-वृन्दा भार्गवे
झपाटून टाकणाऱ्या एखाद्या कथेचा शेवट होतो तेव्हा त्यातील बिटवीन द लाइन्स संदर्भ आपल्याला अधिक उमगायला लागतात… रुपकांचे अर्थ उलगडायला लागतात… शेवटामुळे कथा अधिक प्रभावीपणे व्यापून टाकते. डॉ. शंतनू अभ्यंकर गेल्याची बातमी आली आणि त्यांनी लिहून, बोलून ठेवलेल्या असंख्य शब्दांमधले अर्थ अधिक गहिरेपणाने व्यापून व्याकूळ करत राहिले.
एक उमदा माणूस गेला आणि आपल्या दृष्टीनं अपुऱ्या राहिलेल्या त्याच्या कथेचे अनेक शेवट त्यानं आधीच कुठेतरी तुकड्या तुकड्यांनी पेरून ठेवलेले असावेत, असं लक्षात यायला लागलं. दीर्घकाव्याऐवजी खंडकाव्यांचे अनेक तुकडे लिहून अवकाशात भिरकावून देणाऱ्या या विज्ञाननिष्ठ, निरीश्वरवादी माणसाची प्रारंभाच्या काळातली एक कविता सारखी आठवते आहे…
हेही वाचा…दिल्लीत अडकलेले ‘मराठी’…
आपणच अर्धवट लिहिलेल्या कवितेचा कागद
आपण फाडून आभाळात भिरकावून द्यावा
तसं आयुष्य भिरकावून दिलं आहे मी…
आणि त्या कागदाचे कपटे
स्वत:भोवती फिरत, गरगरत, भिरभिरत
खाली झेपावत येतात
तेव्हा त्यांना जशी गरगरणारी, भिरभिरणारी,
त्यांच्याकडे झेपावणारी सृष्टी दिसेल
तसं आयुष्याच्या प्रत्येक तुकड्याकडे
पाहतो आहे मी…
कोणत्याही क्षणी या ध्रुवाकडून त्या ध्रुवाकडे हेलकावत जाणारा आयुष्याचा हा लंबक… हा प्रवास म्हणजे रसरशीत जीवनानुभूतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे; पण डॉ. शंतनू या माणसाचा विचार करत जावं तसं लक्षात येतं की, तो स्वत:च स्वत:ला जेवढा आकळलाय तेवढा कोणालाही उमगू शकलेला नाही.
विज्ञाननिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद ही या माणसाच्या जगण्याची मूल्ये. ती पारखत, पाजळत तो जगला. पाच वर्षे केलेला होमिओपथीचा अभ्यास, एक वर्ष केलेली लेक्चररशिप, त्यातून वाट्याला आलेला भ्रमनिरास, मग होमिओपॅथीचा पूर्ण त्याग, राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देऊन त्यात १०३वा नंबर पटकावून एम.बी.बी.एस, एम डी… पुढे स्त्री आरोग्यतज्ज्ञ म्हणून २५ वर्षांची प्रॅक्टिस… हा माणूस आयुष्यभर लढतच राहिला खरा, पण या जगण्यालाही त्यानं युद्ध न म्हणता सजगपणे अनुभवलेल्या जीवनशैलीचा अप्रतिम दर्जा दिला.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : उद्यासाठीचा आटापिटा…
हे सारं आलं कुठून?
तर डॉ. शंतनू यांच्या घरातूनच!
वडील डॉ. शरद अभ्यंकर स्वत: नास्तिक- अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संबंधित. खोटेपणाची चीड, विज्ञानाची चाड आणि प्रबोधनाची आवड… हे सारे जनुकीय संस्कारातून वाहात शंतनूच्या रक्तात शिरले असावे.
