करोनाने जगाला आपल्या विळख्यात घेतल्यापासून गेली दीड-दोन वर्षे पर्यटन ठप्पच झालंय. ते कधी एकदा सुरू होतंय असं जातिवंत भटक्यांना वाटणं स्वाभाविकच. आता हळूहळू पुनश्च पर्यटनाच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून झळकू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यापुढचं पर्यटनविश्व कसं असेल, कसं असावं याबद्दल खुमासदार चर्चावजा गप्पा..

डॉ. शरद वर्दे

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

‘थंडीचे दिवस सुरू होताहेत किशोर. यंदा नवीन वर्षांरंभ कोणत्या देशात साजरा करणार तुम्ही दोघं राजा-राणी?’ सागररावांनी बीअरचा एक जोरदार घोट घेऊन मित्राला कोपरखळी मारली.

किशोररावांऐवजी मानसीवहिनींनी उत्तर दिलं, ‘हे असतील राजेमहाराजे अजूनही.. मी काही राणीबिणी नाही राहिले आता. पन्नाशी उलटली माझी.’

तोवर किशोरराजे बीअरच्या तात्पुरत्या प्रभावातून बाहेर पडत म्हणाले, ‘रिटायर झाल्यानंतर दरवर्षी कधी सिंगापूर, तर कधी दुबईला जाऊन न्यू ईयर साजरं केलं. पण गेल्या वर्षीसारखं यंदाही इथेच हॅपी न्यू ईयर होणार बहुतेक.’

अचलावहिनींनी चिमटा काढला, ‘तुमचं बरं असतं बाई.. सरकारी नोकरी झाली, आता सरकारी पेन्शन मिळतेय दोघांनाही. दुप्पट उत्पन्न, दुप्पट मजा. फिरा परदेशी.’

वयाने साठी ओलांडलीय याची आठवण करून दिल्याने मानसीवहिनी जरा कातावल्याच. लगेच पलटवार करून म्हणाल्या, ‘आमचं कसलं बरं? आत्ताच तर कुठे तीन-चार वर्ष जातो आहोत आम्ही कुठेतरी. तुमचे सागरसाहेब तर मल्टिनॅशनल कंपनीत होते. ते पण मॅनेजिंग डिरेक्टर! पगार दणदणीत. अधिक दरवर्षी घसघशीत बोनस मिळत असणारच. तुम्ही दोघांनी तर तरुणपणात जगभर फिरून धमाल केली.’

किशोररावांनी संभाषण कोणत्या दिशेने जातंय ते ओळखलं. ते मूळ पदावर आणण्यासाठी त्यांनी विचारलं, ‘वहिनी, वाईन घेणार का? जावयाने माझ्या पासष्टीच्या निमित्ताने कॅलिफोर्निया रेड वाईनच्या दोन बाटल्या पाठवल्या आहेत.’

‘मानसी, तूही घेत असशील तर घेईन मी.’

वाईनचे दोन ग्लास आणून किशोररावांनी विचारलं, ‘काय रे सागर, करोनामुळे बिघडलेली परिस्थिती पूर्वीसारखी कधी होईल? तुझा काय अंदाज?’

सागरसाहेब उत्तरले, ‘ते कसं सांगणार?’

‘पण तुला इतका परदेश प्रवासाचा अनुभव आहे. ३० वर्ष तू कामानिमित्त कॅनडापासून न्यूझीलंडपर्यंत फिरत होतास. मोठमोठे हॉटेल मालक आणि विमान कंपन्यांतल्या वरिष्ठ लोकांबरोबर तुझी उठबस. तुला काहीतरी अंदाज  असेलच.’

‘पूर्वीसारखं लगेचच होणं कठीण आहे. या दीड-दोन वर्षांत पर्यटन क्षेत्रात खूपच पडझड झालीय. विमान कंपन्या आक्रसल्यात. अनेक फ्लाइट्स भारतात आल्याच नाहीत. बबल सर्विसच्या नावाखाली भारत सरकारशी झालेल्या करारानुसार चुळकाभर विमानसेवा सुरू राहिली. त्यातूनदेखील त्या, त्या देशाचे नागरिक, कायम रहिवाशी आणि आपत्कालीन कारणांसाठी प्रवास करणारेच जाऊ शकले.’

