scorecardresearch

कष्टांच्या उन्हात रापलेला प्रतिभावंत

२०१२ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. राऊरी भारद्वाज या तेलुगु साहित्यिकाला जाहीर झाला आहे. आयुष्यभर त्यांनी दारिद्रय़ाचे चटके सहन केले. त्यांनी आपल्या आत्मचरित्राला ‘पाकुडुराळ्ळु’ (शेवाळलेले दगड) असे नाव दिले आहे. आजचा धनदांडगा समाज, सामान्यांना पुढे येऊ देत नाही, जसे शेवाळलेले दगड त्यावर आपला पाय ठरू देत नाहीत. हेच रूपक घेऊन त्यांनी हे लेखन केले आहे.

२०१२ साठीचा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. राऊरी भारद्वाज या तेलुगु साहित्यिकाला जाहीर झाला आहे. आयुष्यभर त्यांनी दारिद्रय़ाचे चटके सहन केले. त्यांनी आपल्या आत्मचरित्राला ‘पाकुडुराळ्ळु’ (शेवाळलेले दगड) असे नाव दिले आहे. आजचा धनदांडगा समाज, सामान्यांना पुढे येऊ देत नाही, जसे शेवाळलेले दगड त्यावर आपला पाय ठरू देत नाहीत. हेच रूपक घेऊन त्यांनी हे लेखन केले आहे.  यानिमित्ताने एकंदर तेलुगु साहित्यिक आणि भारद्वाज यांच्या साहित्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

७० सालातली गोष्ट.या वर्षी प्रथमच डॉ. विश्वनाथ सत्यनारायण या ज्ञानवृद्ध तेलुगु पंडिताला, त्यांच्या ‘श्रीमद् रामायण कल्पवृक्षम्’ या ग्रंथास भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याबद्दल तेलुगु साहित्यविश्वात मोठा जल्लोश आणि आनंदोत्सव होत असतानाच, दुसरी एक लक्षवेधी कुणकुण वर्तमानपत्रांतून उमटली. त्यावेळेच्या मातब्बर लेखिका, महाविदूषी मुप्पाला रंगनायकम्मा यांनी या निर्णयाचा जाहीर निषेध केला. डॉ. विश्वनाथ सत्यनारायण यांच्या ‘श्रीमद् रामायण कल्पवृक्षम्’ या ग्रंथावर कडकडून टीका केली. एवढेच नव्हे तर, या विदूषीने ‘रामायण’ हे कल्पवृक्ष नसून ‘विषवृक्ष’ असल्याचा निर्वाळा देत, त्यांनी दोन मोठे ग्रंथ या संदर्भात लिहिले. या लेखिका सामान्य नव्हत्या. त्यांच्या ‘स्वीट होम’, त्या नंतर ‘हॉट होम’ या दोन्ही कादंबऱ्या तेलुगु साहित्यविश्वात, घरोघरी पोहोचल्या होत्या. किंबहुना तेलुगुचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांनाच मिळेल, अशी चर्चाही सर्वत्र होत होती.

(डॉ. विश्वनाथ सत्यनारायण यांच्या ‘वेई पडगेलु’ या तेलुगु कादंबरीचा भारताचे भूतपूर्व पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी ‘सहस्रफणा’ या शीर्षकाने हिंदीत अनुवाद केला आहे. )

तेलुगु साहित्य जगतात काही साहित्यिक ‘टोळ्या’ पाळून असतात. त्यामुळे जो साहित्यिक, कुठल्याही गटात, मठात नसतो, त्याची मात्र उपेक्षा होते, हे सत्य तेलुगुतले थोर साहित्यिक टी. गोपीचंद यांनी आपल्या ‘पंडित परमेश्वरशास्त्री वीलुनामा’ या ग्रंथात चितारले आहे. (या ग्रंथाचा मराठी अनुवाद मी ‘एका पंडिताचे मृत्युपत्र’ या शीर्षकाने केला. सदरहू ग्रंथ साहित्य अकादमीने १९९६ साली प्रकाशित केला आहे.) यात खऱ्या साहित्यिकाची होणारी परवड मनाला पिळवटून टाकणारी आहे.