स्वत:ची दृष्टी सकारात्मक. गोष्ट सांगण्याची, रंगलेल्या गोष्टीत नाट्य भरण्याची सवय. इतक्या गोष्टीवेल्हाळ माणसाच्या लोभस तरीही माहितीपूर्ण लेखनाला अमाप प्रतिसाद मिळत गेला, यात नवल ते काय? आरोग्य हा तमाम वाचकांच्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय. यूट्यूबवर तर सर्वाधिक खपाची वस्तू… पण डॉ. शंतनू यांना काही विकायचे नव्हते. त्यांना फक्त लोकांशी गप्पा मारायच्या होत्या. अगणित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ते बोलत असत, विषय रूक्ष, पण त्या रूक्षतेला स्वभावातल्या अंगभूत ओलाव्याचा मिश्कील स्पर्श लाभलेला. गहन गंभीर परिषदांमध्ये प्रसन्नतेची झुळझुळ आणायचा हा माणूस! ‘हे सगळे आले कुठून?’- एका भेटीत मी विचारलं तर खळखळून हसले ते.
भाषा-शब्दांशी खेळणे हे सगळे लहानपणापासून. वाईसारख्या खेडेवजा गावात बैलगाडीला धरून किंवा काही अंतर गाढवाच्या पाठीवर बसून धाकटा शंतनू शाळेत जायचा. दिवसभर उंडारायचा. त्याची प्राथमिक शाळा कोणती?- सहज विचारलं तर ‘चल, दाखवतो’ म्हणत हरिहरेश्वर मंदिर ते दाते वाडा या रस्त्यावर घेऊन जाणार. त्या रस्त्यावर झपाटलेलं चिंचेचं झाड आणि अजून दोन वाडे. चार वर्षांत चार वेगवेगळ्या ठिकाणी भरणारी शाळा. शांताबाई मराठे आणि कमलाबाई अभ्यंकर या दोघींसह काही महिलांनी मिळून स्थापन केलेली. शांताबाई मराठे बालक मंदिर. बिन टीव्हीच्या त्याच्या घरात महाराष्ट्रातील कोणकोणत्या ठिकाणाहून साप्ताहिकं, पाक्षिकं, सायंदैनिकं येत असत. ही मासिकं पुस्तकं फडशा पाडण्यासाठीच तर असत. घरात तो नि त्याचा भाऊ शशांक ब्लॅक मॅजिक नावाचा खेळ खेळायचे. व्रात्यपणा अंगात मुरलेला. सगळे खेळ शब्दांच्या करामतीचे. घरात सरस्वती वाचनालय आणि हनुमान व्यायामशाळा काढण्याचे प्रयोग या मुलाने केले… दहाव्या वर्षी पाचगणीला संजीवनी शाळेत दोघा भावंडांना शिक्षणासाठी होस्टेलमध्ये ठेवले. आईबाबांनी वेगवेगळ्या शिक्षणतज्ज्ञांची मतं विचारात घेतली, बऱ्याच जणांशी चर्चा केली. पहिली दहा वर्षं मातृभाषेतून शिक्षण नि नंतर इंग्लिश माध्यमातून. मराठी उत्तम नि इंग्रजीवर प्रभुत्व ही जादू डॉ. शंतनू यांना यातूनच साधली असणार.
हेही वाचा…सुखाचे हॅशटॅग: टाक पाऊल पुढे जरा…
पण पाचगणीच्या संजीवनीत गेल्यावर या मुलाला साक्षात्कार झाला… आपल्याला इंग्रजी ओ का ठो येत नाही. ‘एकदा टेल ऑफ टू सिटीज’ वाचायला सुरुवात केली तर पहिल्या वाक्यातले दोन शब्द अडले. त्यासाठी डिक्शनरी उघडली तर त्यातले चार शब्द अडले. त्यामुळे पहिल्या दोनच वाक्यात टेल ऑफ टू सिटी मिटून ठेवावं लागलं. हा अकरा वर्षाचा मुलगा वाईला घरी पत्र पाठवून काय सांगे, तर इथे वर्गात बूट घालून जावं लागतं नि खडूला चॉक म्हणतात. त्याच्या दृष्टीने ‘वाई ते पाचगणी’ हा भलताच त्रासदायक कल्चरल शॉक होता.