मानसीवहिनींनी धास्तावून विचारलं, ‘म्हणजे विमान कंपन्या पुन्हा सुरू होणारच नाहीत? आमची मुलं आहेत हो परदेशात. एक या टोकाला सिडनीत, तर दुसरी त्या टोकाला बॉस्टनमध्ये.’

‘तसं नाही वहिनी. सुरू होतील, पण पूर्वीसारख्या सुरू कधी होतील ते सांगणं अवघड आहे.’

अचलावहिनींनी महत्त्वाची अडचण बोलून दाखवली, ‘मुळात प्रवाशी तर यायला हवेत ना?’

सागरराव म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वीपर्यंत विमानप्रवास करणारे मुख्यत्वे दोन प्रकारचे लोक होते. एक कामानिमित्त अनेक ठिकाणी जाणारे बिझिनेस ट्रॅव्हलर आणि दुसरे पर्यटनासाठी निघालेले टुरिस्ट. पहिल्या गटात ट्रेनिंगसाठी जाणारे आणि दुसऱ्या गटात स्पेशल इव्हेंट्ससाठी जाणारे असायचे. या दोन वर्षांत टुरिझम जवळजवळ संपुष्टात आलंय. इव्हेंट्सही बरेचसे बंद झालेत.’

‘सगळंच ठप्प झालंय.’

‘पण बिझनेस काही बंद करता येत नाही. ट्रेनिंग बंद करता येत नाही. म्हणून मग त्यांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरली.’

मानसीवहिनी म्हणाल्या, ‘आम्हीसुद्धा आता इंटरनेट बँकिंग कसं करायचं ते शिकलोय.’

‘छान. तर कंपन्यांनी आणि राज्यकर्त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स करून कामं निपटली. पण दोन्ही गटांचा प्रवास थांबल्यामुळे विमानं आणि हॉटेलं थंडावली.’

किशोररावांनी पुस्ती जोडली, ‘सोबत टुर ट्रॅव्हल कंपन्या, बसमालक, टॅक्सीचालक, टुर गाईड यांचीही पंचाईत झाली.’

‘हो ना. एका आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार, सर्वाचं मिळून आतापर्यंत १२ ट्रिलियन डॉलरचं नुकसान झालंय.’

मानसीवहिनींनी विचारलं, ‘म्हणजे किती?’

‘१२ लाख कोटी डॉलर.’

‘म्हणजे नक्की किती आपल्या रुपयांमध्ये?’

किशोररावांनी खिशातून सेलफोन काढून म्हटलं, ‘घे. आता या आकडय़ाला पंचाहत्तरने गुण.. मग कळेल.’

सागरराव पुढे म्हणाले, ‘आता कंपन्यांना सवय झाली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे प्रवास करण्याची गरज संपली. वेळ वाचला. पैशांची तर खूपच बचत झाली.’

मानसीवहिनींनी पतिदेवांचा फोन स्वत:च्या पर्समध्ये टाकून मूळ प्रश्नाला पुन्हा हात घातला, ‘म्हणजे आमचं देशी, परदेशी फिरणं बंद होणार?’

‘नाही होणार. परिस्थिती आटोक्यात आली की पूर्वीचे पर्यटक बॅगा भरून दुप्पट जोमाने घराबाहेर पडतील. विमानसेवा सुरू होतील.’ सागररावांनी ठामपणे भविष्य वर्तवलं.

‘देव करो आणि तसंच होवो.’ वहिनींनी अपार भक्तिभावाने डोळे मिटून हात जोडले.

किशोररावांनी विचारलं, ‘असं इतक्या आत्मविश्वासाने तू कसं काय म्हणू शकतोस?’

‘सांगतो. ही कन्झ्युमर मेंटॅलिटी आहे.. ग्राहकाची मानसिकता! यशस्वी व्यावसायिकांना ही कोणत्याही बिझनेस स्कूलमध्ये न जाता समजते. जी मुलं तिथे जाऊन एमबीए करतात, त्यांना निरनिराळ्या केस स्टडींच्याद्वारे शिकवली जाते.’

‘नक्की काय ते सांग..’

‘ग्राहकाची जी गरज कोणत्या तरी बा कारणांमुळे दाबली जाते, ती काही काळानंतर दुप्पट जोमाने उसळून येते.’

‘काही काळानंतर म्हणजे किती दिवसांनंतर?’

