हिमालयावर जे काही शोधकार्य जागतिक पातळीवर झालंय ते शेखरदांनी मनात साठवलंय. हिंदी, संस्कृत, प्राकृत, उर्दू सकट विविध भाषांतील कथा, कहाण्या, कवितांसह. पर्यावरणाचा र्‍हास देशोदेशीचे सत्ताधीश सोडता सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय. शेखरदा त्याबद्दल कित्येक तथ्ये आपल्यासमोर ठेवतात, संभावना सांगतात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही निराशेनं कडवट, नकारात्मक भूमिका घेत नाहीत…

‘हिमालय’ या उत्तुंग विषयावर एक चालताबोलता, अतिशय रसाळ विश्वकोश म्हणजे डॉ. शेखर पाठक. त्याच्याच अंगणात जन्मलेला, अंगाखांद्यावर खेळत वाढलेला… पण एवढंच नाही- ते कुमाऊँ युनिव्हर्सिटीमध्ये इतिहासाचे प्राध्यापक, पर्यावरण जागृतीसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, लेखक, संपादक आणि ‘पहाड’(PAHAR म्हणजे पीपल्स असोसिएशन फॉर हिमालय एरिया रिसर्च) या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापकही आहेत. अकॅडेमिक्स आणि ग्रासरूट लेव्हल या दोन्ही पातळींवर इतकं सखोल ज्ञान बाळगून असलेला आणि तथ्यांवर आपली पकड मजबूत ठेवून, हिमालयीन पर्यावरणासाठी ठोस कार्य करणारा शेखरदांसारखा देशबांधव म्हणजे समाजाला हिमालयाचीच देणगी! निगर्वी, उंच सुदर्शन शेखरदांचं हे सगळं कार्य एखाद्या पहाडात पाय घट्ट रोवून उभ्या विशाल वृक्षराजाच्या वेगवेगळ्या शाखांसारखं, फैलावत जाणारं…

हिमालयीन प्रदेशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासावर शोधकार्यासाठी जवाहरलाल नेहरू फेलोशीपनं गौरविलेल्या या अभ्यासकाला तीन मूर्तिभवनाच्या ग्रंथालयात बसून शोधकार्य ज्या समरसतेने करता येतं; त्याच आत्मीयतेनं तो हिमालय पालथा घालतो. दर १० वर्षांनी हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशातून पिथोरागढ जिल्ह्यातल्या नेपाळ सीमेवरील अस्कोटपासून ते हिमाचल प्रदेशच्या सीमेवरल्या आराकोटपर्यंत ११५० कि. मी लांबीच्या पदयात्रेने पर्यावरणातले बदल जाणून घेणं, तसंच जनमानसाशी स्थानिक बोलीभाषेतून थेट संवाद साधणं अत्यावश्यक वाटतं. १९७५ पासून सुरू झालेल्या या ४५ दिवसांच्या पदयात्रेत गढवाल आणि कुमाऊँचे कॉलेजकुमार तसेच कामाचे साथी असतातच, पण इतरेजनांनाही हवं तेव्हा, हवे तितके दिवस सामील होता येतं. मुख्य म्हणजे पैसे घेऊन नाही, आवश्यक गोष्टी फक्त.

जेवणाखाण्याची साधी व्यवस्था वेगवेगळ्या टप्प्यावरले ग्रामजन प्रेमानं करतात. यात्रेत सर्वांसाठी नियम सारखेच. जाती-धर्माचा उच्चार निषिद्ध. माणूस हीच एक जात. एकदा यात्रेच्या मार्गात मुक्कामाठिकाणी तिथल्या दलित यजमानाला शंका आली की यात काही उच्चवर्णीय आहेत. त्यांना घरी जेवू घातल्यास आपल्याला पाप लागणार ही रूढ समाज रीत. म्हणून भीतीपोटी त्यानं जेवण वाढायला नकार दिला. सगळे तसेच उपाशी झोपले, पण जात नाही सांगितली. शेखरदांच्या समाज परिवर्तनाची चाकं शांतपणे अशी फिरतात- गावोगाव. दुसरा किस्सा : अलमोडा जिल्ह्यातल्या खेड्यात शेखरदांनी एका म्हातारबुवांना विचारलं, ‘‘इथला एमएलए कोण?’’ या शब्दाशी अपरिचित ते आपले असेच म्हणाले, ‘‘अहो, इतक्या उंचीवर कुठून होनार येमेले?’’