या एकाच माणसाला किती किती मिती होत्या… एकाच वेळेस स्मरणरंजनात रमलेला कविमनाचा माणूस नि दुसऱ्या क्षणी बालपणातील निरागसता जपून असलेला प्रसन्न मित्र… एक चिकित्सक वाचक नाटकाची आवड असलेला बेफिकीर हरफनमौला कलावंत आणि आत्ताचा प्रौढपणातील विलक्षण ज्ञानाने आणि अभ्यासाने युक्त असलेला जबाबदार तत्त्वज्ञ; एकाच वेळेस आयुष्याच्या या तिन्ही टप्प्यात लीलया वावरणं सहज जमत असे या माणसाला!
डॉ. शंतनू वृत्तीने ठार नास्तिक, पण वाईत त्यांच्या क्लिनिकपर्यंत पोचताना रस्ता चुकला, फोन केला, तर म्हणाले, ‘माझ्या क्लिनिकच्या समोर गणपतीचं देऊळ आहे हो, चुकणार नाही तुम्ही!’ एका ठार नास्तिकाकडून ही खूण ऐकताना हसू आलं तर तेच पुढे म्हणाले, ‘एका बाजूला शंकराचं नि दुसऱ्या बाजूला पार्वतीचं देऊळ आहे मध्ये गणपती. कारण मी गायनाकॉलॉजिस्ट आहे ना!’
त्यांच्या क्लिनिकमध्ये दर्शनी भागात विठ्ठल प्रभू यांचा ‘निरामय कामजीवन’ हा ग्रंथ लावलेला. प्रत्येक स्त्री आरोग्यतज्ज्ञाने तो आपल्या क्लिनिकमध्ये लावायला हवा, हा आग्रह. वाईला त्यांच्या क्लिनिकमध्ये डॉ. प्रभू आले होते तेव्हा दारात त्यांचं स्वागत करताना या माणसाने साष्टांग नमस्कार घातला होता.
हेही वाचा…‘दूर’च्या दिल्लीतला ग्रंथविक्री प्रश्न…
डॉ. शंतनू यांचं वाईचं क्लिनिक ही एक मस्त आनंदी गंमत होती ती जुनी हमारा बजाजवाली स्कूटर. नवजात बालकाबरोबर काढण्याचा सेल्फी पॉइंट… घरातली जुनी स्कूटर न विकता त्याचा सेल्फी पॉइंट करायचा हे असं काहीतरी भन्नाट सतत सुचत राहायचं. कामात असतानाही सतत वाजणारा फोन. प्रत्येक फोन घेणार. मग अनेकांना व्याख्यानं देण्यासाठी डॉ. शंतनू अभ्यंकर हवे असणार. मग हा माणूस धावपळीत वेळ काढून गावागावात व्याख्यानं द्यायला जाणार. मग तिथे समई पूजन. देवादिकांच्या तसबिरींना हार वैगेरे. एकदा तर कोणा स्वामींची पूजाही त्यांच्या हस्ते केली गेली. या नास्तिक माणसाने स्वामींच्या गळ्यात रीतसर हारबीर घातला. ‘हे असं कसं करता तुम्ही? त्रास नाही का होत?’- विचारलं की उत्तर तयार असे, ‘आपलं कम्युनिकेशन कोणाबरोबर होणार ते महत्त्वाचं. आपण श्रोतृवर्गासाठी आलोय. त्यांच्या आरोग्याच्या समस्या महत्त्वाच्या. आपल्याला गप्पा त्यांच्याशी मारायच्या आहेत!’
अचानक कधी कंटाळा आला तेव्हा एकदा हा माणूस रोटरी क्लबच्या पाककला स्पर्धेत सहभागी व्हायला गेला, तिथे मालपुवा करायला सांगितल्यावर या पठ्ठ्याने तो केला. वरून बक्षीसही मिळालं. एखाद्याला धक्काच बसायचा तर हा म्हणाला, ‘एकही पुरुष नव्हता तिथे, म्हणून मला दिलं असणार बहुदा…’
या माणसाने स्वत:ला जगापुढे आनंदाने खुलं सोडलं होतं. स्वत:कडे घेऊन येणाऱ्या असंख्य पायवाटा तयार करून त्या खुमासदार पद्धतीनं अशा सजवून ठेवल्या होत्या की कुणालाही त्याच्यापर्यंत, त्याच्या बुद्धिप्रामाण्यवादापर्यंत, त्याच्या निरीश्वरवादापर्यंत सहज पोचता यावं. त्यांच्याकरिता निखळ नितळ संवादाचे सेतू बांधत मानवी नात्यांची साखळी गुंफत जाणारा हा आधुनिक संतच होता. संत गाडगेबाबांच्या कृतिशील, व्यवहारवादी अनुभवाधिष्ठित समुपदेशनाशी घट्ट नातं सांगणारी देखणी आणि आकर्षक पद्धती डॉ. शंतनू यांच्याकडे उपजतच होती.