‘दोन शक्यता असतात. एक म्हणजे ते बा कारण लोप पावणं. सध्याच्या संदर्भात करोना आणि त्याची म्यूटेशन्स- म्हणजे करोनाच्या पुढच्या पिढय़ा नष्ट होणं. ते होईलही बहुतेक. शास्त्रज्ञ त्याच दिशेने काम करताहेत. त्यांना एक अशी प्रभावी लस सापडली किंवा गुणकारी औषधाचा शोध लागला तर भविष्यात हे संकट गंभीर राहणारच नाही.’

‘खरंच असं होईल?’

‘का नाही होणार? अनेक दशकांपूर्वी पेनिसिलीनचा शोध लागल्यावर हेच झालं. त्यानंतर झपाटय़ाने एकापेक्षा एक प्रभावी अँटिबायोटिक्स निर्माण झाली. आता पूर्वीच्या जीवघेण्या देवी, प्लेग, घटसर्प वगैरे रोगांची दहशत राहिली नाहीये.’

‘खरं आहे. आणि दुसरी शक्यता कोणती?’

‘लोकांना सवय होणं, त्यांनी करोनाची पर्वा न करणं, ‘टू हेल विथ यू’ म्हणणं, असं किती दिवस घाबरत घाबरत घरात कोंडून घेणार? काय व्हायचं ते होऊ दे.. ही मनोवृत्ती बळावते.’

‘ते झालेलं बघतोयच की आपण हल्ली. गेल्या वर्षी लोकांनी सणसमारंभ बंद केले. यंदा अनेक ठिकाणी ते सुरू झाले. बिनधास्तपणे. विशाल मोर्चे आणि विराट सभा तर होताहेतच.’

‘ते याच कारणामुळे. पर्यटन ही प्रगल्भ समाजाची गरज असते. आता ज्या मध्यमवर्गीय लोकांचं उत्पन्न काही ना काही कारणांमुळे वाढलं आहे आणि ज्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत, त्यांच्यात बाहेरचं जग बघण्याची ऊर्मी बळावली आहे.’

मानसीवहिनींनी कबूल केलं- ‘हो. आम्हालाही वाटतं तसं. उभा जन्म गेला नोकरीसाठी धावपळ करण्यात आणि मुलांना वाढवण्यात. सासू-सासरेही होते घरात. बाहेर कुठेही जाता आलं नाही. पण आता शक्य आहे. तेही हातपाय धड असेपर्यंतच. त्यात या करोनामुळे दोन वर्ष फुकट गेलीत.’

‘आता पुन्हा शक्य होईल, वहिनी. काळजी करू नका.’

‘सुरू तर होऊ दे. मग मी वर्षांतून चार ट्रिपा करणार म्हणजे करणारच.’

‘तुमच्यासारखीच निकड भरघोस डबल उत्पन्न मिळवणारी मध्यमवयीन जोडपी आणि अविवाहित तरुण-तरुणी यांनाही असते. त्यांना देशोदेशींची संस्कृती बघायची असते.’

‘भारताबाहेर कसली आलीय संस्कृती?’

‘तरुण पिढीला देशोदेशीची खाद्यसंस्कृती, वाद्यसंस्कृती आणि मद्यसंस्कृती प्रत्यक्ष अनुभवायची असते. तिथली भव्य वस्तुसंग्रहालयं, मनोरंजनाची स्थळं, नयनरम्य बॅले, शेक्सपिअरची नाटकं, कर्णसुखद ऑपेरा, पारंपरिक जत्रा, विदेशी कॉकटेल्स प्रत्यक्ष अनुभवून मनाला उभारी द्यायची असते. ही गरज जास्त दिवस दाबून ठेवणं केवळ अशक्यच.’

मानसीवहिनींनी समाधानाचा सुस्कारा सोडून म्हटलं, ‘म्हणजे आम्हाला अजून रशिया, दक्षिण अमेरिका, जपान, आफ्रिका बघायचं आहे ते आता शक्य होईल..?’

अचलावहिनी म्हणाल्या, ‘नक्की होईल. आणि मुलीचं बाळंतपण काढायलाही जाता येईल.’

सागररावांनी दुरुस्ती केली, ‘प्रवास होईलच हो; पण एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. तुमचं पर्यटन लगेचच पूर्वीसारखं नाही होणार.’

‘का नाही होणार?’