‘‘तसं नाही. इथला नेता कोण?’’ म्हटल्यावर आजोबा विचारात पडले, ‘‘नेता वगैरे कोणी नाहीये, इथे डी.एम साहेब आले होते ४-५ वर्षांपूर्वी.’’ यावरून पहाडी खेड्यापाड्यांतल्या राजकीय जागरूकतेची कल्पना यावी.  पदयात्रेत मुख्य भर निरीक्षणावर- पर्वत, जंगल, झाडंझुडपं, जनावरं, पशु-पक्षी, माणसं आणि संस्कृती यांच्या तपशिलांसह रस्त्यात येऊन भेटणार्‍या अनेकांशी संवाद. त्यांच्याकडून ताजी माहिती आणि समस्यांबद्दल (‘गावात आता २२ होम स्टे झाले’पासून ‘अमुक एक सरकारी शाळा बंद पडली’पर्यंत) जाणून घेणं. ते शक्य त्या संबंधितांपर्यंत पोहोचवून उपाय शोधणं. रोज आठेक तास रस्त्याने चालताना कुमाऊंनी गाणी नाचत- गात, हसतखेळत मार्गक्रमणा… अगदी प्राथमिक गरजा ठेवून केलेली ‘अआअ’ (अस्कोट -आराकोट अभियान) पदयात्रा म्हणजे मिळेल ते खाणं-पिणं, वेळ पडल्यास चणे, सत्तू खाऊन गुजराण करणं / मिळेल तशा अंथरूण पांघरुणात झोपणं/ अंघोळी वगैरे… ही यात्रा करणार्‍या प्रत्येकाचाच अनुभव हा की यातून जे शिकायला मिळालं ते शाळा-कॉलेजातल्या पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप वेगळं- खरंखुरं! हिमालयातील जल-जंगल-जमीन-जन यांची परिस्थिती तर इतक्या तेजीनं बदलते आहे की, जनमतावर सत्तेचा बुलडोझर फिरवून ‘विकास’ केवढी दूरगामी किंमत वसूल करून गेलाय हे कळतं. पण हे शाळा-कॉलेजमधल्या छापील गुर्‍हाळ चालवणार्‍या शिक्षकांना नाही जाणून घ्यावंसं वाटत. अशा यात्रांमध्ये त्यांना सामील केलं पाहिजे आणि या यात्रेत शिकल्या-सवरल्यांनी जमेल तितक्या शैक्षणिक संस्थात जाऊन यातले वन विज्ञान, भूगर्भशास्त्र आणि जल संसाधनांच्या वापर व व्यवस्थापनाचे अनुभव विद्यार्थ्यांना/ गावकर्‍यांना सांगितले पाहिजेत… यावर सर्वांचे जोरदार एकमत!