हेही वाचा…‘दूर’च्या दिल्लीतला ग्रंथविक्री प्रश्न…
पत्नी डॉ. रुपाली नि डॉ. शंतनू कविता, अभिवाचनासारखे ऑफ बीट कार्यक्रम अनुभवायला, चांगली नाटकं पाहायला पुण्याला जाऊन रात्री परत यायचे… वाईला थिएटर नव्हतं ना… म्हणजे नाही… एकदा हे दोघे ‘मी वसंतराव देशपांडे’ या चित्रपटाला गेले. थिएटरमध्ये हे दोघे. बाकी कुणी नाहीच. त्यांनी त्यांच्या घराशेजारच्या दोघींना बोलावलं. त्या आल्या… आता चार जण झाले. मग दोघांनी आपल्या मित्र मैत्रिणींना फोन केले. आयत्या वेळेस कोण येणार? ओळखीचा असला तरी किमान दहा-बारा माणसं आल्याशिवाय मालक चित्रपट कसा सुरू करणार? ऐन वेळेस कोणी आलं नाही. तेवढ्यात बिगारी काम करणारे सहा-सात बिहारी लोक आले. ‘कौनसा पिक्चर’ म्हणून त्यांनी डोअर कीपरला विचारलं, त्यानं नाव सांगितलं… ‘वो गानेवाले वसंतराव…’
‘उनका पिक्चर है तो दे देना दस टिकीट… त्यांच्यामुळे यांना तो चित्रपट पाहता आला!’
असे कैक किस्से रंगवून सांगताना पुन्हा स्वत: खळखळून हसणार नि ट्रॅक बदलून त्यानंतर पुढची दहा मिनिटं रिचर्ड डॉकिन्सच्या फिलॉसोफीवर बोलणार. अगदी ऐकत राहावंसं वाटायचं. विराट अशा या विश्वातील मानवाच्या जगण्याचं एक वेगळं तत्त्वज्ञान रिचर्ड डॉकिन्सच्या किंवा डार्विनच्या निमित्तानं जगण्याच्या अनुभूतीतून तो सांगत राहायचा… या नोंदीचं बोट धरून आपल्यामध्ये त्या झिरपाव्या असं त्याला वाटत असायचं का?
हे सगळं एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपुल लेखनात लोकविज्ञान चळवळ नि अंधश्रद्धा समितीशी संबंधित विचारधारेचा आशय कुठे ना कुठे सतत झिरपत राहायचा. उच्चार स्वातंत्र्य, लोकशाही मूल्यं यांचं समर्थन डॉ. शंतनू यांनी सातत्यानं केलं. विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे भाबडेपणाशी या माणसाचं वाकडं. लेखन करताना अशा तमाम भाबड्या जनांना ठेवणीतले फटकारे मारत गेला. पण म्हणून त्या भाबड्यांचा राग कधी केला नाही.
वाई तर्कतीर्थांची… म्हणूनच विचारी नि मीमांसा मानणारी… डॉ. शंतनूवर वाईकरांचं प्रेम का असू नये? मनात आलं असतं तर पुण्यासह कोणत्याही शहरात या निष्णात डॉक्टरनं प्रॅक्टिस सुरू केली असती. गडगंज पैसा कमावला असता. मात्र वडिलांनी ५० वर्षे ज्या क्लिनिकमध्ये रुग्णसेवा केली त्या ‘मॉडर्न क्लिनिक’मध्येच थोड्या सोयी करत डॉ. शंतनू यांनी आपलं बस्तान बसवलं… वाईकर या ऋणात होतेच. वाईला त्याच्यातील साहित्यगुण, जबरदस्त वाचन, प्राज्ञपाठ्यशाळेसाठीचं योगदान, वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्याची कल्पकता ठाऊक झाली होती. त्यांना भेटायला येणारी माणसं ख्यातनाम साहित्यिक, नाटककार, सामाजिक क्षेत्रातले दिग्गज असत. सातारा, पुणे आणि इतर मोठ्या शहरांत डॉ. शंतनू हे नाव सर्वतोमुखी झालं होतं.