‘पर्यटन सुरू झालं तरीही लोकांना मनातून धास्ती राहीलच. ही बदललेली, काहीशी धास्तावलेली मनोवृत्ती संबंधित कंपन्यांनी नीटपणे समजून घेतली पाहिजे. त्यानुसार विमान कंपन्यांनी, हॉटेल चालकांनी आणि पर्यटन सेवा क्षेत्रातल्या व्यावसायिकांनी आपली धोरणं आखली तर या व्यवसायाला पुन्हा उभारी येऊ शकेल.’

किशोररावांनी विचारलं, ‘लोकांच्या विचारांत काय बदल झालाय असं तुला वाटतं?’

‘धास्ती आणि अनिश्चितता. लोक पूर्वी कधीही नव्हते इतके आज धास्तावलेले आहेत. म्हणजे घराबाहेर तर पडायचंच आहे; पण प्रवास सुरक्षित होईल का, ही भीती. विमानात चढले की अनेक प्रवासी हातातल्या जंतुनाशकाचा दणदणीत फवारा सीटवर मारतात. हॉटेलमध्ये गेले की तेच करतात. हॉटेलच्या खोलीत गेले की चादरी आणि अभ्रे खरंच जंतुनाशकं घालून काळजीपूर्वक धुतले आहेत का, हे मॅनेजरला चारचारदा विचारतात. विमानातल्या आणि हॉटेलमधल्या कमोडचा वापर करताना त्यांना मनातून धाकधूक असते. जेवायला बसले तर प्लेट्स खरंच स्वच्छ आहेत का, ते चारचारदा न्याहाळून तपासतात.’

‘हो रे. घरातल्या घरातही आम्ही अजून सतत हात धूत असतो. पण मग यावर उपाय काय?’

‘उपाय पर्यटन क्षेत्रातल्या लोकांनी शोधायचा आहे आणि अमलात आणायचा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्टलेस सर्विस.’

‘म्हणजे?’

‘जास्तीत जास्त सेवा कोणाचाही हात न लागता पुरवायच्या. आणि ते तसं होतंय हे पर्यटकांना दिसलं पाहिजे. टूर ऑपरेटर्सपासूनच ही सुरुवात झाली पाहिजे. मोठय़ा शहरांमध्ये ठिकठिकाणी त्यांची मोठी, चकचकीत कार्यालयं आहेत. याआधी पर्यटन करू इच्छिणारे लोक तिथे जाऊन, प्रत्यक्ष एजंटला भेटून, समोरासमोर बसून सर्व माहिती घेत असत.’

मानसीवहिनींनी म्हटलं, ‘हो. आम्ही असंच करतो.. म्हणजे करत होतो.’

‘यापुढे ही चर्चा बरीचशी ऑनलाइन व्हायला हवी. म्हणजे अनोळखी माणसांशी प्रत्यक्ष संबंध येणारच नाही. ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलद्वारे सर्व बाबी निवांतपणे समजून घेता येतील. नाही तरी सध्या अशा प्रत्येक पर्यटन-इच्छुकाकडे स्मार्टफोन आहेच. वहिनी, तुम्ही म्हणालात तसं या दोन वर्षांच्या करोनाकाळात वयस्कर मंडळीही नेट बँकिंग, पेटीएम, व्हॉट्सअ‍ॅप, नेट सर्फिग वगैरेमध्ये पारंगत झालीय.’

‘हो. आम्ही खूप चॅटिंग करतो.’

‘यानंतर तुम्ही एक फोन करायचा किंवा मेसेज पाठवायचा. टुर कंपनीकडून लगेच एक छोटी प्रश्नावली येईल. त्यात तुमची फक्त प्राथमिक माहिती भरायची. म्हणजे तुम्ही कितीजण प्रवास करणार, तुमची वयं, किती दिवसांची टुर हवी, आतापर्यंत कुठे कुठे जाऊन आलात, वगैरे. मग तुम्हाला तुमच्या सोयीनुसार चर्चा करण्याची वेळ सांगितली जाईल आणि त्या वेळेला व्हिडीओ कॉल येईल. तुम्ही त्या चुणचुणीत प्रतिनिधीकडून सर्व माहिती विचारून घ्या, सगळे प्रश्न विचारा आणि पुढच्या कॉलची वेळ ठरवा. ईमेलवरून सगळी संबंधित परिपत्रकं तात्काळ येतील. ती नीटपणे वाचा.’

