव प्रत्ययास येतो.
‘आईवरच्या कविते’त तर स्त्रीबद्दलची दुटप्पी नीती फारच बोलकी झालीय! ती पूर्णच वाचावी अशी. स्त्रीचा सन्मानही कवी कसा करतो हे आईच्या या कवितेमधून दिसतं. ‘शब्दांपलीकडच्या कविता म्हणशील तर मला तुझीच शिकवणी लावायला हवी’ या ओळींतूनही हा सन्मान व्यक्त होतो. ‘भेटीच्या काठावरती’ मधून ‘तो लाव तुझ्या प्रेमाचा कुंकुमतिलक मजला, गुलमोहोर फुलेल माझ्या गात्रागात्रांतून’ यात अनेक परंपरांविषयी कृतज्ञता, सन्मान व्यक्त होते. ‘संजीवन’ कवितेतही उपहास करत, टवाळी उडवत आशावादाचे तत्त्वज्ञान मांडले आहे. ‘कृतिषंढ’ कवितेतून मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी वर्गाचं नाकर्तेपण व्यक्त होतं. एखाद्या प्रेमभऱ्या कवितेतून अत्यंत आश्वासक, भरवसा दिलासा देणारा सूर उमटतो. ‘पुतळा’ कवितेच्या शीर्षकातूनच सामाजिक मानसिकता दिसते. थोरांचे पुतळे बनवून त्यांची होणारी विटंबना आणि त्यात स्वत:बद्दलची कबुलीही येते. ‘बहाणा’ कविता बऱ्यावाईटाचा पाठशिवणीचा खेळ हे रूपक साधून कोणताही आव न आणता फार मोठं तत्त्वज्ञान सांगते. ‘कधीतरी’ कवितेत अंतर्मुख होण्यातली अपरिहार्यता आणि त्यातून उमलणारे आशावादी सूत्र येते, मग ते संगीत असो वा शब्द असोत वा कृती.

‘झाडांच्या कविता’ ही अशीच दीर्घ निसर्गकविता. यात झाडांच्या निमित्तानं अनेक निसर्गाशी जोडलेले विषय येतात, तसंच काहीसं वैश्विक तत्त्वज्ञानही! काही अपवाद वगळता राजा दीक्षित यांची कविता या बड्या ख्यालासारख्या आहेत. काहीशा विद्वतजड ! ठुमरी, दादरा, कजरी, होरी गाताना मन जसं पिसासारखं हलकं व्हावं लागतं तसं इथं होत नाही. या कवितांमधून मूळ व्यासंगी विद्वान पिंड उमटतो. तरीही सकस आणि वाचनीय आहेत यात शंकाच नाही.

‘कुरबॅश आणि इतर कविता’, राजा दीक्षित, संवेदना प्रकाशन, पाने १४४, किंमत २२५ रुपये

shubh.sangeet@gmail.com