मोठ्या संघर्षानंतर बी. जे. मेडिकलमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा शंतनू बॅचमधील इतर मुलांपेक्षा सात एक वर्षानं मोठा… ती सारी ब्राईट… पण या मुलाला नाटकाचं वेड… नाटकं लिहावी, त्यात काम करावं याची कोण हौस! ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकातली त्याची विभाकरची भूमिका नि मंदाची भूमिका करणारी त्याच्यापेक्षा सात वर्षांनी लहान रुपाली रास्ने- जी पुढे त्याची अर्धांगिनी झाली.
हेही वाचा…पडसाद: अंतर्मुख करणारा लेख
कॉलेजमध्ये दर वर्षी नाटक व्हायचेच… पुरुषोत्तम, फिरोदिया, फर्ग्युसनचे इनलिंक, आयआयटीला मूड इंडिगो. शेवटी गॅदरिंगला बी. जे.मध्येच तीन अंकी नाटक… एका वर्षी ‘समोरच्या घरात’ हे नाटक… त्यात तो नवरा नि रुपाली बायको. नाटक करता करता अर्थातच दोघेही आकंठ प्रेमात बुडाले… तो एकांकिका, कविता करणारा… त्याचं मराठी ऐकत राहावं असं. रुपाली कॉन्व्हेंटमधली… तो प्रेमात असला तरी या मनस्वी माणसानं ते व्यक्त म्हणून केलं नाही. हिने फोन केल्यावर ‘शंतनू’ एवढाच शब्द बोलणार- ‘मी शंतनू बोलतोय’ हे पूर्ण वाक्यदेखील नाही. नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर महिनाभराची सुट्टी… पत्र नाही. संपर्क नाही… रुपाली औरंगाबादला… ज्याच्यावर प्रेम तो काही बोलतच नाही… महिना संपला. एके दिवशी पुण्यातल्या कॅम्पमधल्या एका रेस्तराँमध्ये त्याने तिला प्रपोज केलन, पण भणंग राहणारा… खादीचा कुर्ता घालणारा… नाटकात बुडालेला मुलगा आपल्या मुलीला सुखात ठेवेल का हा प्रश्न रुपालीच्या पालकांना पडला… पण मग. सगळे मार्क्स त्याच्या बुद्धीला दिलं गेलं. विवाह पार पडला… पुढे पत्नी डॉ. रुपाली नेत्रचिकित्सक झाली.
आयुष्य पुढे सरकत राहिलं. बहरत राहिलं आणि अकस्मात ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ हा डॉ. शंतनू अभ्यंकरांचा लेख ‘महाअनुभव’मध्ये प्रसिद्ध झाला. वाचकांनी हा प्रदीर्घ लेख वाचला. जो पुढे समाजमाध्यमांवर फिर फिर फिरला. त्यानंतर सगळ्यांची दृष्टी बदलली आणि ब्लॉगर, लेखक, वक्ता, डॉ. शंतनू अभ्यंकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला… घरादाराला धक्का बसला.
आपल्याला फुप्फुसाचा कॅन्सर झाला हे समजल्यावर अनेक गैरसमज गळत गेले. आपण निर्व्यसनी आहोत. आपली जीवनशैली अशा तऱ्हेची व्याधी होणारी नाही तरी आपल्याला याच्याशी झटावे लागणार हे कळल्यावर मुळात हा रोग आपल्याला का झाला असेल याचा त्याचा शोध सुरू झाला. गूगलला शरण जात त्या विषयावरचे साहित्य धुंडाळणे हा एकच उपक्रम! हा लेख घरात कोणाला न दाखवता डॉ. शंतनू यांनी ‘महाअनुभव’ला पाठवला होता, त्यामुळे सारेच चकित झाले. त्यानं इतकंखासगी कशाला लिहावं. आपल्याला अमुक एक व्याधी झाली ते का सांगावं असं प्रथम रुपालीला वाटलं. थोडीफार हीच भावना आई बाबा नि मुलांची होती. शंतनू मात्र शांत. आपल्याला कॅन्सर झाला तर त्यात लपविण्यासारखं काय आहे. आपल्याकडून काही तरी चूक झाली असं का वाटून घ्यायचं… ही काही लाजिरवाणी गोष्ट आहे का? जो डॉक्टर आहे आणि ज्याच्याजवळ लिहिण्याची ताकद आहे त्या माझ्यासारख्यानं यावर लिहू नये तर कोणी लिहायचं? – हा युक्तिवाद!