‘चालेल.’

‘पुढच्या ऑनलाइन चर्चेत तुम्ही कोणती टुर घेणार, एकूण रक्कम किती भरायची, तारीख कोणती वगैरे ठरवायचं, रकमेबद्दल घासाघीस करायची आणि प्लॅन पक्का करायचा. नेट बँकिंग करून पैसे ट्रान्सफर करायचे. विमान तिकिटं आणि इतर कागदपत्रं ईमेलने येतील.’

‘आणि त्यांच्याकडून फुकट बॅग कशी मिळणार?’

किशोरराव डाफरले, ‘सहा बॅगा पडल्या आहेत घरात. प्रत्येक बॅग फक्त एकेकदाच वापरलीय.’

‘म्हणजे काय? हक्क आहे तो आपला.’

सागररावांनी तिढा सोडवला, ‘बॅग हवीच असेल तर ती कुरिअरने घरपोच येईल. त्यावर सॅनिटायझर फवारून ती तीन दिवस तशीच बाल्कनीत ठेवा. किंवा बॅग नको असं सांगा आणि बॅगेच्या किमतीएवढा डिस्काउंट मागून घ्या.’

‘हं. हे छान सुचवलंत.’

‘तसंच विमान कंपन्या आणि हॉटेल चालक आता जुन्या पद्धती सोडून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा जोमाने वापर करतील आणि अनोळखी लोकांचा नजीकचा संपर्क कमीत कमी प्रमाणात ठेवतील.’

‘कठीण आहे रे. आम्हाला सवय आहे ती बेल दाबून शिपायाला बोलवायचं आणि ‘पाणी घेऊन ये’ असं सांगायचं. सगळंच आपोआप मशीनद्वारे होणार म्हणजे कठीणच!’

मानसीवहिनींनी उलट पवित्रा घेतला, ‘कठीण काय त्यात? मस्तच होईल सगळं. आपली मुलं परदेशात हेच करतात. सूर्यास्तापूर्वी तासभर घरातले दिवे आपोआप लागतात. हवेत बदल झाला की हीटर किंवा कूलर आपोआप सुरू होतो. जमिनीवर ठेवलेला रोबो आपणहून घरातला सगळा कचरा काढतो.’

‘म्हणजे वहिनी हा बदल पटकन् तुमच्या अंगवळणी पडेल. शिवाय टुर कंपन्यांनी आता ‘१४ दिवसांत दहा देश’ अशी पॅकेजं बाजूला ठेवली पाहिजेत. पर्यटक आता ‘टिकमार्क टुरिझम’ करायला धास्तावतील.’

‘टिकमार्क टुरिझम म्हणजे?’

‘एकेक देश एक-दोन दिवसात आटोपून पुढच्या देशात बसने किंवा विमानाने जाणं. हातात जणू सर्व देशांची यादी आहे आणि हा देश आज पाहिला असं म्हणून रात्री त्या देशासमोर टिकमार्क करणं. काहीच समजत नाही हो त्या देशाबद्दल! लोक जातात पॅरिसला. जगप्रसिद्ध लूव म्युझियम बघितलं का, असं विचारलं तर ‘हो’ म्हणतात. ‘किती दिवस लागले सगळं पाहायला?’ ‘नाही म्हणजे आतून नाही बघितलं. बसमधून गाईडने सांगितलं की, हे ते जगातलं एक नंबरचं म्युझियम. आणि ते नीटपणे बघायचं तर दोन-तीन दिवस लागतील. इतका वेळ नव्हता.’ ‘बरं, आयफेल टॉवर पाहिलात?’ ‘हो, पण तोही बसमधूनच.’ ‘आणि पॅरिसच्या जगप्रिय मूलान रूझ नाइट क्लबमध्ये रात्री जाऊन डोळ्याचं पारणं फेडणारे कॅबेरे डान्स पाहिले असतीलच ना?’ ‘छे हो, काहीतरीच काय? आम्हा २०-२५ पुरुषांसोबत सगळ्यांच्या बायका होत्या ना बरोबर!’ असं दीड दिवसात पॅरिस आटोपलं. हे टिकमार्क टुरिझम.’