शेखरदांसारखा एकाग्रतेनं काम करणारा, पंचाहत्तरीतही संगणकाला लाजवणारी स्मरणशक्ती असणारा, अमोघ वक्तृत्वाचा आणि अफाट बौद्धिक क्षमतांचं सार्थक करून ‘बहुजन हिताय’ हाच जीवनाचा मार्ग बनवणारा विरळा. ते पहाडांवरच्या प्रेमाचं शब्दजाल नाही विणत. म्हणूनच हिमालयावरील त्यांच्या कुठल्याही भाषणाच्या श्रवणभक्तीची संधी ज्याला लाभते, तो कधी रिक्तहस्ते परत जात नाही. स्वानुभव सांगायचा तर हिमालय म्हणजे आपल्या देशात नकाशावर दिसतो तेवढाच मनात येत असे. पण नगाधिराज अलीकडे-पलीकडे एकूण २,५०० किलोमीटर लांबीत पसरलेला आहे हे खडबडून जाणवलं. दरवर्षी भूगर्भातील भारतीय प्लेटने युरेशियाई (तिबेटन) प्लेटला धक्का दिल्यानं २-४ मि.मी.ने वर उठतो हिमालय! या पर्वतशृंखलेत २०,००० फुटांहून कमी उंचीचे अनेक ‘बच्चा पहाड’ प्रथमच लक्षात आले! आपल्याखेरीज देशांच्या सीमा इतर सहा देशांच्या सीमा म्हणजे नेपाळ, भूतान, चीन (तिबेट), पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमार या पर्वताला लागून आहेत आणि पर्वतीय पर्यावरण एकच असल्यानं हिमालयाचं स्वास्थ्य /अस्वास्थ्य सगळ्यांनाच दूरगामी परिणाम देणारं आहे. हिमालयाचं क्षेत्रफळ पृथ्वीच्या क्षेत्रफळाच्या साधारण .३ टक्के आणि जगातली १० टक्के जैविक विविधता त्यात आहे. आपल्या सर्व मोठ्या नद्या म्हणजे गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा हिमालयातूनच उगम पावतात आणि ठिकठिकाणी येऊन मिळणार्‍या उपनद्यांबरोबर देशाच्या ४४ टक्के भौगोलिक प्रदेशात त्या पाणी पोहोचवतात. भराभर नोट्स घेतल्यास असं काही काही हाती लागतं. थोडक्यात काय तर, डोळ्यांना सुखावणार्‍या शुभ्रतम हिमालयाबरोबरचा देखणेपणावर भाळून सुरू झालेला रोमांस संपतो आणि आपला दाता, रक्षणकर्ता म्हणून उभ्या ठाकलेल्या पर्वतराजाबरोबर डोळस, कृतज्ञ प्रेमाचा गहिरा अध्याय सुरू होतो.

हिमालयावर आजवर जे काही शोधकार्य जागतिक पातळीवर झालंय ते शेखरदांनी ग्रहण करून मनात साठवून ठेवलंय. हिंदी, संस्कृत, प्राकृत, उर्दू सकट विविध भाषांतील कथा, कहाण्या, कवितांसह. पर्यावरणाचा र्‍हास देशोदेशीचे सत्ताधीश सोडता सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय आहे. शेखरदा त्याबद्दल कित्येक तथ्ये आपल्यासमोर ठेवतात, संभावना सांगतात, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कधीही निराशेनं कडवट, नकारात्मक भूमिका घेत नाहीत. ‘‘लडने- झगडने से कुछ हासील नहीं होगा. मसला सिर्फ पहाडों का नहीं, पूरे देश का है. देश का ही क्यों, पूरे विश्व का है. अमेझॉन के रेनफॉरेस्ट का एक हिस्सा खत्म होने से आशियाई देशों का मान्सून पॅटर्न बिगड गया है. ऐसे अनेक विश्वव्यापी तथ्य साबित हो चुके हैं… म्हणून धोरणांना विरोध म्हणजे देशद्रोह हे सोयीस्कर समीकरण मोडून काढायला हवं.’’ २०१५ मध्ये देशातील वाढती असहिष्णुता आणि हिमालयीन प्रदेशातील पर्यावरणाकडे होणार्‍या दुर्लक्षाच्या विरोधात शेखरदांनी सरकारला पद्मश्री पुरस्कार परत केला.