या लेखानंतरच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना डॉ. शंतनू सांगत, ‘मला आश्चर्य वाटतं, सगळेच हादरले. रडत होते. लांबलांबून लोक मला भेटायला येत. त्यात काळजी चिंता असायची… त्या लेखापूर्वी आणि लेखानंतर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. लोकांना तो लेख खूप आवडला. संतोषीमातेची पत्र खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या महाराष्ट्रात हा लेख व्हायरल व्हावा याचेच मला अतोनात आश्चर्य वाटले!’ – होतंच ते एक आश्चर्य!
सर्वत्र चर्चेचा एकच विषय. एकदा भेळ खायला गेल्यावर एका अनोळखी माणसाने त्यांना ओळखून विचारलं, ‘डॉक्टर, कितवी स्टेज?’ त्याच्या डोळ्यात दु:ख व करुणा होती.
शंतनू यांनी उत्तर दिलं, ‘चौथी…’
विचारणारा इतका हळहळला की त्याच्या या दु:खाच्या सन्मानार्थ शंतनू नि रुपाली भेळ न खाताच निघून गेले.
मृत्युपूर्वी जवळपास एक महिना अगोदर विल्यम श्वेट या अमेरिकन पेशंटने लिहिलेल्या ‘लिव्हिंग विथ टर्मिनल कॅन्सर- अ स्टोरी ऑफ होप’ या पुस्तकाची माहिती मिळाली. डॉ. शंतनू यांना या पुस्तकाचा आधार वाटला. आपल्यालादेखील खूप काळ जरी नाही तरी काही वर्षे नक्कीच बोनस आयुष्य मिळू शकेल याची खात्री वाटू लागली.
हेही वाचा…सीमेवरचा नाटककार..
शेवटचे तीन महिने डॉ. शंतनू अनेक कामांत व्यग्र राहिले. मे महिन्यात वाईला वसंत व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करताना वैभव मांगले, संदीप खरेंची खुमासदार मुलाखत घेतली. वाईला काही ठिकाणी व्याख्यानं… क्लिनिकमध्ये जाणं… वाईकरांना भेटणं चालूच होतं… डॉक्टर इथे आहेत, हे त्यांना माहीत होतं. ११ जुलैला डॉ. शंतनू यांनी एक मुलाखत दिली. तेव्हा ते थकलेले दिसत होतेच. १६ जुलैला ऑक्सिजन लावावा लागला. तोपर्यंत चालतेबोलते होते ते. १५ जुलैला रुटीन केमोसाठी दीनानाथला जाताना कोणताच वाईट विचार डोक्यात आला नाही. १३ जुलैला मुलाची एंगेजमेंट. १४ जुलैला चार पुस्तकांचे प्रकाशन! डॉ. शंतनू यांच्याच भाषेत सांगायचं तर डॉक्टरांचे ‘चौळे…’ हे दोन्ही उत्तम झालेच पाहिजेत असे कार्यक्रम. या कार्यक्रमाला भाषणाऐवजी ते आभार मानायला उभे राहिले तेव्हाच धाप लागत होती, पण कसलेला कलाकार तो. धाप लागायला सुरुवात झाली की तो पॉज घ्यायला सुरुवात करी. त्या अवधीत श्वास घ्यायचा… चेहऱ्यावर तेच परिचित हसू…
१५ जुलैला दीनानाथला श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून दाखल व्हावं लागलं शेवटी. २६ तारखेपर्यंत तिथेच… पुन्हा पुण्याच्या घरी १०-१२ दिवस. डॉ. शंतनू खूश होते… आजूबाजूला जिवलग माणसे… मुलगा, मुलगी, नात… ऑक्सिजन जरी अध्येमध्ये लागत होता तरी ही माणसे डोळ्यासमोर होती. इराला- नातीला मांडीवर घेत तिच्यासाठी केलेल्या कविता म्हणणं चालू होतं. पुन्हा ९ ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. १२ ऑगस्टला पुन्हा श्वासाला त्रास. त्यानंतर आयसीयू. तिथे हाय फ्लो ऑक्सिजनचे मशीन आहे म्हणून त्या ठिकाणी पाठवणी. वाटलं होतं दोन आठवड्यांत वाटेल नक्की बरं… खात्री नि विश्वासाची पेरणी सुरू.