किशोररावांनी मान डोलवली. ‘आमचंही पॅरिसमध्ये असंच झालं. पण रात्री आमच्या टुर कंपनीने जेवणात पुरणपोळ्या वाढल्या त्या मस्तच होत्या. तृप्त झालो. ब्रेकफास्टला पण टिपिकल मराठमोळे झणझणीत पदार्थ असायचे. युरोपमध्ये बसून ते खाणं म्हणजे अलौकिक अनुभव होता.’

‘अरे बाबा, जाता परदेशी तर जेवा की तिथलं जेवण! मी खाद्यसंस्कृती म्हणालो मघाशी ते याच संदर्भात. गेलाच आहात नवीन देशात तर तिथली अभिनव जीवनशैली अनुभवा. पण ४०-५० लोक एकत्र पर्यटन करत असले की ते केवळ अशक्य असतं. म्हणून यापुढे अनेक लोक असं मोठय़ा ग्रुपमधून भसाभसा एकेक देश बघण्यापेक्षा- म्हणजे अशा मास टुरिझमऐवजी क्लास टुरिझमला प्राधान्य देतील.’

‘तुझ्या या नवीन संज्ञांचा शब्दार्थ समजतो, पण भावार्थ कळत नाही.’

‘पन्नास वर्षांपूर्वी शाळेत हे शब्द ऐकत होतो आपण; पण आहेत लक्षात अजून. तर क्लास टुरिझम ही आता भविष्यकाळाची गरज होणार आहे. एकेक कुटुंब, फक्त मित्रमैत्रिणी, तीन-चार नातेवाईक किंवा स्नेही कुटुंबं अशी पर्सनलाइज्ड टुर जास्त पसंत करतील.’

‘तुम्ही येत असाल तर आपण चौघं जाऊ या निरनिराळ्या ठिकाणी.’

‘नक्की. पण एक महत्त्वाचा बदल करायचा. व्हेकेशनऐवजी स्टेकेशन करायचं.’

‘आता हे काय नवीन?’

सागररावांनी विस्तृतपणे सांगितलं, ‘ही आपली गरजही आहे आणि विशेष आनंददायीसुद्धा आहे. स्टेकेशन म्हणजे एकाच ठिकाणी जायचं. तिथेच मुक्काम ठोकायचा. शक्यतोवर गावात. हल्ली सर्व सुखसोयीसंपन्न छोटी छोटी स्वतंत्र घरं किंवा स्टुडिओ अपार्टमेंट्स आठ-दहा दिवसांसाठीही भाडय़ाने मिळतात. एअरबीएनबी, होमटूगो, फ्लिपकीसारख्या अनेक कंपन्या हे काम करतात. आसपास पायी पायी फिरायचं. स्थानिक लोकांना न्याहाळायचं. तिथलंच स्थानिक खाणंपिणं चाखायचं आणि ते गाव, तो देश समजून घ्यायचा. प्रवासाची धास्ती वाटते म्हणून सततचा प्रवास टाळायचा. त्यामुळे विमान प्रवास आणि बस प्रवास खूप कमी होईल. म्हणजे धाकधूकही नाही आणि पर्यटनही निवांतपणे होईल.’

‘आणि टुर कंपनी हे नीटपणे आखून देईल?’

‘काही वर्षांपूर्वी मोठय़ा टुर ऑपररेटर्सनी अशी सेवा द्यायला सुरुवात केलीयसुद्धा.’

‘तू म्हणतोस ते पटतं मला. सतत १५ दिवस सिक्स-सेव्हन-एट करून चार दिवसांत माझ्या वयाची माणसं थकून जातात. दर दिवशी सकाळी नऊ वाजता बसमध्ये बसल्यावर थोडय़ाच वेळात लोक पेंगायला लागतात. खिडकीबाहेरचं काय बघणार? रात्री आठ वाजता नवीन शहर, नवीन हॉटेल.. बॅग उघडा, सकाळी ती भरून निघा पुढच्या प्रवासाला. खरं सांगतो, नक्की कधी कोणत्या शहरात पाय टेकले होते ते भारतात परतल्यावर आठवतदेखील नाही.’

‘आणि किशोर, पर्यटन म्हटलं की आपल्याला परदेशच आठवतो. पण आपल्यापैकी किती जणांनी खुद्द आपल्याच देशातली- अगदी आपल्या राज्यातलीच नयनरम्य किंवा ऐतिहासिक स्थळं पाहिली आहेत? ईशान्य भारतातली ठिकाणं खरोखरच अभूतपूर्व आहेत. खुद्द महाराष्ट्रात असूनही कधी विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश या विभागातला निसर्ग आपण पाहिलाय?’