शेखरदांचा लोकसंग्रह त्यांच्या ज्ञानाइतकाच विशाल. त्यांच्याबरोबर दोन अतिशय गुणी पहाडी व्यक्तींचे पाय आमच्या खेड्यातल्या घराला लागले. एक म्हणजे हिमालय व पहाडी निसर्गाचे तज्ज्ञ छायाचित्रकार पद्मश्री अनुप साह आणि दुसरे म्हणजे हिमालयावर जीवापाड प्रेम करणारे पहाडी आवाजाचे कवी गिर्दा ऊर्फ गिरीश तिवाडी. ही सगळी मंडळी चिपको आंदोलनातही एकमेकांसोबत होती. १९७७ मध्ये जेव्हा नैनितालच्या जंगलांचा लिलाव सरकारने जाहीर केला तेव्हा याविरोधात ज्वलंत निदर्शनं झाली. भूमिगत झालेल्या मित्रांमध्ये बसून गिर्दांनी रातोरात चळवळीसाठी एक गीत लिहून- ‘आज हिमालय तुमन को धत्यूं छ, जागो जागो ओ मेरे लाल…’ त्याला पहाडी लोकगीताची चाल लावली. गिर्दांच्या खड्या, धारदार आवाजाची अशी ओढ की ते घराघरांत जाऊन पोहोचलं आणि आजही राज्य- गीतासारखं सभा-समारोहात गायलं जातं. ते अंगणातल्या जर्दाळूच्या डेरेदार झाडाखाली गिर्दांच्या तोंडून ऐकण्याचं भाग्य आम्हाला लाभलं.

शेखरदा हा खरोखरच लोकांचा माणूस आहे. त्यांच्या पुस्तकांतून आणि भाषणांतून ते लोकांशी ज्या मैत्रीपूर्ण शैलीत संवाद साधत असतात, त्यात आपल्याला माहीत आहे ते इतरांशी वाटून घ्यायची कळकळ स्पष्ट दिसते. समूहशक्तीवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांना ज्ञानानं जागरूक करून समाज बांधायचा असतो. आजवरच्या सामाजिक आंदोलनांतून नेतृत्व करण्याची क्षमता दिसते, पण सत्तेचं आकर्षण शून्य. इंग्रजीत आणि हिंदीत प्रकाशित त्यांचं ‘चिपको-मूव्हमेंट अ पीपल्स हिस्ट्री’ चंडी प्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणांनी उभारलेल्या चिपको आंदोलनाची ‘बखर’ म्हणायला हवी. ऐतिहासिक तथ्यांसाठी लिहिलेली. दोन खंडात प्रकाशित झालेली हिंदीतली ‘दास्तान -ए -हिमालय’ तर प्रत्येक भारतीय भाषेत अनुवादित व्हावी अशी.

हिमालयाबद्दल, त्याच्या लाखो वर्षांपूर्वीच्या उद्भवापासून आजवरच्या स्वरूपापर्यंत सर्वांगाने माहिती देणारी खाण आहे. गेली ५० वर्षे हिमालयाचा झालेला अभूतपूर्व र्‍हास ही सर्वांत दुर्दैवी बाब! देशोदेशी तिबेट, हिमालय आणि नद्यांबद्दलच्या सर्वंकष ज्ञानाचा आणि लोकजीवनाचा संसाधक म्हणून त्यांना जगभर मागणी आहे, पण त्यांना न पैशाचा लोभ, न कुठल्या पदाचा. आयुष्यात आपल्याला काय करायचंय याबद्दल एवढी स्पष्टता आणि दृढता अभावानेच पाहायला मिळते. त्यांना सावलीसारखी साथ आणि कामातही सहयोग देणार्‍या उमाजी आणि शेखरदा म्हणजे ‘रब ने मिलायी जोडी’ आहे. शेखर पाठक म्हणजे असीम ज्ञान, आदर्शवाद, व्यवहारकुशलता आणि आशेचं सबळ रूप आहेत- हिमालय की छांव में राहणार्‍या आपणा सर्व भारतवासीयांसाठी! arundhati.deosthale@gmail.com