… पण तसे घडले नाही. शंतनू यांनी मृत्युपत्रात लिहून ठेवले होते, मला विनाकारण कोणताही लाइफ सपोर्ट चालू ठेवू नका. शेवटी अतिशय शांतपणे सगळ्यांकडे पाहत पाहत त्यांनी अखेरचा निरोप घेतला.
हा माणूस गेला तेव्हा आख्खी वाई लोटली. माणसे हमसून हमसून रडत होती. कैक शोकसभा… तीन-चार तास चालणाऱ्या. ‘माझी आणि त्यांची विचारसरणी भिन्न… अंनिस आणि लोकविज्ञान चळवळीशी ते एकनिष्ठ. मी सश्रद्ध, पण त्या माणसाचं माणूसपण एवढं मोठं होतं की, त्यांच्याबद्दल आकस कधी वाटला नाही,’ असं म्हणणारा कुणी डोळे पुसत दुसऱ्याला सांगायचा.
‘एखादा संघ प्रचारक, जनकल्याण रक्तपेढी आणि शंतनूचं वैचारिक व्यासपीठ भिन्न हे सांगून वैचारिक विरोध कधीही या संबंधाच्या आणि संवादाच्या आड आला नाही.’
विज्ञानाचा लोककल्याणासाठी केला जाणारा उपयोग ते जाणून होते. त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद हा प्रामाणिक होता. त्या अर्थाने ते पुरोगामी होते.
आस्तिक-नास्तिक साऱ्यांचा ओघ असलेली गर्दी. शंतनू अभ्यंकर या लोभस माणसाचा मृत्यू किती चटका लावणारा ते सांगून गेली.
हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जतन-सुविधेचा सोपा काळ..
सबंध आयुष्यात वेगवेगळ्या घटनांचा लंबक एका बाजूला जाऊन आदळतो; तेव्हा त्यातून हताश न होता त्या लंबकाच्या दुसऱ्या बाजूला झालेल्या प्रवासाचा आनंद घेणारी वृत्ती असलेला हा लोभस माणूस त्या आंदोलनांचा आनंद घेताना दिसत आला. त्या प्रवासावर व्यक्त होताना प्रवासाची चिकित्सा करताना दिसला. इतक्या उत्कटतेनं की सामान्य संवेदनशील माणसालाही त्याच्याकडे पाहून वाटावं की हा खरंच आजारी असेल तर आजारी असणंसुद्धा रसरशीत जगण्याचा भारीच भाग आहे. समज-अपसमज, श्रद्धा-अंधश्रद्धा या धर्मशास्त्रातल्या असो वा विज्ञानातल्या- चिकित्सा करून त्यातून गवसलेल्या तथ्यांची आपल्याच दिलखुलास आकर्षक पद्धतीनं मांडणी करणारे डॉ. शंतनू अभ्यंकर एखाद्या गाणाऱ्या खोडकर हसऱ्या चेहऱ्याच्या शुभ्र सूफी संतासारखे वाटत राहिले खरे. आता ते नाहीत, तरी हताशेनं हळहळणारं मन त्यांच्या आठवणींनी दुखावेल, पण वियोगाच्या त्या दु:खाला एक प्रसन्न, सकारात्मक किनारही असेलच असेल!
bhargavevrinda9@gmail.com