मानसीवहिनींना काही हे पटलं नाही. ‘आणि लोकांना कुठे गेलो होतो असं सांगायचं? समोरची बाई म्हणेल, ‘आम्ही किनई यंदा टोकियो, ओसाका, हिरोशिमा बघून आलो.’ आणि आम्ही सांगायचं की, गडचिरोली, उस्मानाबाद, नंदुरबारला गेलो होतो. हसतील सगळे.’

‘वहिनी, तुम्ही बाहेरचं जग पाहणार म्हणता ते तुमच्या आनंदासाठी, वेगळ्याच अनुभवांसाठी, मन ताजंतवानं करण्यासाठी की मित्रांसमोर फुशारकी मारण्यासाठी? जा की एकदा कोकणात. राहा समुद्रकिनारी. ताजेतवाने होऊन याल. आणि आता या धाकधुकीचा पगडा असलेल्या काळात स्वत:च्याच वाहनातून पाच-सातशे किलोमीटरच्या परिघातलं पर्यटन आपण बिनघोर करू शकतो. चार दिवसांत परत येऊ शकतो. अशी मिनीकेशन हीसुद्धा आता नजीकच्या भविष्यकाळातली गरज होणार आहे.’

‘पण आम्हाला इतर देशच बघायचे आहेत. त्यानंतर करू कधीतरी तारकर्लीचं मिनीकेशन.’

‘हेच सगळं नीट आखून देण्यासाठी आता पर्यटन सल्लागार हा नवीन व्यवसाय सुरू होईल.’

‘आता हे लोक काय करतील?’

‘सल्ला देतील. पर्यटन ठप्प झाल्याच्या या प्रदीर्घ कालावधीनंतर आता या संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता यांचं महत्त्व खूप वाढलंय. प्रत्येक देशाचे पर्यटनविषयक नियम वेगवेगळे. रोगाचा प्रादुर्भाव किंचित वाढला की काही देश बंदी घालतात. या कारणामुळे आणि वैयक्तिक समस्यांमुळे प्रवासाच्या तारखा आयत्या वेळेला बदलू शकतात. त्यामुळे कोण बुकिंगमध्ये बदल करून देतं आणि कोण कटकट न करता पैसे परत करतं याबद्दलची माहिती देणारे सल्लागार आता हवेत.’

‘नक्कीच.’

‘शिवाय टुर ऑपरेटर अनेक आहेत. काही मोठय़ा कंपन्या, तर काही छोटय़ा. काही जुन्या, काही नवीन. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काहींनी रद्द झालेल्या पर्यटनासाठी भरलेली रक्कम परत केली. काहींनी मौन पत्करलं. काही विमान कंपन्या उत्तम सेवा पुरवतात, काही वैताग देतात. काही ठिकाणं पर्यटकांची झकास देखभाल करतात. काही ठिकाणी लूटमार होते. काही ठिकाणची निवासस्थानं सुसज्ज असतात. काही ठिकाणी तोंडघशी पडायला होतं. त्यामुळे ही सगळी अद्ययावत माहिती बाळगणारे आणि पर्यटकाभिमुख अचूक सल्ला देणारे प्रामाणिक लोक आता हवे आहेत. या कामासाठी कार्यालय स्थापन करण्याची गरज नाही. सल्लागार स्त्री किंवा पुरुष घरबसल्या ही सेवा ऑनलाइन पुरवू शकतील.’

मानसीवहिनी म्हणाल्या, ‘खरेदीतही फसवतात हो काही काही ठिकाणचे दुकानदार. अहो, आपण बँकॉकला गेलो होतो तेव्हाचं आठवतंय? तुम्हाला काय आठवणार म्हणा? तुमचं लक्ष भलतीकडेच असायचं. अचलाताई, सगळ्या वस्तू बनावट निघाल्या. अगदी कपडेसुद्धा! अशा सल्लागारांची नक्कीच गरज आहे.’

सागरराव उठून उभे राहिले आणि बीअरचा शेवटचा घोट घेत म्हणाले, ‘वहिनी, सॉलिड भूक लागलीय. जेवण वाढायला घेताय ना?’

vardesd@gmail.com