या नंतर गडियारम् रामकृष्णशर्मा यांनी आपल्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, ‘कमलपत्र’ या आत्मचरित्रात, आजच्या साहित्य परिषद संस्था, होणारी साहित्य संमेलने यातून आढळणाऱ्या गटबाजीविषयी मोठय़ा विस्ताराने लिहिले आहे. (हा ग्रंथसुद्धा ‘कमलपत्र’ या शीर्षकाने मी मराठीत अनुवादला आहे. हा ग्रंथ साहित्य अकादमीने गतवर्षी प्रकाशित केला.)

तेलुगु साहित्य विश्वात ‘चेरबंडराजु’ नावाचा फार मोठा बंडखोर कवी आहे. त्यांनी तर तेथील सरंजामशाहीची लक्तरे वेशीवरच टांगली. ‘जो पर्यंत सामान्य माणसाचे नेमके चित्रण साहित्यात येणार नाही, तोपर्यंत मी शांत राहणार नाही’, असा सज्जड दम तथाकथित समाजाला दिला आहे. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या एका काव्यसंग्रहाचे प्रकाशन अमावस्येच्या मध्यरात्री, महारोग्यांच्या वस्तीतल्या एका महारोग्याच्या हस्ते केले.

अजून एक तेलुगु महाकवी असेच होते. ज्याची संपूर्ण आयुष्यभर हेटाळणी झाली. दलित म्हणून त्याला वर्गात बसू दिले नाही, तो कवी म्हणजे ‘जाषुवा’ होय. त्यांचे सुमारे शंभर काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. पुढे त्यांना ‘पद्मविभूषण’ ही बिरुदावलीही मिळाली. अत्यंत दारिद्रय़ात आयुष्य काढलेल्या या कवीच्या नावाने, आज एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आपले मराठी कवी नारायण सुर्वे यांना मिळाला.

‘गद्दर’ नावाचे कवी, केवळ पंचा नेसून, घोंगडे खांद्यावर टाकून उघडय़ा अंगाने चौका चौकात उभे राहून, हलगीच्या कडक आवाजात गरीब, कष्टकऱ्यांच्या वेदना कवितेतून मांडत हिंडतात.

 हा सारा पट एवढय़ासाठीच सांगितला की, आज ज्या डॉ. राऊरी भारद्वाज या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, त्यांचे जीवनही असेच हलाखीचे आणि कष्टदायी होते. आयुष्यभर त्यांनी दारिद्रय़ाचे चटके सहन केले. मिळेल ती नोकरी केली. शेवटास काही प्रींटिंग प्रेसमध्ये प्रूफरीडिंगचेही काम केले. एकदा ते मद्रास येथे प्रूफरीडिंगची नोकरी तुटपुंज्या पगारावर करीत असताना, त्यांची बायको पहिल्यांदा गरोदर राहिली. त्यांनी मोठय़ा प्रेमाने बायकोस विचारले, ‘तुला काय खावेसे वाटते?’ यावर बायको म्हणाली, ‘तुम्ही हातपाय धुवून जेवायला बसा, मी सांगते.’ ते हातपाय धुवून जेवायला बसले आणि त्यांनी विचारले, ‘आता सांग, काय तुझी इच्छा?’ त्यावर बायको म्हणाली- ‘मला फक्त दहा पैशाचे चुरमुरे आणून द्या.’ त्यांनी आणून दिले. पत्नी जेव्हा दुसऱ्यांदा गरोदर राहिली, त्यावेळी त्यांनी हाच प्रश्न केला, ‘बोल, तुला काय खावेसे वाटते?’ बायको म्हणाली, ‘मला जिलेबी खावीशी वाटते.’

यावर भारद्वाज यांनी विचारले, ‘पहिल्या वेळी तुला चुरमुरे खावेसे वाटले तर आता तुला जिलेबी खावीशी वाटते, तुझ्यात हा इच्छेचा फरक कशामुळे झाला?’

यावर बायको म्हणाली, ‘तुम्ही पहिल्यांदा इच्छा विचारली, त्यावेळी मी तुम्हाला ‘हातपाय धुवून या’ असे म्हटले होते. तुम्ही जेव्हा हातपाय धुवायला गेलात, त्या दरम्यान मी तुमच्या खिशात किती पैसे आहेत, हे पाहिले. त्यावेळी तुमच्या खिशात फक्त दहा पैसे होते, त्यामुळे मी तुम्हाला परवडेल अशी इच्छा व्यक्त केली. आज तुम्ही आकाशवाणीत नोकरी करीत आहात, तेव्हा नक्कीच तुमच्याकडे जिलेबी आणून देण्याइतपत पैसे असतील.’

त्यांच्या पत्नीचे नाव ‘कांतम’ होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ‘काव्यस्मृती’ नावाचा ग्रंथ त्यांच्या आठवणींवर लिहिला.

एकंदरीत त्यांचे जीवन विलक्षण दारिद्रय़ात गेले. त्यामुळे त्यांचे शिक्षण जेमतेम आठवीपर्यंतच झाले. परंतु त्यांनी केलेल्या साहित्याचा अभ्यास पाहून तेथल्या विद्यापीठाने त्यांना डी. लिट ही मानद पदवी बहाल केली.

त्यांच्या समग्र साहित्यात ‘सामान्य माणूस हा केंद्रबिंदू’ आहे. त्यांनी आपले आत्मचरित्र ‘पाकुडुराळ्ळु’ (शेवाळलेले दगड) या शीर्षकाने लिहिले आहे. आजचा धनदांडगा समाज, सामान्यांना पुढे येऊ देत नाही. जसे शेवाळलेले दगड, आपला पाय ठरू देत नाहीत हेच रूपक घेऊन त्यांनी हे लेखन केले आहे. हे आत्मचरित्र वाचताना वाचकाचे काळीज पूर्णत: गलबलून जाते.

आज भारद्वाज यांचे वय ८६ वर्षांचे आहे. त्यांच्या नावावर ३७ कथासंग्रह, १७ कादंबऱ्या, ८ नाटके इतकी साहित्य संपदा नोंदवली गेली आहे. तेलुगुतले नव्या शैलीचे, प्रयोगशील कथालेखक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. ते उत्तम कथाकथनकार आहेत. त्यांची चित्रमय शैलीत कथा सांगण्याची शैली अप्रूप वाटावे अशी आहे. हैद्राबाद येथील ‘विजयनगरम्’ कॉलनीत आज ते राहत आहेत.

त्यांनी लहान मुलांसाठी देखील विशेषतेने लेखन केले आहे. मुलांसाठी त्यांनी ६ छोटय़ा कादंबरीका, ५ कथासंग्रह, ३ निबंध संग्रह लिहिले आहेत. पुढची पिढी सज्ञान, उत्तम भाषा ज्ञानाने मंडित व्हावी, अशी त्यांची आंतरिक तळमळ आहे.

त्याचबरोबर त्यांच्या इनुपुतेरा (लोह पडदा), कौमुदी आदी ग्रंथही खूप लोकप्रिय आहेत. कौमुदी या ग्रंथाचा, इंग्रजी व काही भारतीय भाषांतून अनुवाद झाला आहे.

आतापर्यंत त्यांना दिल्ली साहित्य अकादमी पुरस्कार, सोव्हियत लँड पुरस्कार, बाल साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळालेले आहेत. या ज्ञानपीठ पुरस्काराने, कष्टाच्या उन्हात रापलेल्या एका कष्टजीवी साहित्यिकाच्या मस्तकी मानाचा तुरा खोवला जातो आहे, ही बाब अत्यंत अभिनंदनीय आहे.     

लक्ष्मीनारायण बोल्ली

ु’’्र’ं७्रेल्लं१ं८ंल्ल@ॠें्र’.ूे

मराठीतील सर्व लेख ( Lekha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr rauri bhardwaj from telugu literature